गाणं निवृत्तीचं

विधात्री कीर्तने

शास्त्रीय गायनाच्या कितीही मैफिली ऐकल्या तरी गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं ते अभंगानं वा हरिनामाच्या गजरानं. निवृत्तीनाथांनी आपल्या अभंगांमधून प्रेमभावाचा संदेश दिला. तो गायनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवणार्यामला गायकांनी केलेलं हे संगीतचिंतन...

भावव्याकूळ करणारे अभंग : गोदावरीबाई मुंडे

गोदावरीबाई मुंडे हे वारकरी भजन गायकीतलं लोकप्रिय नाव. सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, हरिनाम सप्ताह, कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकरवर त्यांचे अभंग वाजत असतात. सीडी, कॅसेटच्या दुकांनांमध्येही गोदावरीबाईंच्या अभंग, गवळणींना मोठी मागणी असते. त्यांनी गायलेले नामदेव महाराज रचित निवृत्तीनाथांच्या समाधीचे अभंग प्रसिद्ध आहेत. नामदेवरायांच्या शब्दांमधील अतीव वियोग गोदावरीबाईंचं गायन ऐकणार्‍यालाही व्याकूळ करतो.

वयाच्या बाराव्या वर्षांपासून गोदावरीबाई मुंडे संतांचे अभंग गातायत. लहान वयातच त्यांच्या वडिलांनी त्यांना हाताला धरून गावात होणार्‍या भजनांच्या कार्यक्रमात बसवायला सुरुवात केली. वडील स्वतः सांप्रदायिक असल्यानं गोदावरीबाईंच्या घरातच अभंग, भजनं होत असत. त्यातूनच त्यांना भजनाची गोडी निर्माण झाली. हळूहळू त्या स्वतः भजनाचे कार्यक्रम करू लागल्या. अभंगांना चाली लावणं आणि त्यांचे कार्यक्रम करणं हाच एकमेव ध्यास त्यांनी घेतला. त्या सांगतात, समाधीचे अभंग म्हणजे ज्या संतानं समाधी घेतली आहे त्या संताच्या जीवनावर दुसर्‍या संतांनी रचलेले अभंग. ज्ञानेश्वरांच्या समाधीचे आणि निवृत्तीनाथांच्या समाधीचे अभंग संत नामदेवांनी लिहिले आहेत. समाधीचे अभंग आणि हरिपाठाचे अभंग यातला फरक म्हणजे समाधीच्या अभंगांचा शेवट हा ‘नामा म्हणे’ असा असतो तर हरिपाठाच्या अभंगांचा शेवट हा ‘ज्ञानदेव म्हणे’ असा असतो.

मी संत निवृत्तीनाथांचे समाधीचे अभंग गायले त्याला आता दहा ते बारा वर्षं झालीत; पण अजूनही लोकांचा त्याला प्रतिसाद  कायम आहे. त्याचं झालं असं, की माझे गुरू रमेशमहाराज सेनगावकर एकदा मला म्हणाले की, ‘संत निवृत्तीनाथ हे माउलींचे गुरू. निवृत्तीमहाराजांच्या रचना गेय रूपात यायला पाहिजेत. त्या लोकांच्या ओठावर खेळताना फारशा दिसत नाहीत.’ मग आमचे स्नेही संगीतकार अरुण जोशींनी काही रचना निवडल्या. त्यांनीच संगीत दिलं. त्र्यंबकेश्वरला त्याचं चित्रीकरणही केलंय. ते युट्यूबवर उपलब्ध आहे. ‘निवृत्तीनाथ बैसले समाधी सुचित्त’, ‘समाधीच्या पाळी बैसली सकळी’, ‘विमानी बैसली विठ्ठलसुख मूर्ती’ आदी निवृत्तीनाथांच्या समाधीचे अभंग संत नामदेवांनी मोठ्या भावविभोर स्थितीत लिहिले आहेत. ते ऐकताना श्रोत्यांचीही समाधी लागते. नव्या पिढीकडूनही मला या गीतबद्ध रचना आवडल्याचे फोन येतात तेव्हा खूप बरं वाटतं. कारण आपलं संतसाहित्य आजच्या प्रश्नांचीही उत्तरं सांगतं. ते शाश्वत आणि वैश्विक आहे.

