निवृत्तीनाथ वटवृक्ष आणि सोपान, मुक्ताबाई या वटवृक्षाच्या सावल्या म्हणाव्यात एवढा निवृत्तीनाथांचा प्रभाव या दोघांवर होता. आईवडिलांच्या मागे आपल्याला सांभाळणार्याव या थोरल्या दादाच्या पावलावर पाऊल टाकून या भावंडांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. परस्परांना श्रीमंत करणार्याो या नात्याला दिलेला हा उजाळा...
श्री निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरादी संतांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. कारण या संतांनी स्वतःविषयी असं काही लिहून ठेवलेलं नाही. संत नामदेवांनी मात्र, श्री निवृत्तीनाथादी भावंडांविषयी लहानसं अभंगात्मक चरित्र लिहिलेलं आहे. महत्त्वाची ठळक माहिती त्यात उपलब्ध आहे. मात्र, निवृत्तीनाथांविषयी खास अशी माहिती त्यात आढळून येत नाही. श्री ज्ञानदेवांसारखी ग्रंथसंपदा श्री निवृत्तीनाथांनी निर्माण केलेली नाही, तरी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इ. ग्रंथांचा ‘बोलविता धनी’ श्री निवृत्तीनाथ आहेत, असं ज्ञानदेवांनी आपल्या ग्रंथात नमूद करून ठेवलं आहे. निवृत्तीनाथांचे सुमारे ३७४ अभंग उपलब्ध आहेत; परंतु त्यात त्यांनी वैयक्तिक जीवनाविषयी काहीही लिहिलेलं नाही. त्यांचा जन्म शके ११९०मध्ये झाला. संत जनाबाईंच्या अभंगात खालीलप्रमाणे नोंद आढळते.
शालिवाहन शके अकराशे नव्वद | निवृत्ती आनंद प्रगटले ॥
निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि त्यांचे आई-वडील यांच्या जीवनातील प्रमुख घटना महाराष्ट्रातील आबालवृद्धांना तोंडपाठ आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. निवृत्तीनाथांचं आयुष्य उणंपुरं तेवीस वर्षांचं! मातापित्यांचा वियोग झाला त्या वेळी ते अवघे ९-१० वर्षांचे असावेत. पण, त्या कठीण परिस्थितीत ते धाकट्या तीनही भावंडांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहिले. त्यांना धीर दिला. सतत ज्ञानाची प्रेरणा दिली. ज्येष्ठ बंधू आणि श्रेष्ठ गुरू या दोनही भूमिकांवरून त्यांचं व्यक्तिमत्त्व मोठं लोभस आहे, असं दिसतं. विरक्त, प्रज्ञावंत, ज्ञानी, समाजातील सर्वांविषयी प्रेम आणि कळवळा, सदा तृप्त, शांत, धीर गंभीर, भारदस्त स्वभावाचे! संत मंडळात त्यांचं स्थान फार आदराचं, अनन्यसाधारण आहे.
निवृत्तीनाथांच्या आणि ज्ञानदेवांच्या अभंगांत अनेक ठिकाणी साम्य आढळतं. निवृत्तीनाथ वयानं, अनुभवानं मोठे असल्यामुळं काही अभंगांत त्यांच्या अनुभवजन्य ज्ञानाची छटा दिसून येते.
हरिविण न दिसे जनवन आम्हा | नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥
आम्ही चकोर हरि चंद्रमा | आम्ही कळा तो पौर्णिमा ॥
चंदनाचे झाड परिमळे वाड| त्याहूनी कथा गोड विठ्ठलाची ॥
निवृत्तीनाथांचे अभंग रचनेनं थोडेसे मोठे आहेत; पण अर्थपूर्ण आणि गोड आहेत. गुरु महिमा सांगणारे अभंग पुनःपुन्हा वाचावेसे वाटतात. उदा.
निवृत्ती निष्काम सर्व आत्माराम | गयनी हे धाय गुरुगम्य ॥
निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज | गयनीराजे मज सांगितले ॥
निवृत्ती पुरता गुरू विवरण | गयनीची खूण आगम रुपे ॥
निवृत्ती परिवार गुरू गयनी अमर | गोरक्षी कंदर बल माझे ॥
गुरू गहिनीनाथ यांचा दाट प्रभाव निवृत्तीनाथांवर पडलेला दिसून येतो. तसंच, ज्ञानदेवांच्या वाड्मयावर निवृत्तीनाथांच्या विचारांची छाप पडलेली दिसते. निवृत्तीनाथांच्या वृत्तीत वैराग्याचं, गांभीर्याचं लेणं असलं तरी, कृष्णनामाच्या महात्म्यानं त्यांचे अनेक अभंग नटलेले दिसतात. ‘सगुण निर्गुण एकु गोविंदु रे’ मानणार्या या परंपरेत निवृत्तीनाथांच्या अभंगांत निराकाराचं, निर्गुणाचं, योगविषयक अनुभूतीचं जसं दर्शन होतं तसंच त्यातून राम कृष्णांच्या सगुण प्रेमाचं लाघवही विपुल प्रमाणात दिसतं.
