बालपणीच अनाथपण वाट्याला आलेल्या निवृत्तीनाथादी भावंडांचा जन्म आपेगावला झाला की, आळंदीला यावर वाद होता. त्यावर हायकोर्टानं या भावंडांचं जन्मस्थळ आपेगावच, असा निकाल दिलाय. अज्ञानाचा अंधार दूर करणार्या या प्रकाशमूर्तींच्या जन्मगावाची परिस्थिती सध्या कशी आहे?
नुकताच पाऊस सुरू झालाय. शेतात पेरण्यांची लगबग. मातीतून केवढे तरी नवजात कोंब उगवून आलेत. हिरव्या पायवाटांवरून भगव्या पताका घेऊन आषाढी गाठण्यासाठी पंढरपूरला निघालेले वारकरी रस्त्यात भेटत होते. मी गाडीवर औरंगाबादहून आपेगावला निघालो होतो. औरंगाबादहून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आपेगावचे दिशादर्शक फलक रस्त्यावर क्वचितच लागलेले दिसले. त्यामुळं गाडी थांबवून रस्ता विचारत विचारत आपेगाव गाठलं.
गावात पोचलो. आपेगाव साडेचार हजार लोकवस्तीचं गाव. आता आपेगाव हीच निवृत्तीदेवादी भावंडांची जन्मभूमी असल्याचा निकाल लागून जवळपास चाळीसेक वर्ष झाली. पण, पुरातन मंदिर सोडलं तर गाव कुठल्या विशेष खाणाखुणा अंगावर मिरवताना दिसत नाही. आता मी मंदिराच्या आवारात गेलो. इथल्या प्राचीन मंदिराच्या बाजूलाच नव्यानं दगडी मंदिराची उभारणी सुरू आहे. आवारातच या भावंडांच्या वंशावळीची माहिती देणारा वंशवृक्ष चितारलेला होता. त्यात माउली आणि निवृत्तीनाथांचे पणजोबा हरिहरपंत जावळे हे आपेगावचे कुलकर्णी आणि देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण असल्याचं कंसात लिहिलं होतं. तर तिथं कदम महाराज भेटले. हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकरांनी सुरू केलेल्या निवासी गुरूकुलात ते व्यवस्थापन पाहतात. १५ वर्षांपूर्वी ते कोल्हापूर सोडून इथं आले. एकूण ६५ विद्यार्थी सध्या इथं शिकतात. औरंगाबाद जिल्ह्यासह बीड, लातूर, जालना आदी ठिकाणांहून विद्यार्थी इथं आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. संस्थानात चार-पाच वर्षांपर्यंत कोल्हापूरचे विद्यार्थी, पैलवान यांचा वावर मोठा होता. आता एकही पैलवान नसल्याचं समजलं.
शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी गावात दररोज माधुकरी मागून जेवतात. मंदिराच्या आवारातील अजान वृक्ष आणि सोन्याच्या पिंपळासमोर हे गुरूकुल आहे. इथं पाचव्या इयत्तेपासूनच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यांना कीर्तन-प्रवचन करण्याचे धडे दिले जातात. सोबतच गीता, हरिपाठ, विचारसागर शिकवला जातो. विद्यार्थी पखवाज, तबला, हार्मोनियम वाजवायलाही शिकतात. पहाटे आणि संध्याकाळी ४ ते १० या वेळेत हे सुरू असतं. सोबतच शालेय शिक्षणासाठी ही मुलं गावातल्या जिल्हा परिषद, खासगी शाळेत जातात. मी गेलो तेव्हा सगळी मुलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत गेलेली होती. एकटा कृष्णा ढोले तेवढा महाविद्यालय सुरू असल्यानं मागं राहिलेला. तो म्हणाला, मी सहा वर्षांपूर्वी डोणगावहून इथं आलो. आत्ता बी.ए. सेकंड इअरला आहे. माझी पूर्ण गीता पाठ आहे. मी विचारलं, ‘अर्थ येतो का?’ तो हसला. म्हणाला ‘नाही.’
