महामाउली

हर्षदा परब

देवाची आळंदी म्हणजेच ज्ञानदेवांची आळंदी. माउलींनी आळंदीचा कोपरा न कोपरा व्यापलेला आहे. त्यात त्यांचे गुरू आणि वडीलबंधू असूनही निवृत्तीनाथ मात्र क्वचितच दिसतात. पण, ज्ञानेश्वर आहेत म्हणजेच निवृत्तीनाथही आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

पुण्यापासून आळंदी खूप वेगळी वाटते. वाटेतल्या निगडी चौकात भक्तिशक्ती पुतळा आपण पाहतो. भक्ती समोर शक्ती किती ठेंगणी आहे, त्याची जाणीव होते. एक वेगळीच प्रेरणा मिळते. त्याचं प्रत्यंतर ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीत येतं. मराठी मुलखाच्या कानाकोपर्‍यात आलेली साधीभोळी माणसं माउलींच्या संजीवन समाधीसमोर नतमस्तक होतात आणि जगण्याची प्रेरणा घेऊन जातात.

इथला प्रत्येक माणूस ‘माउली, माउली’ गात असतो. माउलींविषयी भरभरून बोलत राहतो. पण, त्यात फक्त माउलीच असतात. त्यात संत निवृत्तीनाथ मात्र सापडत नाहीत. निवृत्तीनाथांविषयी विचारलं, की सर्वसामान्य माणसं फारसं काही सांगू शकत नाहीत. ‘निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेवांचे गुरू’, या एका वाक्यात सर्वसामान्य माणसांची निवृत्तीनाथांबद्दलची माहिती संपून जाते. याच अलंकापुरीत निवृत्ती ज्ञानदेवांसह चौघा भावंडांचा जन्म झाला. त्यांचा छळही इथंच झाला आणि माउलींनी इथं समाधी घेतली, असं त्या माहितीचं एक्स्टेंशन. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माउली, सोपानकाका, मुक्ताबाई यांचा जन्म इथलाच, असं लोक सांगतात खरं; पण त्याचा पुरावा काही सांगता येत नाही. वाडवडिलांनी सांगितलंय, इतकं त्यांना पुरे असतं.

निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी. मूळ गाव पैठणजवळचं आपेगाव. ते बालपणापासूनच वैराग्यानं भारलेले. शिक्षणानंतर तीर्थयात्रा करता करता ते आळंदीला पोचले. तिथले कुलकर्णी सिधोपंत यांनी त्यांना आपलं जावई करून घेतलं. लग्नानंतर आपेगावात विरक्त विठ्ठलपंतांना आर्थिक गोळाबेरीज जमेना म्हणून ते सुखवस्तीला सासुरवाडीला आले. इथंच त्यांचा संसार सुरू झाला. पण, त्यांचं मन संसारात लागेना म्हणून त्यांनी संन्यास घेतला. गुरूच्या आज्ञेवरून ते पुन्हा संसारात आले. आळंदी या सनातनी पगडा असलेल्या गावच्या पुरोहितांनी हे महापातक ठरवलं. त्यामुळं त्यांनी गावाबाहेर सिद्धबेटावर संसार थाटला. तिथंच चार मुलांचा जन्म झाला. विठ्ठलपंतांचा संसार आळंदीत असल्यामुळं त्यांच्या मुलांचाही जन्म इथलाच असा साधासरळ तर्क लावला जातो. पण अभ्यासकांची पुस्तकं चाळली तर आपेगाव आणि आळंदी या दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जातात. ज. र. आजगावकर, भिंगारकर बुवा, शं. वा. दांडेकर, द. अ. आपटे, बा. अ. भिडे असे अभ्यासक आळंदीचा जन्म मानतात. तर पांगारकर, गुरुदेव रानडे, श. गो. तुळपुळे, चांदोरकर, धारूरकरशास्त्री अशी अभ्यासकमंडळी आपेगावच्या बाजूनं आपलं मत नोंदवतात. दोन्ही बाजूंकडे सांगण्यासाठी समकालीन संतांचे दाखले देतात.

