नाथशृंखला

अभिषेक भोसले

मराठवाडा म्हणजे संतांची भूमी! नेहमी कोरडा दुष्काळ अनुभवणार्याह या भूमीत संतविचारांची बीजं कधी आणि कशी रुजली असतील? त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केल्यास एकमेकांमध्ये गुंफलेली, खोलवर पसरलेली विविध धर्म, पंथांची मुळं आढळतात.

आमचा प्रवास सुरू झाला तो, नाथ चिंचोलीवरून. गहिनीनाथगड अशी या गावाची दुसरी ओळख आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र. गहिनीनाथ महाराजांची समाधी. गहिनीनाथगडाला जाणारा सगळा रस्ता माळरानातून जातो; पण गाव वसलंय एका डोंगरावर. छोटासा घाट चढत तुम्ही गावात पोचता. रस्ता कापत असताना ऊन आणि दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या. रस्त्याची परिस्थितीही मराठवाड्यातील इतर रस्त्यांप्रमाणंच. चिंचोली गावच्या दक्षिण भागाकडून प्रवेश करताना एका मोठ्या कमानीनं लक्ष वेधून घेतलं. ती निरखत काष्टीमार्गे श्री क्षेत्र गहिनीनाथगड संस्थानमध्ये पोचलो. कमानीपासून दीडेक किलोमीटरवर आत गावात गेल्यावर समोर एक मोठी भिंत लागली. दुपारची वेळ असल्यानं गर्दी नव्हती. या भिंतीच्या बाजूला फरशीचं प्रशस्त अंगण आणि उजव्या बाजूला फुला-नारळाचं छोटंसं दुकान होतं. भिंत संपल्यानंतर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार लागलं. प्रवेशद्वाराचं नवं दगडी बांधकाम पुरातन वाटत होतं. या मंदिरात गोरक्षनाथ, गहिनीनाथ महाराज आणि वामनभाऊ महाराज यांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला श्री संत यादव बाबा यांच्या समाधीचंही छोटं मंदिर आहे. मंदिरातील भिंतींवर हरिनाम सप्ताहाचे ‘हँडबील्स’ चिटकवलेले होते. मुख्य मंडपातील भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचं चित्र दिसलं. मूळ मंदिराच्या मध्यभागी गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला वामनभाऊ महाराज आणि उजव्या बाजूला गोरक्षनाथांची समाधी आहे. वामनभाऊ महाराज यांनी या परिसरात नाथसंप्रदाय रुजवण्यासाठी मोठं योगदान दिलंय. त्यामुळंच इथं त्यांचीही समाधी. नाथ आणि वारकर्‍यांचं नातं, त्यांनी दिलेला संदेश याचा विचार करत मंदिर न्याहाळत होतो. गहिनीनाथ महाराजांच्या समाधीच्या दारावरच्या एका पाटीमुळं थबकलो. त्यावर लिहिलं होतं, ‘स्त्रियांना आत जाण्यास मनाई आहे. सौजन्य-ज्ञानप्रबोधिनी सेवाभावी संस्था, चिंचोली नाथ’. म्हणजे अलिकडच्या काळात नाथ आणि वारकरी यांच्या समतेच्या विचारांवर चढविल्या जाणार्‍या पुटांचं हे एक उदाहरण.

यानिमित्तानं मराठवाड्यात फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे, नाथांच्या प्रत्येक मंदिर आणि समाधी परिसरात नाथ आणि वारकर्‍याचं ऐक्य सांगणार्‍या खुणा दिसतात. इथंही गहिनीनाथांच्या समाधीच्या मागं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती उभ्या होत्या. नाथ चिंचोलीमधून दरवर्षी अनेकजण पंढरपूरला वारीला जातात. षष्ठीच्या दिवशी मी नाथ चिंचोलीमध्ये होतो. तर दरवर्षी षष्ठीनिमित्त नाथ चिंचोलीमधून पैठणला दिंडी जाते. यावर्षीही दिंडी गेली असल्यानं मंदिर समितीवरची मंडळी काही भेटली नाहीत. मंदिरातील एका भिंतीवर नाथ चिंचोलीबद्दलची माहिती लिहिली होती. त्यात गहिनीनाथ यांच्याबरोबरच वामनभाऊ महाराज यांनी केलेल्या सेवाकार्याची माहिती होती. आषाढवारी, एकादशीला नाथ चिंचोलीला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मराठवाड्याच्या विविध भागांतून मंडळी इथं दर्शनासाठी येतात. नांदेड, परभणी भागातून काही भाविक सहपरिवार दर्शनासाठी आले होते. त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही नेहमी येतो इकडं. घरी काही देवकार्य असलं तर, पहिल्यांदा इथं दर्शनाला येतो. पंढरीच्या वारीलाही जातो. वारकरी हे नाथ संप्रदायातूनच आलेले आहेत. ज्ञानेश्वरांना नाथांनीच सांगितलं होतं ना, ज्ञानेश्वरी लिहायला असं एकजण म्हणाले.

