कीर्तनकारांचे ‘आयटीआय’

नीलेश बने

ज्ञानाची तहान लागलेले निवृत्तीनाथ गहिनीनाथांच्या पायाशी बसून स्वतः समृद्ध होतातच; पण वारकरी चळवळीच्या ‘माउलीं’नाही घडवतात. गुरूनं शिष्याला घडवण्याच्या परंपरेचं स्वरूप आज काय झालंय? शेकडो वर्षांचा इतिहास सांगणार्या् वारकरी शिक्षणाच्या क्षेत्रात, आज नक्की काय घडतंय आणि काय बिघडतंय?

गावाच्या देवळापुढल्या मोठ्ठ्या मंडपात हजारोंचा समाज बसलेला… बायका एका बाजूला, पुरुष दुसर्‍या बाजूला… मोठमोठे बॅनर अख्ख्या गावभर तर लावलेले आहेतच; पण मंडपाच्या बाहेर सर्वात मोठ्ठा ‘फ्लेक्स बॅनर’ लावलेला… त्यावर पुढील आठवडाभर कोणत्या कोणत्या बुवांचं कीर्तन आहे त्याची यादी लावलेली… त्याच्या बाजूला तिथल्या नेत्याचा हात जोडून फोटू… ‘धर्मपरायण अमुकतमुकदादांच्या मार्गदर्शनखाली गावात हरिनाम सप्ताह’ अशा आशयाचा मजकूर… सभामंडपाच्या शेजारी जेवणाची तयारी सुरू… आणि आत सभामंडपात बुवांचा आवाज टीपेला पोहचलेला… बोला विठ्ठोब्बा रखुमाई!!!! तर, संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज काय म्हणतात… वेदाचे ते सार आम्हासिच ठावे | येरांनी वाहावा भारमाथा….

बुवांचं कीर्तन संपतं आणि सारा समाज बुवांच्या पायाशी लोळण घेतो. पायपडणीचा हा भव्यदिव्य कार्यक्रम थोडक्यात आवरून बुवा पुढल्या मुक्कामासाठी निघण्याची सूचनावजा इशारा देतात… लगेच गाड्यांचा ताफा मंडपाच्या दाराशी धावत येतो… त्यातील एका आलिशान गाडीत बुवा सर्वांना नमस्कार करत बसतात आणि ताफा मार्गस्थ होतो… बुवा निघून जातात आणि गाव जेवणावळीकडे वळतं… तुकोबांनी सांगितलेला वेदांचा अर्थ आणि एका वेळच्या जेवणाची झालेली सोय एवढे पदरी पाडून जनता घराकडे वळते… एका हरिनाम सप्ताहातून गोरगरिबांना मदतीचं समाजकारण, ‘व्होट बँके’चं राजकारण, फ्लेक्सवाला-आचारी-मंडपवाला-साउंडवाला यांचा धंदा आणि बुवांचा मीटर सर्व कसं नीट सुरू राहतं. यासोबत हरिनामसंकीर्तनाच्या आध्यात्मिक कामाचं पुण्य कनवटीला मिळतं ते वेगळंच!

हरिनाम संकीर्तनाच्या या गजरानं सारा महाराष्ट्र असा दुमदुमून जातो; पण हे असं हजारोंना तल्लीन करणारे आणि एकाएका कीर्तनाचे हजारो रुपये कमावणारे कीर्तनकार तयार कसे होतात? आळंदीतील गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरताना आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं. इथं बोळाबोळामध्ये छोट्यामोठ्या अशा शेकडो वारकरी शिक्षणसंस्था आहेत. या शिक्षणसंस्थांमध्ये कीर्तन, प्रवचन, पखवाजवादन आदी कला शिकवण्याची यंत्रणा आहे. बरीचशी मुलं या संस्थेतच राहून किंवा आळंदीतील धर्मशाळांमध्ये राहून हे शिक्षण घेतात. एकदा का तुम्ही इथून शिकून बाहेर पडलात की कीर्तन, प्रवचन क्षेत्रात ‘ह.भ.प.’ची उपाधी तुम्हाला चिकटते. मात्र, यापुढचा प्रवास मात्र तुमचा लोकसंपर्क आणि वाणीवरचं प्रभुत्व यावर अवलंबून असतो. बुवांची वाणी जेवढी रसाळ आणि लोकसंपर्क जेवढा दांडगा, तेवढा बुवा मोठ्ठा!

