तरीही आपण ‘कूल’

Ringan

आठवत असेल तर गेल्या वर्षी ‘रिंगण’चा संत जनाबाई अंक कॉ. गोविंदराव पानसरेंना अर्पण केला होता. तेव्हा त्यांच्या हौतात्म्याला एक वर्षही झालेलं नव्हतं. ‘आदरणीय कॉम्रेड’ असा मायना लिहून तेव्हा जे वाटलं, ते भडभडून लिहिलं होतं.

‘पुढच्या वर्षी ‘रिंगण’ कुणाला अर्पण करावं लागेल, त्याची तयारी अविवेकाच्या मंडपात सुरू असेल’, असं त्यात लिहून गेलो होतो. ही भीती होती. ती खरी होऊ नये अशी आशाही होती. पांडुरंगानं ती ऐकली मात्र नाही. अंक आल्यानंतर महिनाभरातच डॉ. एम. एस. कलबुर्गींचा खून झाला.

पुन्हा एकदा भल्या पहाटे काळोख दाटला. आपण पुन्हा हादरलो. विवेकाच्या लढाईच्या वगैरे गोष्टी केल्या. पुन्हा सगळं विसरून गेलो. नव्या सरकारनं खुन्यांना पकडल्यामुळं तर गंगेत घोडं न्हाऊन सुकलंही. आपल्यासमोर तपस्व्यांना मारलं जात आहे. तरीही आपण ‘कूल’ आहोत आणि स्वतःला संतांच्या विचारांचे पाईक म्हणवण्यात धन्यता मानतो आहोत.

संतांनी मराठी मुलखाच्या काळ्या मातीत शेकडो वर्ष विवेकाची मशागत केलीय. तिथंच आज अविवेकाचं तण माजलंय. खुनी म्हणून ज्यांची नावं समोर आलीत, त्यांच्या बापजाद्यांनी कधीकाळी संतांच्या पताका खांद्यावर घेतलेल्या असणार नक्की. संतांचा छळ करणार्‍यांना सर्रास सनातनी म्हटलं गेलंय. आजचे सनातनी मात्र नाव तुकोबांचं घेत आहेत आणि कामं मंबाजीची करत आहेत. अशावेळेस एकतर आपल्याला संतांच्या बाजूला यावं लागेल किंवा सनातन्यांच्या. तिसरा पर्याय नाही.

विवेक अविवेकाच्या या लढाईत संतांच्या पाळ्यात उभं राहता यावं म्हणून ‘रिंगण’ची धडपड आहे. पुढच्या वर्षी संत विसोबा खेचरांवर अंक काढायचं ठरवलं आहे. डॉ. कलबुर्गी महात्मा बसवेश्‍वरांच्या क्रांतीचा वारसा अधोरेखित करत होते. त्याच विचारांचा मराठीतला सर्वात जुना ग्रंथ विसोबांनी लिहिलाय. त्यांच्या निमित्तानं बसवण्णा ते कलबुर्गी शोधायची आमची इच्छा आहे.

कॉम्रेड, गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला शब्द दिला होता, विवेकाची पताका खाली पडू देणार नाही. तेच पुन्हा एकदा सांगतो आहोत. निवृत्तीनाथ साक्ष आहेत त्याला.

सचिन परब

श्रीरंग गायकवाड

0 Shares
जनाबाई पायरी वाट निवृत्तीची