निवृत्ती तटाके निघालो आम्ही

अविनाश गोसावी

सद्गुरू निवृत्तीनाथांची थोरवी गाताना ज्ञानेश्वरमाउली आपली सर्व प्रतिभा पणाला लावतात. त्यांच्यापासून ते संतपरंपरेतले शेवटचे संतकवी मानले जाणार्याज निळोबारायांपर्यंत जवळपास प्रत्येक संत निवृत्तीनाथांचा गौरव करतोच करतो.

श्रीमन् निवृत्तीनाथ महाराज. भागवत संप्रदायाचे आद्यपीठ. ज्ञानेश्वरमाउलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणासाठीच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो. आद्यपीठ, आद्यगुरू, आदिनाथ असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज. संताच्या हृदय, भाव, मनातले अलौकिक ऐश्वर्यरूप म्हणजे श्री निवृत्तीराज. निवृत्ती या तत्त्वाची साक्षात भावार्थसंपन्न परिणीती म्हणजे, निवृत्तीनाथांचं स्वरूप. श्रेष्ठ गुरुतत्त्वाचं रूप म्हणजे ज्ञानदेवांच्या मनातल्या शब्दब्रह्माचं प्रकटीकरण. निवृत्तीनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना भक्तीच्या ओथंबलेपणातून मन:स्पर्श करावा लागेल. निवृत्तीदेवांच्या संजीवन समाधी वैभवाला ७१९ वर्षांचा कालावधी झाला. नाथांच्या संजीवन समाधीसमोर मन: मस्तक व्हावं लागेल. हो मनच! कारण नमस्कार ही मनाची भाषा आहे.

निवृत्तीनाथांचे शिष्योत्तम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

यदक्षरममनाख्येयमानंदमजकेवलम |
श्रीमन् निवृत्तीनाथेती ख्यातं देवतमाश्रये ॥

अक्षर म्हणजे ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षर’ म्हणजे नाश न पावणारे आहेत. अर्थात निर्विकार स्वरूपाचे आहेत. कोणत्याही तर्‍हेनं सांगता येण्याजोगं नाहीत, ते आनंद स्वरूप आहेत. जन्मविरहित, एकमेव आहेत. ऐश्वर्ययुक्त श्री निवृत्तीनाथ नावानं प्रसिद्ध असणारं दैवत आहे. त्यांचाच मी आश्रय करून राहतो.

ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, शेकडो अभंग याद्वारे गुरुवर्यांचं अनेक प्रकारानं भाववर्णन करणारे ज्ञानदेव म्हणतात, माझ्या निवृत्तीरायाचं रूप आकाशाहून मोठं आहे. वर्णन करता येत नाही त्यांच्या रूपाचं. परब्रह्म आहेत ना ते! ब्रह्म कुठे पूर्ण आकळता येतं का? ज्ञानदेवांना ब्रह्मज्ञानाची किल्ली सापडली आहे गुरूकृपेनं! ज्ञानदेव वर्णन करतात,

ब्रह्मज्ञानाची किल्ली | सांगितली एकेच बोली |
निवृत्तीराजे बोलविली बोली | तेची बोली बोललो ॥

अमृताची गोडी कशी आहे, सांगता येतं का? मन रसाळ भक्तीनं बोलू लागतं. पंढरीची वारी आणि संताची विठ्ठल दर्शनाची आस. अप्रतिम उत्कट सामावलं आहे या वारीच्या वाटेवर. विठुरायाच्या सगुण मूर्तीनं संतांच्या मनाला अशी साद घातली आहे गेल्या शेकडो, हजारो वर्षांपासून. या आर्त भावनेतून पाझरलेले भक्तिप्रेमयुक्त शब्द म्हणजे अभंग. संतांच्या मनातले भावकल्लोळ म्हणजे अभंग. अभंग म्हणजे अनुभूती. अभंग म्हणजे भावसाक्षी, साक्षीभाव, अंतरंगातले तादात्म्य, भजन, कीर्तन, संवाद. अभंग म्हणजे महाराष्ट्र देशीचं प्रबोधन आहे. समाज जीवनाचा धागा. अभंग म्हणजे संतांचं शाश्वत स्वरूप. तेच अक्षरब्रह्म, संवेदना, उपदेश, चिंतन, समर्पण, सर्वकाही. याच अभंगांतून नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि इतरही महान संतांनी आपले भाव व्यक्त केले आहेत, निवृत्ती दादांबद्दल.

