वटवृक्ष

भास्कर हांडे

देवाचं रूप आपल्यापुढं ज्या संतांनी सगुण साकार केलं, ते संत प्रत्यक्ष कसे दिसत असावेत, याचं फक्त अनुमानच आपण लावू शकतो. हे अनुमान आपण तत्कालीन सामाजिक परिस्थिती, संस्कृती, इतिहास यावरून काढू शकतो. अशा निरीक्षणांच्या आधारेच रिंगणच्या कव्हरवर निवृत्तीनाथांचं चित्र रेखाटण्यामागचे हे विचार...

काश्मिरी शैव परंपरेतील नाथपंथीय विचारांची शाखा महाराष्ट्राच्या भूमीत रुजली. या वटवृक्षाच्या अनेक पारंब्या काश्मिर, पंजाब राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या प्रांतात रुजल्या. हा वृक्ष दिवसेंदिवस विस्तारतच गेला. या वृक्षाच्या सावलीत जीवनाच्या वाटेवर निघालेले पांथस्थ विसावले, सुखावले. शिवाच्या सार्वभौमिक तत्त्वाला मान्य करत वैष्णवांनी याच वडाच्या पारंब्यावर झोके घेतले. इथंच त्यांनी डाव मांडले, डाव मोडले. पारंबी आणि मातीचा जिव्हाळा वाढत गेला. या वडाच्या सावलीत अनेक संकरने घडली. खडकावरील रुजलेल्या या वृक्षाच्या मुळ्या खोल भूगर्भ छेदू लागल्या. सह्याद्रीच्या कड्याकड्यावर एकेका वृक्षानं ठाण मांडलं. डोंगर माथ्यावर एक वृक्ष अन् पायथ्याला शेतकरी, संसारी, विचारी महंत वा संत…रिंगणच्या निवृत्तीनाथ विशेषांकासाठी कव्हर रेखाटण्यापूर्वी असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

शाळेत असल्यापासून निवृत्तीनाथादी भावंडांची अनाथपणाची कहाणी ऐकलेली. वाघ पाठीमागं लागल्यानं त्र्यंबकेशवराजवळच्या डोंगरात हरवलेले निवृत्तीनाथ एका तपानंतर पुन्हा कुटुंबाला भेटले, असं चरित्रात सांगितलं जातं. हे एक तप गहिनीनाथांच्या सहवासात घालवल्यानंतर पुन्हा परतलेले निवृत्तीनाथ अमूलाग्र बदललेले होते.

हा बदल विचार-आचारातला तर होताच. पण, तो वेशभूषेतही असणार. अर्थात संतांच्या मांदियाळीत आपणाकडून निवृत्तीनाथ तसे उपेक्षितच राहिले. त्यामुळं आत्ताच्या डिजिटल युगातही गुगलवर त्यांच्या प्रतिमा सापडत नाहीत.

निवृत्तीनाथांच्या पोशाखाचा विचार करत असताना तत्कालीन जागतिक इतिहास, संस्कृती लक्षात घ्यायला हवी. ग्रीक, रोमन, इजिप्शियन कालीन संस्कृतीत पुरुषांचा वेश हा एकाच सलग कपड्याचा असायचा. उच्च वर्ग आणि राजघराण्यातील पुरुषांच्या वेशामध्येही फार प्रकार नव्हते. अरेबियन संस्कृतीनंतर वेशामधील विविधता जाणवू लागली. मात्र, आध्यात्मिक, धर्मासंबंधित तत्त्ववेत्त्यांचा पोशाख एकसारखाच म्हणजे सफेद रंगाचा राहिला.

निवृत्तीनाथांचा काळ हा फार पुरातन नाही. तो मध्ययुगीन म्हणता येतो. आधुनिक काळ सुरू होण्याआधी त्याची सुरुवात झाली. भारतावर परदेशी आक्रमणं सुरू झाली होती. इस्लाम धर्माची स्थापना होऊन बौद्ध धर्माशी त्याचा संग्राम सुरू होता. त्यात ख्रिश्‍चन धर्म प्रस्थापित होऊन १२०० वर्ष झाली होती, तर इस्लाम धर्म ५०० वर्षांचा होऊन विस्तारित होण्याच्या मार्गावर होता. संस्कृत्या इस्लामच्या दबावाखाली बदलण्याच्या स्थितीत होत्या. चेंगीझखान उत्तर आशियातून युरोप ते पश्‍चिम आशियात धडक देऊन ख्रिश्‍चन धर्माला शह देत होता. चेंगीझखानाच्या फौजा १३व्या शतकात मंगोलियाला परत जाता जाता उत्तर इराण, मध्य आशिया अशा ठिकाणी वास्तव्यास राहिल्या. हा एक फार मोठा संकरणीय काल आहे. जशा अलेक्झांडरच्या फौजा नैऋत्य भारतात विखरून राहिल्या होत्या. या सर्वांचा परिणाम इथल्या समाजजीवनावर, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी, वस्त्रप्रावरणांवर झाला. साहजिकच या काळात जन्माला आलेली निवृत्तीनाथ आणि भावंडंही हे संक्रमण अनुभवत होती. यातील वैचारीक बदलाचे मोठे प्रवर्तक निवृत्तीनाथ ठरले. त्यांच्या काळात महाराष्ट्रातील समाजजीवन एका वेगळ्या अवस्थेतून जात होतं. समाज कर्मकांडांच्या दलदलीत अडकून पडला होता. जगभर धर्म आणि सत्ता यांच्यात संघर्ष वाढला असताना इथं धर्माच्या व्यवस्थापनातच अंदाधुंदी माजली होती. यात परिवर्तन घडणं क्रमप्राप्त होतं. याच क्षितिजावर आपण उभे आहोत, याची जाणीव निवृत्तीनाथांना झाली असणार. म्हणूनच तर त्यांनी ज्ञानदेवांतील आत्मज्ञानाची ताकद ओळखून त्या ज्ञानाचा स्रोत सामान्य जनांपर्यंत पोचवला. निवृत्तीनाथ मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, जगात धर्मा धर्मांची लढाई सुरू असताना महाराष्ट्रात नाथ पंथाचं तत्त्वज्ञान ज्ञानदेवांच्या मुखातून वैष्णव मनोभावे ऐकत होते.

