केदारी महाराज

सुनील इंदुमान ठाकरे

केदारी महाराजांचं जीवनचरित्र थक्क करणारं आहे. त्यांच्या नावावर अनेक चमत्कार आहेत; समाजजागृतीचं त्याचं कार्य मोठं आहे. जगणं कसं आदर्श असावं, हे त्यांनी आपल्या आचरणातून लोकांना पटवून दिलं. पंढरपूरपासून 8-9 किलोमीटरवर बाभळगाव हे लहानसं गाव आहे. तिथं 1720मध्ये महाराजांचा जन्म माळी कुटुंबात झाला. त्यांना शेखा नावाची थोरली बहीण होती. आई-वडलांच्या निधनानंतर शेखानं त्यांचा सांभाळ केला. पुढं शेखा यांचं लग्न माळशिरस तालुक्यातल्या पिलीव गावातील शंकर ननवरे यांच्यासोबत झालं. एकट्या पडलेल्या महाराजांना शेखानं सासरी आणलं. बहिणीच्या सासरी केदारी बहिणीच्या नवर्‍याला माळीकामात मदत करू लागले. लहानपणापासूनच महाराजांचा अध्यात्माकडे ओढा होता. ते अखंड हरिचिंतनात राहायचे.

सातारा, कोकणकडून आलेल्या वार्‍या पिलीवला मुक्कामी असायच्या. या वारकर्‍यांची महाराज सेवा करायचे. मळ्यातली फळं, भाजीपाला त्यांना द्यायचे. ही गोष्ट त्यांच्या भावजींच्या लक्षात आली. ते भडकले. त्यांनी महाराजांना घरातून बाहेर काढलं. आता त्यांचे सर्वच आधार तुटले. वारकर्‍यांच्या सोबतच ते पंढरपूरला आले. दिवसा माधुकरी मागावी आणि रात्री चंद्रभागेच्या वाळवंटात झोपावं, असा त्यांचा दिनक्रम असायचा. एक दिवस गरुडखांबाजवळ मल्लपा महाराज वासकरांची आणि त्यांची भेट झाली. मल्लपा महाराजांनी केदारी यांचं सामर्थ्य, तेज आणि अधिकार ओळखला. विठ्ठलाच्या समचरणांवर केदारी महाराजांनी मस्तक टेकवलं. विठ्ठलाच्या साक्षीने तुळशीची माळ गळ्यात घातली. गुरुची वाट न बघता स्वत:च माळकरी बनणं चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. मल्लपा महाराज याचे साक्षी होते. जणूकाही साक्षात पांडुरंगानेच केदारी महाराजांना अनुग्रह दिला होता. त्यांचं आत्मचिंतन वाढलं. हरिनामात मग्न राहून ते लोककल्याणाचा विचार करत.

गंगाखेड तालुक्यातील उखळी या गावातील जीवाजी बाबा पवार पंढरपूरला नियमित महिन्याच्या वारीला येत. त्यांना केदारी महाराजांचं दर्शन चंद्रभागेच्या वाळवंटात झालं. सात्विकवृत्तीच्या जीवाजींनी केदारी महाराजांना उखळीला येण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार ते उखळीला गेले. उखळी परिसरातील हाकार्‍या-पुकार्‍या माळात केदारी महाराज चिंतन, साधनेला बसत. याच परिसरात काही अंतरावर आदिवासी समुदायदेखील राहत होता. त्यांचंही केदारी महाराजांनी प्रबोधन केलं. पशू, पक्ष्यांसह सर्वांमधे ईश्वरी वास आहे. हिंसा टाळून आदर्श जीवन जगा. कुणावर अत्याचार करू नका. कुणाला दुखवू नका आदी गोष्टी त्यांनी आदिवासींना समजावून सांगितल्या. कीर्तनातून ते आध्यात्मिक आणि सामाजिक जागृती करत. चुकीच्या रुढींवर ताशेरे ओढत. सर्वसामान्यांना छान जगण्याचं सोपं तत्त्वज्ञान सांगत. वाघानं नेलेलं लेकरू परत आणणं, मृत लेकराला जिवंत करणं अशा आख्यायिका त्यांच्या पोथीत आढळतात. पौष वद्य नवमी, 1780मध्ये त्यांनी उखळी इथं समाधी घेतली.

पंढरपुरातल्या झेंडे गल्लीत सावतोबांना आणि केदारी महाराजांना मानणार्‍या उखळीकर परिवाराचे काही मठ आहेत. ते बीड जिल्ह्यातल्या परळीजवळच्या उखळी या गावातले ननवरे. आता ते पंढरपूरचेच झालेत. त्यातल्या सावता महाराज उखळीकरांचा मठ 300 वर्षे जुना आहे. त्यांची उखळी ते पंढरपूर अशी दरमहा वारी 1720 पासून आजही नियमित निघते. या मठात संत सावता माळी यांची मूर्ती आहे. 1905 पासून उखळीकर फडाला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात स्थान मिळालं. त्यांची दिंडी पाचव्या क्रमांकावर असते.

उखळी आणि परळी इथे केदारी महाराज यांची मोठी देवळं आहेत. उखळीमधे त्यांची समाधीच आहे. तिथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होते. उखळीकर फडाचे सर्व उत्सवही साजरे होतात. त्यातून वारकरी संप्रदायाचा मोठा प्रसार मराठवाड्यापासून पंढरपुरापर्यंत होताना दिसतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण महिन्याची वारी हे आहे.

0 Shares
अवघा रंग एक करणारा भजनाचा आनंद सोहळा! श्रीगुरू नामदेव अण्णा