अनाथांचा नाथ

नंदन रहाणे

धर्मसत्तेला उघड्यावर पडलेल्या त्या बालकांची दया आली नाही. त्यांच्यातील थोरल्या मुलानं त्या सगळ्या वेदना स्वतःत मुरवून टाकल्या. एवढंच नाही तर त्या खलप्रवृत्तीच्या अंगणात त्यानं ज्ञानरूपी अमृताचं झाड लावलं. त्यानंतर त्यालाच गुरुस्थान देऊन गेली ७०० वर्ष महाराष्ट्र त्याचे विचार जगतो आहे. तो मुलगा म्हणजे अनाथांचा नाथ श्री निवृत्तीनाथ...

श्री निवृत्तीनाथ हे लौकिकार्थाने श्री ज्ञानदेवांचे मोठे बंधू. मात्र, ज्ञानदेवांनी त्यांच्या भाऊपणापेक्षा त्यांच्या गुरुपदाचा उदोकार सदैव सर्वत्र केल्याचा प्रत्यय ज्ञानेश्‍वरीत ठायीठायी येतो. गीतेवरचं भाष्य मराठीत करत असताना, ज्ञानदेवांच्या चित्तवृत्ती अतिशय फुलून आलेल्या आहेत. त्यांचा देह, त्यांची बुद्धी, त्यांची प्रज्ञा, प्रतिभा आणि आत्मशक्ती ऐन तारुण्यात असल्याचं आपल्याला अगदी आजही जाणवतं. आपण काहीतरी जगावेगळं करू घातलं आहे, याची ठसठशीत जाणीव त्यांच्या मनात सतत जागी आहे. त्याविषयीचा आत्मविश्‍वास आणि अभिमान त्यांच्या ओव्यांमधून ओसंडून वाहताना दिसतो. निरूपण करण्याच्या ओघात, कित्येकदा ज्ञानदेव रूपकांची, उपमांची, उत्प्रेक्षांची, दृष्टांतांची झाड लावून देतात. किती किती सांगू, कायकाय सांगू, कसं, कशाप्रकारे सांगू असं त्यांना होऊन जातं. अशा वेळी अनावर झालेल्या त्यांच्या चित्तवृत्तींना आणि ओसंडणार्‍या काव्यशक्तीला देखील लगाम घालण्याचं काम निवृत्तीनाथ करतात आणि ते ज्ञानदेवही निःसंकोचपणे नोंदवून पुढे सरकतात, असा जगावेगळा प्रकारही ज्ञानेश्‍वरीत अनुभवाला येतो. गुरू म्हणून निवृत्तीनाथांविषयीचा जो श्रद्धाभाव ज्ञानदेव ठिकठिकाणी प्रकट करतात तो विलक्षण तर आहेच; पण अतिशय विलोभनीय देखील आहे. त्या दृष्टीनं पंधराव्या अध्यायातील पहिल्या २१ ओव्या फारच हृदयगम आहेत. पुढं अठराव्या अध्यायातही १७४८ ते १७६८ या ओव्यांमध्ये ते असंच उचंबळून आलं आहे. आपल्या ग्रंथकर्तृत्त्वाचं संपूर्ण श्रेय ज्ञानेश्‍वर निवृत्तीनाथांना देतात हे फारच अद्भुत आहे. हा पूज्यभाव बंधू म्हणून नाही तर गुरू म्हणून आहे हे उघडच आहे. ज्ञानदेवांचे जे गुरू ते समस्त वारकर्‍यांचे महागुरू हे ओघानं आलंच. आणि जे जे वारकरी संप्रदायाचं ते ते सगळ्या महाराष्ट्राचं या न्यायानं श्री निवृत्तीनाथ हे सकल महाराष्ट्राचे आद्यगुरू हे तर निर्विवाद अन् स्वयंसिद्धी प्रस्थापन म्हटले पाहिजे.