नवनाथांतील गहिनाथांचा शिष्य निवृत्तीनाथ. या नाथांच्या स्थलांतरांमध्ये उत्तर, मध्य पश्‍चिम भारत आणि आजचा पाकिस्तानमधील मुलतान, सिंध, गुजरात हे प्रांत प्रामुख्यानं येतात. १९४७च्या फाळणीनंतर मुलतान आणि सिंधवरून येणारे योगी, ज्यांना आपण दरवेशी म्हणतो त्यांचं येणंजाणं कमी झालं. महाराष्ट्राचा शेजारी गुजरात, सिंध, मुलतान हे प्रांत धुळे, देवगिरी या मुलुखापर्यंत जोडलेले होते. नाथांची ती परिक्रमा आजही आहे. तिचा मार्गही कायम आहे. जो महानुभावी पंथाशी मिळता जुळता आहे. या वेगवेगळ्या धर्म, पंथांचा परिक्रमा मार्ग एकमेकांना आडवा उभा छेदतो. त्यातील नाथ पंथियांची परिक्रमा अशीच वेगवेगळ्या डोंगरावरील गुहेमध्ये वास्तव्य केलेल्या ठिकाणांना भेट देत असते. त्यात मुलतान मधीलही गुंफा आहेत.

नाथ पंथीयांचा पोशाख मध्ययुगीन म्हणजेच इजिप्त, रोमन, ग्रीक तसाच पार्शियन आणि भारतीय संस्कृतीमध्ये कमी जास्त प्रमाणात सारखेपणा धरून होता, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. इजिप्शीयन ‘रा’ रोमन ‘धर्मगुरू’ ग्रीक तत्त्ववेत्ता यांचे तेव्हाचे पुतळे आहेत. त्यांचे पोशाख पाहायला मिळतात, त्यात असंच एका कपड्यापासूनचं सलग वस्त्र असतं. तसंच वस्त्र भारतातही विविध पक्षांचे अनुयायी परिधान करत असतील. त्याच पठडीतील वेश निवृत्तीनाथांचाही असणार.

नंतरच्या म्हणजे १०व्या शतकानंतर कपडे रंगीत करण्याची प्रथा आली. ख्रिश्‍चन धर्माचे सुरुवातीचे कपडे पांढर्‍या रंगाचेच असत. यहुदी, रोमन, कॅथलिक, इजिप्शीयन यांचे धर्म अनुयायीसुद्धा पांढ-या रंगातील वस्त्रं परिधान करतात. हिंदूच्या वस्त्रांमध्ये भगवा केशरी रंग सामावला गेला. तर, महानुभावी आणि रिया पंथातील अनुयायी काळ्या रंगांची वस्त्रं परिधान करतात. जैन धर्मातील अनुयायी सफेद रंगाचे तर बौद्ध अनुयायीच भगवा वेश परिधान करतात. ख्रिश्‍चन आर्थोडॉक्स काळ्यारंगाची वस्त्रं परिधान करतात. हे सर्व विचारात घेऊन चित्र रेखाटताना निवृत्तीनाथांच्या वेशाचा विचार करावा लागला.

अर्थात निवृत्तीनाथांचा आणि त्यांच्या भावंडांचा वेश यात फरक आहे. ज्ञानेश्‍वर महाराज आणि सोपान महाराज यांचीही वस्त्रं निवृत्तीनाथांसारखीच असायला हवीत; परंतु नाथपंथातून तपस्या केलेले निवृत्तीनाथ आज फिरणार्‍या नाथ पंथीयांसारखे भगवं वस्त्र घालत होते का हा प्रश्‍नच आहे. कारण निवृत्तीनाथांसह ही भावंडं कोणत्याही धार्मिक विधीला सामोरी गेली नव्हती. ती इतर सामान्य जनांसारखीच वाढली आणि राहिली. त्यामुळं त्यांची वस्त्रंही सामान्यांसारखीच असायला हवीत. म्हणून निवृत्तीनाथ मी पांढर्‍या रंगात रंगवले. त्याचं दुसरं कारण त्यांनी जो रंगविरहित प्रकाश सामान्य लोकांपर्यंत पोचवला तो प्रकाशच मुळी सप्तरंगाचा आहे. सफेद वस्त्र ही वस्तू आहे. वस्तूचा गुणधर्म रंगहीन आहे. प्रकाश रंगहीन दिसतो; पण तो सप्तरंगांचं मिश्रण आहे.

0 Shares
उत्तरायण धर्म जागो निवृत्तीचा