आता मी गावात ग्रामपंचायतीजवळच्या घरासमोर गावकरी बसलेल्या कट्ट्याजवळ आलो. गावात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान सुरू होतं. चावडीवर अनेक वृद्ध माणसं चर्चा करत बसली होती. त्यांच्यात जाऊन बसलो. त्यातले कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब औटी म्हणाले, ‘आमचं गाव खूप धार्मिक आहे. आता त्याचा पुरावा पाहा की, आज मतदान असूनही गाव केवढं तरी शांत आहे. या गावात राहताना मिळणारं मानसिक बळ मोठंच आहे. तीर्थस्थानाच्या विकासासाठी राज्य शासनानं २०११मध्ये ‘पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. त्याअंतर्गत २०० कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ५५ कोटी मिळाले. त्यातले आजवर केवळ ८५ लाख आपेगावच्या वाट्याला आलेत. गवगवा केवळ पैठणचा होतो. आपेगाव आता कुठं दहा वर्षांपूर्वी लोकांच्या नजरेत आलंय. राजकीय नेतृत्वानं आणि शासनानं मात्र नेहमीच आपेगावावर अन्याय केलाय.’ सोबत बसलेले उत्तम औटे, अण्णासाहेब आणि तात्यासाहेब औटे समर्थनार्थ मान डोलावतात. उत्तमकाका सांगतात, गावात धार्मिक कार्यक्रम मात्र सातत्यानं सुरू असतात. माउलींचा जन्म गोकुळाष्टमीला झालेला. त्या दिवशी मोठा उत्सव असतो. पारायण, हरिपाठ तर वर्षभर सुरूच असतात. तरुण मुलं-मुलीही उत्साहानं सहभागी होतात. गावातील मुस्लीम समाजही नियमितपणे उत्सवाची वर्गणी देतो. हिरीरीनं सहभागही नोंदवतो. महिला गेल्या पाचेक वर्षांपासून हरिपाठाला मंदिरात येतात. त्यांनी मुक्ताई भजनी मंडळ स्थापन केलंय.
तात्यासाहेब औटे बोलत-बोलत मला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणतात. तिथं पोस्टर्स लागलेली. त्यावरूनच रूपालीताई औटे या गावच्या सरपंच असल्याचं कळालं; अन्यथा कट्ट्यावर ज्येष्ठ माणसं सरपंच हाटेलात बसलेले असतील, त्यांना भेटा, असं सांगत होती. तात्यासाहेबांना मी ‘सरपंचांना भेटायचंय’ म्हणाल्यावर ते मला चहाच्या टपरीवर घेऊन गेले. तिथं एका गृहस्थांची ‘हे सरपंच’ म्हणून ओळख करून दिली. मी बोललो, ‘पण सरपंच तर रूपालीताई औटे असल्याचं वाचलं की आत्ताच मी ग्रामपंचायतीच्या पाटीवर.’ त्यावर ते गृहस्थ बोलले, ‘अहो, मी तिचा नवरा. मीच करतो सगळं. ती घरी असतीय. तिला काय हा कारभार जमत न्हाय.’ मी बोललो, ‘अहो, तुमच्याच गावात जन्मलेल्या मुक्ताबाईंनी केवढी सुरेख अभंगरचना केली. तुमच्या पत्नीला हा कारभार का जमणार नाही?’ आजूबाजूचे लोक ‘सरपंच’ रामचंद्ररावांना हसायला लागले तसं ते ओशाळले. गावाच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरहून आल्यापासून त्यांनीच सगळं केलं. नसता हे काय झालं नसतं बघा. आता मंदिराचं बांधकामही सुरू केलंय. त्यांच्या पायीच गावाची प्रसिद्धी झाली. ते मंदिर विकासासाठी देणग्याही मिळवून आणतात मोठमोठ्या लोकांकडून.’ त्यांच्यासोबत शेख हमीद शेख अजीज बसले होते. ते म्हणाले, ‘मी गावातल्या सगळ्या सण-उत्सवात, कीर्तना-काल्यात सहभागी होतो. आमच्या समाजाच्या महिलाही उत्सवात येतात. माझ्या या मित्रांबरोबर तिरुपती बालाजी, शिर्डी सगळे देवही करून झालेत. मला आवडतं हे.’
गावाच्या वेशीवर आल्यावर एका गावकर्यानं मला थांबवलं. नाव न छापण्याच्या बोलीवर ते बोलते झाले. म्हणाला, ‘हे हभप ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थ साधसुधं नाही. कोल्हापूरहून पाच-पंचवीस मल्ल आणून धाकदपटशानं त्यांनी ही गादी बळकावलीय. सगळे गावकरी त्यांच्या विरोधात होते. आता पैशांच्या जोरावर यांनी सगळ्यांची तोंडं बंद केलीत. विशेष खेदाची गोष्ट काय, तर यांचे वडील विष्णू महाराज निवर्तल्यानंतर कुणालाही न जुमानता यांनी त्यांचे अंत्यसंस्कार मंदिराच्या आवारात केले. आणि तिथंच त्यांची समाधीही बांधली. मंदिरात सगळीकडं त्यांच्या नावाच्या विटा बसवल्यात. अजून बरेच काय-काय प्रताप या महाराजांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावे जमा आहेत. आता हा सगळा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.’