राज्य सरकारनं आपेगाव हे निवृत्तीनाथांसह ज्ञानेश्वरांचं जन्मगाव असल्याची नोंद केलीय. त्याच्या विकासासाठी निधीही दिलेला आहे. ज्ञानेश्वर माउली संस्थानाला हे मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार निवृत्तीनाथांचा जन्म आळंदीतलाच. त्यावरून म्हणे कोर्टकेसही सुरू आहेत. संस्थानचे विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी याविषयी फार काही सांगत नाहीत. ते रूढीपरंपरांचे दाखले देतात. ही पूर्वापार मान्यताप्राप्तच गोष्ट आहे, असं सांगतात. तोच इतिहास आहे, असा दावा करतात. इथूनच चारही भावंडं शुद्धिपत्रासाठी पैठणला गेली. त्यामुळे त्यांचं मूळ गाव कुठेही असलं तरी जन्म आळंदीचाच, असं ते डॉ. कुलकर्णी सांगतात. आपल्याकडे लेखी पुरावे नाहीत, असं मात्र ते सांगतात. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवेदेखील आळंदी हेच निवृत्तीनाथांचं जन्मस्थान असल्याचं सांगतात. आळंदी गावात एका जागेची मालकी या चारही भावंडांच्या नावावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आळंदीत निवृत्तीनाथांचा जन्म झाला असेल तर तो सिद्धबेटावर. भरपूर झाडं, समोर वाहणार धरणाचं पाणी, शांतता आणि निसर्ग पाहून मन प्रसन्न होतं. चारही भावंडं आधी आईवडिलांसोबत आणि नंतर एकट्यानं तिथं झोपडी बांधून राहत होती. या भावंडांच्या वास्तव्यानं हे बेट कैलास आणि वैकुंठापेक्षाही पावन झालं आहे. संत नामदेवांनी त्यावर अनेक अभंगांतून शिक्कामोर्तब केलेलं आहे.

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | दैवताचे नावं सिद्धेश्वर ॥

चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा | तो सुख सोहळा काय वाणू ॥

नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पावरी ॥

कैलासिचा वास अधिक सिद्धबेट | विष्णूचे वैकुंठ पुरातन ॥

फक्त कैलास आणि वैकुंठच नाही तर पंढरपुराहूनही हे श्रेष्ठ ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इथं देवही पक्षी बनून राहतात, अशी थोरवी त्यांनी गायलेली आहे. तिन्ही लोकांतील देवतांसह चारधाम, सातपुर्‍या, बारा ज्योतिर्लिंग, योगी, संत यांचं वास्तव्य सिद्धबेटावर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नामदेवरायही तीर्थाटनानंतर संतमेळ्यासह इथं राहिले होते. संतांच्या अभंगांबरोबरच स्कंधपुराण, शिवपुराण, आळंदी महात्म्य, ज्ञानेश्वरांच्या समाधीचे अभंग यांत सिद्धबेटाचं वर्णन आहे. आजही इथं वारकरी, रंजले-गांजलेले, भाविक भक्त, नाथपंथी, कबीरपंथी, बैरागी, संन्यासी, योगी यांची ये-जा असते. आळंदी हे प्राचीन शैव तीर्थक्षेत्र असल्यामुळं नाथसिद्ध इथं निवृत्तीनाथांच्याही आधीपासून येत असणार. या सिद्धांच्याच सहवासात त्यांचं बालपण गेलं असेल. त्यांना कौटुंबिक वारशात नाथपंथाची ओळख मिळाली होती. ते त्यांचं आकर्षण इथंच वाढीस लागलेलं असू शकेल. गहिनीनाथांकडून मिळालेल्या दीक्षेत पुढे या आकर्षणाचं पूर्णत्व अनुभवता येतं. असं असलं तरी ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत दुसर्‍याच ठिकाणी दाखवली जाते आणि मांडे भाजलेली जागाही दुसरीकडेच आहे.

