सावता माळींना पोथीरूप देण्याचं महत्त्वाचं काम भिकू भुजबळांनी केलं. सावतोबा आज नाहीत, भिकू भुजबळही नाहीत. पण तरीही त्यांच्यापर्यंत पोचायचं होतं. शोध घेत घेत भिकू भुजबळ हाती लागले.
‘श्री सावता महाराज महात्म्य’हे संत सावता माळी महाराजांचं ओवीबद्ध चरित्र. चौदा अध्याय. ३२६ ओव्या. रसाळ भाषा. संतसाहित्यावर पोसलेली शब्दकळा. गोष्टी रंगवून सांगण्याचं अफलातून कौशल्यं. भाविकांच्या श्रद्धेला धक्का न देता काहीतरी धडा देण्याचा प्रयत्न. जुन्या पोथ्यांच्या रुळावर जाणारी भाषा. ते वाचताना या पोथीचा लेखक किमान दोनेकशे वर्ष तरी जुना असेल असं वाटत राहतं.
पोथीच्या शेवटी लेखकानं भिकू अशी नाममुद्रा दिलेली असते. ग्रंथ लिहून झाल्याचं साल नोंदवलंय, ते शके १८६७. आपल्या वापरातल्या इसवी सनात ते आणलं तर होतं १९४५. म्हणजे ही पोथी फार जुनी नाही. सध्या उपलब्ध असलेलं आधुनिक रूपातलं पोथीचं पुस्तक अरणच्या सावता महाराज मंदिर ट्रस्टनं छापलंय. त्यात पुस्तकाच्या शेवटी प्रकाशकानं लेखकाचा फोटोही छापलाय. नाव असतं भिकू सावळाराम भुजबळ. त्यांच्याविषयी फक्त एकच वाक्य असतं की, ते कामशेत इथल्या शाळेत मुख्याध्यापक आहेत.
आता भिकू भुजबळ नावाचे आधुनिक महिपती कोण होते, याचा शोध घेण्यासाठी कामशेतला जाण्याशिवाय पर्याय नसतो. तोच एक धागा असतो, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा. निगडी ते तळेगाव बसनं आणि तिथून लोकलनं कामशेत. गावात उतरलो तेव्हा ब-यापैकी संध्याकाळ झालेली.
स्टेशनबाहेर समोर दुकान होतं. दुकानाचे मालक विलास भटेवरा. त्यांना भिकू भुजबळांविषयी विचारलं. त्यांना पूर्ण गाव खडानखडा माहीत होतं. पण त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. त्यांनी जुन्या वारक-यांना फोन केले. माळी समाजातल्या लोकांना फोन केले. कुणालाच काही माहीत नव्हतं. शेवटी मी निराश होऊन जायला निघाल्यावर भटेवरांना अचानक शाळेतल्या देवरुखकर बाईंची आठवण झाली. ५७-५८ वर्षांपूर्वी ते शाळेत असताना त्यांना देवरुखकर बाई शिकवायला होत्या. त्यांची चौकशी केली. त्या कुठं बाहेर गेल्या होत्या. त्यामुळं त्यांच्यासोबतच असणा-या ग्रेसबाईंना भेटायचं ठरलं. त्यांचं घर दत्त कॉलनीत. वय जवळपास ७९ वर्ष. आणखी प्रकृती खणखणीत. नजरही तीक्ष्ण. आताही एखाद्या तरुणीसारखं चालतात, फिरतात. या वयात घरातील कामं करतात. आठवणही तल्लख. तोवर देवरुखकर बाईंकडे जाण्यासाठी त्यांचा निरोप घेतला. ग्रेसबाईंनीच त्यांच्या घरी सोडलं.