मंदिराच्या बाहेर येऊन एका झाडाखाली सावलीत बसलो, तर तिथं आलेल्या गावच्या पोस्टमास्तरनं आमच्याकडचं साहित्य पाहून चौकशी केली. मग त्यांना आम्ही नाथसंप्रदायाच्या मराठवाड्यातील पाऊलखुणा शोधत असल्याबद्दल सांगितलं. त्यावर ते म्हणाले, अहो गहिनीनाथांची खरी समाधी तर तिकडं आहे. गावाच्या बाहेर डोंगरात. तो रस्ता दिसतोय बघा तिकडं. त्या वाटेनं जा. तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला तिकडं मिळंल. तोपर्यंत आम्ही याच जागेला गहिनीनाथांची समाधी मानलं होतं. वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतल्यामुळं इथं गहिनीनाथांचंही समाधी मंदिर बांधण्यात आलं होतं.

मग आम्ही मोर्चा वळवला गहिनीनाथ महाराज यांच्या मूळ समाधीकडं. गावापासून दोनेक किलोमीटरवरच्या डोंगरात हे समाधीस्थळ आहे. प्रचंड ऊन आणि अरुंद रस्त्यामुळं आम्हाला हे दोन किलोमीटरचं अंतर दोनशे किलोमीटर वाटायला लागलं. शेवटी दीड-पावणेदोन किलोमीटर अंतर गेल्यावर एक चौफुला आणि छोटीशी पाटी लागली. रंग उडालेल्या पाटीवर बाण काढून लिहिलं होतं, गहिनीनाथ महाराज समाधी स्थळ. त्या बाणाच्या दिशेत जाऊन डावीकडं वळून एका चढावर पोचलो. तिथून समोर झाडांमध्ये एक मंदिर दिसत होतं. मंदिरापलिकडं एक कोरडाठाक बंधारा दिसला. खाली उतरलो. मंदिरासमोर ओढा आणि सभोवती दाट आमराई होती. ओढ्याला लागूनच असलेल्या भिंतीला मध्यभागी एक छोटासा दरवाजा होता. दरवाजाच्या वरच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती. त्यातून आत जाऊन पायर्‍या चढत वर गेलो आणि थेट गहिनीनाथांच्या मूळ समाधीच्या समोर उभे राहिलो. तिथून उजव्या बाजूनं खाली उतरलो. तिथं एक विहिरीसारखं बांधकाम होतं. हा मंदिराचा पाण्याचा स्त्रोत. समाधीसमोरच्या प्रशस्त व्हरांड्यात अनेकजण दुपारची विश्रांती घेत होते. उजव्या बाजूच्या छोट्या सभामंडपात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती होती. व्हरांड्याच्या मागं असलेल्या भिंतीच्या छोट्या खिडकीतून डोकावलो. पलिकडं पाण्याचा डोह दिसला. हा डोह म्हणजे सिंदफणा नदीचं उगमस्थान, असं तिथल्या लोकांनी सांगितलं. बाहेर कडक उन्हाळा असताना समाधीमंदिरात मात्र गारवा होता.

समाधीच्या मुख्य मंदिराच्या दरवाजावर १६१९ असं बांधकामाचं साल कोरलं होतं. बाजूलाच अर्थिक मदतीसाठी लावलेल्या ‘फ्लेक्स’वर गहिनीनाथांसोबतच संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरमहाराज यांचे फोटो छापलेले होते. गहिनीनाथांच्या या मूळ समाधी मंदिरात आल्यापासून एक विशेष गोष्ट उशिरा लक्षात आली. ती म्हणजे मंदिरात वावरणारी सर्व माणसं अंध होती. त्यांच्यातील एकजण गळ्यात वीणा अडकवून पहारा देत होता. दुपारनंतर वीणा दुसर्‍या एकानं घेतला. तोही अंधच होता. वीण्याच्या तारांतून निघणारी कंपनं मंदिरभर झरत होती. हे अंध भक्त सहजतेनं मंदिरात वावरत होते. १९४८ पासून हा अखंड वीणापहारा या ठिकाणी सुरू असल्याचं या मंडळींनी सांगितलं. आजूबाजूच्या गावातील अंध भाविक या ठिकाणी तीन ते सहा महिने राहायला येतात आणि नाथांची सेवा करतात, अशी माहिती मिळाली. ही सर्व मंडळी स्वत:ला वारकरी म्हणवून घेत होती.