निवृत्ती हे त्यांचं मूळ नाव आहे. या चारही भावंडांची ही जी विलक्षण नावं विठ्ठलपंतांनी ठेवली आहेत, त्यातून त्यांच्याही प्रगल्भतेचं दर्शन आपोआप घडून जातं. संन्यासानंतर संसारात परतल्यावर विठ्ठलपंतांना झालेलं पहिलं अपत्य ते हेच. त्याचंही नाव त्यांनी जाणीवपूर्वक ‘निवृत्ती’ असं ठेवलं. म्हणजे विरही पत्नी रुक्मिणीची व्यथा भ्रमंतीत असलेल्या त्यांच्या गुरुंना योगायोगानं समजली आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंतांनी पुन्हा संसाराचा अंगीकार केला तरी त्यांच्या मनातले सर्वसंगपरित्यागाचे विचार म्हणा, वेड म्हणा कधीही गेलं नव्हतं, हेच त्या नामकरणातून दिसतं. या ज्येष्ठ पुत्र निवृत्तीचा जन्म शके १९९५ मधल्या माघ वद्य प्रतिपदेचा आहे. त्याचं इसवी सन वर्ष येतं १२७३. याचा अर्थ असा होतो की, वारकरी संप्रदायाचे आद्यसंत, आद्यसंघटक, आद्यअभंगकार, आद्यकीर्तनकार श्रीनामदेव महाराज यांच्यापेक्षा श्रीनिवृत्ती महाराज हे निदान सव्वातीन वर्षांनी तरी लहान आहेत. असं असूनही, ज्ञानदेवांप्रमाणंच नामदेव आणि मग सावता, नरहरी, गोरोबा, चोखोबा, परिसा, जगमित्र, बंका आदी करून सर्व संतमंडळ त्यांना आद्यगुरुपदाचा मान देताना दिसतं. हे खूपच स्पृहणीय आणि कुतूहलजनक आहे यात शंका नाही. हे गुरुत्व त्यांना गहिनीनाथांच्या अनुग्रहामुळं मिळालेलं आहे. गहिनी हे नाथ संप्रदायातले एक महत्त्वाचे सिद्धपुरुष. त्यांनी प्रथमदर्शनीच या निवृत्तीची आध्यात्मिक योग्यता जाणली आणि त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करून गुरुमंत्रही दिला. साहजिकच निवृत्तीचा ‘श्री निवृत्तीनाथ’ झाला. जीवनाला कलाटणी देणारा हा प्रकार घडला तेव्हा निवृत्तीचे वय फारतर दहाबारा वर्षांचं असेल. म्हणजे अगदी कोवळ्या वयात निवृत्तीला ‘नाथ’पणाचा ‘लाभ’ आपोआप झाला आहे! ते त्यानं अथवा त्यांच्या आईवडिलांनी ठरवलेलं ध्येय नव्हतं! त्र्यंबकेश्‍वरच्या श्रीपर्वतावरील गहन अरण्यात व्याघ्रदर्शनानंतरच्या चुकामुकीत, योगायोगानं निवृत्ती कड्यापोटी असलेल्या गुंफेत पोचला आणि तिथं त्याला श्रीगुरुगहिनीनाथांचं दर्शन झालं हा प्रसंग सर्वज्ञात आहे. नियतीनं केलेल्या या एका लहानशा खेळीतून पुढे महाराष्ट्राचा आध्यात्मिक पट औरसचौरस विस्तारत गेला असंच आता म्हणावं लागेल!