देवरूखकर बाईंचं वय वर्ष ८०. प्रकृती आणखी चांगली होती. आवाजही खणखणीत, पण त्यांना ऐकायला येत नाही. जे काही बोलायचं आहे, ते त्यांना लिहून द्यावं लागतं. मी लिहून दिल्यावर चष्माही न लावता लगेच वाचून बाई सांगायला लागल्या. ‘मी शाळेत होते तेव्हा तर भुजबळ नावाचे कोणी सर नव्हते. आमच्यापूर्वी असतील तर आम्हालाही काही माहिती नाही. अगोदर कोण असायचं हे तेव्हा जास्त आतासारखं माहीत असण्याचं काही कारणही नाही. शिवाय मी नवीन होते.’ कोणाला माहिती असेल असं मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ‘वडगावला एक फार जुने गुरुजी आहेत. त्यांचं वय शंभरच्या पुढं असेल. ते किंवा त्यांची बायको तुम्हाला सर्व माहिती देतील. ते म्हणजे जगन्नाथ विष्णुपंत धर्माधिकारी गुरुजी. पुण्याला जाता-जाता लगेच गेलात तर तुम्हाला नक्कीच भेटतील सायंकाळच्या वेळी.’ बाईंनी पत्ताही सांगितला. वडगाव महत्त्वाचं होतं. कारण इथंच हा ग्रंथ लिहिला गेला होता. तशी एक ओवीच ग्रंथात आहे,
पोटोबाचे वडगाव । लिखाण स्थळ अभिनव ॥
येथें ठेवूनीया भाव । ग्रंथसमाप्त केलासे ॥
दुस-या दिवशी देवरूखकर बाईंचे नातेवाईक अरुण भोसले यांना फोन करून मी शाळेत काही रेकॉर्ड सापडतं का ते बघा म्हणून फोन केला. ते म्हणाले, दोन-तीन दिवसात सांगतो, एका मित्राला शाळेतील माहिती आहे. पण तिथून काही मिळत नव्हतं. मी वडगावला धर्माधिकारी गुरुजी यांच्याकडे जायची तयारी करत होतो. अमरावती इथले सावता अभ्यासक सतीश जामोदकर यांनी भुजबळ यांच्यावरचा लेख मिळवून दिला होता. भिकू भुजबळ यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भुजबळ यांनी ‘ज्योती आवाज’ या मासिकाच्या ‘शिरोमणी श्री सावता महाराज विशेषांका’त १९९३ साली लेख लिहला होता. ‘संत शिरोमणी श्री सांवता महाराजांची पोथी लिहणारे- कै. भिकू सावळाराम भुजबळ’ असं त्या लेखाचं टायटल होतं. लेखात ज्ञानेश्वर भुजबळ यांचा पत्ताही दिला होता. तो असा : मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय, वानवडी, पुणे-४०. पहिल्यांदाच भिकू भुजबळांपर्यंत पोचण्याचा काहीतरी भक्कम क्ल्यू सापडला होता.
दुस-या दिवशी सकाळीच भैरवनाथ विद्यालय शोधून काढलं. या शाळेचं नाव २७ वर्षांपूर्वीच बदललं आहे. त्यामुळं गुगल मॅपवर ते सापडत नव्हतं. शेवटी एका फेसबूक पेजवर त्याचं बदललेलं नाव कळलं, श्री हरिभाऊ बळवंतराव गिरमे विद्यालय. पुलगेटकडून जवळच लष्कर हॉस्पिटलच्या पुढं वानवडी बाजार इथं एका एकराच्या भव्य प्रांगणात ही शाळा आहे. तिथं कळलं भिकू भुजबळ तर आता जिवंत नाहीत. त्यांच्यावर लेख लिहिणारे त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भुजबळ यांनीच ही शाळा सुरू केलीय. आता त्यांचे पुत्र म्हणजे भिकू भुजबळांचे नातू श्रीकांत भुजबळ हे शाळेच्या संचालक मंडळाचे सेक्रेटरी आहेत.
दुस-या दिवशी सकाळी श्रीकांत भुजबळ यांच्याशी महर्षीनगर इथल्या त्यांच्या घरी भेट झाली. त्यांनी भिकू भुजबळ यांच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ‘भिकू भुजबळ यांचा जन्म अंदाजे १९१२च्या सुमारास चाकण इथं झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पण त्यांना शिक्षणाची फार आवड होती. परिस्थितीशी झुंजत सतत पहिल्या नंबरने पास होत.’‘ज्योती आवाज’ या अंकात ज्ञानेश्वर भुजबळ यांनी वडलांविषयी सविस्तर लिहिलंय. त्यानुसार शिक्षणानंतर भिकू भुजबळ च-होली इथल्या, प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांची बदली आळंदी इथं झाली. तिथं साखरे महाराज यांचा सहवास त्यांना लाभला. साखरे महाराजांच्या सोबत राहून त्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं. कीर्तन-भजनाचाही अभ्यास केला. खरंतर साखरे महाराज त्यांचे आध्यात्मिक गुरुच बनले. शिक्षक म्हटल्यावर सतत त्यांची बदली होत होती. चिंचवड, वडगाव मावळ, कामशेत, मोशी अशा अनेक ठिकाणच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून अत्यंत सचोटीनं काम केलं.