अरुप बागडे निर्गुण सवंगडे | खेळे ताडेकोडे नंदाघरी ॥
ते रुप संपूर्ण यदोदा खेळवी | कृष्णाते आळवी वेळोवेळी ॥
वैकुंठ दुभते नंदाघरी माये | ते पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥
सर्वस्वरुप नाम राम सर्व घनश्याम | तो गोकुळी आत्माराम दूध मागे ॥
भाग्येविण दुभते दैव उभडते | नंदाघरी आवडते घरी खेळे ॥
जेथुनि उद्गारु पसवे ओंकारु | तोचि हा श्रीधरु गोकुळी वसे ॥
योगियांचे धन ते ब्रह्म संपन्न | तो हा जनार्दन नंदाघरी ॥
संत सोपाननाथ
ज्ञानदेव, नामदेवांच्या प्रभावळीत वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व असणार्या संतांमध्ये सोपाननाथ स्वकर्तृत्त्वावर स्वतःची योग्यता टिकवू शकले. त्यांचा पारमार्थिक अधिकार लक्षात घेता आणि अन्य संतांनी त्यांचा केलेला गौरव पाहता त्यांची योग्यता खचितच मोठी होती हे जाणवतं. ज्याप्रमाणं संतश्रेष्ठ ज्ञानदेवांना ‘माउली’ म्हणून अत्यंत प्रेमानं, आदरानं संबोधलं जातं, त्याचप्रमाणं सोपानदेवांना वारकरी सांप्रदायिकांत अतिशय सलगीनं आणि लडिवाळपणे ‘सोपानकाका’ असं म्हटलं जातं. संत नामदेवांनी त्यांचा गुणगौरव केला आहे. त्यांनी घडवलेलं सोपाननाथांचं व्यक्तिमत्त्व दर्शन वाचकांना एक आत्मज्ञान संपन्न, आचारशील, मौनी, अंतर्मुख, निजधनासाठी बांधलेल्या, एकनिष्ठ महात्म्याची ओळख करून देतं. विनम्रता आणि सत्वशीलता हे सोपाननाथांच्या व्यक्तिमत्त्वातील अनन्यसाधारण घटक असून, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट केल्याप्रमाणं अमानित्व गुणाचं दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून स्पष्ट होतं. संत म्हणून, ज्ञानी विभूती म्हणून, सर्वांचे लाडके सोपानकाका म्हणून आणि साहित्यात स्वतंत्र ठसा उमटविणारे श्रेष्ठ रचनाकार म्हणून सोपाननाथांची योग्यता लक्षात राहाते. ज्ञानेश्वरांचं सर्वसंग्राहक आणि व्यापक तत्त्वज्ञान सोपानदेवांच्या वाङ्मयात दिसतं. ज्ञानदेवांच्या चरित्रात आणि सोपानदेवांच्या चरित्रात जितकं साधर्म्य आहे तितकंच त्यांच्या कार्यातही दिसून येतं. संत सोपाननाथ हे ज्ञानेश्वरादी भावंडात क्रमानं तिसरे. त्यांच्या जन्माविषयी संत जनाबाईंचा एक अभंग प्रमाण मानण्यात येतो.
शालिवाहन शके अकराशे नव्वद| निवृत्ति आनंद प्रगटले ॥
त्र्याण्णवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले | सोपान देखिला शाण्णवात ॥
नव्याण्णवाच्या साली मुक्ताई देखिली | जनी म्हणे केली मात त्यांनी ॥
सोपाननाथांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी गुरू आज्ञेवरून संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. हे जनरूढी विरुद्ध असल्यानं त्यांना वाळीत टाकण्यात आलं. याच कालखंडात सोपानदेवांचा जन्म झाला. ब्रह्मवृंदानं बहिष्कृत ठरवलेल्या विठ्ठलपंतांनी आपल्या चारही मुलांचा विद्याभ्यास करवून घेतला. ब्रह्मवृंदाची देहान्त प्रायश्चित्ताची आज्ञा प्रमाण मानून विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांनी आपले देह गंगेला अर्पण केले. अशारीतीनं आईवडिलांच्या मायेला आणि सावलीला मुकलेली आणि बहिष्कृत असणारी भावंडं पोरकी होऊन उघड्यावर आली. सोपाननाथांच्या बालपणाच्या जीवनात झालेला हा मोठा आघात होता. त्यावेळी त्यांचं वय अवघं सहा वर्षांचं होतं. चारही भावंडांत एकमेकांविषयी आत्यंतिक प्रेम होतं. संत नामदेवांनी वर्णन केलेल्या ‘आदी’, ‘तीर्थावळी’, ‘समाधी’ या तीन प्रकरणात्मक ज्ञानदेव चरित्रावरून हे लक्षात येतं. वडील भाऊ निवृत्तीनाथांना नाथपंथीय सत्पुरुष गहिनीनाथ यांच्याकडून उपदेशदीक्षा मिळाली होती. तोच उपदेश त्यांनी आपल्या भावंडांना सांगितला. आदिनाथ-मस्त्येंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ-सोपाननाथ अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. गुरुबाबतची उच्च कोटीची भावना आपल्या काव्यात व्यक्त करताना सोपाननाथ म्हणतात.