अभंगांत मी रमतो : प्रभाकर कारेकर

मी वयाच्या अकराव्या वर्षापासून गाणं शिकायला सुरुवात केली. गाण्याची प्रेरणा मला वडिलांकडून मिळाली. तेही भजनं गात असत. त्यामुळं मी सतत भजनं, अभंग ऐकत गेलो. माझ्या गुरूंनीही त्यातील गोडी वाढवली. आजही भजनातून वा अभंगातून मला जेवढा आनंद मिळतो, तो अन्य कशातूनच मिळत नाही.

मी संत निवृत्तीनाथांचा पहिला अभंग गायलो तो होता जसवंत यांनी संगीत दिलेला. तो ‘तोचि नारायणा’ हा अभंग गाताना मला विलक्षण आनंद वाटत होता. निवृत्तीनाथांचे अभंग गाताना आपलं मुख गोडावत जातं. या निर्गुण अभंगांना चाल लावायलाही वेळ लागत नाही. मला आठवतंय कवी बा. भ. बोरकर यांच्या शतकपूर्तीच्या निमित्तानं मी गोव्यात एक कार्यक्रम केला होता. त्यात बोरकरांच्या एका कवितेला मी लावलेली चाल लोकांनाही खूपच आवडली. लोक अजूनही मला कार्यक्रमांमध्ये ती कविता अभंगाप्रमाणं गायला सांगतात.

‘ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत
वेद झाले रानभरी गोंधळले संत
ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती
आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती
ज्ञानदेव गेला तेव्हा तडा विटे गेला
बाप रखमा देविवरु कटीत वाकला’

अशा त्या कवितेतील काही ओळी आहेत. हे गाताना मला एक वेगळीच समाधी लागते. करुण, आनंद, भक्ती सगळेच रस एकवटून येतात. मी त्यात बुडून जातो.

शास्त्रीय संगीत गाण्यापूर्वी आपण रियाज करतो. तसं भजन गाण्यापूर्वी मी अभंग नीट वाचतो. त्याचा माझ्या मनावर परिणाम होतो. मनात अभंगातील भाव उतरतो आणि तो गायनातून ओठांवर येतो. त्यामुळं मला जर कधीही कुणी अभंग गायला सांगितला तर मी नाही गात.

माझे गुरूजी सुरेशबुवा हळदणकर भजनं खूप छान गायचे. मी भीमसेनबुवांची भजनंही खूप ऐकायचो. त्यामुळं मला भजनाची गोडी लागली. माझ्या मते भजन ही एक भक्ती आहे. भजन गाताना त्यावर भक्तीनं संस्कार करणं अपेक्षित असतं. आपण भजन भावभक्तीनं गायलो तरच त्यातील अभंगांना आपण न्याय देऊ शकतो. मी ज्या संतांचे अभंग गातो त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर गाताना उभी राहते. त्यात मी डुबून जातो. त्यामुळंच अनेकदा माझे कार्यक्रम ठरलेल्या वेळेच्या पलिकडं जातात.

माझं असं ठाम मत आहे की, सर्व संत संगीताचे नीट जाणकार होते. त्यांनी लिहिलेला प्रत्येक अभंग सुंदर चालीत म्हणता येतो. कारण त्यांनी या अभंगरचना विशिष्ट रागात, चालीत बांधल्यात. या रचना एका रागात एका तालात एका भक्तीत बांधल्या गेल्यानं त्याची श्रीमंती वाढलीय. या सगळ्या संतांनी आमच्यावर खूप मोठी कृपा करून ठेवलीय. त्यांचे अभंग आयुष्यभर तृप्त आनंद देत आलेत. या अभंगांची गोडी हजारो वर्ष अशीच राहील.