कीर्तनकार, प्रवचनकार घडविणार्‍या शेकडो वारकरी शिक्षण संस्था असल्या तरी, आळंदीतील स्वानंद सुखनिवासी जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था ही या सर्वांमधील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. असं म्हणतात की, महाराष्ट्रात जे काही दहा-बारा हजार वारकरी कीर्तनकार आहेत त्यातील ८० टक्क्यांहून अधिक कीर्तनकार हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोगमहाराजांच्या संस्थेतून शिकलेले आहेत. म्हणजे एकतर ते तरी इथे शिकलेत किंवा त्यांचे शिक्षक तरी इथून शिकून गेलेले आहेत. पुढील वर्षाच्या गुढीपाडव्याला, मार्च २०१७मध्ये या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होताहेत. या शंभर वर्षांत या संस्थेने घडविलेल्या कीर्तनकार, प्रवचनकारांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर आणि काहींनी तर भारताबाहेरही कीर्तनाचा गजर पोचवला आहे.

मार्च १९१७मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सद्गुरू जोगमहाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि ह.भ.प. वै. मारुतीबुवा गुरव, ह.भ.प.वै. मारुतीबुवा ठोंबरे यांच्या प्रयत्नानं संस्थेची स्थापना झाली, असा इतिहास संस्थेचे पदाधिकारी सांगतात. संस्थेच्या पुस्तिकेतही तो तसाच लिहिलेला आहे. पण, यामागची थोडी सविस्तर कथा संस्थेचे एक विश्वस्थ दिनकर भुकेलेशास्त्री यांनी आम्हाला सांगितली. ते म्हणाले की, आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर हे मुळात शैवउपासक गुरव समाजाकडे होतं. पुढे देवळाचं उत्पन्न वाढलं आणि या पूजेवरून गुरव आणि गावातील पूजापाठ सांगणारा ब्राह्मण पुरोहित समाज यांच्यात वाद झाला. अर्थात नंतर कोर्टात केस पडली आणि निकाल गावातील पूजा सांगण्याचा अधिकार असल्यानं पुरोहितांच्या बाजूनं लागला. पण त्याआधीच मारुतीबुवा गुरव यांनी पुण्यातील विविध वेदपाठशाळांमध्ये जाऊन शिक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना जातीचं कारण सांगून शिक्षण नाकारण्यात आलं. पण, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. आळंदीतच जोग महाराज आपला मठ चालवत होते. एकंदरीत त्यांचा जातीपातीला विरोध होता. शिक्षण हे सर्वांसाठी खुलं असावं, असं त्यांचं म्हणणं होतं. मारुतीबुवा गुरव, मारुतीबुवा ठोंबरे आदींनी जोग महाराजांना आपण शिक्षणसंस्था काढुया म्हणून गळ घातली आणि बुवांनीही ती मान्य केली. त्यातून जन्माला आली ती, आजची जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था.

संस्थेच्या स्थापनेनंतर २ वर्ष ११ महिन्यांतच जोग महाराजांचा इहलोकवास संपला. पण, या कालावधीत त्यांनी संस्थेची आर्थिक आणि संघटनात्मक घडी बसवून स्थिर केली होती. त्यांच्या पश्चात बंकटस्वामी महाराजांनी खर्‍या अर्थानं ही संस्था मोठी केली. ते जवळपास सव्वाचोवीस वर्ष संस्थेच्या अध्यक्षपदी होते. बंकटस्वामी हे भजनमहर्षी होते. त्यांच्या आवाजात जादू होती. गावागावात जाऊन त्यांनी वारकरी संप्रदायाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवलं. त्यांच्या या कामानं प्रभावित होऊन लोकांनी संस्थेसाठी जमिनी दिल्या, आर्थिक साहाय्य केलं. याच कामातून संस्थेला विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह मोठा लोकाश्रय लाभला आणि संस्था मोठी होऊ लागली. अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेचा वटवृक्ष बहरू लागला. पांडुरंगशास्त्री शर्मा, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मामासाहेब दांडेकर अशा विद्वानांनी संस्थेसाठी आपलं आयुष्य दिलं आणि संस्था नावारूपाला आली.

आज आळंदीतील माउलींच्या मंदिरासमोरील गल्लीतून सरळ दहाएक मिनिटं चालत गेलो की, आपण जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या दाराशी पोहचतो. साधारणतः सहा-साडेसहा एकरचा रम्य परिसर असलेल्या या संस्थेची मंदिरासारखी इमारत लक्ष वेधून घेते. एका बाजूला लांबच्यालांब शेत, शेताच्या टोकाला गोशाळा, इमारतीच्या तळमजल्यावर शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकघर, एक मजल्याच्या इमारतीत शिक्षकांची राहाण्याची सोय, विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय, काही वर्गखोल्या आणि कीर्तनासाठी सामायिक सभागृह असं या संस्थेचं सर्वसाधारण स्वरूप. पण, ही संस्थेची नवी इमारत आहे. संस्थेचे सातवे अध्यक्ष विठ्ठल भावडू चौधरी-मोठेबाबा यांच्या कारकिर्दीत संस्थेला हे नवे दिवस दिसले. त्याआधी मंदिराजवळच्या जुन्या छोट्या जागेतून संस्थेचा कारभार चालायचा.

