श्रीगुरू नामदेव अण्णा

विठोबा सावंत

वारकरी परंपरा शुद्ध स्वरूपात आजरेकर फडात पाहता येते. त्याचं नेतृत्व करण्याची योग्यता नामदेव अण्णा माळी यांनी आपल्या कर्तृत्वानं मिळवली होती. ते अरणच्या इतिहासातलं मानाचं पान आहे.

आपल्याकडे राजकारणापासून प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असते तशी ती भागवत धर्माचा प्रसाराची परंपरा पुढं नेणार्‍या फडांमध्येही असते. पण यात वेगळेपण आहे ते आजरेकर फडाचं. या फडाचं नेतृत्व आजवर वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी केलं आहे. त्यातलंच एक नामदेव बाबुराव वसेकर अर्थात श्रीगुरू नामदेव अण्णा. नामदेव अण्णा संत सावता महाराजांच्या अरणचे.

दिनकरराव माईणकर तथा बाबासाहेब आजरेकर हे या फडाचे संस्थापक. त्यांच्यानंतर त्यांच्या घराण्यातल्या दादासाहेब आणि नानासाहेब आजरेकर यांनी फडाचं नेतृत्व केलं. नानासाहेबांनंतर माईणकर कुटुंबात पुढं कोण वारस नव्हता. मग नामदेव अण्णांची निवड झाली.

‘माळ्याला कसं निवडलं, असा वाद तेव्हा झाला. पण लोकशाही होती फडावर. आमच्या आजोबांचं म्हणजे नामदेव अण्णांचे सगळे अभंग तोंडपाठ. लहानपणापासून कीर्तन करायचे. फड प्रमुखाची निवड करायची तेव्हा लोकांनी निवडून दिलं. १९०४ ते १९११ अशी सात वर्ष ते आजरेकर फडाचे प्रमुख होते,’ नामदेव अण्णांचे नातू शिवदास सोपान वसेकर सांगतात.

एक्याऐंशी वर्षांचे शिवदास वसेकर गुरुजी शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झालेत. निवृत्तीनंतर कीर्तनसेवा सुरू ठेवल्यानं ओघवती वाणी. आजरेकर फड आणि आपल्या आजोबांविषयी वसेकर गुरुजी भरभरून माहिती देतात. पण कुठंही वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन. नामदेव अण्णांची कीर्तनकला आणि लौकिकाबद्दल ते सांगतात, ‘धुंडा महाराज कीर्तन करत होते. त्यांना ज्ञानेश्वरीची एक ओवी आठवेना. ओवीचा संदर्भ लावायचा कसा, असा प्रश्न पडला. कुणीतरी म्हणालं, नामदेवांना विचारा. पण ते म्हणाले, नामदेव अण्णा उलटा कांदा खातात. त्यांना काय येतंय, अशी हेटाळणीही त्यावेळी झाली. पण कौतुकही होतं.’

वसेकर गुरुजी सांगत होते, ‘अण्णा विरहणीचे अभंग चांगले सोडवत. अण्णांचं कीर्तन ऐकून मामासाहेब दांडेकरांनीही कौतुक केलं होतं. मामासाहेब दांडेकर अण्णांना समकालीन. त्यांचे गुरू जोगमहाराज. बंडीशेगावला आषाढी वारीत आजरेकर फडाच्या वतीने कीर्तन असतं. तिथं नामदेवअण्णांच कीर्तन होतं. ब्राह्मणेतराचं कीर्तन असल्यामुळं जोगमहाराज प्रथेप्रमाणं तोंड पाहणार नव्हते. ते तोंडावर घोंगडं घेऊन बसले. पण त्यांनी कीर्तन ऐकलं आणि अण्णांना कडकडून मिठीच मारली. ते म्हणाले, आम्ही कसले ब्राह्मण, तू खरा ब्राह्मण कीर्तनकार. त्या काळात स्वाभाविकपणे फडावर ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा वादही होता. तरीही माईणकरांच्या घराण्यापलीकडे आजरेकर फडाचे प्रमुख म्हणून निवड करण्याची वेळ आली, तेव्हा बहुमतानं अण्णांची निवड झाली. आजरेकर फडाच्या प्रमुखाची लोकशाही पद्धतीनं निवड करण्याची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. पुढं फडाच्या दोन शाखा झाल्या. फडप्रमुख म्हणून आजही मराठा, ब्राह्मण, माळी अशा वेगवेगळ्या जातीतील व्यक्तीची निवड आतापर्यंत झालीय. अर्थात लोकशाही म्हटलं की, राजकारणात रंगतो तसा निवडणुकीचा फडही रंगतोच. पण तो निवडीपुरताच,’ वसेकर गुरुजी सांगतात.

‘आजरेकर फडामध्ये जो गादीवर असेल त्याचं कीर्तन फलटण आणि बंडी शेगावला असतं. दरवर्षी वारीच्या वेळी. आळंदीहून पंढरपुरात येताना. ज्ञानोबांच्या वारीत. कुठला अभंग कुठं म्हणायचा याचीही एक परंपरा आहे. हा फड सगळ्या संतांना मानतो. पण ज्ञानोबांना जास्त मानतो. खरंतर ज्ञानोबारायांपेक्षाही त्यांच्या अभंगांवर आजरेकर फडाची श्रद्धा.’ वसेकर गुरुजी आजरेकर फडाची माहिती देतात. ‘फडप्रमुख कीर्तन केलं तर मानधन तर घेत नाहीच, पण जेवतही नाहीत. एरव्ही जेवतील, पण कीर्तन केल्यानंतर नाही.’

आजरेकर फडाचे आता निवडून आलेले प्रमुख हरीदाद रामभाऊ बोराटे हे माळी समाजाचेच. ते इंदापूरचे. वसेकर गुरुजींच्या नात्यातले. म्हणजे त्यांच्या बहिणीचे ते दीर. थोडक्यात, फडातील लोकांचं नातंगोतंही वारकरी सांप्रदायातलंच. सावता महाराजांच्या अरणमधल्या मंदिरात आजरेकर फडाला मान आहे. आजरेकर फडावरील किमान एक मानकरी आल्याशिवाय सावता महाराजांच्या शेजारतीला सुरुवात होत नाही. अरणमध्ये या फडाचे वारकरी वद्य एकादशीला गाव प्रदक्षिणा काढतात. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीला देहूकर अरणला कीर्तन-प्रवचन करतात. पण आजरेकर फडाची दिंडी निघाल्याशिवाय ते कीर्तनाला उभं राहत नाहीत, अशी माहिती वसेकर गुरुजी आणि रविकांत वसेकर यांनी दिली.

नामदेव अण्णांचा पुण्यतिथी उत्सव इंदापूर इथे दरवर्षी भाद्रपद वद्य पंचमी आणि षष्ठीला होतो. तेव्हा आजरेकर फडातली सर्व प्रमुख मंडळी जमा होतात. कीर्तन, जागर, दिंडी समारंभ, कीर्तन अशा सगळे कार्यक्रम आजही निष्ठेनं पार पाडतात. फड नामदेव अण्णांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

0 Shares
केदारी महाराज सावतोबा-जोतिबा विचारांचे वारसदार