निवृत्ती हाच अभंगांचा मूळ गाभा : कौशल इनामदार 

संगीत हा माझा आवडीचा विषय असला तरी काव्य हाही माझ्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळं संगीतातलं काव्य वा काव्यातलं संगीत एकमेकांतून बाहेर काढायचं आणि संगीतात काव्याचा अर्थ मिसळायचा, हा माझा छंद आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही काव्याची पुनर्बांधणी करणं मला आवडतं. काव्यातील शब्दांमधलं गुपीत शोधणं या पद्धतीनंच मी आजपर्यंत संगीताकडं बघत आलेलो आहे. त्यामुळं गाणं कुठली गोष्ट सांगतं यात मला जास्त रस असतो. माझा मूळ पिंड हा आस्तिकाचा नसल्यामुळं मी फार अभंग केले नाहीत. माझा पिंड कबीरांच्या ‘सुनो भाई साधू’मधला ‘साधकाचा’ आहे.

जनाबाईंचा ‘दळिता कांडिता, तुज गाईन अनंता’ हा एक अभंग आपण घेतला तर मला नेहमी असं वाटायचं की, जनाबाई यात जे म्हणतायत त्यातून दोन अर्थ निघतात. एक म्हणजे मी सतत तुझं नाव घेत राहीन आणि दुसरा असा की, मी नुसतंच तुझं नाव घेत बसणार नाही, तर ते मी दळिता कांडिता घेईन, म्हणजेच काम करता करता घेईन. त्यामुळं जिथं काम आहे तिथं ऊर्जा वा ‘एनर्जी’ आहे, तिथं ‘लिथार्जी’ नाहीये. त्यामुळं असे अभंग चित्रपटातही त्याच पद्धतीनं चित्रीत व्हावेत, असं मला वाटतं. संतांचे अभंग आजपर्यंत टिकलेत वा चालत आलेत कारण त्यात असलेला वृत्तीरस. एवढंच नाही तर, हे अभंग म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत छोटे छोटे साक्षात्कार आहेत, असं मला वाटतं. कान्होपात्रेचा ‘नको देवराया अंत आता पाहू | प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥’ असा अभंग आहे. तर यात अभंग हे मीटर/वृत्त आहे. या वृत्ताची खासियत अशी आहे की, दुसर्‍या आणि तिसर्‍या छंदात यमक आलं पाहिजे; पण या अभंगाच्या वाक्यांत ते येत नाहीये. त्यामुळं मी शोधलं तर त्याचं मूळ असं आहे, ‘नको देवराया अंत पाहू आता | प्राण हा सर्वथा फुटो पाहे…’  असं ते काव्य आहे. त्यामुळं संपूर्ण अभंगाचं ‘सेंटीमेंट’च बदलतं. त्यामुळं या अभंगाची जी चाल आहे, ती हे शब्द त्यात बसवल्यानंतर तशी असूच शकत नाही. कारण ‘फुटो पाहे’ असं असेल तर तो प्रतिकार त्या चालीत अपेक्षित आहे. यातल्या ‘प्राण हा सर्वथा फुटो पाहे’ या परिस्थितीला आपण प्रत्येकजण सामोरे जात असतो. कुणी आईसाठी, कुणी वडिलांसाठी, कुणी बहिणी-भावांसाठी तर कुणी प्रियकरासाठी. यातला देव हा मुद्दा बाजूला काढला तर अभंगांमधून सर्वसामान्यांचंच विश्व संतांनी उभं केलेलं आहे, हे आपल्याला जाणवतं. कारण अभंगांतील भावना चिरंतन आहेत. त्यामुळंच अभंग हा कुठल्याही काळात अनुरूपच राहतो.