आम्ही जेव्हा संस्थेत पोचलो तेव्हा काही विद्यार्थी परिसरात रेंगाळत होते, तर काही सायकलवरून येत होते. विचारलं तेव्हा कळलं की, संस्थेचे आत्ताचे अध्यक्ष मारुतीबुवा कुरेकर महाराजांचा पाठ सुरू होणार आहे. थोड्याच वेळात कुरेकर महाराज आले. त्यांच्यासोबत काही विद्यार्थी होते. महाराजांना भेटीसंदर्भात वेळ मागितल्यावर, त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि कार्यालयात माहिती घेण्यास सांगितलं. विद्यार्थ्यांनी कुरेकर महाराजांची तब्येत बरी नसल्यानं ते बाहेरच्यांशी फारसं बोलत नाहीत, असं सांगितलं. मग तिथल्याच विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी माहिती विचारण्यासाठी तुम्ही तुकाराम महाराजांना भेटा, असं सांगत, एका खोलीकडे बोट दाखवलं.

तुकाराम महाराज मूळचे बारामतीचे. संस्थेत विद्यार्थी म्हणून आले आणि संस्थेचेच होऊन गेले. गेली काही वर्ष ते संस्थेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहताहेत. ओळख, कशासाठी आलात वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर तुकाराम महाराजांनी संस्थेची ओळख करून देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, या संस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, इथे विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. गेली शंभर वर्षे फक्त आणि फक्त लोकाश्रयावर ही संस्था सुरू आहे. इथले विद्यार्थी पंचक्रोशीमध्ये माधुकरी मागतात आणि जगतात. शिक्षकही त्याच समर्पणभावनेनं इथं शिकवतात. इथलं शिकवणं हा त्यांच्या उत्पन्नाचा भाग नाही. या परंपरेमुळंच आज आळंदीमध्ये जेवढं महत्त्व माउलींच्या मंदिराला आहे, तेवढंच महत्त्व जोग महाराजांनी स्थापन केलेल्या या ज्ञानमंदिराला आहे.

तुकाराम महाराज ज्या आत्मविश्वासानं हे सारं सांगतात, ते ऐकून प्रभावितच व्हायला होतं. त्यांना विचारलं की, विद्यार्थ्यांना फी नाही, संस्था लोकाश्रयावर चालते हे उत्तमच; पण शिक्षकांना पगार नाही तर शिक्षकांचा उदरनिर्वाह कसा चालतो. त्यावर ते म्हणाले की, जोग महाराज संस्थेत शिक्षक असणं ही खूप मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. इथं शिकलेले, शिकवलेले काही जण आज मंडलेश्वर, महामंडलेश्वर या उपाध्यांपर्यंत पोचले आहेत. इथं शिकवणार्‍या शिक्षकाला संप्रदायात आणि समाजात मानाचं स्थान आहे. त्यामुळं इथं शिकवणारे अनेक जण आपला बहुमूल्य वेळ ज्ञानदानासाठी आनंदानं देतात. उरलेल्या वेळात गावागावात कीर्तन करतात. संस्थेला वर्षातून रामनवमीचे पंधरा दिवस, जन्माष्टमीचे दहा दिवस, आषाढी वारीचे २४ दिवस अशा काही सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांमध्ये हे शिक्षक कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम करतात. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

विद्यार्थ्यांची निवड कशी काय केली जाते, असं विचारल्यावर तुकाराम महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायात इथं शिकणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळं इथं प्रवेश मिळावा यासाठी राज्यभरातील विविध भागातील विद्यार्थी अर्ज करतात. या विद्यार्थ्यांची प्राथमिक पूर्वपरीक्षा घेऊन त्यातील साधारणतः शंभरेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दहावीनंतरचे म्हणजे १५ वर्षांच्या वरील विद्यार्थीच इथं प्रवेश घेऊ शकतात. पुढं यातील काही विद्यार्थी वैयक्तिक अडचणींमुळे गळतात. त्यामुळं आज साधारणतः तीनशे-साडेतीनशे विद्यार्थी चारही वर्षांमध्ये शिकत आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना पारमार्थिक शिक्षणासोबत स्वावलंबनासाठी शेती, हातमाग, शिवणकाम आदी गोष्टी शिकविल्या जात. पण, आता या गोष्टी शिकविल्या जात नाहीत. हे सारं बंद झालं कारण, या सार्‍या गोष्टी आज स्वावलंबनासाठी फारशा उपयुक्त राहिलेल्या नाहीत, असं काहीसं कारण ते देतात. पण, मग आज संगणक प्रशिक्षण, परदेशी भाषा अशा नव्या गोष्टींचा समावेश का झाला नाही? हा अभ्यासक्रम अपडेट का झाला नाही?, असं विचारताच, या सार्‍या पारमार्थिक मार्गापासून दूर देणार्‍या गोष्टी असल्याचं सांगत मूळ प्रश्नाला बगल देतात. स्वावलंबनाचा हा मार्ग संस्थेनं का सोडला आणि फक्त कीर्तन-प्रवचनाच्या मार्गानं पोट भरण्याचा मार्गच का स्वीकारला? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं विचारूनही मिळत नाही.