भक्तशिरोमणी नामदेव. निवृत्तीनाथांचा प्रत्यक्ष सहवास घडलेले. समाधीसुखाचा सोहळा ज्यांच्या शब्दांनी आपल्या मनाचा आजही ठाव घेतो. डोळे पाणावतात, असं नामदेव महाराज म्हणतात,

नाही जाती कुळ वर्ण आधिकार |
क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे ॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट |
निजबोधे इष्ट स्वरूप माझे ॥
नव्हे आप तेज वायू व्योम |
महततत्व तेही विराट नव्हे ॥
नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण |
अनुभूती भजन होऊनी नव्हे ॥
निवृत्ती म्हणतसे ऐका ज्ञानेश्वरा |
माझी परंपरा ऐसी आहे ॥

निवृत्ती तत्त्वाची उत्तुंगता यथार्थपणे जाणवते या वाणीतून. निवृत्ती हे तत्त्व आहे. गुरू तत्त्व स्वरूप असतात. संताची भाव एकवाक्यता अनुभूतीपूर्ण आहे. नामदेवराय म्हणतात,

स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती |
संसाराची शांती झाली माझ्या ॥

निवृत्तीनाथांच्या समाधीनंतर दोनशे तीस वर्षांनी पैठणक्षेत्री जन्माला आलेले एकनाथ महाराज यांची निवृत्तीनाथांबद्दलची अभंग रचना भाव-सौंदर्यानं संपन्न आहे. कसे आहेत आपले निवृत्तीनाथ? नाथ महाराज सांगतात,

विश्वाचा तो गुरू स्वामी निवृत्ती दातारू |
आदिनाथा पासुनी परंपरा आली जाण ॥

अजून एका अभंगात ते म्हणतात,

समाधी निवृत्ती म्हणता | हरे संसाराची व्यथा ॥
दृष्टी पाहता निवृत्तीनाथ | काय भय नाही तेथ ॥
समाधी पहाताची डोळा | काय सांगू तो सुख सोहळा ॥
एका जनार्दनी शरण | समाधी पाहताच जाण ॥

जन्माला आलेल्या प्रत्येकास वेगवेगळी व्यथा आहे. शरीराच्या माध्यमातून विविध प्रकारचं सुख मिळविण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. याबरोबर तो दु:खालाही प्राप्त होतो. या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत. याच्या वर घेऊन जाणारी मनाची स्थिती म्हणजे आनंद. ‘केवळ आनंद’ हे निवृत्तीनाथांचं रूपवैभव आहे. नाथमहाराज सांगतात, समाधी, निवृत्ती हे शब्द अंत:करणातल्या भक्तीतून उगम पावले की, संसारातल्या व्यथा नाहीशा होतात. जीवनातली भीती ही भावना संपून जाते. असा निवृत्ती-भक्त द्वंद्व-मुक्त होतो. आनंद ऐश्वर्यासह जगतो.

एकनाथ महाराजांच्या अभंगरचना निवृत्तीनाथांचं ‘स्वामी रूप’ स्पष्ट करत जातात. ते म्हणतात,

धन्य धन्य निवृत्तिदेवा | काय महिमा वर्णावा ॥
शिव आवतार धरूनी | केले त्रैलोक्य पावन ॥
समाधी त्र्यंबकशिखरी | मागे शोभे ब्रह्मगिरी ॥
निवृत्तिनाथाचे चरणी | शरण एकाजनार्दनी ॥

निवृत्ती नाम हे तत्त्व रूपानं समजावून घेतले, तर परमार्थ सुखाचा लाभ होतो. नाथमहाराज म्हणतात, ‘निवृत्ती नामाचा निज छंद| एकाजनार्दनी आनंद ॥’ आनंद स्वरूपाच्या जाणीवेमुळं माणूस जीवन चांगल्याप्रकारे जाणू शकतो आणि सर्व बंधनांतून मुक्त होता येतं. एकनाथ महाराज सांगतात, आपणा सर्वांसाठी ‘एका जनार्दनी न करी साधन | निवृत्ती म्हणता जाण सर्व जोडे ॥’

सेना महाराज असोत की, चोखोबाराय, जनाबाई असोत की, कान्होपात्रा, तुकाराम महाराज असोत की, निळोबाराय, सोपानदेव असोत की, मुक्ताई, निवृत्तीनाथांचं गुणगायन करत असताना त्यांच्या वाणीतून पाझरलेला भाव आपल्या मनात आजही पोचतो. नामदेव महाराजांच्या नंतरच्या काळातले सेना महाराज निवृत्तीनाथांचं वर्णन करतात,