याचप्रमाणं निवृत्तीनाथांचंही काव्य आहे. उदाहरणार्थ त्यांच्या ‘मन कामना हरी | मने बोहरी | चिंतिता श्रीहरी | सुखानंद ॥’ यात दुसर्‍या आणि तिसर्‍या चरणात यमक आहे. एक संगीतकार म्हणून माझ्या काही बाबी लक्षात आल्या. आपल्याकडं काव्य करण्याची परंपरा आहे. ती संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील अशा सगळ्या संतांपासून चालत आलेली आहे. आपण ती काव्य गाऊन सादर करतो. गाताना फक्त अर्थ हा घटक महत्त्वाचा नसतो तर ध्वनीही महत्त्वाचा असतो. निवृत्तीनाथांच्या वरील अभंगात ‘न’चा वापर केलाय. त्यामुळं एक ध्वनी निर्माण होतो. जो आपल्याला काहीतरी सांगत असतो. अर्थाच्या पलिकडं एक मोठी दुनिया आहे. त्यामुळं निवृत्तीनाथांच्या अभंगांच्या बाबतीत मला दोन गोष्टी अशा जाणवल्या की, एक म्हणजे त्यांचं ध्यान समाधी, कीर्तन. आणि निवृत्ती म्हणजे एकूणच सगळ्यापासून अलिप्तता यावर त्यांच्या अभंगात भर दिसतो.

ज्ञानेश्वरांनी नात्यांचाही ठाव घेतलाय त्यांच्या काव्यात. तर निवृत्तीनाथांच्या काव्यात निवृत्ती, ध्यान, विठ्ठलभक्ती हा सूर मला आढळलं. त्यांच्या अनेक अभंगांमध्ये पुंडलिकाचा उल्लेख येतो. त्यामुळं ते स्वतःला पुंडलिकात बघतात वा त्यांचा ‘आयडॉल’ हा पुंडलिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते ज्ञानेश्वरांचे गुरू आहेत; पण ज्ञानेश्वरांसारखा रसाळपणाच नाही तर, अर्थांची साखळीच मला निवृत्तीनाथांच्या काव्यात जाणवते. त्यामुळं त्यांच्या सर्व रचना ‘फिलॉसॉफिकली रिच’ आहेत. निवृत्ती हाच त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळं ते रसाळपणाच्या नादालाच लागलेले नाहीत, हे नक्की.

महाराष्ट्राच्या मातीतच अभंग : अंकिता जोशी

अंकिता ही पं. जसराजजी यांची शिष्या. लहानपणापासूनच तिनं संगीताचा ध्यास घेतला. नांदेडची ही कन्या शास्त्रीय संगीताबरोबरच अभंगांचेही कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात करत असते. अंकिताचे आजोबा मोरेश्वरराव रवंदे हे कीर्तनकार आहेत. त्यामुळं संतवाङ्मयाची परंपरा तिला आजोळपासून मिळाली. लहानपणापासूनच तिच्या कानावर संतांचे अभंग पडत होते. शास्त्रीय संगीताचं सुरुवातीचं शिक्षण तिनं आपल्या मामांकडं म्हणजेच नांदेडला लक्ष्मीकांत रवंदे यांच्याकडून घेतलं. त्यानंतर गाण्याच्या पुढच्या शिक्षणासाठी ती पं. जसराजजी यांच्याकडं गुरूकुल पद्धतीनं राहू लागली. मेवाती घराण्यामध्ये गायल्या जाणार्‍या बंदिशींमध्ये वा अभंगामध्ये एक ‘स्पिरीच्युअलिटी’ आहे. बंदिशी या कृष्णाला, माता कालिकेला म्हणजे देवीला धरून आहेत. शिवाय मी महाराष्ट्रात जन्मला आले असल्यामुळं अभंगांची गोडी मला मातीतूनच मिळालीय. मला अभंग गायला खूप आवडतं. टाळ, मृदंग आणि त्याचा एक ठरावीक बाज मला मोहात पाडतात. मागच्या काही महिन्यांत मी नवी मुंबईत अभंग गायनाचे कार्यक्रम केले. त्यात मी एक गोष्ट नवीन अशी शिकले की, अभंग हे विलंबित ठेक्यातही लोक गातात. ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. फक्त भजनी ठेका न धरता तो आठ मात्रांतही गातात. त्यात सरगम करता. आलापी तर करतातच, तानाही घेतात. ही सगळी जादू आहे.