संस्थेचे विश्वस्त असलेले भुकेलेशास्त्री यांनी मात्र, याबद्दल वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले की, वारकरी चळवळीचे नियम अभ्यासले तर कीर्तन-प्रवचनासाठी गावात गेलात तर अन्नप्राशन करू नका, बैलगाडीच्या बैलांसाठी गावात चाराही फुकट घेऊ नका, असं सांगितलं आहे. कीर्तन, प्रवचनासाठी पैसे घेतल्यास स्वविष्ठाभक्षणाचं पाप लागतं, असं सांगितलं जातं. पण आजचे कीर्तनकार, प्रवचनकार हे सारे नियम पायदळी तुडवतात. पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत बिदागी घेतल्याशिवाय बुवा कीर्तन करत नाहीत. प्रवासासाठी आलिशान एअरकंडिशन गाड्या, बोटांमध्ये चार-चार आंगठ्या, ब्रेसलेट्स हे सारं कोणतं वैराग्य आहे? परमेश्वराचं नाम विकण्याचा हा धंदा आज गावागावात वेगाने फोफावत आहे, हे वास्तव आहे.

संस्थेच्या अभ्यासक्रमातही कालानुरूप बदल व्हायला हवा, असंही भुकेलेशास्त्री यांचं म्हणणं आहे. आज संस्थेत शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, भगवद्गीता, विष्णुसहस्त्रनाम, पंचदशी, विचारसागर, ज्ञानेश्वरी आणि भजनसाठीचे अभंग आदी गोष्टी शिकविल्या जातात. ज्ञानाची गंगा संस्कृतमधून लोकांच्या भाषेत आणण्याचं कार्य वारकरी चळवळीनं केलं. मग वारकरी शिक्षण संस्थेत हे सारं संस्कृतप्रचुर शिक्षण कशासाठी? ज्ञानेश्वर-नामदेव-चोखामेळा-जनाबाई इथपासून एकनाथ-तुकाराम-निळोबाराय-गाडगेबाबांपर्यंतच्या संतांच्या विचारात काही कमतरता आहे का? या विचारांऐवजी संस्कृत व्याकरण, पंचदशी हे सारं कशासाठी शिकवलं जातं? मुलांचा पाया पक्का व्हावा म्हणून मूळ विचार शिकवले जातात, असा दावा केला जातो. पण, ज्या वारकरी चळवळीनं या सर्व ज्ञानाला पर्याय म्हणून नवा विचार रुजवला तो सोडून पुन्हा मुळांकडे जाण्याचा अट्टाहास कशासाठी?

आज महाराष्ट्रात होणारी बहुसंख्य कीर्तनं ही तुकाराम महाराजांच्या अभंगांवर होतात. ज्ञानेश्वर माउली किंवा इतर संतांच्या अभंगावर क्वचित कीर्तनकार जोर देतात. असं असूनही वारकरी शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात गाथा शिकवली जात नाही. याचं कारण विचारल्यावर गाथा ही सोपी आहे. ती शिकवण्याची गरज नाही. गाथेतील निवडक अभंग शिकवले तरी पुरतं. उरलेली गाथा वाचूनही कळते, पण तसं ज्ञानेश्वरीचं नाही. तिची भाषा वेगळी आहे. त्यामुळं ती शिकवावी लागते, असं कारण दिलं जातं. पण, विद्यार्थ्यांना संस्कृत व्याकरण, वेदांवर आधारित पुस्तकं शिकवायला पुरेसा वेळ दिला जातो. मग तुकोबांसह अन्य संतांची बोळवण निवडक अभंगांवरच का केली जाते, हे कोडं मात्र काही केल्या उलगडत नाही.