त्या ठिकाणी एक नाथपंथीय साधूही होते. त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ही मंडळी आणि तो साधू यांनी आमच्याकडं दुर्लक्ष केलं. मग वीणापहारा देणार्‍यांतील एकानं काही माहिती सांगायला सुरुवात केली. त्यानं सांगायला सुरुवात करताच ‘काहीही माहिती देता का?’ म्हणत तो साधू त्यांच्यावर भडकला. मग सांगणारा माणूस गप्प झाला. साधू तोंडावर पाणी मारून बाहेरच्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याच्यासोबतच्या पोराला म्हटलं, बोलायला लावा की महाराजांना; पण तो म्हणाला, महाराज आता भडकलेत. काहाही बोलणार नाहीत. मग आम्ही निघालोच.

पुढचा प्रवासाचा टप्पा होता, नाथ चिंचोली ते शिरूर तालुक्यातील येवलेवाडी हे गाव. पैठण-पंढरपूर मार्गावरचं हे महत्त्वाचं ठिकाण आणि जालिंदरनाथांचं समाधी स्थळ. नाथ संप्रदायाशी संबंधित असलेली मंदिरं आणि समाधीस्थळांमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही ठिकाणी ‘गोपाळकाला’ उत्सव असतो. थोडक्यात सांगायचं तर गुरुवारी या सर्व ठिकाणी यात्राच भरते. त्यामुळं येवलेवाडीला गुरुवारी जायचं ठरवलं. मग गुरुवारी नाथ चिंचोलीवरून पांढरवाडी फाटा, अंबरनेर गाठलं. अंबरनेरच्या पुढं एक किलोमीटरवर एक मोठी कमान लागली. तिच्यावर लिहिलं होतं, ‘पैठण-पंढरपूर पालखी मार्ग. पाऊले चालती पंढरीची वाट. चैतन्य श्री जालिंदरनाथ तीर्थक्षेत्र येवलवाडी’. आम्ही मंदिर परिसरात पोचलो. तिथं प्रसाद, माळा, नारळ, फोटो यांचे मंदिराबाहेर अनेक स्टॉल्स लागले होते. भोवती सदरा, धोतर, गुलाबी पटके बांधलेली वृद्ध मंडळी दिसत होती. आजूबाजूच्या गावातून ‘टमटम’ आणि स्वत:च्या गाड्यांनी अनेक मंडळी इथं येतात, असं तिथला चहावाला सांगत होता. मंदिरात तुडुंब गर्दी झालेली होती. त्यात स्त्रियांचं प्रमाण मोठं होतं.

मंदिरातील पुजारी लक्ष्मण येवले सांगत होते, फेब्रुवारीत इथं जालिंदरनाथ जयंती महोत्सव असतो. यावेळी सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्यात प्रामुख्यानं कीर्तन, प्रवचन, भजन, आरती आदी कार्यक्रम असतात. या वेळी रायमोहा भागातील बारा वाड्यांवरची मंडळी इथं कावड मिरवणूक घेऊन येतात. काठीच्या मिरवणुकीसोबतच घोडा, छबिन्याची मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडते. महाशिवरात्रीला ही १२ वाड्यांच्या काठ्यांची मिरवणूक असते. काठ्या शिखराला लावल्या जातात. मग पहाटे चारच्या सुमारास या काठ्या घेऊन त्या मिरवणुका मागे फिरतात. पाडवा, अमावस्या, महाशिवरात्रीला याठिकाणी उत्सव साजरे होतात. याशिवाय दर गुरुवारी इथं यात्रा भरते.