देव म्हणतो की, जिथं जिथं माझं नाव घेतलं जातं वा नामस्मरण केलं जातं तिथं मी असतो. त्यामुळं या नामस्मरणाला सुरांची आणि लयीची साथ मिळाली तर त्या गुणगुणण्यालाही एक वेगळीच ऊर्जा मिळते.

निवृत्तीनाथांचा प्रभाव : योजना शिवानंद

‘योजना प्रतिष्ठान’ या संस्थेचे विश्वस्त पं. शिवानंद यांनी १९९२मध्ये आषाढी एकादशीच्या अभंगगायन कार्यक्रमाचा संकल्प केला. प्रत्यक्ष कार्यक्रमाची कॅसेट प्रकाशित व्हावी या भक्तिभावनेनं १९९२ मध्ये ‘देवदयानिधी’ या कार्यक्रमातून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. आजपर्यंत पं. जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, सुरेश वाडकर, साधना सरगम, आरती अंकलीकर-टिकेकर, श्रीधर फडके, रामदास कामत यांसारख्या अनेक दिग्गज्जांनी यात आपलं गायन सादर केलं आहे. या संस्थेअंतर्गत चाललेल्या या कार्यक्रमाचं यंदाचं हे पंचविसावं वर्ष आहे.

निवृत्तीनाथांची बहीण आदिमाया मुक्ताई यांचा मी गेल्यावर्षी अभ्यास केला. मुक्ताबाई ही खरंतर निवृत्तीनाथांची धाकटी बहीण आणि शिष्याही; परंतु अभ्यास करताना मला असं आढळलं की, मुक्ताई नंतर निवृत्तीनाथांची गुरू झाली. मुक्ताबाईला निवृत्तीनाथ गुरू मानू लागले. त्यांनी मुक्ताईवर अभंग लिहिलेत. ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनीही मुक्ताईवर आरती लिहिली आहे. म्हणजे स्त्रीचं हे आदिमाया रूप भावंडांनी स्वीकारलं, गुरूंनी स्वीकारलं आणि मग सगळ्या संतांनीही स्वीकारलं. संत ज्ञानेश्वर समाजव्यवस्थेवर, चाली-रितींवर, रूढी-परंपरांवर रागावले होते. त्यांना समाजाकडून झालेला त्रास, अपमान, अवहेलना यामुळं उद्विग्न झाले होते. त्या वेळी निवृत्तीनाथांनी मुक्ताईला ज्ञानेश्वरांची समजूत काढण्याची जबाबदारी दिली. त्यामुळं निवृत्तीनाथ हे एकटे असूच शकत नाहीत. ती चौघं भावंड एकत्र आहेत आणि या भावंडांवर तसंच इतर संतांवर निवृत्तीनाथांचा, त्यांच्या रचनांचा प्रभाव पडलेला दिसतो.

पंडित कल्याणजी गायकवाड

माझं मूळ गाव पैठणजवळ. पण, १९८५मध्ये मी आळंदीला येऊन स्थायिक झालो ते गाणं शिकायला. लहानपणापासून माझे वडील, काका गावातल्या भजनाच्या कार्यक्रमांना मला सोबत नेत. अगदी दोन-तीन वर्षांचा असल्यापासूनच भजनं, अभंग माझ्या कानावर पडत होते. थोडा मोठा झाल्यावर मी ऐकून ऐकून भजनं म्हणायला लागलो. आवाज चांगला असल्यानं लोकांनीही प्रोत्साहन दिलं म्हणूनच मग मी आळंदीला येण्याचा निर्णय घेतला. आळंदीला राहून गाणं शिकण्यासाठी; मात्र मी पुण्यात जात होतो. खंडाळकर म्हणून माझ्या गुरूंकडे मी आठ-दहा वर्ष शिकलो, आणि त्यानंतर पंडित अजय पोहणकर यांच्याकडून मी गेली पंचवीस-तीस वर्ष शास्त्रीय गायन शिकतोय. संगीत सागरासारखं आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ते शिकत राहावं असं मला वाटतं.