वडगाव मावळ इथं नोकरीला असताना एकदा सलग तीन महिने शिक्षकांचा संप झाला. या संपकाळात त्यांनी सावता माळी यांच्याबद्दलची माहिती गावोगाव फिरून गोळा केली. याच काळात ते सावता माळी यांच्या अरण गावालाही अनेक वेळा जाऊन आले. या माहितीच्या संकलनातून साकार झाली सावता महाराजांची ओवीबद्ध पोथी, ’श्री सांवता महाराज महात्म्य’.
आजपासून ६९ वर्षांपूर्वी हरिभाऊ बळवंतराव गिरमे या सासवडच्या माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी पोथी छापली आहे. तेव्हा भिकू भुजबळ हे कामशेत जि. पुणे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हेडमास्तर होते. त्यांच्याविषयी ते कृतज्ञतापूर्वक लिहितात, ‘हार्दिक आभार! सदर ‘श्री सांवता महाराज महात्म्य’ हा ग्रंथ प्रकाशित करण्याची माझी तीव्र मनिषा फार वर्षांपासून होती; परंतु आर्थिक साहाय्याची अडचण भासू लागली म्हणून दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड, माळीनगरचे मे. बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना मी विनंती करताच त्यांनी ती तत्काळ मान्य केली. त्यांच्या कृपेनं हा मौलिक ग्रंथ प्रकाशित करता आला आणि सर्वांना त्याचा लाभ झाला. या धार्मिक कार्यात उदार अंत:करणानं दिलेल्या अमोल साहाय्याबदल वरील कंपनीचे सन्मान्य मे. बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचे मी हार्दिक आभार मानत आहे.’
वडलांनी सांगितलेल्या आठवणी श्रीकांत भुजबळ सांगतात, ‘आजोबा भिकू भुजबळ शाळेतून रिटायर्ड झाल्यानंतर १९६०मध्ये पुण्यातल्या गुरुवार पेठेत राहायला आले. त्यांचं कुटुंब १९७५पर्यंत तिथं राहत होते. आपल्या मुलांनी शिकावं ही त्यांची तीव्र इच्छा, पण घराच्या आर्थिक परिस्थितीमुळं ज्ञानेश्वर यांचं शिक्षण नववीत थांबण्याची चिन्हं दिसू लागली. तेव्हा पुन्हा त्यांना माळी शुगर फॅक्टरीने आधार दिला. फॅक्टरीच्या बोर्डिंगमध्ये ते पुढील शिक्षणासाठी रवाना झाले. पुढं ते बीए, एमए, बीएड, एमएड झाले आणि पुणे विद्यापीठात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. भिकू भुजबळ यांना देवाची आणि भजन-कीर्तनाची खूप आवड होती. ते यात तल्लीन होऊन जायचे. आयुष्याच्या उतरवयात ते भ्रमिष्टासारखे करायला लागले होते. अशातच १९७०मध्ये त्यांचा अपघाताने करुण अंत झाला.’
श्रीकांत भुजबळ आजोबांबद्दल आठवण सांगतात, ‘मी दहा वर्षांचा असताना ते गेले. त्यावेळी मला एवढं काही समजत नव्हतं. त्यांनी मोडी लिपीत लिहिलेली पोथी मी पाहिलीय. पण मोडी लिपी काही वाचता यायची नाही. एकदा माळी समाजाचे नेते डोमाळे यांनी ती मूळ पोथी नेली. त्यामुळं ती मूळ प्रत उपलब्ध नाही. आणि आता डोमाळेही नाहीत.’ श्रीकांत भुजबळ यांनी आपल्या आजोबांचा एक फोटोही मला दाखवला. काळी टोपी घातलेला एक साधा शिक्षक. पण त्याने आपल्या व्यासंगाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर ग्रंथ लिहिला. आज सावता महाराजांच्या भक्तांसाठी या ग्रंथाला पूजनीय धर्मग्रंथाचं स्थान आहे. त्याची राज्यभर पारायणं होतात. सावता माळी पुण्यतिथीला तर त्याची पारायणं हटकून होतात. असा सन्मान तर मोठमोठ्या लेखकांच्या मोठमोठ्या पुस्तकांनाही लाभत नाही.
सुदाम सावरकरांचे आद्यसंत एकमेव कादंबरी ‘सावताई’