याच सिद्धबेटावर राहत असतानाच निवृत्तीनाथांच्या आईबाबांना देहान्त प्रायश्चित्त सुनावण्यात आलं. त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. इथंच निवृत्तीनाथांनी पालकत्व आणि गुरुत्वाची सावली आपल्या तिन्ही भावंडांना दिली. इथंच काहीही चूक नसलेल्या पोरक्या मुलांचा आळंदीकरांनी छळ केला. इथंच माउली रुसून बसल्या आणि मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग गायले. इथंच मुक्ताबाईंनी माउलींच्या पाठीवर मांडे भाजले. इथूनच चांगदेवांचं गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत आकाशात उडाली. एकाच वेळेस दुःख, वेदना, चमत्कार आणि दुसरीकडे ज्ञान, भक्ती, वैराग्य यांची साक्षीदार असलेली ही भूमी. पण त्याहीपेक्षा इथं गावाबाहेर असताना निवृत्तीनाथ भावंडांचा साध्या भोळ्या बहुजनसमाजाशी संपर्क आला. कुणी सुतार, कुणी कुणबी, कुणी गवळी त्यांना सांभाळत होते. कैकाड्यांची भाषा शिकण्याएवढा त्यांना भटक्याविमुक्तांचा सहवास लाभला. आपल्याला कोणासाठी काम करायचं आहे, याची व्यापक जाणीव निवृत्तीनाथांना इथं झाली असावी. निवृत्ती ते निवृत्तीनाथ हा सारा प्रवास इथंच घडला.

या परिसरात सहज लक्ष जातील अशी दोन देवळं दिसली. त्यातलं एक विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं. हे देऊळ चांगदेव महाराजांनी सांगितलं आहे. हे निवृत्तीनाथांसह सर्व भावंडांचं प्रतिकात्मक जन्मस्थान आहे. हे निवृत्तीनाथांच्या हयातीतच देऊळ बनलं होतं म्हणे. याच परिसरात धार्मिक ग्रंथांची पारायणं सुरू असतात. इथल्या प्रसन्न आणि शांत वातावरणामुळे वारकरी शिक्षण संस्थांमधले अनेक विद्यार्थीही कायम असतात. अभ्यासासाठी इथं छोट्या झोपड्या करून राहतात. हे विद्यार्थी गावकर्‍यांकडून माधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. संजय ढाकणे त्यातलाच एक. तो पाच वर्षांपासून इथं राहतो आहे. ज्या परिसरात माउलींच्या कुटुंबाचा छळ झाला, त्यांना यातना सहन कराव्या लागल्या, त्याच परिसरात आज त्यांच्याच नावानं माधुकरी मागून शेकडो विद्यार्थी जगत आहेत, हे सांगताना संजय महाराजांच्या चेहर्‍यावर कृतज्ञता होती. पण संजयसारखा एखादाच हे मान्य करतो आणि बोलूनही दाखवतो; अन्यथा सगळी आळंदीच या कुटुंबाच्या नावावर पोटाची खळगी आणि खिसेही भरत आहे.

इथं असेही काही जण भेटतात, जे निवृत्ती-ज्ञानदेवांवर अन्याय झाल्याचंच अमान्य करतात. आश्चर्य वाटतं की ते सांगणारे आळंदी संस्थानाशी संबंधित असतात. वर आपले हे दावे नाव न सांगण्याच्या अटीवर करतात. ते सांगतात की, त्या काळात ब्राह्मणाला देहान्त प्रायश्चित्त म्हणजे मृत्यू असा अर्थ नव्हता. म्हणजे प्रत्येक जातीसाठी वेगळ्या शिक्षा असायच्या. देहान्त प्रायश्चित्त म्हणजे भूमिगत होण्याची शिक्षा होती. त्यामुळं विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीआईने इंद्रायणीत आपला जीव दिला नाही तर ते बनारसमध्ये गेले. तिथल्या लोकांना ते नंतर दिसल्याचंही त्यांना माहीत आहे. या चारही भावंडांचं वय कितीसं होतं की त्यांच्यावर अन्याय होईल, असा सवालच ते करतात. या भावंडांवर अन्याय झाला असा शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे, असं त्यांचं मत आहे. त्यासाठी ते त्यांची सारी विद्वत्ता पणाला लावतात. यांच्या पूर्वजांनी निवृत्ती ज्ञानदेवांचं जगणं कठीण केलं होतं. आताही आळंदीतल्या पुरोहितशाहीची ही वृत्ती अजूनही बदलेलेली नाही, हे अनुभवून वेदना होतात.