जीवा उद्धारण म्हणता निवृत्ती |
जुनाट जुगादीचे गुप्त ठेविले ॥
तेची निवृत्तीनाथ दिधले |
ज्ञानदेवे प्रगट केले ॥
जगा दाविले निधान ॥
ध्यान धरिता निवृत्ती |
आनंदमय राहे वृत्ती |
सेना म्हणे चित्ती धरा |
स्मरता चुके येरझारा ॥

चोखोबा महाराज त्यांच्या अभंगगाथेतील ‘संताची आरती’ या प्रकरणात निवृत्तीनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा करतात. चोखोबांसारख्याच निवृत्तीनाथांना समकालीन असणार्‍या संत जनाबाईंनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता यांचं जन्मशक त्यांनी आपल्या अभंगातून नोंदवून ठेवलं आहेत. ‘निवृत्ती आनंदे प्रगटले|… सदाशिवाचा अवतार | स्वामी निवृत्ती दातार |’, असं त्या म्हणतात. निवृत्तीनाथांच्या अभंगाचे बोल कोणी लिहून ठेवले, याची माहिती त्यांच्या अभंगातून मिळते. त्या लिहितात, ‘निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने | मुक्ताईची वचने ज्ञानदेवे |’ कान्होपात्रा लिहितात, ‘शिव तो निवृत्ती | विष्णू ज्ञानदेव पाही ॥’ निवृत्तीनाथांच्या रूपाचं वर्णन त्या शिवस्वरूपात करतात.

तुकाराम महाराजांनीही निवृत्तीनाथांच्या वर्णनाच्या ओव्या गाण्याचा निश्चय सांगितला आहे,

पंढरीये माझे माहेर साजणी |
निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगया ॥
आनंदे ओविया गाईन मी त्यांसी |
जाती पंढरीसी वारकरी ॥

तुकोबारांचे शिष्य निळोबा महाराज ज्ञानेश्वरांची परंपरा सांगताना प्रतिपादन करतात,

शिव शक्ती निमित्य दावून |
उपदेशिले निजगुह्यज्ञान ॥
गुह्यागुह्यकथन | तेणे गहीनिते उपदेशून ॥
उद्धरावया दीनजन | तेणे निवृत्ती शिक्षापिला ॥
तोची हातवटी ज्ञानेश्वरा | दिधली आदी परंपरा ॥
देहाच्या दीपकी वस्तू एक चोख |
असोनिया शोक का करितो ॥
देहाभारी आत्मा नांदे निरंतर |
असता हा विचार का धावतोसी ॥
निवृत्तीचे सार हरिरूप सदा | नित्य परमानंदा रतलासे ॥

सोपनकाका काय म्हणत आहेत सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दल ते पाहूया,

तुझा तुची थोर तुज नाही पार |
आमुचा आचार विठ्ठल देव ॥
न दिसे दुसरे निर्धारित खरे |
श्रीगुरू विचारे कळले आम्हा ॥
तव तू संपन्न आमुचे हो धन |
सांगितली खुण निवृत्तीदेवी ॥
आत्मरूप सखा आत्मपणे चोख |
निर्गुणीचे चोख सगुणी झाले ॥

आता निवृत्तीनाथांच्या मुक्ताबाई काय म्हणतात ते बघूया. मन घेऊन जावू सातशे वर्षा पल्याड…चांगदेवांना प्रश्न विचारला होता मुक्ताईनं…

मुक्त होतासी तो का बद्ध झाला |
आपल्या बंधने आपण बंधलासी ॥

मुक्तीचं स्वरूप कसं असतं, हे किती पटकन/चपखल सांगितलं या आदिमायेनं…

आता मुक्ताबाई सांगत आहेत, त्यांच्या श्रीगुरू निवृत्तीनाथांबद्दल…अहो त्यांच्या निवृत्तीदादाबद्दल…..

मुक्ताई चैतन्य अवघे चिद्वन |
आदी अंतु खुण निवृत्तीची ॥
व्यक्त अव्यक्तीचे रुपस मोहाचे |
एक तत्त्व दीपाचे हृदयी नांदे ॥
चांगया फावले फावूनी घेतले |
निवृत्तीने दिधले आमुच्या करी ॥

निवृत्तीच्या तटा, ने तू भक्ता

मुक्ताई आपल्या मनातले भावकल्लोळ व्यक्त करतात, बघूया त्यांच्याच शब्दात,

प्रारब्ध संचित आचरण गोमटे |
निवृत्ती तटाके निघालो आम्ही ॥
मुळीचा पदार्थ मुळीच पै गेला ॥

0 Shares
दोन आधारवड श्रीनिवृत्तीनाथ नामावली