ज्या संप्रदायाची दीक्षा निवृत्तीदेवांना मिळाली तो नाथ संप्रदाय मध्ययुगातल्या भारतीय धर्मजीवनातलं एक अतिशय गूढ प्रकरण आहे. साधारणपणे दहाव्या शतकापासून नाथांचा आढळ भारतभर सर्वत्र होऊ लागतो. या पंथाचा प्रारंभ आदिनाथांपासून झाल्याचं सर्व मानतात. आदिनाथ म्हणजेच शंकर यावरही सर्वांचं एकमत आहे. मग येतात मच्छिंद्रनाथ, मानवी देहधारी पहिले नाथ ते हेच असं सर्व मानतात. त्यांच्यासह पुढे एकंदर नऊ नाथ मुख्य असल्याचं सांगितलं जातं. मात्र, वेगवेगळ्या परंपरांमध्ये त्यांची नावे वेगवेगळी येतात. शिवाय पुढे त्यात इतके वैविध्य आहे, की नेट धरून करू म्हणणाराही थकून जाईल. या नाथमंडळींच्या संचाराची व्याप्ती कच्छपासून कामरूपपर्यंत आणि काश्मिरपासून केरळपर्यंत अशी सर्व भारतभर आहे. त्यांच्या कथा ऐकल्या की स्थल, काल, वर्ण, जाती, नाम, रूप या सगळ्यांच्या पलिकडे ते असल्याचं लक्षात येतं. मात्र, नऊ प्रमुख नाथांमध्ये देखील, पहिल्या नाथांपेक्षा म्हणजे मत्स्येंद्रनाथांपेक्षा गोरक्षनाथांचा महिमा मोठा आहे, हेही जाणवतं. कारण, त्यांनी चक्क आपल्या गुरुंनाच, मच्छिंद्रनाथांनाच योगिनींच्या समूहातून मुक्त केलं. थेट नेपाळचा हिंदू समाज त्यांच्या भक्तिपोटी स्वतःला गोरखा म्हणवून घेतो. अशा या गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ आणि त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ. पण, हा संबंध केवळ या पिढीतला नव्हे. श्री निवृत्तीदेवांचे आजोबा गोविंदपंत आणि आजी नीराबाई या उभयतांनाही गहिनीनाथांचाच उपदेश प्राप्त झालेला होता. म्हणजे इ.स. १२८५च्याही आधी पन्नास साठ वर्ष नाथांचा महिमा निवृत्तीच्या घराण्याला ठावूक आहे.

निवृत्तीनंतर ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्ता यांचे जन्म होत गेले, तसतसा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचा छळही वाढत गेला. लहानग्या लेकरांचं तर अस्तित्वच नाकारलं गेलं. धर्मनिष्ठ मायबापांनी आपले देह जलार्पण करून प्रायश्‍चित्त घेतलं तरी ब्राह्मणी धर्मसत्तेला उघड्यावर पडलेल्या अजाण, अनाथ बालकांची दया आली नाही. त्यांची होरपळ आणि वणवण सुरूच राहिली ती थेट १२९१ पर्यंत. म्हणजे पैठणचा वेदपठणाचा प्रसंग घडेपर्यंत. म्हणजे निदान सलग १८ वर्ष निवृत्तीनं धर्मांध निर्दयांचं हे आतंकपर्व अनुभवलं आहे. कारण, आईवडिलांमागे तोच एक मोठा होता. साहजिकच सगळे आघात आधी त्याच्यावर पडलेले आहेत अन् त्यालाच अधिक तीव्रतेनं सोसावे लागले आहेत. तो सगळा ताप, त्या सगळ्या वेदना, त्या सगळ्या निर्भर्त्सना त्या पोरानं कशा स्वतःतच मुरवून, जिरवून टाकल्या असतील हे त्याचं तोच जाणे! त्याला गुरुस्थान देऊन, गेली ७०० वर्ष महाराष्ट्र करतो आहे ते केवळ सत्ताधुंद ब्रह्मवृंदाचं पापक्षालन!