मंदिराच्या मुख्य दरवाजापासून ३०-४० पायर्‍या चढून आत गेलं की मूळ समाधी मंदिर लागतं. मंदिराचा दरवाजा ओलांडून आत गेलं की समोर थेट समाधी दिसते. समाधी उंच ओट्यावर आहे. ओट्याला चारी बाजूनं लोखंडी कुंपण घालण्यात आलं आहे. त्यात एक पुजारी सोबतच्या दोन लहान मुलांसोबत येणार्‍या स्त्रियांना होमहवन करून देत होते. होमाच्या धुरामुळं मंदिरातील वातावरण कोंडलं होतं. मंदिराच्या डाव्या कोपर्‍यात तीन-चार मंडळी नवनाथ ग्रंथाचं पारायण करत बसली होती. एका कोपर्‍यात जवळच्याच खेड्यातून आलेली एक पन्नाशीची महिला बसली होती. तिच्या अंगात येत होतं. त्यामुळं म्हणे तिला इथं नाथांच्या सेवेत आणलं होतं. इथं राहून नाथाची सेवा केल्यास अंगात येण्याचा आजार कमी होतो, अशी जवळपासच्या तसंच मराठवाड्यातील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळं ज्यांना असे आजार आहेत अशांना, घरातील लोक या ठिकाणी सेवा करण्यासाठी आणून सोडतात. हे लोक इथं तीन ते सहा महिने थांबून नाथांची सेवा म्हणजे मंदिर परिसरात साफसफाई वगैरे करतात. नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात. त्यात स्त्री, पुरुष दोघंही असतात. मंदिराच्या कोपर्‍यात थांबून मी या सगळ्या गोष्टी पाहत बसलो. गुलाबी रंगाच्या साडीतली एक पन्नाशी ओलांडलेली महिला समाधीसमोर ओट्याच्या खाली बसली होती. बाजूला तिची सासू बसली होती. काही वेळानंतर तिनं तोंडातून विचित्र आवाज काढायला सुरुवात केली. मग कळलं की, तिच्या अंगात आलं आहे. ती थोडा वेळ घुमून शांत झाली.

मंदिराच्या एका दाराजवळ जालिंदरनाथाच्या जन्माबद्दलची एक दंतकथा चितारली आहे. त्यात असं लिहिलंय, पांडवांच्या वंशातील राजा बृहद्रवाने हस्तिनापुरात सोमयाग केला. यज्ञ पूर्ण झाल्यावर यज्ञातील रक्षा काढून साफसफाई करताना तळाशी एक सुंदर तेजपुंज बालक राजा बृहद्रव आणि राणी सुलोचना यांना दिसलं. ते बालक म्हणजेच जालिंदरनाथ होय.

मंदिरात फिरताना वारकरी संप्रदायाशी संबंधित काही खुणा दिसल्या नाहीत. अर्थात इथं वारकरी सप्ताह होतात. या ठिकाणी कल्याण विठ्ठल आल्हाडे नावाचा कडा आष्टी या गावचा पोरगा भेटला. तोही मागील अनेक दिवसांपासून नाथांची सेवा करत होता. याच काळात नवनाथ ग्रंथाचं संपूर्ण पारायण केल्याचं त्यानं सांगितलं. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कनिफनाथ, रेवणनाथ, भर्तृहरिनाथ, चर्पटीनाथ, नागनाथ आणि गहिनीनाथ या सर्व नऊ नाथांबद्दलची इत्थंभूत माहिती त्यानं सांगितली. त्यानं नवनाथांशी संबंधित सर्व मंदिरं आणि समाधींना भेटी दिल्या आहेत. वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाचाच एक भाग आहे, असं तो म्हणाला.

बीड जिल्ह्यातील नाथ चिंचोली आणि येवलेवाडी या दोन ठिकाणांना भेटी दिल्यानंतर पुढं परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका गाठायचा होता. गंगाखेडपासून परळीकडं जाताना वडगाव रेल्वे स्टेशन फाट्यावरून आत अंदाजे १० किलोमीटर अंतरावर हरंगुळ गावी भर्तृहरिनाथांचं समाधी मंदिर आहे. हरंगुळवरून दरवर्षी सीताराम देशमुख यांच्या नावावर नोंद असलेली दिंडी क्रमांक २८६ पंढरपूरला जात असते. गाव तसं बरंच मोठं आहे. भर्तृहरिनाथाचं मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. तर गावाबाहेर असलेल्या टेकडीवर भस्माची समाधी आहे. फेब्रुवारी महिन्यात समाधी मंदिराच्या आवारात मोठी जत्रा भरते, असं मंदिरातील मंडळी सांगत होती. राजेश देशमुख सांगत होते, पूर्वी गावामध्ये सप्ताह वगैरे काहीच व्हायचं नाही; पण संगमनेरचे वामनभाऊ महाले महाराज यांनी नाथांच्या समाधी मंदिरात गुरुवार सुरू केला. फेब्रुवारी महिन्यात गावात हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. आत्तापर्यंत त्यात बंडातात्या कराडकर, बाबा महाराज सातारकर, रामराव ढोक यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपंचमीच्या वेळी गावात मोठी यात्रा भरते. आमचं गावातलं हे समाधीस्थळ जिवंत आहे. त्याची अनुभूती आम्हाला नागपंचमीला येते. नागपंचमीच्या दिवशी समाधीजवळ वारूळ तयार होतं. तसंच वाटीत ठेवलेलं दूधही हे वारुळ पितं. म्हणून आम्ही या स्थळाला जिवंत समाधी स्थळ मानतो. मंदिराच्या परिसरात असलेल्या कडूनिंबाची पानं गोड लागतात. याला आम्ही नाथांचा चमत्कार मानतो. अशा चमत्कारांमधून नाथ आपली अनुभूती देत असतात. उत्सुकता म्हणून मीही ती कडूनिंबाची पानं खाऊन पाहिली. ती खरंच कडू नव्हती. मग माझ्यातला मायक्रोबायॉलॉजिस्ट जागा झाला. या पानांमध्ये असे कोणते रासायनिक घटक उतरलेत, ज्यामुळं त्यांच्यातील कडवटपणा कमी झालाय, हे तपासलं पाहिजे असं मनात आलं. म्हणून ती गोड लिंबाची काही पानं पुण्यात ‘लॅब’मध्ये देण्यासाठी मी सोबतही घेतली.