व्यवस्थापक असलेल्या तुकाराम महाराजांशी प्रश्नोत्तरं सुरू असतानाच ते म्हणाले, आपण ज्ञानेश्वर महाराज शिंदेना भेटुया. ते तुम्हाला अधिक सविस्तर उत्तरं देऊ शकतील. तुकाराम महाराजांकडून आमची स्वारी ज्ञानेश्वर महाराजांकडे वळली. संतविचाराच्या शोधात चाललेला हा प्रवास संतांच्या नावांना काही केल्या सोडत नाही, हे मनोमन पटत होतं. ज्ञानेश्वर महाराज शिंदे हे शिक्षणानं इंजिनिअर. पण इंजिनिअरिंगची वाट सोडून ते आता संस्थेत शिक्षक आणि कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून जगतात. संस्थेच्या शेतातील वाट तुडवत आम्ही गोशाळेकडे चाललो होतो. वाटेत जे जे विद्यार्थी येत ते पायातल्या पायताणं काढून, महाराजांच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करत होते. गोशाळेत स्थिरावल्यावर त्यांना विचारलं की, तुम्ही इंजिनिअरिंगपेक्षा वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षक होण्याचा निर्णय का घेतलात? त्यावर ते हसले आणि म्हणाले की, यंत्रांच्या इंजिनिअरिंगपेक्षा मला मनाचं इंजिनिअरिंग जास्त महत्त्वाचे वाटलं. माझं मन इथं जास्त रमतं. म्हणून तो रस्ता सोडून मी इथं आलो.

ज्ञानेश्वर महाराज मोकळेपणानं बोलत होते. ते म्हणाले की, आज वारकरी शिक्षणाचं स्वरूप बदललं आहे. आज कीर्तनकार हा व्यवसाय झाल्यानं दुसरं काहीही करता येत नाही म्हणून कीर्तनकार व्हायला येणार्‍यांची संख्या वाढली आहे. या आधीही असे पोटभरू कीर्तनकार असतील; पण ही संख्या आता अधिकच वाढली आहे. आज हे शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी कोण आहेत? ज्यांना शैक्षणिक आयुष्यात फार काही करता आलेलं नाही, गावामध्ये फार काही संधी नाही, म्हणून वारकरी शिक्षण घेऊन बुवा होता येईल, असा विचार करणार्‍यांची संख्या वाढत आहे. तसंच, हे शिक्षण घेण्यासाठी कोणतीही फी लागत नाही. त्यामुळं ज्ञानग्रहणापेक्षा उदरभरणाच्या हेतूनं येणारे अधिक आणि खरे विद्यार्थी कमी, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

आधी काही मोजक्याच वारकरी शिक्षणसंस्था होत्या. आज गावागावात अशा संस्था वाढल्या आहेत. त्यातील अनेक जण तर जोग महाराजांच्या संस्थेत शिकलेले आहेत. इथं शिकून त्यांनी स्वतःच्या नव्या संस्था उघडल्या आहेत. काही जण तर बक्कळ फी घेऊन मुलांना शिकवत आहेत. अनेक संस्था तर नोंदणीकृतही नाहीत. त्यामुळं विद्यार्थीही वाढलेत आणि त्यांना शिकवण्याचा दावा करणार्‍या संस्थाही. एकंदरीत शिक्षणव्यवस्थेची जशी दुरवस्था झालीय तशीच काही प्रमाणात वारकरी शिक्षण व्यवस्थेचीही अवस्था झाली. हे सारं बदलायला हवं, पण परंपरेला मुरड घालण्यासाठी जे सामर्थ्य हवं ते आजच्या नेतृत्त्वात दिसत नाही, हे दुर्दैव आहे, असं त्यांनी मान्य केलं.

जर आजच्या कीर्तनकारांनी इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर केला, संगणकासह बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, जगभरात सुरू असलेल्या नवनव्या विचारांना आपल्या अभ्यासात सामावून घेतलं तर त्यांची उंची आणखी वाढेल. संताच्या विचारांचं सामर्थ्य हे बदल स्वीकारण्यात होतं. संतांनी कायमच जुन्या कर्मकांडांना फाटा देऊन नवे विचार रुजवले. पण, आम्ही मात्र जुन्यालाच कवटाळत बसलो आहोत. आजच्या परिस्थितीत वारकरी संतांच्या विचारांची आवश्यकता मोठी आहे. पण संतांच्या या विचारांना नव्या पद्धतीनं मांडणारी पिढी घडवण्यासाठी लागणारे शिक्षण आज उपलब्ध नाहीत. वारकरी शिक्षणाची ही नवी दिशा गाठण्यासाठी संघटितरीत्या प्रयत्न व्हायला हवेत, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीनंतर, ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांच्याशी भेट ठरली होती. राजाभाऊही व्यवसायानं इंजिनिअर; पण आळंदीपासून पंढरपूरपर्यंत आणि परत आळंदीपर्यंतचा सारा पालखी सोहळा ते चोपदार म्हणून सांभाळतात. वारकरी शिक्षणसंस्थेविषयी विचारल्यावर ते म्हणाले की, आज पालखीसोबत येणार्‍यांची संख्या वाढते आहे. दरवर्षी नवनवे चेहरे पालखीसोबत येतात. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पण, हे सारे हवशे-गवशे तरुण आहेत. या तरुणांना वारकरी चळवळीचं सार कळायला हवं. नुसती वारी महत्त्वाची नाही, तिचा अर्थ कळला पाहिजे. यासाठी वारकरी शिक्षण हवं. शंभर वर्षांपूर्वी जोग महाराज, दांडेकर महाराजांनी ही संस्था सुरू केली. तिच्यात बदल होणं गरजेचं आहे. पण, आज शिक्षणाचं माध्यमही बदलत आहे. त्यानुसारही बदल व्हायला हवेत. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक पालक आले आणि म्हणाले, माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकतो. त्याला वारकरी शिक्षण घ्यायचं आहे. घेता येईल का हो? आता या मुलाला मी इंग्रजी शाळेत शिक्षण आणि सोबतच वारकरी शिक्षण घेण्याचा पर्याय सुचविला. पण, हे शिक्षण एकत्र का मिळू शकत नाही. तसे अभ्यासक्रम का घडू शकत नाहीत? शिक्षणातील नवे प्रयोगही वारकरी शिक्षणाला जोडले गेले पाहिजेत; पण त्यासोबत त्या विद्यार्थ्याला वारकरी संस्कारही मिळाले पाहिजेत.

