‘सावताने केला मळा’ हे सावतोबांवरचं एक लोकप्रिय पुस्तक. त्याचे लेखक धुळ्याचे ग. द. माळी हे फक्त लेखकनव्हते तर आमदार, प्रयोगशील शेतकरी आणि स्वातंत्र्यसैनिकही होते.
खान्देशच्या इतिहासाचं पान उद्यान पंडित ग. द. माळी गुरुजी यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना बापूसाहेब म्हणत. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९१५ला शिरपूर जवळच्या मांडळ या गावी झाला. त्यांचे वडील शेती करत. घरची परिस्थिती गरिबीची, त्यामुळं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांना शिक्षणाची प्रचंड गोडी होती. शिक्षणाच्या ओढीनं त्यांनी कॉलेजपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करताच त्यांना ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. शिकवण्याची आवड असल्यानं थोड्याच काळात त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक कमावला.
शिक्षक म्हणून नोकरी करत असताना लेखनाची आवड त्यांनी जपली. मुद्रण, प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्याकाळी क्रमिक पुस्तकांच्या आणि साहित्य निर्मितीसाठी पुण्यामुंबईच्याच लेखकांची चलती असे. त्याकाळात गुरुजींनी शामराव चौधरी यांच्या सहकार्यानं पहिली ते अकरावीपर्यंतची विविध वेगवेगळ्या विषयांवरची अनेक पुस्तकं लिहून प्रकाशित केली. ही पुस्तकं लोकप्रिय झाल्यानं उत्तर महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला.
त्याशिवाय ‘राजमाता जिजाबाई’, ‘अशा वीरकन्या भारतमातेच्या’, ‘भारतरत्न इंदिरा गांधी’, ‘आपले नेहरूकाका’, ‘सावताने केला मळा’, ‘भारत खंडाचा इतिहास’, ‘आपला पश्चिम खान्देश’ अशा अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. त्यांच्या ‘महात्मा ज्योतिबा फुले’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचं पारितोषिकही मिळालं होतं.
ते शासकीय नोकरी करत असतानाही सामाजिक क्षेत्रात काम करत. त्यांच्या सामाजिक कामांचा आवाका पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब हिरे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. अल्पावधीतच धुळे जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं. त्यांच्यावर महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा असल्यानं बहुजनांच्या शिक्षणासाठी ते नेहमीच झटले. बहुजन आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केल्या. हे करत असतानाच त्यांनी १५वर्ष धुळे शहराचे आमदार म्हणून काम केलं. खान्देशातील पाण्याची आबाळ लक्षात घेऊन त्यांनी करवंद धरण उभारलं.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना तत्कालीन पश्चिम खान्देशातील १५६ खेडी गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी गुजराती नेत्यांनी केली. त्यात नंदूरबारसह सहा तालुके गुजरातमध्ये समाविष्ट होणार होते. ते प्रत्यक्षात आलं नाही, यासाठी माळी गुरुजींचं योगदान महत्त्वाचं आहे. विधानसभेत त्यांनी केलेली बिनतोड मांडणी अत्यंत प्रभावी ठरली. तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी यासाठी गुरुजींचा गौरव केलाय.
शेतकर्याच्या घरातं जन्म झाल्यानं शेतीबद्दल त्यांना आस्था होती. शेतीमध्ये त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले. फलोत्पादन आणि फळ संशोधन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची कामगिरी करून दाखवली. मांडळ या गावी खडकाळ पडीक आणि रेताड जमिनीत त्यांनी नंदनवन उभं केलं. त्यांनी लखनौ ४९ जातीच्या पेरूचं विक्रमी उत्पादनघेतलं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांना देशात सर्वप्रथम ‘उद्यानपंडित’ ही उपाधी देऊन गौरवण्यात आलं. गुरुजींनी उभारलेल्या मांडळच्या आदर्श फळबागेला अखिल भारतात नावाजलं गेलं.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, शेती क्षेत्राप्रमाणंच त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केले. ‘नवहिंद’ नावाचं साप्ताहिक त्यांनी अखंडपणे २५ वर्ष चालवलं. त्यातून सातत्यानं जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. विविध संस्थांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. जे करायचं ते उत्कृष्ट हे तत्त्व अंगीकारून त्यांनी आजन्म काम केलं. १७ एप्रिल १९७९ रोजी त्यांनी धुळ्यात अखेरचा श्वास घेतला.
मृत्यूच्या आधी एकच वर्ष त्यांचं ‘सावताने केला मळा’ हे पुस्तक प्रकाशित झालं. अत्यंत रसाळ आणि सोप्या भाषेत त्यांनी हे सावता महाराजांचं चरित्र लिहिलंय. गोविंद राऊत आणि भिकू भुजबळ यांच्या सावताचरित्रांचा प्रभाव त्यावर आहेच. असं स्वतः गुरुजींनीच सांगितलंय. पण एक शिक्षक आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनमानसाची नस माहीत असल्यानं वाचकांना नेमकं काय हवंय, ते त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळंच श्री आदर्श पुस्तकालयानं या पुस्तकाची देखणी आवृत्ती प्रकाशित केलीय. ती आवडीनं वाचली जातेय.
एकमेव कादंबरी ‘सावताई’ इतिहास घडवणारा भक्तीचा मळा