निवृत्तीनाथांचं सानिध्य लाभलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे विश्रांतवड. इथं एक वडाचं झाड आहे. इथं चांगदेवांनी विसावा घेतला होता, असं सांगतात. इथं चांगदेव आणि चारही भावंडांच्या भेटीचं एका भिंतीत कोरलेलं शिल्पाकृती चित्र आहे. थकलेले प्रवासी, आसपास राहणारे अनेक जण या वडाच्या सावलीत दुपारची झोप घ्यायला येतात. आसपासच्या लोकांनी या जागेत अतिक्रमण सुरू केल्यानं इथं संस्थानच्या वतीनं संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. तसेच, इथल्या परिसराचं सुशोभीकरण करण्यात येत आहे. आळंदी संस्थानचा एक सुंदर पण जुना रथ इथं ठेवलेला आहे. पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात येणार्‍या या लाकडाच्या रथावर सुंदर कोरीवकाम केलेलं आहे. हा रथ भाविक, पर्यटकांचं आकर्षण बनू शकेल. पण आता मात्र तो अडगळीत पडलेला आहे. मंदिर परिसरातही या चारही भावंडांची देवळं आहेत.

ज्ञानेश्वर माउली समाधी मंदिराच्या आवारातच एक समाधी आहे भोजलिंग काकांची. या सुतार समाजातील माणसानं या संन्याशाच्या पोरांना आधार दिला. त्याचं ऋण म्हणून माउलींनी त्यांना अनुग्रह दिला म्हणजेच आपल्याकडे असलेलं सगळं ज्ञान समजावून सांगितलं. आळंदीत सगळेच मुलांवर अन्याय करत नव्हते. उलट त्यांना आश्रय देणारेही होते, याचा पुरावा म्हणजे भोजलिंगकाकांची समाधी होय. धर्ममार्तंडांच्या प्रभावानं माणुसकी विसरणारे जसे या आळंदीत होते; तसेच प्रेमाच्या नात्याने चारही भावंडांच्या दुःखावर फुंकर घालणारेही होते. निवृत्तीनाथादी भावंडांना अंगाखांद्यावर खेळवणारं त्यांचं एक चित्रही त्यांच्या छोट्याशा समाधीजवळ आहे.

ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला, याबद्दल वाद असले तरी त्यांनी आळंदीतच समाधी घेतली याबद्दल कोणतेही वाद नाहीत. माउलींच्या संजीवन समाधीपाशी आल्यानंतर निवृत्तीनाथांची आठवण येणं स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर शेवटचा दगड निवृत्तीनाथांनीच लावला. त्यानंतर त्यांच्या भावनांवरचा बांध सुटला. या सुखदुःखाच्या पार निवृत्ती घेतलेल्या नाथांनी हंबरडा फोडला. ते स्फुंदून स्फुंदून रडू लागले. नामदेवांनी केलेलं त्याचं वर्णन हृदय पिळवटून टाकणारं आहे.