कोवळ्या वयात नाथ संप्रदायाची महत्ता ज्याच्या गळ्यात आपणहून पडली त्या ‘कुमार’ निवृत्तीची मनोधारणा काय होती हे महाराष्ट्रानं कधीतरी समजावून घेतलं पाहिजे. आपल्या सुदैवानं, त्याची वैचारिक बैठक जशीच्या तशी आपल्याला उपलब्ध आहे! हे उपकारदेखील नेहमीप्रमाणेच श्री नामदेवरायांचे म्हटले पाहिजेत! कारण त्यांनी श्री निवृत्तीदेवांचे बोल ध्वनिमुद्रित करावेत तसे लिहून ठेवलेत! ब्राह्मणाच्या मुलाची मुंज आठव्या वर्षी होते. म्हणजे हा प्रसंग निवृत्तीच्या किंवा ज्ञानदेवांच्या किंवा उशिरातउशिरा सोपानाच्या ८व्या वर्षीचा आहे. वर्षांचा अदमास बांधायचा झाला तर इसवी सन १२८१ किंवा १२८३ किंवा सरशेवट १२८५ असू शकेल. मुलं उपनयनाच्या सीमेवर आलेली, वयं उलटून चाललेली. हे पाहून धर्मनिष्ठ वडील धर्मसत्तेपुढे विनंती करायला उभे राहिले. सत्तामदानं धुंद झालेल्या धर्ममार्तण्डांनी त्यांना धुत्कारून लावलं. तो माज आणि वडिलांची ती काकुळती पाहून निवृत्ती म्हणू लागला, ‘नको मला तो धर्म, नको मला ते ब्राह्मण, नको मला ती मुंज… मी क्षत्रिय नाही, ब्राह्मण, वैश्य, शूद्रही नाही… मला वर्ण, जाती, कूळ यांचे अधिकारही नकोत… मी देवगण नाही, यक्ष किन्नर, ऋषिमुनी, निशाचरही नाही… मी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशही नाही…. मी सगुण नाही, साकार नाही, निर्गुण नाही, निराकार नाही… मी आहे अनादी, अनंत, अव्यक्त, अविनाशी! ज्याला आत्मबोध होईल त्यालाच माझं स्वरूप समजेल! ज्ञानदेवा, ऐक, माझी परंपरा ही अशी आहे!’

निवृत्तीनाथ हे असे होते. परिपूर्ण अन् परिणतप्रज्ञही केवळ ज्ञानदेवांच्या आग्रहासाठी ते गतानुगतिक, वर्णगंडग्रासित मुढांच्या समूहासमोर पुन्हापुन्हा जात राहिले आणि त्यांनी दिलेलं अवमानाचं आम्ल वारंवार पित राहिले. साक्षात गहिनीनाथांकडून गुरुपदेश मिळाल्यानं त्यांना आपलं आत्मस्वरूप समजलं होतं. त्यामुळंच, अवडंबरानं सिद्ध होणार्‍या ब्राह्मणी धर्मसंस्कारांची त्यांना गरजच वाटत नव्हती. आईवडिलांच्या पश्‍चात नाथपंथीयांचं अनुकरण करून ते देशपरिभ्रमणाला निघूनही जाऊ शकले असते; पण लहानग्या भावा-बहिणींसाठी ते स्वतःच छत्र झाले, प्रतिकूलतेचा ताप अंगावर झेलत राहिले. निवृत्तीनाथ अगदी लहानपणापासूनच सर्व भेदाभेदांच्या पल्याड उभे आहेत. १२९१ किंवा १२९२मध्ये पंढरपूरात झालेल्या नामदेवरायांच्या भेटीमुळं ते आणि इतर भावंडं नामदेवप्रणित संतमंडळात प्रवेश करते झाले आहेत. अन्य सर्व संतांपेक्षा त्यांचा हा प्रवेश उशिरा आणि जवळपास शेवटी झाला आहे. कारण जन्मापासून तारुण्यापर्यंत म्हणजे १२७३ पासून १२९१ पर्यंत निवृत्तीनाथांच्या मागे आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्‍न दुष्टचक्राप्रमाणे लागलेला होता. ते बिचारे आळंदी, चर्‍होली, चाकण अशी पंचक्रोशी, नंतर आपेगाव पैठणपर्यंतची वणवण यातच भोवंडत होते. या दरम्यान, इकडे पंढरपुरात नामदेवांचं उत्कट भक्तिकार्य १२७५ पासून स्वतंत्रपणे सुरू झालेलं होतं आणि त्यातून महाराष्ट्राचं सुविख्यात संतमंडळ आकारालाही आलेलं होतं. या संतमंडळाला भेटताच निवृत्ती आणि ज्ञानदेवांना अतिशय आनंद झालेला आहे. कारण, इतका प्रेमळपणा, इतका मोकळेपणा, इतका निर्मळपणा त्यांच्या वाट्याला याआधी कधी आलेलाच नव्हता. नामदेवांच्या प्रेमधर्मानं त्यांना सामावून घेतलं आणि योग आणि ज्ञानाचे हे पुतळेही अंतर्बाह्य हेलावून गेले. निवृत्तीनाथांच्या नावावर साधारणपणे ३५१ अभंग आढळतात. त्यातल्या किमान ९-१० अभंगांमध्ये त्यांनी नामदेवांचा उल्लेख आनंदानं केलेला आहे. निवृत्ती महाराजांनी नाथ संप्रदायाचा परिवेश न स्वीकारता, नामदेवांच्या संतमंडळाचं गुरूपण आनंदानं आणि आपुलकीनं स्वीकारलं हे त्यांचं मोठेपण.