कुठलाही गाण्याचा प्रकार गाण्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असावा लागतो म्हणून मी ते शिकलो. आळंदीत आध्यात्मिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही या तत्त्वावर आळंदीत अध्यात्माचं शिक्षण दिलं जातं. अशा खूप संस्था इथं आहेत. शिक्षक घरादाराचा त्याग करून वारकरी मुलांना अध्यात्माचं शिक्षण देतात. त्यामुळे इथं अध्यात्माचा माहोल मला मिळाला आणि जयराम महाराज भोसले यांचीही एक संस्था होती तिथं ज्ञानेश्वरीचा पाठ, गीतेची संता, अभंगगायन होत असे; त्यामुळं अध्यात्मासोबत मला संगीताचा मेळ इथं घालता आला. सुरुवातीला मला अर्थदृष्टी पाहिजे तितकी नसल्यानं या संस्थांमधल्या जाणकार लोकांकडून अभंगांचे अर्थ समजून घेऊन चाली कशा लावाव्यात हे शिकलो. संतांच्या काव्यात फार मोठी ताकद आहे. सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही काव्य केली आहेत आणि त्यातून उपदेश केला आहे. म्हणूनच अर्थ समजून चाल लावली तर तिच्यात तो भाव येतो आणि ती चांगल्या गायकानं गायली की ती आणखीन भावपूर्ण होते. आळंदीत संगीताचं वातावरण पूर्वी कमी होतं. त्यामुळं मी आळंदीत ‘कृष्णाई संगीत शिक्षण संस्था’ या नावानं संस्था स्थापन केली. आपल्याला येतं ते इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांनाही द्यावं या हेतूनं. इथल्या जवळपास हजाराहूनही अधिक वारकरी मुलांना मी विनामूल्य शिकवलंय. गुरूकुल पद्धतीनं अनेक विद्यार्थी राहूनही शिकतात. पैठण आणि आळंदी अशा दोन शाखा मी सुरू केल्या आहेत.

जसे तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गायले जातात तेवढे निवृत्तीनाथांचे अभंग गायले जात नाहीत. मी माझं भाग्य समजतो की खूप पूर्वीपासून मला निवृत्तीनाथ महाराजांचं काव्य माहितेय. त्यांचे अभंगही मी गायलेत आणि सीडीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचतायत. निवृत्तीनाथांनी श्रीकृष्णावर लिहिलेले अभंग अतिशय सुरेख वर्णन करणारे आहेत. काही अभंग हे लघू मात्रेत असतात तर काही अभंग गुरू मात्रेत असतात. त्यात खूप रचना गाण्यासारख्या आहेत. मला असं वाटतं त्याकडे लोकांनी लक्ष देऊन चांगल्या गायकांकडून त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. मी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या नेहमीच गातो.

संगीताची परंपरा या संप्रदायाला फार पूर्वीपासून आहे. कारण ‘जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग’, असं नामदेव महाराज कीर्तन करत असताना जनाबाईंनी ज्ञानेश्वरांना आदेश केला की, तुम्ही अभंग म्हणा. कीर्तन करत असताना अभंग म्हणण्याची एक वेगळी चाल असते. सगळे टाळकरी त्यात एकत्र म्हणतात तर ही चाल ज्ञानेश्वरांना ठाऊक होती याचाच अर्थ संगीताशी त्यांचं नातं होतं. आजही काकडाभजन, हरिपाठाचे अभंग, गौळण या सगळ्याच्या चाली वेगवेगळ्या आहेत. त्यांची स्वतःची वैशिष्ट्यं आहेत. काकडाभजनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पारंपरिक पद्धतीनंच गायलं तर त्याचा भाव खरोखर उमटतो. नाटाचे अभंग असतात त्यात चार ओळींची कडवी असतात. हरिपाठ हा सर्वसामान्य गाऊ शकतील अशा चाली आहेत. सहज आणि सोपी चाल हेच वैशिष्ट्य.

