पंढरी‘नाथ’

राकेश कदम

वारकरी परंपरेचा आजचा पसारा समजून घ्यायचा असेल, तर पंढरपुरातच जावं लागतं. वारकरी विचारांचं तिथलं उत्तुंग देवालय अनुभवल्यावर लक्षात येतं, की या देवालयाचा भक्कम पाया आहेत, संत निवृत्तीनाथ.

‘निवृत्तीनाथांचं पंढरपुरात फारसं काही नाही, तिकडे त्र्यंबकेश्वरला गेलात की सगळे काही मिळेल’.

पंढरपुरात आल्यावर भक्तांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात; पण निवृत्तीनाथांचं पंढरपुरात काय? या प्रश्नाचं समाधान देणारं उत्तर मात्र सापडत नाही. निवृत्तीनाथांचं कर्तृत्व जिथं शिखरावर पोचलं त्या चंद्रभागेच्या तिरावर निवृत्तीनाथांविषयी सांगणारं कुणी सापडत नाही. हभप महाराज, कीर्तनकार, पत्रकार, मूर्तीकार, बडवे, उत्पात यांच्या कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य आणि ग्रंथविक्रेते अशा सगळ्यांना विचारून बघितलं. निवृत्तीनाथ आणि पंढरपूर या विषयावर जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याची जबाबदारी असलेलं बेलापूरकर कुटुंब वगळता इतर सर्वांकडून आलेली उत्तरं एकाच प्रकारची होती, त्र्यंबकेश्वरला जा, इथं काही नाही.

समता वर्तावी अहंता खंडावी |
तेणेचि पदवी मोक्षमार्ग ॥
क्षमा धरा चित्तीं अखंड श्रीपती |
एक तत्त्व चित्तीं ध्याईजेंसू ॥
नाम हाचि मंत्र नित्य नाम सार |
दुसरा विचार घेऊ नको ॥
अन्य शास्त्र भजना नाही पै मुक्तता |
हरिनाम गाता मुक्ती रोकडी ॥

हा एकच अभंग निवृत्तीनाथांच्या विचारांचं कर्तृत्वाचं मोठेपण सांगण्यासाठी पुरेसा आहे. भक्तिमार्गाच्या प्रचार आणि प्रसाराला देशभर जाण्यापूर्वी संत निवृत्तीनाथ आणि भावंडं आपली दिंडी घेऊन पंढरपूरच्या वेशीजवळ पोचले होते. अभ्यासकांना विचारलं तर ते आषाढ शुद्ध नवमी शके १२१३ अशी तारीख सांगतात. पंढरीत पोचल्यानंतर दशमीला संतमंडळींपैकी नामदेव, सावता माळी, गोरोबा, चोखोबा, भागाबाई, जनाबाई, चांगदेव आदींनी त्यांचं स्वागत केलं होतं. पी. के. पाटील यांच्या निवृत्तीनाथ चरित्रातले संदर्भ खरे मानले तर सुवासीन म्हणून संत भागाबाई या महार संत महिलेनं या चारही भावंडांचं स्वागत औक्षण केलं होतं. त्याच दिवशी भागाबाई यांनी आपल्या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी प्रथम ‘ऐसी कृपाळू माउली’ असा शब्दप्रयोग केला होता. महार ही धर्ममार्तंडांनी बहिष्कृत, अस्पृश्य ठरवलेली जात. पण, निवृत्ती आणि त्यांची भावंडं सामाजिक समतेची पताका घेऊनच भक्ती आणि ज्ञानमार्गाच्या प्रसाराला निघाले होते. त्यामुळं निवृत्तीनाथांचा धाकटा भाऊ आणि शिष्य ज्ञानेश्वर हे भागाबाईंसाठी ‘माउली’ होते. पंढरपुरात आल्यानंतर निवृत्तीनाथांनी नामदेवांसोबत भजन, कीर्तन केलं. यानंतर सर्व जण वारकरी विचारांच्या प्रचारासाठी उत्तरेत गेले.

जगभर ज्ञानदीप लावण्याचा वसा घेऊन तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी आणि त्यानंतरही निवृत्तीनाथ पंढरीत नक्कीच आले होते. त्यांचं पंढरपुरातलं वास्तव्यही बराच काळ असावं. नामदेवांसह सर्वच समकालीन संतांनी त्याबद्दल मोठ्या आदरानं आणि प्रेमानं लिहून ठेवलं आहे. या काळातच चंद्रभागेच्या वाळवंटात सामाजिक क्रांतीची पताका तेजानं तळपत होती. नामदेव त्यात आघाडीवर होते. ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीत केलेल्या वैचारिक अधिष्ठानाची जोड मिळाली होती. नाथपंथाकडून मिळालेला समतेचा ‘दंशू’ त्यांनी वारकर्‍यांपर्यंत पोचवला होता. तिथेच जातपातीचा भेदभाव संपवणारा काला झाला. कीर्तन, अभंग अशा लोकजागराच्या हत्यारांना धार चढली. त्या सगळ्याच्या पायात निवृत्तीनाथ ठामपणे उभे होते. पण, याच कर्तृत्वाच्या खाणाखुणा आज मात्र सापडत नाहीत.