वारकरी संप्रदायानं माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देण्याचं मोठं कार्य केलं आहे. त्यासाठी नामदेवांनी भक्तीच्या रंगानं, ज्ञानदेवांनी ज्ञानाच्या संगानं आणि निवृत्ती देवांनी योगाच्या अंगानं मोठं मूलभूत काम केलं आहे. काश्मिरी शैवदर्शन म्हणजेच कौलमार्ग हा निवृत्तीनाथांच्या विचारपूंजाचा गाभा. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव यांचं सामरस्य त्यात अभिप्रेत आहे. ज्ञानदेवांचा विद्विलासवाद त्यातूनच येतो. नामदेवांनी तर त्यांच्या संतमंडळात जनाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई यांना स्थान देऊन स्त्री तत्त्वाचा सुयोग्य सन्मानही केलेला होताच. भेदमूलक परंपरा मोडीत काढून, समन्वय साधून, सहिष्णूतेची शिकवण देत समाजाला पुढं घेऊन जायचं हा या मंडळींचा जाणता प्रयत्न होता. त्याला सुयोग्य अधिष्ठान निवृत्तीनाथांनी दिलं आहे. शिव आणि शक्ती, हरी आणि हर यांची एकात्मता समाजावर बिंबवण्याकरता निवृत्तीनाथ लोकयात्रेत सहभागी झाले आहेत. हा सगळा कालखंड अवघ्या सहा वर्षांचाच आहे. इ.स. १२९२ ते १२९७. पण या सहा वर्षांत निवृत्तीनाथांनी केलेल्या संस्कारांनी महाराष्ट्राला गेल्या सहाशे वर्षांत प्रचंड ऊर्जा पुरवली आहे, हे निःसंशय. समता, सहिष्णूता आणि सहजीवन यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांत महाराष्ट्राचा वाटा नेहमीच मोठा राहिला आहे. कारण त्याच्या चार आद्यबिंदूंपैकी एक निवृत्तीनाथ हे आहेत. ते सर्वसंग परित्यागी नाथ होऊ शकले असते; पण ते तसे झाले नाहीत. ते शास्त्रचर्चा विमर्शक आचार्य होऊ शकले असते; पण ते तसेही झाले नाहीत. ते मुमुक्षूजन सांगाती संत होऊन राहिले. कारण सामान्यांविषयीची अपार करुणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.

भक्तितत्त्वाचा जन्म दक्षिणेत झाला असं मानलं जातं. इसवी सनाचे ४थे शतक ते ७वे शतक हा तो कालखंड आहे. जसजशी भक्ती परिपुष्ट होत गेली त्यातून कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडू या प्रदेशात शैव, वैष्णव, जैन, बौद्ध, लिंगायत, ब्राह्मण अशा समूहांमध्ये झगडेही उद्भवले. कधीकधी तर हिंसक संघर्षांचाही उद्रेक झाला. अभिव्यक्तीची अतिरेकी तीव्रता हे दाक्षिणात्य वैशिष्ट्य वगळून, महाराष्ट्रानं विवेक आणि संयम या पायावर भक्ती चळवळीची उभारणी केली. त्याच्या सगळ्या खुणा निवृत्तीनाथांच्या अभंगांत दिसतात. त्यांच्या दुर्मीळ गाथेची पाने उलटता उलटता