ज्येष्ठांचिया आधी कनिष्ठांचे जाणे |

केले नारायणे उफराटे ॥

उफराटे फार कळले माझे मनी |

वळचणीचे पाणी आढ्या गेले ॥

समाधीमंदिराजवळच साठीतले कृष्णा पवार भेटले. आर्मीतून रिटायर्ड झालेल्या या माणसानं आळंदी संस्थानसाठी माउलींचा हायटेक रथ तयार करण्यात योगदान दिलंय. आपल्या आर्मीतील अधिकार्‍यांच्या मदतीनं हे काम त्यांनी केल्याचं ते मोठ्या उत्साहानं सांगतात. बालपणापासून ऐकलं त्यावर वेगळा विचार केला नाही. श्रद्धेनं नमस्कार करतो, निवृत्तीनाथांविषयी विचारलं की, असं स्पष्टच उत्तर ते देतात. इथल्या लोकांनी संतांना ओळखलंच नाही. त्यांनी चमत्कार केल्यानंतर आज हे सोहळे, समारंभ होत आहेत, ते सांगतात. देवळासमोरच दुकान असलेले अविनाश कुळूंजकर सांगतात की, निवृत्तीनाथांनी माउलीला मोठं केलं. त्यांनी गुरू म्हणून शिष्याला मोठं केलं. म्हणूनच माउलींच्या नावानं गजर होतो. निवृत्तीनाथ कुठे ऐकू येतात का? इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत ते निवृत्तीनाथ समजावून सांगतात.

देवळाजवळच आणखी एका दुकानात आम्ही अशाच चर्चा करत होतो. दुकानदाराच्या तोंडून ‘माउली, माउली’चा गजर सुरू होता. माउलींबद्दल आत्मीयतेनं भडाभडा बोलत होता. बोलता बोलता त्यानं सांगितलं, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर झालेल्या अन्यायावर ज्ञानेश्वरीतच लिहिलेलं आहे; पण ती सर्वत्र प्रचलित असलेली नेहमीची ज्ञानेश्वरी नाही. आजची ज्ञानेश्वरी खरी नाही, असं म्हणताच आम्ही उडालोच. ती आपली ज्ञानेश्वरी आहे, असं त्यानं अगदी विश्वासानं सांगितलं. थोडं मागंपुढं होऊन त्यानं एका लोखंडी कपाटातून लाल कापडात गुंडाळलेलं एक जाडजूड पुस्तक काढलं. त्या ज्ञानेश्वरीतले संदर्भ सांगायला सुरुवात केली. संन्याशाच्या पोरांवर झालेल्या अन्यायाबाबत त्यात थेट लिहिलं होतं. हे उल्लेख बाजारात मिळणार्‍या ज्ञानेश्वरीतून वगळण्यात आलेले आहेत, असं तो सांगत होता. ‘ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांना, त्यांच्या कर्तृत्वाला आणि ज्ञानाला आपल्या सोयीनंच स्वीकारलं. आपल्याला अडचणीच्या ठरतील अशा सगळ्या गोष्टी झाकून ठेवल्या.’ ही ज्ञानेश्वरी सर्वत्र उपलब्ध नाही. पण थोडे प्रयत्न केले तर ती कोल्हापुरातून मिळू शकते. मूळ ज्ञानेश्वरीच्या प्रती इतिहासार्य राजवाडे यांनी लपवून ठेवल्या. त्या लोकांपर्यंत येऊच नयेत म्हणून त्यातली अनेक पानं त्यांनी भाकरीसारखी तव्यावर परतवून जाळून टाकली, अशी इंटरेस्टिंग माहिती तो देत होता. हे त्याच्या प्रस्तावनेतच लिहिलेलं आहे म्हणे. ही पोथी कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मी देवस्थानचे वहिवाटदार भालचंद्र श्रीपाद प्रधान यांच्याकडे १९७२ साली मिळाली. ही प्रत १४ शनिवार, विभव संवत्सर शके १४९० म्हणजे १ जानेवारी १५६९ या दिवशी पैठणमुक्कामी लिहून पूर्ण केली आहे. त्यामुळं हे हस्तलिखित एकनाथांच्या ज्ञानेश्वरीच्याही आधीचं ठरतं. त्या प्रतीवर नमूद केल्यानुसार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ प्रकाशनातर्फे ती प्रकाशित करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सवानिमित्त १९९३ साली त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक आणि मराठीचे प्राध्यापक पां. ना. कुलकर्णी याचे संपादन केलं आहे. पंडित बाळाचार्य खुपेकरशास्त्री, प्रा. श्री. ना. बनहट्टी, म. वा. धोंड, म. रा. जोशी या संशोधकांनी ही प्रत एकनाथपूर्वकालीन असल्याचं मान्य केले आहे. मोठ्या आणि जाणकार व्यक्तींनी या ज्ञानेश्वरीला मान्यता देऊनही ही ज्ञानेश्वरी मान्यताप्राप्त का नाही, असा प्रश्न निर्माण होतो. आळंदीतील एका सामान्य व्यक्तीला ज्ञानेश्वरीच्या वेगळ्या प्रतीबाबत आजही लपूनछपून बोलावं लागतं, याचं वाईट वाटतं.