संत निवृत्तीनाथ आणि नाथ परंपेरचा वारसा जाणून घेण्यासाठी मी पंढरपुरातील बेलापूरकर महाराजांच्या मठात पोचलो. मठामध्ये एक ज्येष्ठ वारकरी वीणा वाजवत उभा होता. आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वरहून येणारी संत निवृत्तीनाथांची पालखी याच मठात उतरते. अंमळनेकर महाराजांचा मठ म्हणूनही या मठाला ओळखलं जातं. संत भानुदास महाराज बेलापूरकर यांनी माघ वद्य एकादशी शके १८२२ला या मठाची स्थापना केली. सागवानी लाकूड वापरून सुबकरीत्या तयार केलेल्या या मठात संत निवृत्तीनाथांचं पादुका मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला भानूदास महाराजांचे वंशज मोहन महाराज आणि त्यांचं कुटुंबीय राहतात. मी या मठात गेलो तेव्हा मोहन महाराज त्र्यंबकेश्वरहून येणार्‍या निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, मोहन महाराज यांच्या मातोश्री सुधा बेलापूरकर आणि चुलतभाऊ केशव बेलापूरकर यांची भेट झाली. या दोघांनीही बेलापूरकरांच्या आजवरच्या पिढीनं केलेल्या कामांची माहिती दिली.

भानुदास महाराजांच्या पुढाकारातूनच संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरपुरात यायला सुरुवात झाली. १९४०मध्ये भानुदास महाराजांनी निवृत्तीनाथांची पालखी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यापुढे ठेवली होती. त्यांनीच पुढे पंढरपुरात या मठाची, पादुका मंदिराची स्थापना केली. मंदिरात नित्योपचार होतात. तुळशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील पांडुरंग देशमुख यांनी हस्तलिखित निवृत्तीगाथा बेलापूरकरांच्या मठाला दिली होती. ही गाथा आजही जपून ठेवली आहे. चैत्र वद्य चतुर्थी ते एकादशी यादरम्यान निवृत्तीगाथेचं पारायण होतं. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वर्षातून अनेक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांना आमच्या कुटुंबाची आवर्जून उपस्थित असते, असं केशव महाराज यांनी सांगितलं.

यादरम्यान मोहन महाराज यांच्याशी फोनवरून संपर्क झाला. मोहन महाराज म्हणाले, निवृत्तीनाथ पंढरपूरला आले होते; पण त्यानंतर ते उत्तरेत गेले. ज्ञानेश्वरमाउलींनी पुढे वारकरी पंथ चालवला. निवृत्तीनाथांना भेदाभेद अमान्य होता. हीच परंपरा आम्ही वारकरी पुढे घेऊन चाललो आहोत.

बेलापूरकर कुटुंबीयांच्या भेटीनंतर पंढरपुरातील प्रसिद्ध मूर्तीकार जयसिंग आणि राजेंद्र मंडवाले बंधूंची भेट घेतली. मंडवालेंची ही आठवी पिढी सध्या कार्यरत आहे. विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या मूर्ती त्यांनी घडवल्या आहेत. संत निवृत्तीनाथांची मूर्ती बनवून घेण्यासाठी तुमच्याकडे किती लोक येतात या प्रश्नावर राजेंद्र मंडवाले म्हणाले, विदर्भ, खान्देशातील काही लोक चौकशी करून जातात. आम्ही आजवर विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या १० हजारांहून अधिक मूर्ती तयार करून दिल्या आहेत. निवृत्तीनाथांच्या फार तर २० ते २५ मूर्ती करून दिल्या असतील. ज्येष्ठ बंधू जयसिंग यांनी निवृत्तीनाथांचं एक चित्र रेखाटलं आहे. त्याआधारेच आम्ही मूर्ती साकारत असतो. निवृत्तीनाथांच्या मूर्तीची पूजा करताना बरेच नियम पाळावे लागते. फार कडक नियम असतात. त्यामुळं त्यांची मूर्ती फारशी मागत नाहीत, असं स्प्ष्टीकरणही राजेंद्र यांनी नोंदवलं. खरं तर निवृत्तीनाथांनी या सगळ्या ओवळ्यासोवळ्यातून आणि गूढवादातून बाहेर निघण्यासाठीच भक्तिमार्गाची सोपी पायवाट घालून दिली. त्याच निवृत्तीनाथांची मूर्ती कडक नियमांमुळे पूजली जात नाही. संतांचे पुकार खरंच व्यर्थ गेले का, असं वाटायला लावणारी ही माहिती.