पूर्वीपासून लावलेल्या चाली लोकांमध्ये प्रचलित आहेतच; परंतु आम्ही काही नव्या चाली लावून हे अभंग लोकांसमोर आणले. वारकरी संप्रदायाला गाण्यासाठी नवं भांडवल मिळावं म्हणूनच सुमित स्टुडिओसारख्या कंपनीतर्फे मी पन्नास ते साठ सीडीज बाजारात उपलब्ध केल्या आहेत. त्यातही वारकर्‍याला सहज गाता येईल अशाच चाली आहेत. निवृत्तीनाथांचं काव्य हे मुख्यत्वे श्रीकृष्णावर आहे. ज्याप्रमाणं गौळणींमध्ये कृष्ण आणि राधाच्या क्रीडांचं वर्णन असतं त्याचप्रमाणे नाटांच्या अभंगात मनोरंजन असतं. काही अभंग हे उपदेशपर असतात, ते गंभीर गावे लागतात. नाटांचे सगळेच अभंग गाताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. इतकं मी त्यात वाहून जातो आणि हा अनुभव एकदा-दोनदा नाही तर मी जेव्हा जेव्हा गातो तेव्हा मला प्रत्येक वेळी येतो. त्यांच्या अभंगांवरील कॅसेटचं रेकॉर्डिंग करतानाही माझे डोळे पाणावले होते.

अजित कडकडे

मी गाणं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकलो. खरं म्हणजे मला गाण्याकडं कधीच वळायचं नव्हतं. आमच्या घराण्यात माझे मामा न शिकताही गाणी रेडिओवर ऐकून अतिशय उत्तम गातात. मामा सोडले तर कुणालाच मी कधीही गुणगुणतानाही ऐकलं नाही. त्यामुळे गाण्याचे संस्कार एखाद्या घराण्यात असतात तसे माझ्यावर नव्हते; पण मी इंटरसायन्स करत असताना पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा कार्यक्रम माझ्या गावात होता तो ऐकण्यासाठी गेलो होतो. तेव्हाही मी अगदी शेवटी बसलो होतो. त्या कार्यक्रमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला आणि मी ठरवलं की, आपल्याला गाणं शिकायला पाहिजे आणि तेही बुवांकडेच. कारण त्यांचं गाणं मला अतिशय आवडलं होतं. त्यानंतर मी त्यांच्याकडे शिकायला जायला लागलो. मी वयाच्या अठराव्या वर्षी बुवांकडे जायला लागलो; परंतु सुरुवातीला दोन वर्ष त्यांनी मला काहीच शिकवलं नाही. कारण त्यांना अजिबात वेळ नव्हता आणि मीही अगदी प्राथमिक अवस्थेत होतो. सारेगमप शिकण्यापासून सुरुवात होती. त्या वेळी बुवांकडं पंडित प्रभाकर कारेकर, पंडित राजेश्वर बोबडे, अरविंद पिळगावकर असे मातब्बर कलाकार यायचे. अभिषेकीबुवांचे कार्यक्रम असायचे, ते संगीत नाटकांना संगीत द्यायचे, त्यांचं रेकॉर्डिंग्ज असायचं. त्यामुळं वयाच्या विसाव्या वर्षी माझं खरं शिक्षण सुरू झालं. माझ्या गुरूंचं वैशिष्ट्य मला एकच जाणवतं की, ते शास्त्रीय, नाट्यगीत वा भावगीत वा अभंग काहीही गाऊ द्यात, त्या गाण्याचा भाव त्यात पुरेपूर उतरलेला असायचा. प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ ते गाण्यातून उलगडायचे. बुवांनी हातचं राखून आम्हाला कधीही शिकवलं नाही. ते जे शिकले ते त्यांनी शिष्यांना दिलं. त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत त्यांच्या शिकवण्याचे.