आळंदीतून निघताना राजाभाऊ चोपदारांचं एक उत्तर डोक्यातून जात नव्हतं. ज्ञानेश्वरांचे गुरू एवढीच निवृत्तीनाथांची आळंदीतली ओळख काय, या प्रश्नावर त्यांनी इतरांपेक्षा वेगळंच उत्तर दिलं. ज्ञानेश्वरांनी नाथ परंपरेप्रमाणे स्वतःचं ज्ञान एका शिष्याला देणं अपेक्षित होतं. पण त्यांना ते ज्ञान, संचित सर्वांसाठी खुलं व्हावं असं वाटत होतं. तेव्हा माउलींनी नाथांकडे, त्यांच्या गुरुकडे त्यांचं मन व्यक्त केलं. नाथांनीही ज्ञानेश्वरांचं हे म्हणणं मान्य केलं आणि त्यांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची परवानगी दिली. जर निवृत्तीनाथांनी गुरू म्हणून नकार दिला असता, तर ज्ञानेश्वरीतलं अथांग ज्ञान पुढे आलंच नसतं. राजाभाऊंचं हे ऐकून गुरुशिष्य परंपरा मोडण्यासाठी ज्ञानेश्वरांना पाठिंबा देणारे गुरू शिष्याइतकेच नाहीत तर तसूभर मोठेच वाटू लागतात. ते माउलींना घडवणारे ‘महामाउली’ ठरतात.

आळंदीत मी निवृत्तीनाथ शोधायला आले होते. मला वाटलं, त्यांची मोठी देवळं दिसतील. त्यांच्याबद्दल आळंदीकर भरभरून बोलतील. त्यांच्याशी जोडलेल्या, त्यांचं सान्निध्य लाभलेल्या जागा दाखवतील. तसं काहीच माझ्याबाबतीत घडलं नाही. जे काही ऐकलं ते ज्ञानेश्वर माउलीबद्दल. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल. त्यांच्या काव्याबद्दल. त्यांच्या चमत्कारांबद्दल भरभरून बोलत असतात. आळंदीच नाही तर जगभरातील लोकांना ज्ञानेश्वरी आणि माउलींनी भुरळ घातली आहे. ही भुरळ जितकी ज्ञानेश्वर माउलींची आहे, तितकीच त्यांचे गुरू निवृत्तीनाथांचीही आहे. माउलींना माउली बनवणारे निवृत्तीनाथ आपल्या शिष्याच्या माध्यमातून भेटतच असतात. समाधी, देवळं, जप, गजर, पारायण या सगळ्यात ज्ञानेश्वर माउली असले तरी त्यांच्याही आत अणुरेणू निवृत्तीनाथच आहेत. स्वतः पडद्याआड राहून शिष्याला मोठं करणारा हा गुरू माउलीच्या प्रत्येक गजरावर आपल्याला भेटतो. वारंवार भेटतो. भेटत राहतो. निवृत्तीनाथांनी शिष्य असा घडवला की तो त्यांच्यापेक्षा मोठा झाला. बास… हे लक्षात आलं आणि वाटलं आपल्याला निवृत्तीनाथ कळायला सुरुवात झालीय.

0 Shares
माणुसकीचं उगमस्थान पंढरी‘नाथ’