राजाभाऊंची भेट वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात ठरली होती. भेट सुरू असतानाच काही विद्यार्थी सायकलवरून माधुकरी घेऊन येत होते. पांढरेशुभ्र धोतर, त्यावर पैरण, खांद्यावर उपरणं आणि डोक्यावर टोपी असा गणवेश असलेल्या या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा मोह टाळता आला नाही. त्या मुलांशी बोलताना जाणवलं की, यातील बरीचशी मुलं मराठवाड्यातील आहेत. पण, कोल्हापूरसारख्या संपन्न पट्ट्यातील एकही विद्यार्थी संस्थेत नाही. गेली कित्येक वर्ष मराठवाड्यात दुष्काळ आहे. हे तर या विद्यार्थ्यांच्या इथं येण्याचं कारण नसेल ना, असा विचार संस्थेतील एका शिक्षकांना बोलून दाखविला. तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, मराठवाड्यात दुष्काळामुळे इथं तिथली मुले अधिक आहेत का, हे सांगणं अवघड आहे. पण, एवढं नक्की की, वारकरी संप्रदायाचा प्रसार तिथं मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. मोठमोठे महाराज आणि त्यांचे भव्यदिव्य गड. या गडांचा असलेला भक्तपरिवार यामुळे त्या भागात वारकरी शिक्षणाबद्दल आकर्षण आहे.

वारकरी महाराजांचे मोठमोठे गड म्हटले की, मला बीडचा भगवानगड आठवला. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या या गडावर जमणारी गर्दी आठवली. मग हळूहळू राजकारण, जातीचं गणित, महाराज, त्यांचे गड, त्यांची बेटं हे सारं चित्र डोळ्यापुढं येऊ लागलं. दुष्काळात शेताला द्यायला पाणी नसताना टँकरनं पाणी आणून चालणारे हरिनाम सप्ताह आठवले. एकदंरीतच या सार्‍या प्रकारांचा मराठवाड्यातील जनजीवनावर असलेला प्रभाव जाणवला. त्यामुळंच मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर उत्तर शोधणारा उद्योजक किंवा शेतकरी होण्यापेक्षा कीर्तनकार महाराज होणं हे सोपं असल्याचं स्पष्ट दिसलं आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त का? या प्रश्नाचं उत्तर मिळत गेलं.

इथं येणार्‍या विद्यार्थ्यांचा दिनक्रम नक्की काय असतो, हे समजून घेणं फारच उद्बोधक होतं. येथे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नीट नाही. त्यामुळं बहुसंख्य विद्यार्थी आळंदीतीत धर्मशाळांमध्ये किंवा भाड्यानं खोली घेऊन राहतात. पहाटे ४ ते ५.३० शौच, मुखमार्जन, व्यायाम-प्राणायाम आणि स्नान करून नित्यनेम करणं, पहाटे ५.३० ते ६ प्रार्थना, सकाळी ६ ते ७ देवदर्शन, नगरप्रदिक्षणा, सकाळी ७ ते १० अध्ययन (पाठश्रवण), सकाळी ११ ते १२ भोजन, दुपारी १२ ते २ विश्रांती, दुपारी २ ते ४ पाठांतर, दुपारी ४ ते ५ सार्वजनिक ज्ञानेश्वरी श्रवण, संध्याकाळी ५ ते ७ स्वाध्याय, संध्याकाळी ७ ते ८.३० भजन, रात्री ८.३० ते ९ भोजन, ९ ते १० स्वयंअभ्यास आणि रात्री १० ते पहाटे ४ विश्रांती, असा विद्यार्थ्यांचा दिनक्रम आचारसंहितेत नोंदवलेला आहे. असं जर नियमित होत असेल, तर खरंच कौतुकास्पद आहे, म्हणून दोन दिवस वेगवेगळ्या वेळेत विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. तेव्हा प्रत्यक्षात मात्र ही आचारसंहिता काटेकोरपणे पाळणं एवढं बंधनकारक नसल्याचं स्पष्ट जाणवलं. लेक्चर बंक करण्याचा प्रकार इथंही दिसत होता. पण, अशा काही विद्यार्थ्यांमुळं संस्था बदनाम होते. ज्यांना शिकायचं ते मनापासून शिकतात. शेवटी उडदामाजी काळेगोरे असणारच, ही भूमिका इथंही दिसत होती.