दुजेपणी ठाव द्वैत ते फेडिले | अद्वैत बिंबले तेजोमय ॥
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक | निवृत्तीने चोख दाखविले ॥
निमाली वासना बुडाली भावना | गेली ते कल्पना ठाव नाही ॥
सोपान नैश्वर परब्रह्मसाचार | सेवितु अपार नाम घोटे ॥
सोपानदेवांच्या नावावर आज अवघे ५२ अभंग उपलब्ध आहेत. या अभंगांतून वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीतील प्रमुख तत्त्व प्रकट झालेली दिसतात. पंढरी माहात्म्य, पंढरीतील काला, नाममहिमा, आपल्या स्थितीसंबंधी जनांशी उद्गार, उपदेश, ज्ञान, घोंगडी इ. अभंगांचे विविध प्रकार त्यांच्या रचनेत वैविध्य आणतात. त्यांचे अभंग अत्यल्प असले, तरी त्यातील निवेदन प्रांजळ आहे. जे आपले ते सांगितले, अशी सोपाननाथांची वृत्ती आहे. त्यांच्या अभंगवाङ्मयातून त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रौढ आणि प्रगल्भ असल्याचं जाणवतं. विचार व्यक्त करणारी संयमी भाषा त्यांनी वापरलेली दिसून येते. वर उल्लेख केल्याप्रमाणं सोपानदेवांच्या जीवनात सद्गुरूंचं स्थान अनन्यसाधारण होतं. गुरूकृपेनं लाभलेलं आत्मज्ञान, नष्ट झालेली द्वैताची भावना याचा उल्लेख त्यांनी अभंगांतून वेळोवेळी केलेला आहे. थोरले बंधू म्हणूनच नव्हे तर गुरू म्हणून निवृत्तीनाथांविषयी त्यांना वाटणारा अपार आदर व्यक्त करताना सोपानदेवांचे शब्द अधिक हृद्य होतात.
नाही नाही भाव न दिसे प्रपंच | रोहिणी आहाच मृगजळ ॥
तुटलासे सांटा वासना चोखाळा | दिननिशी फळ राम झाला ॥
रामेविण दुजे नाही पै हो बिजे | बोलतू सहजे वेदु जाण ॥
निवृत्ती खुणा ज्ञानदेवा हरि | सोपान झडकरी झोंबिन्नला ॥
निवृत्तीनाथांचा हा कृपाशीर्वाद जीवनात महत्त्वाचा टप्पा आहे, असं त्यांना वाटतं. वासनेपासून दूर होण्यात, संसाराच्या प्रलोभनापासून अलिप्त राहाण्यात महत्त्वाचा वाटा गुरूंचा आहे, याची प्रांजळ कबुली सोपानदेव देतात. हरिस्मरणाचा सहज उच्चार हा वेद जाणण्याएवढा महान असल्याचं ते अगदी सहजासहजी सांगतात. ‘सोपान झडकरी झोंबिन्नला’ सारख्या शब्दातून मनातील हा तीव्र आवेग अभिव्यक्त होताना दिसतो.
संत मुक्ताबाई
मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या कनिष्ठ भगिनी. ज्ञानेश्वरादी भावंडांचा जन्म आपेगाव येथे झाला. मुक्ताबाईंचा जन्म शके १२०१ (इ. स. १२७९) प्रमाथिनाम संवत्सर, आश्विन शुद्ध प्रतिपदा- घटस्थापना या दिवशी माध्यान्ही झाला, असं उपलब्ध पुराव्यांवरून दिसतं. तरीही या चारही भावंडांचे जन्मकाल आणि जन्मस्थळ या विषयी मतमतांतरं आढळतात. या चारही भावंडांची चरित्रं अलौकिक आणि विलक्षण आहेत. मुक्ताबाई साधारण १७-१८ वर्षच जगल्या; पण तेवढ्या अल्पवयात थोरांना लाजवील एवढं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं. उच्चपद मिळवलं. या वयात त्यांच्या प्रतिभेनं गाठलेली उंची स्तिमित करणारी आहे. एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान कुठून, कसं आलं? या प्रश्नांना उत्तर नाही.