निवृत्तीनाथांचे विचार लोकांपर्यंत पोचले असते तर असं घडलं नसतं. कीर्तनकार क्वचितच कधीतरी निवृत्तीमहाराजांचे अभंग सोडवायला घेतात, तेही काही समाधीदिनाचं औचित्य असेल तरच. त्यांच्यावरची पुस्तकंही फारशी नाहीत. पंढरीतील प्रसिद्ध ग्रंथविक्रेते मुकेश येवणकर सांगतात की, वारकरी आम्हाला ज्ञानेश्वर, तुकाराम गाथा मागतात. दोघांचीही चरित्रं मागितली जातात; पण निवृत्तीगाथा अथवा निवृत्ती महाराजांचं चरित्र फारसं कोणी मागत नाही. सीडीवाल्यांना तर एकच निवृत्तीमहाराज माहीत असतात. हभप निवृत्तीमहाराज इंदुरीकर देशमुख. त्यांच्या कीर्तनाच्या सीडी वारकर्‍यांमध्ये सुपरहिट आहेत. यू-ट्यूबवरपण निवृत्ती असा सर्च केला की तेच सापडतात.

पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळ बिडकर यांनी १९७४मध्ये संत निवृत्तीनाथांवर ‘पंढरीसंदेश’ साप्ताहिकाचा विशेषांक प्रकाशित केला होता. या विशेषाकांची एक प्रत आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. हा अंक प्रकाशित करण्यासाठी त्या वेळी बरेच परिश्रम घेतले होते. निवृत्तीनाथांच्या चळवळीची माहिती घ्यावी यासाठी तो अंक प्रकाशित केला. तसा दुसरा प्रयत्न आजवर कुणी केल्याचं ऐकिवात नाही, असे बिडकर यांनी सांगितलं.

निवृत्तीनाथांचा हा शोध घेत असताना नाथपंथीय लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी झाला. अखेर सनातन हिंदू धर्माचे समर्थक वा. ना. उत्पात यांची भेट घेतली. संवाद सुरू होताच वा. ना. उत्पात म्हणाले की, पंढरपुरात निवृत्तीनाथांबद्दल विशेष काही सापडणार नाही. गांधी रोडवर एक मठ आहे; पण तो अंमळनेकर महाराजांचा मठ आहे. मुळात संतांचे वारसदार हे विचारांचे खरे वारसदार म्हणता येणार नाहीत. ज्ञानेश्वरमाउलींना निवृत्तीनाथांचा नाथपंथ वारकरी पंथामध्ये विलीन केला. देगलूरकर, औसेकर ही महाराज मंडळी खरं तर नाथपंथीय आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये संत निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराजांचे यांच्यातील संवाद आहेत. संतांची स्तवनं गाताना खूप विशेषणे गातोस. त्यात खूप रममाण होतोस. आम्हाला मुद्दा सांग, असं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना बजावलं आहे. आम्ही ऐकायला बसलोय की कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं. तू दुसरंच काहीतरी सांगतोय. हा संवाद सुद्धा एक छान विषय होऊ शकतो. परंतु, नाथपंथात सांगितलेले मार्ग हे सामान्य माणसाच्या आवाक्यात नाहीत. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी या मार्गानं जाऊ नका, असं सांगितलं आहे.

वा. ना. उत्पात यांच्या भेटीनंतर मी पुन्हा बेलापूरकरांच्या मठात पोचलो. कारण नावापुरते का होईना, निवृत्तीनाथ सापडणारं तेच एक ठिकाण होतं. मठातल्या निवृत्तीनाथ पादुका मंदिरासमोर एक वयस्कर वारकरी हातात वीणा घेऊन रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं पुटपुटत होता. वीणेचा स्वरही अतिशय शांतपणे उमटत होता. मठाची स्थापना झाल्यापासून येथे वीणावादन सुरू आहे. तोही म्हणाला, निवृत्तीनाथांची माहिती मिळवायची असेल तर इथं काय करताय, त्र्यंबकेश्वरला जा. पंढरपुरात निवृत्तीनाथ सापडणार नाहीतच. ते शोधायचे असतील तर आत आत शिरून शांतपणे ऐकावं लागतं. त्या वीणेकर्‍याच्या गळ्यातल्या वीणेच्या सूरांसारखं. आज वारकरी परंपरेचा प्रभाव गेल्या सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ जगभर पसरतो आहे. त्याचं सगळ्यात मोठं केंद्र असलेल्या पंढरपुरातच समजून घेता येतं. हा सारा पसारा म्हणजेच निवृत्तीनाथांचा माग आहे. पायाचे दगड दिसतात का कधी? त्यावर उभारलेल्या मंदिराच्या कळसाला नमस्कार केला जातो. पंढरपुरात केला जाणारा प्रत्येक नमस्कार निवृत्तीनाथांपर्यंत पोचत असतो.

0 Shares
महामाउली कीर्तनकारांचे ‘आयटीआय’