दुपारच्या वेळेत माधुकरी घेऊन येणार्‍या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्यावर कळलं की, आळंदी परिसरातील काही घरांमध्ये माधुकरी ठरवून घेतलेली आहे. काही गट नियमानं त्यांच्याकडून माधुकरी मागून आणतात. अनेक जण दुपारचं जेवण झालं की आधी विद्यार्थ्यांची माधुकरी वेगळी काढून ठेवतात. पण, बर्‍याचदा हे शिजवलेलं अन्न असल्यानं खराब होतं. त्यामुळं संस्थेनं आता अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे. त्यातून सकाळची न्याहारी आणि रात्रीचं जेवण संस्थेतर्फे दिलं जातं. दुपारचं भोजन मात्र माधुकरी आणून केलं जातं. बर्‍याचदा जेवणासाठी काही घरांतून आमंत्रण येतं. अशा वेळी काही विद्यार्थी आणि शिक्षक यजमानांकडे भोजन घेतात. एकंदरीतच लोकवर्गणीतून आणि लोकाश्रयातून विद्यार्थ्यांचं पोट भरतं.

संस्थेचं हे कार्य अधिकाधिक विस्तारावं आणि त्यात सकारात्मक बदल व्हावेत, यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत. यावर्षी संस्थेचा शतक महोत्सव असल्यानं वेगवेगळ्या योजनाही आखण्यात येत आहेत. संस्थेनं आपला बृहद्आराखडा प्रसिद्ध केला असून, त्यात भजन, कीर्तनासाठी सत्संग भवन, २००० चौरस फुटांचं क्रीडांगण, अतिथी भवन आणि वयोवृद्ध कीर्तनकारांसाठी साधना भवन अशा गोष्टींचा समावेश आहे. या भौतिक सुविधांसोबत संस्थेची स्वतःची सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा मानस असल्याचं भुकेलेशास्त्री यांनी सांगितलं. ज्यामुळं विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणासोबत अत्याधुनिक शिक्षणही घेता येईल.

आळंदीत जोग महाराजांच्या संस्थेप्रमाणं अन्य संस्थाही आता मोठ्या होऊ लागल्या आहेत. साखरे महाराजांची ‘साधकाश्रम’ ही संस्थाही तेवढीच जुनी आणि लोकप्रिय आहे. आता इतरही अनेक नवीन संस्थाही उदयाला आल्या आहेत. यातील अनेक संस्था तर शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. आळंदीतील शाळेत नियमित शालेय अभ्यासक्रम आणि संस्थेत वारकरी अभ्यास असा दुहेरी अभ्यास ही मुलं करतात. यातील अनेक संस्था अनधिकृत आहेत. वसतिगृह म्हणून असलेले सरकारी निकषही या संस्थांनी पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळं धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली लोकाश्रय मिळवायचा आणि प्रत्यक्षात कायद्याची पायमल्ली असा गोंधळ सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

यातील काही शिक्षणसंस्थांत लैंगिक शोषणासारखे भयंकर गुन्हे झाल्याचंही उघडकीस आलं आहे. आळंदीतील पोलिस ठाण्यात अनेक वारकरी शिक्षण संस्थांविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. कोर्टामध्ये अनेक खटले सुरू आहेत. त्यामुळं वारकरी शिक्षण संस्थांच्या या व्यापामध्ये कोण चांगले आणि कोण वाईट हे ओळखणं सर्वसामान्यांसाठी अवघड बनलं आहे. यासंदर्भात वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर यांनी अनधिकृत वारकरी शिक्षणसंस्थांवर लगाम घालण्याची मागणी केली आहे. धर्मदाय संस्था, ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असणार्‍या संस्था वगळता, इतर अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर तातडीनं बंदी आणण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

यासंदर्भात सोन्नर म्हणाले की, आळंदी आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांचं पेव फुटलं आहे. कोणतीही पात्रता नसणारी मंडळी एखादा हॉल किंवा धर्मशाळा भाड्यानं घेऊन वारकरी शिक्षण संस्था सुरू करतात. त्याची प्रशासनाकडे नोंद नसते. काही संस्था तर वर्षाला २० ते २५ हजार रुपये फी उकळत आहेत. तसंच या सार्‍यांवर कोणतंही नियंत्रण नसल्यानं तेथील मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत असल्याचे उघड होत आहे. गेल्या काही वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. एकट्या आळंदीतच २००हून अधिक वारकरी शिक्षण संस्था असून, तिथं सात ते आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याची कोठेही प्रशासकीय पातळीवर नोंद नाही. हे सारं थांबवून अधिकृत संस्थांना मदत आणि अनधिकृत संस्थांना लगाम घालण्याचं धोरण सरकारनं तातडीनं स्वीकारायला हवं.