ते नेहमी म्हणायचे की, गाताना तुम्ही ताना मारता आणि आलाप घेता आणि कवींवर अन्याय का करता? कवींनी जे गाणं लिहिलंय वा काव्य लिहिलंय त्याकडं लक्षच देत नाही. लोकांना शब्दच कळत नाहीत. त्यामुळं फक्त ताना घेऊन आणि आलाप करून गायलात तर कवींवर अन्याय होतो. अभिषेकीबुवांनी गायलेले आणि लोकप्रिय झालेले अनेक अभंग आपल्याला संतांचे अभंग वाटतात; परंतु त्यातलं काही काव्य हे बा. भ. बोरकरांच्या कविता आहेत. ज्या वेळी बा. भ. बोरकरांनी त्या कविता अभिषेकीबुवांना दिल्या त्या वेळी मी तिथंच होतो. त्या कविता बुवांना इतक्या आवडल्या की, बुवांनी ज्या आर्ततेनं आणि भावपूर्ण म्हटल्या आहेत त्यावरून जर त्याखाली संत तुकाराम वा एकनाथ वा इतर कुठल्याही संताचं नाव असतं तर ते संतांचंच काव्य वाटलं असतं. बोरकर जास्त अभंग लिहीत नसत. त्यांचं काव्य हे कोंकणी भाषेत जास्त होतं; परंतु त्यांनी जी भावगीतं लिहिली वा अभंग लिहिले ते जोपर्यंत लोकांना सांगत नाही की, हे बोरकरांचं आहे तोवर लोकांना ते संतांचंच वाटे.

बुवांनी आम्हाला कधीच एकही अभंग, एकही नाट्यगीत वा भावगीत शिकवलं नाही. कारण ते फक्त शास्त्रीय संगीत शिकवायचे. मी कार्यक्रम करतानाही सुरुवातीला शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीतच गायचो. मला अभंगांची आणि भक्तिगीतांची आवड नव्हती; त्यामुळं मी कधीच गायचो नाही. मग कोणीतरी मला सांगायचं की, तुम्ही फक्त शास्त्रीय आणि नाट्यगीतंच गाता, तेव्हा तुम्ही अभंगही गा अशी ‘फर्माईश’ व्हायची आणि मी मोठ्या नावडीनं तो अभंग गायचो आणि लगेचच संपवायचो. पण, माझी ‘देवाचीये द्वारी’ ही कॅसेट आली, त्याला प्रभाकर पंडित यांनी संगीत दिलं होतं. त्यात सगळे संतांचे अभंग होते; परंतु कॅसेटच्या रेकॉर्डिंगदरम्यान ते अभंग गाता गाता माझ्यावर त्या अभंगांचा आणि संतांच्या वाङ्मयाचा एवढा प्रभाव पडू लागला की, मला असं वाटायला लागलं की, फक्त चाल सोडली तर या शब्दांमध्ये काहीतरी दडलेलं आहे, गूढ आहे. मला नेहमी असं वाटतं स्वामी समर्थ असतील वा साईबाबा असतील या सगळ्यांनी मला गाण्याकडे वळवलं असेल ते भक्तांपर्यंत पोचवावं यासाठीच. नाहीतर मी कधी याकडे वळलोच नसतो. आता कार्यक्रमांत शास्त्रीय गायल्यानंतर जी ‘फर्माईश’ होते ती अभंगांचीच होते.

0 Shares
हरवलेला नायक साईड हिरो