वारकरी संप्रदायाबद्दल विचारलं असता घनश्याम येडे सांगत होते, नाथ आणि वारकरी संप्रदाय एकच आहेत. तसं वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायातून उगम पावलेला आहे. आमच्या गावात नाथांना मानणारी अनेक मंडळी न चुकता दरवर्षी वारीला जातात. भर्तृहरिनाथ हे मूळचे उज्जैनचे. या भागात फिरत आले असता त्यांना ही जागा आवडली, म्हणून त्यांनी आपला मुक्काम इथंच ठोकला. त्यांना गावातला एक माळी दररोज जेवण पुरवायचा. भर्तृहरिनाथांचा मुक्काम हा गावाबाहेरच्या टेकडीवर असायचा. कालांतरानं या माळ्याचं वय झालं. त्याला अन्न घेऊन दररोज त्या टेकडीकडं जाणं शक्य होईना. मग नाथांनी त्याला सांगितलं, तू काही टेकडीवर येत जाऊ नकोस. मीच जेवण करण्यासाठी गावात तुझ्या घरी येत जाईन. त्यामुळं गावातील लोकांची अशी धारणा आहे की, त्या माळ्यामुळंच नाथ गावात आले. तेव्हापासून वंशपरंपरागत पुजार्‍याचं काम त्या माळी कुटुंबाकडं आलं. ज्या माळ्यासाठी नाथ टेकडीवरून गावात आले, त्या माळ्याची समाधीही मंदिरातच आहे. मुळात मंदिराची काही जागा ही त्या माळ्याच्या घराची जागा आहे. भर्तृहरिनाथाचं हे मंदिर तसं मोठं आहे. बाहेरच्या बाजूला मोठं पटांगण आहे. हे मंदिर बंदिस्त स्वरूपाचं असून, मंदिरात प्रवेश करताना मोठ्या उंचीची भिंत लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारावर लक्ष्मीचा फोटो आहे. आत गेल्यावर एक त्रिशूळ मध्यभागी रोवलेला दिसला. गहिनीनाथ, जालिंदरनाथ यांच्या समाधी स्थळांजवळही असा त्रिशूळ होता हे मला आठवलं. मंदिराच्या आत गेल्यावर समोर मुख्य समाधी मंदिर दिसतं. मंदिराच्या समोरच ते गोड पानाच्या कडूनिंबाचं झाड आहे. मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आहे. समाधी केशरी रंगाच्या कपड्यानं झाकण्यात आली होती. त्यावर मोरपिसांचा एक कुंचा ठेवण्यात आला होता. पूर्वीच्या दोन्ही म्हणजे गहिनीनाथ आणि जालिंदरनाथांच्या समाधीची जागा आत जाऊन पाहता आली नव्हती. ती बंद होती. पण, या ठिकाणी मात्र गावकर्‍यांनी गाभार्‍याचं कुलूप उघडून ती जागा दाखविली. मंदिर तसं खूप जुनं असल्याचं त्याच्या बांधकामावरून वाटत होतं. छताला आधार देण्यासाठी वापरलेली लाकडं जुनाट असल्याचं जाणवत होतं. नाथसंप्रदायावर लवकरच ‘अल्लख निरंजन’ नावाचा सिनेमा येत असल्याची माहिती गावकर्‍यांकडून कळाली. त्या सिनेमाचं शूटिंग या गावात झालेलं असल्यानं आपलं गाव पडद्यावर दिसणार याचं गावकर्‍यांना प्रचंड अप्रूप वाटत होतं. नाथषष्ठीनिमित्त या मंदिरात कार्यक्रम होतात.