हे सारं समजून घेत असताना, भारतीय संस्कृतीतील प्राचीन गुरूपरंपरेच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांपासून सुरू झालेली वारकरी चळवळीची गुरूपरंपरा पाहताना पडणारे प्रश्न संपता संपत नाहीत. आज, गावागावात उभे राहणारे हरिनाम सप्ताह, मठ, बेटं, गड हे सारं पाहिलं की, अस्वस्थ व्हायला होतं. ज्ञानोबा, तुकोबांनी पंढरपूरच्या वाळवंटात जी सामाजिक क्रांती घडवली त्याच क्रांतीचे वारसदार म्हणवणारे हे सारे मठाधिपती वारकरी चळवळीचे सांप्रदायीकरण का करताहेत? धर्मातील अवडंबर आणि कर्मकांडाला सातत्यानं डागण्या देत विवेकाची पताका फडकवणार्‍या वारकरी चळवळीतील काही जण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करतात, तेव्हा ते तुकोबा, गाडगेबाबांचे हे वारसदार कसे ठरतात? शंभर वर्षांहून अधिक मोठी वारकरी शिक्षणाची परंपरा एकीकडे सांगायची, या परंपरेतील मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाईं आदी संत कवयित्रींचा इतिहास सांगायचा; पण या शिक्षणाची दारं महिलांना खुली करून द्यायची नाहीत, हा दुटप्पीपणा कशासाठी, असा प्रश्न कोणीच का विचारत नाही?

एकीकडे वारकरी शिक्षण देणार्‍या संस्था वाढताहेत, तर दुसरीकडे या संस्थातील विद्यार्थ्यांना टार्गेट म्हणून पाहणारे गटही वाढताहेत. कडवा धार्मिक प्रसार करणार्‍या संघटना या विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुराष्ट्राची स्थापना वगैरेची भाषा करणार्‍या संस्था आळंदीत मंडप घालतात आणि अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्वतःला वारकरी म्हणवणारे आयोजकांच्या मांड्याला मांड्या लावून भाषणं ठोकतात. तेव्हा अनगडशहांच्या दर्ग्यात दरवर्षी विसावा घेणार्‍या तुकोबांरायांना काय वाटत असेल, याचा विचार कोणीच का करत नाही?

हे सारं खरं असलं तरी, गेल्या शंभर वर्षात वारकरी शिक्षणाच्या पंरपरेत या संस्थांनी हजारो कीर्तनकार-प्रवचनकार घडवले. या कीर्तनकारांनी भागवतधर्माची आणि वारकरी संप्रदायाची पताका गावागावात फडकवत ठेवली. आज दुःखानं पिचलेल्या, शहरीकरणानं गांजलेल्या आणि कृषीव्यवस्थेत हतबल झालेल्या गावकर्‍यांमध्ये आजही आशेचे किरण जिवंत ठेवण्यामध्ये या कीर्तनकारांनी पोचवलेल्या संतसाहित्याचा फार मोठा वाटा आहे. गावातील काही पोरं का होईना, गळ्यात माळ घातल्यानं दारू-गांजापासून दूर झाली, हे या कीर्तनपरंपरेपरेचं यश मानायला हवं.

एखादी वाईट गोष्ट घडली की, सार्‍या प्रकरणावर फुल्ली मारायची हा मनुष्यस्वभाव आहे. पण, ज्या संस्था खरंच चांगलं काम करताहेत, त्यांना ओळखून त्यांच्यावर सरकारनं आणि समाजानं सातत्यानं लक्ष ठेवायला हवं. गाडगेबाबांनी ज्या निस्पृहतेनं संस्था उभारल्या, त्या निस्पृहपणानं माणसं घडवली गेली तरच वारकरी चळवळीचा विद्रोह जिवंत राहील. पैठणच्या ब्रह्मवृंदानं नाकारलेलं शिक्षण मिळवून रेड्यामुखी वेद वदवून घेणारी निवृत्ती-ज्ञानोबांची आणि प्रसंग आल्यास नाठाळाच्या माथी काठी हाणणारी तुकोबांची ही वारकरी परंपरा आपल्या रक्तात आहे, हे विसरून चालणार नाही.

0 Shares
पंढरी‘नाथ’ उत्तरायण