औरंगाबाद, नगर जिल्ह्यासह परिसरातील वीस-पंचवीस पालख्या आपेगावातूनच प्रस्थान ठेवतात. यासाठी पाच-सात वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ‘पालखी पूल’ मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू वाहतुकीमुळं खचलाय. दोन वर्षांपासून या पुलाची दुरुस्ती न झाल्यानं गोदापात्रातूनच पालख्या मार्गस्थ होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, दोन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यानं पात्रात पाणी नाही. त्यामुळं पालख्यांना तिथून जायचा पर्याय तरी उपलब्ध झालाय. आता यावर पर्याय म्हणून पैठण तालुक्यातील आपेगाव आणि गेवराई तालुक्यातील कुरणपिंपरी या दोन गावांना जोडणार्या नव्या पुलाच्या निर्मितीसाठी विद्यमान शासनानं १५ कोटींचा निधी मंजूर केलाय. पैठण ते आपेगावाचा रस्ताही अतिशय बिकट आहे. गावकर्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाकडं वर्षानुवर्ष पाठपुरावा करूनही तो अजून पक्का झालेला नाही. पैठणहून आपेगावकडं जातानाही शेवटपर्यंत माउलींच्या गावी जायचा रस्ता दाखवणारी कुठलीच दिशादर्शक पाटी वा खूणही सापडत नाही.
मी मग चित्ते-पिंपळगावला खुद्द हभप ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेलो. ते आपेगाव संस्थानाचे विद्यमान प्रमुख आहेत. मूळचे कोल्हापूरचे. ते सांगतात, माझे वडील विष्णू महाराज कोल्हापूरकरांना त्यांचे गुरू रंगनाथ महाराज परभणीकरांनी ज्ञानदेवांची जन्मभूमी सिद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ते कोल्हापूरहून इथं आले. ज्ञानदेवांची जन्मभूमी आळंदी वा पैठण नसून आपेगावच आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर आपेगाव हीच माउली आणि त्यांच्या भावंडांची जन्मभूमी असल्याचा निकाल नागपूर हायकोर्टानं दिला. आता हे सगळं माउलीनंच करवून घेतलं की आमच्याकडून… महाराज एक गोशाळाही चालवतात. त्यासाठी ७ एकर गायरान जमीन त्यांनी मिळवलीय. ते सांगतात, ‘गायीला हिंदू धर्मात पूज्य मानलंय. गोसेवा हे पुण्याचं काम आहे.’ आता महाराज गोसेवा करतात म्हटल्यावर मी त्यांना गोवंश हत्याबंदी कायदा आणि त्या अनुषंगानं भारतात होत असलेल्या ‘अखलाक’ प्रकरणासारख्या हिंसेविषयी विचारलं. ते मग तावातावाने म्हणतात, ‘गाय आपली माता आहे. तिचं रक्षण करताना झाली हिंसा तर काय बिघडलं? गोरक्षा समित्यांतल्या सदस्यांचं तरुण रक्त असतं. ते चिडून घेतात हातात शस्त्र. पोलिस आणि कायदा निष्प्रभ ठरला तर हे करायलाच पाहिजे. आमचे गुरू आदरणीय किशोरजी व्यास यांच्या नेतृत्वाखाली करतो आम्हीही गोरक्षा समिती चालवतो.’ पण, महाराज कटाक्षानं फक्त देशी गायीच सांभाळतात. विदेशी गायींच्या पोटात कदाचित ३३ कोटी देव सापडत नसतील!
किशोरजी व्यास यांच्या नेतृत्वात महाराज काम करतात असं कळाल्यावर विषय जादूटोणाविरोधी कायद्यावर आला. आताही महाराज बोलते झाले, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आम्हा कीर्तनकारांच्या कीर्तनात चमत्कार सांगण्यावर बंदी आणणारा होता. आम्ही केला कायद्याला विरोध.’ पुढं महिला कीर्तनकारांविषयीही त्यांची अशीच ‘परखड’ भूमिका. ते म्हणाले, ‘महिलांना विटाळ असतो. त्यामुळं त्यांनी देहू-आळंदीच्या वीणामंडपात कीर्तन करण्याचा अट्टहास करू नये. आपली ‘पायरी’ त्यांनी ओळखावी.’ मी म्हणालो, ‘पण सोयराबाई तर म्हणाल्या होत्या ना, ‘देहाचा विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध’ त्यावर जराही विलंब ना लावता ते उत्तरले, ‘अहो, त्या संतपदाला पोचलेल्या सोयराबाई, आपण साधे मर्त्य मानव. त्यांची बरोबरी कुठे करणार?’ माउलीही कृष्णाचा अवतार होते. कृष्णानं आयुधांचा वापर करून धर्मस्थापना केली. माउलींनी शब्दांचा वापर करून, एवढंच काय ते!
तर असा मी ज्ञानेश्वर-निवृत्तीनाथांचं गाव शोधत फिरलो; पण मला माणसं भेटली. त्यांना भजणारी, पूजणारी. सामाजिक जात वास्तवातून तावून-सुलाखून बाहेर पडत तेजाळलेल्या, संतपदाला पोचलेल्या या भावंडांची जात शोधून ठळक करणारी. त्यांच्यावर जातीय मालकी हक्क सांगणारी. त्यांचे क्रांतिकारी विचार आत्मसात करण्यापेक्षा त्यांना मूर्तीबद्ध करणं पसंत करणारी!
वाट निवृत्तीची नागघाट