इथं भेटलेले राजेश देशमुख सांगत होते, पूर्वी या ठिकाणी म्हणजे मंदिराच्या समोर असलेल्या पटांगणात मुस्लीम समाजातील लोक श्रद्धेनं प्राण्यांचा बळी द्यायचे; पण कालांतरानं गावकर्‍यांनी ही प्रथा बंद पाडली. मंदिराच्या एकदम समोर आजही एक वास्तू आहे. ती या प्रथेचं अस्तित्व तुम्हाला दाखवत राहते. राजेश देशमुख हे सांगत असताना नाथ चिंचोलीमधील गहिनीनाथांच्या मूळ समाधीजवळही अशी प्रथा होती, असं तिथल्या लोकांनी सांगितल्याचं आठवलं.

गावाच्या बाहेर टेकडीवर भृर्तहरिनाथांची भस्माची समाधी आहे. या मंदिराचं बांधकाम नव्यानंच झालंय. मंदिरात बसून गावकर्‍यांशी चर्चा करताना जवळच असणार्‍या भांबुरवाडी आणि गहिनीनाथ देवकरा येथील नाथसंप्रदायाशी संबंधित मंदिरांची माहिती मिळाली. देवकरा हे गाव अंबाजोगाई-किनगाव मार्गावर आहे. तर भांबूरवाडी हे गाव गंगाखेड परभणी रस्त्यावर गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. खरं तर हरंगुळ गावच्या लोकांनाही भांबुरवाडीच्या या मंदिराबद्दल माहिती नव्हती; पण लोणावळ्याचे कोणीतरी तहसीलदार दर्शनासाठी हरंगुळला आल्यानंतर त्यांच्याकडून या लोकांना भांबुरवाडी मंदिराची माहिती मिळाली. वेळेअभावी आम्ही मग फक्त भांबुरवाडी गाठण्याचा निर्णय घेतला.

संत जनाबाईंच्या मंदिरापासून गंगाखेड शहरातून वाहणार्‍या गोदावरीच्या कोरड्या पात्रातून नदी ओलांडून थेट भांबुरवाडीच्या रानात पोहचलो. नदीला पाणी असल्यावर गंगाखेडकडून परभणीच्या दिशेला जावं लागतं. भांबुरवाडीला पोचण्याचा रस्ता कच्चा. अडबंगनाथाचं मंदिर कुठं आहे, असं विचारत विचारत गेलो. गोदावरीच्या तीरावर असलेलं हे छोटंस मंदिर. सोबतचा कॅमेरा पाहून आजूबाजूच्या घरांतील दोन-तीन महिला जमा झाल्या. पुण्यावरून आलो आहे, असं सांगितल्यावर त्यांनी आपुलकीनं प्यायला पाणी वगैरे दिलं. एका छोट्याशा खोलीत हे मंदिर आहे. दुपारच्या वेळी गावात गेलो. गावात एकही पुरुषमाणूस दिसला नाही. लहान मुलं आणि स्त्रीया. त्यांना मंदिराबद्दल काही माहिती नव्हती; पण त्या सांगत होत्या, बुलडाणा, अमरावती, मुंबई, पुणे भागातून लोक गाड्या करून दर्शन घ्यायला येतात. मंदिराची खोली बंदिस्तच होती. बाहेरून कुलूप लावलं असल्यामुळं काही आत जाता येत नव्हतं. जाळीतून आत भिंतीवर लावलेली शंकराची ‘पोस्टर्स’ दिसत होती. मध्यभागी समाधी होती. दाराच्या वरच्या बाजूला गणपती, दत्त, हनुमान यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. गावातील काही लोक नियमीतपणे वारीला जातात, असं त्या महिलांनी सांगितलं.