त्र्यंबकेश्वराच्या आसमंतात गुरू गोरक्षनाथ शिष्य गहिनीनाथ यांनी आपल्याला नाथ संप्रदायाची दीक्षा दिल्याची नोंद संत निवृत्तीनाथांनीच आपल्या अभंगांमध्ये केलेली आहे. निवृत्तीनाथांकडून मंत्रदीक्षा आणि परमज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदेवांनी आपले गुरू आणि ज्येष्ठ बंधू यांच्या आज्ञेनं मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना अनुग्रह दिल्याचा उल्लेख संत एकनाथ महाराजांनी केलेला आहे. ते म्हणतात,
ज्ञानदेवे उपदेश करुनिया पाही | सोपान मुक्ताई बोधियेली ॥
मुक्ताबाई बोध खेचरासी केला | तेणे नामयासी बोधियेले ॥
नाम्याचे कुटुंब चांगा वटेश्वर | एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा॥
या अभंगात आलेल्या ज्ञानदेवांच्या उपदेशाचा अर्थ मार्गदर्शन असाच घेणं योग्य होईल. कारण प्रत्यक्ष मुक्ताबाईंच्याच अभंगात गुरूकृपेविषयी येणारे उल्लेख हे निवृत्तीनाथांसबंधी आहेत. उदा. वृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता | सर्वही समता सांगितली ॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज | हरिप्रेमे उमज एकतत्त्वे ॥
चांगया फावणे फावोनी घेतले | निवृत्तीने दिले आमुच्या करी ॥
यावरून मुक्ताबाईंना अध्यात्माचा उपदेश निवृत्तीनाथांनीच दिला होता, असा निष्कर्ष काढता येतो. चांगदेव वटेश्वर यांना संत मुक्ताबाईंनी अनुग्रहीत केलं, असं मानलं जातं. या दृष्टीनं पाहिलं तर संत निवृत्तीनाथ हे चांगदेव वटेश्वर यांचे परात्पर गुरू ठरतात. मुक्ताबाईंची कविता वाचताना त्यांना जन्मजात एका आध्यात्मिक अधिकारपदाचा लाभ झालेला असावा, असं मनात आल्यावाचून राहात नाही. एखाद्या महायोगिनीप्रमाणं त्या सदैव अलौकिकपणे वावरतात. त्यांच्या प्रकृतीला उपदेश परता मानवते. नाम माहात्म्य सांगण्याची आणि पारमार्थिक सुखाचं वर्णन उपदेशकाच्या भूमिकेतून करण्याची त्यांची लकब त्यांच्यावरील निवृत्तीनाथांचा प्रभाव दर्शवणारी आहे. काही अभंगांतून हा उपदेश केवळ सांकेतिक असतो, तर काहींतून त्यांना आलेला ज्ञानानुभव व्यक्त होतो तो पुढीलप्रमाणे :
विश्रांती मनाची निजशांती साची | मग त्या यमाची भेटी नाही ॥
आधी करी मनन मग सारी स्नान | रोकडेचि साधन आले हाता ॥ आत्मज्ञानाबद्दल बोलता बोलता मुक्ताबाई जेव्हा आपले अनुभव शब्दांकित करू लागतात, तेव्हा त्यांच्या अनुभवाचं अस्सल रूप ध्यानात येतं.
निर्गुणाची सेज सगुणाची बाज | तेते केशवराज पहुडले ॥
कैसे याचे करमे दिवसा चांदणे | सावळे उठणे एका तत्वे ॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण | जीव शिव संपूर्ण एका तत्त्वे ॥
ज्यायोगे मुक्ताबाई हरिरूप बनल्या ‘मुक्तामुक्त कोडे सुटले’
एका रुपे दीपक लावलेला पाहिला तो ज्ञानानुभव मुक्ताबाई वरील ओळींमधून शब्दबद्ध करू पाहतात. त्यामुळं त्यांचे हे अभंग सधन झाले आहेत. थोडक्यात, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांचा अंतरंग अनुबंध हा नुसता जीवशास्त्रदृष्ट्या एकरूप नव्हता, तर वान्द्मयीनही प्रस्तुत अनुबंध हा एकात्म होता. संत निवृत्तीनाथ हे त्यांना वडील बंधू म्हणून पूज्य आहेतच; परंतु त्याहीपेक्षा जास्त ते गुरू म्हणून वंदनीय होते, हे वरील उदाहरणावरून लक्षात येऊ शकेल.
धर्म जागो निवृत्तीचा दोन आधारवड