‘आमचा आचार आमचा विचार |
सर्व हरिहर एकरुप ॥’
‘वेगळा भाविता वेगळाचि होये |
ब्रह्मासी न साहे तेथिचा मळ ॥’
‘अहिंसेचे स्वरुप हेचि हरिरुप |
म्हणजे हरि आप सर्व आहे॥’
‘श्रुतिशास्त्र वेद यांसी नाही भेद |
भेदवादी हुंदूवेगळे पडे ॥’
‘प्राकृत संस्कृत एकचि पै मथित |
गुरुगम्य हेत पुराण महिमा ॥’
‘पुरुष प्रकृती नांदताती घरी |
अखंड शेजारीब्रह्मसुखे ॥’
‘सौजन्य समाधान सर्व जनार्दन |
आम्हांरुपे धन इतुके पुरे ॥’
‘खुंटले वेदान्त हरपले सिद्धांन्त |
बोलणे धादान्त तेही नाही ॥’

असे जागोजागी भेटणारे त्यांचे चरण वाचले की, मन आजही थक्क होतं. या शब्दांमागे त्या वेळच्या समाजात माजलेले वाद, विवाद, विसंवाद, वितंडवाद दिसू लागतात आणि त्यांचं शमन व्हावं म्हणून आयुष्यही पणाला लावणारे निवृत्तीनाथ स्पष्टपणे जाणवू लागतात. ‘समता वर्तावी अहंता खंडावी | तेणेचि पदवी मोक्षमार्ग ॥’ हेच त्यांचं धर्मांच्या मक्तेदारांना सांगणं होतं. ‘नलगे मुंडणे काया ही दंडणे | अखंड कीर्तने स्मरा हरी ॥’, असा स्पष्ट उपदेश निवृत्तीरायांनी प्रदर्शनवाद्यांना केला आहे. ‘मागे नेद्ये काही प्रेमाविण आणिका | सप्रेमाची भूक कृष्ण करी ॥’ हा निष्कर्ष त्यांनी सामान्यजनांना ऐकवला आहे. ‘परनिंदा झणीं परपीडा जनी | नित्यता कीर्तनीं जपे हरी ॥’ आणि ‘शांतीचे भजन क्षमतेचा कळवळा| गोपाळ सकळां देही नांदे ॥’ एवढीच त्यांची आचारसंहिता आहे. फक्त ‘राम राम जप समत्त्वे साधावा | अहंकार टाकावा अहंबुद्धी ॥’, अशी त्यांची अपेक्षा आहे.

ज्याचं नावच निवृत्ती आहे अशा या महाराष्ट्राच्या आद्यगुरुरावाला, आपल्या आयुष्यात माणुसकीचे, समाधानाचे, उमाळ्याचे, जिव्हाळ्याचे अनुभव फार थोडे आले, मग सुखोपभोग आणि राजोपचार तर दूरच राहिले. मात्र, सामान्य माणूस सतत सुखाची, भोगांची कामना आयुष्यभर करतो अन् संसारात गुरफटतो. हीच त्याची मूळ नैसर्गिक प्रवृत्ती वैचारिक आहे. त्याला धर्मज्ञ म्हणवणारे सतत संन्यासाचा महिमा ऐकवित असतात. त्यामुळं त्याचा गोंधळ उडतो अन् मानसिक ओढाताणही होते, अशा सर्वांना या निवृत्तीराजाने काय ऐकवलं आहे. ते पाहा…

प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज |
जनी वनीं कानकरुनी असती ॥
नारायणनाम जपताचि दोन्ही |
एकतत्त्वीं करणीं सांगी हे गूज ॥

योगियांचे योगी श्री निवृत्तीनाथ यांना भोगियांचे भोगी इंद्रियदास यांचादेखील कळवळा होता. म्हणूनच ते गिरीकंदरात गेले नाही, गुंफाकपाटात बसले नाहीत. सुखासाठी धडपडणार्‍या संसारी भक्तजनांत, स्खलनशील विकारी लोकांत वावरले आणि त्यांना त्यांच्याच भाषेत म्हणाले…

‘समशेज बाज सर्वत्र रे भोगी |
एकरुप जगी हरी नांदे ॥’

अशा या विलक्षण निवृत्तीनाथांना दंडवत घालू नये तर काय करावं?

0 Shares
महासमन्वयक अभंग संपदा