बीड, परभणीनंतर आमचा पुढचा प्रवासाचा टप्पा होता नांदेड. म्हणजे नांदेड जिल्ह्याचं एकदम शेवटचं टोक माहूर. उन्हानं आत्तापर्यंत शरीराचे दोन प्रादेशिक भाग केले होते. उन्हामुळं काळवंडलेला भाग म्हणजे मराठवाडा आणि ऊन न लागलेला भाग म्हणजे पुणे, असं आम्ही गंमतीनं वर्गीकरण केलं होतं. माहूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. डोंगरं, ओसाड रान, मधेच हिरवीगार झाडी, पानझड, वणव्यानं काळे पडलेले डोंगर अशा निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा पाहत नांदेडपासून १३० किलोमीटरवरील माहूरगडावर आम्ही पोचलो. वाकाटक काळातील नाथसंप्रदायाशी संबंधित लेणी या ठिकाणी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. वास्तविक सरकारी पाट्यांपासून ते रस्त्यावरच्या पाट्यांपर्यंत इथं अस्तित्व होतं ते फक्त पांडवलेण्यांचं. माहूर शहरातील आयटीआयच्या मागच्या बाजूला या लेण्या आहेत. पर्यटनक्षेत्र म्हणून या लेण्यांचा विकास झालेला नाही. गाडी लावून आम्ही शंभरेक पायर्‍या उतरून खाली लेण्यांजवळ पोहचलो. लेण्यांच्या गुंफेतून पलिकडं दिसणारा एकदम हिरवागार सपाट प्रदेश विलोभनीय दिसला. मला या लेण्यांची रचना अजिंठा कार्ला येथील लेण्यांशी मिळतीजुळती वाटली. कार्ल्याला असणारी कमान या ठिकाणी लेण्यांच्या मुख्य भागाच्या दरवाजावर कोरलेली दिसत होती. या लेण्यांना स्थानिक पांडवलेणी म्हणतात. सरकार दरबारीही त्यांची पांडवलेणी अशीच ओळख आहे. डोंगरावरून वेगानं पडणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळं लेण्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भिंतींच्या खांबावर कोरलेली शिल्पं ओळखू येत नाहीत. मुख्य कक्षात आता शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य कक्षाच्या दाराच्या बाजूला असणार्‍या दोन मोठ्या मूर्तींचीही मोडतोड झालेली आहे. फक्त दरवाजावरील कमानींचा भाग तेवढा शाबूत आहे. अधिक माहितीसाठी माहूरमधील महाविद्यालयाच्या इतिहास विभागाला भेट दिली. तिथल्या प्राध्यापकांनीही ही लेणी पांडवलेणीच आहेत, असं सांगणारा प्रबंधच आमच्या हातात सोपवला! मग आम्ही माहूरच्या वस्तूसंग्रहालयाला भेट दिली. या वस्तूसंग्रहालयाचे ‘केअर टेकर’ राम कोंडे यांनी मात्र या ठिकाणाचा नाथ संप्रदायाशी असणारा संबंध अधोरेखीत केला. त्यांच्या मतानुसार गोरक्षनाथांनी माहूरच्या प्रसिद्ध दत्तशिखराला भेट दिली आहे. परिसरात तशा कथा आहेत. या भागात महानुभव पंथाचे अनुयायी अधिक होते. त्यांना नाथ संप्रदायाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न गोरक्षनाथांनी केला असावा. माहूरच्या या वस्तू संग्रहालयात मातृतीर्थ तलावात सापडलेली १५० वर्षांपूर्वीची विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. एकदम काळ्या पाषाणात बनवलेली मूर्ती; पण ती दुभंगलेली असल्यामुळं कोणीतरी या तलावात टाकून दिली असणार, असं कोंडे म्हणाले.

माहूरचा प्रवास संपवून आमचं लातूर जिल्ह्यातील चाकूरजवळच्या वडवळ नागनाथाला जाण्याचं नियोजन होतं; पण, राम कोंडे यांच्या बोलण्यातून आमच्या यादीत अजून एका नावाची भर पडली. मच्छिंद्रनाथ पारडी.

माहूरवरून किनवटकडे निघालो. आसुली फाट्यावरून आत चारेक किलोमीटरवर पारडी नावाची दोन गावं लागली. त्यातील एक म्हणजे मच्छिंद्रनाथ पारडी. या पारडीमध्ये मच्छिंद्रनाथांचं प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्री आणि धर्मनाथ बिजेच्या दिवशी याठिकाणी भंडार्‍याचा कार्यक्रम होतो. इथं मच्छिंद्रनाथांनी अनुष्ठान केलं होतं, अशी माहिती मंदिराची देखभाल करणारे प्रेमनाथ जाधव यांनी दिली. जाधव कुटुंबाकडं मंदिराची परंपरागत जबाबदारी आहे. जमिनीखाली असणार्‍या दोन वेगवेगळ्या गुफांमध्ये हे मंदिर आहे. या गुंफा गावाच्या एकदम मध्यभागी आहेत. मंदिराच्या एका भिंतीवर नवनाथांच्या छोट्या छोट्या मूर्ती तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या मधोमध पाठीमागं दत्ताची एक मूर्ती ठेवण्यात आली आहे. जी पुन्हा माहूरच्या दत्त शिखराशी नातं सांगणारी आहे.

तिथल्या मच्छिंद्रनाथांच्या मंदिराला कळस नव्हता. त्याबद्दल विचारलं असता, नाथ संप्रदायातील मंदिराला कळस लावत नाहीत, असं आम्हाला मोतीनाथ जाधव यांनी सांगितलं; पण मी पाहिलेल्या इतर सर्व मंदिरांना तर कळस होता. येवलवाडीच्या मंदिरात तर उत्सावांमध्ये कळसाला काठ्या लावण्याची परंपरा प्रसिद्ध आहे. आषाढीला ही सर्व मंडळी पंढरपूरला जातात. या नाथ संप्रदायातील मंदिरांमध्ये जाणवलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट इथंही जाणवली. ती म्हणजे, या मंदिरामध्येही दानपेटी नव्हती! आणखी एक म्हणजे मी पाहिलेल्या नाथ संप्रदायातील बहुतेक मंदिरांमध्ये संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचं चित्र होतं. मच्छिंद्रनाथ पारडीच्या मंदिरातही ते दिसलं. अंग आक्रसून घेत गुंफेतील पायर्‍यांवरून खाली उतरलो. आत मच्छिंद्रनाथांची मूर्ती दिसली. या मूर्तीच्या एकदम मागच्या बाजूला भिंतीला खिडकी असल्यासारखी रचना आहे. गावकर्‍यांना त्याबद्दल विचारलं तर माहूरच्या लेण्यांजवळ जाणारा हा भुयारी मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजूच्या दुसर्‍या गुंफेमध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. तर गावाबाहेर गोरक्षनाथाचं मंदिर आहे. आता ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून, त्याचे केवळ अवशेषच उरलेत.

परडी गावातील लोकांनी पडसा गावात अडबंगनाथाचं मंदिर असल्याचं सांगितलं. परडी ते पडसा हे पाच-सहा किलोमीटरचं अंतर. पडसा गावाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या गावाती व्यक्ती नाथ सांप्रदायीक नाहीत; पण त्यांनी या अडबंगनाथाच्या मंदिराची देखभाल उत्तम ठेवली आहे. धर्मराज बिजेच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.

बीड, परभणी, नांदेड आणि आता आमचा शेवटचा टप्पा होता, लातूर. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गाव. तिथं नागनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे. तसंच औषधी वनस्पतींसाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. नुकतीच शिवजयंती साजरी झाली होती. त्यामुळं दुतर्फा भगवे झेंडे फडकत होते. वडवळ गावात शिरतानाच गेल्या पाच दिवसांपासून आम्हाला तळणारा सूर्य ढगांआड गेला आणि थोड्याच वेळात रप रप करीत आलेल्या पावसानं आम्हाला गाठलंच. तसंच भिजलेल्या अवस्थेत आम्ही नागनाथाचं मंदिर गाठलं. मंदिर चांगलंच प्रशस्त होतं. एका भिंतीवर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहित असल्याचं मोठं चित्र रेखाटण्यात आलंय. इतर भिंतीवर हनुमान, शंकर, तुळजाभवानी आणि दत्ताची चित्रं आहेत. तर त्याच्या समोरच्याच भिंतीवर नवनाथांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. तिथं साईबाबांचेही अनेक फोटो दिसत होते. मंदिरात एकही गावकरी दिसत नव्हता. गाभार्‍याबाहेरच्या एका छोट्या काचेच्या कप्प्यात नागनाथांची मूर्ती आहे. गावातील अनेक लोक पंढरपूरच्या वारीला जातात असं समजलं.

नाथ संप्रदायाशी संबंधित ठिकाणांना भेटी देत होतो, तिथल्या लोकांशी बोलत होतो, तशी या स्थळांची यादी वाढत होती. आपण मराठवाड्यात वर्षभर फिरलो तरी ही ठिकाणं संपणार नाहीत, असं वाटायला लागलं. वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीत रुजून दुसरं झाडं तयार होतं. मग या वटवृक्षाची एक साखळीच तयार होते. तसा हा नाथ संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या सोबतीनं मराठवाडाभर पसरला आहे, असं जाणवलं. आपण त्याच्या काही पारंब्यांना तरी स्पर्श करून आलो, याचं समाधान वाटत आहे.

0 Shares
मायबा, कान्होबा मज लावियेले नाथपंथा