‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ हे सावतोबांच्या जगण्याचं सहज, सोपं तत्त्वज्ञान. हेच तत्त्वज्ञान व्ही. शांताराम यांना भावलं आणि ‘राजकमल’ कंपनी सुरू केल्यावर त्यांनी सावतोबां वर भक्तीचा मळा’ हा चित्रपट बनवला.
आपल्या वाट्याचं कर्म प्रामाणिकपणे करणं, हा सावतोबांचा स्वभावधर्म. त्यामुळं त्यांनी भक्तीचं, आपल्या हृदयात असलेल्या विठ्ठलाचं कधी प्रदर्शन मांडलं नाही. आपलं कर्तव्य नीटपणे पार पाडणं ही त्यांची मूळ वृत्ती त्यांच्या अभंगातूनही व्यक्त झालीय. सावता माळी यांचं आयुष्यच विठ्ठल भक्तीनं व्यापलं होतं. त्यांच्या साध्या, सरळ आणि सच्चेपणानं जगण्याच्या तत्त्वज्ञानाला चित्रपट विश्वालाही भुरळ घातली आणि ‘भक्तीचा मळा’ हा चित्रपट जन्माला आला.
भारतीय चित्रपट निर्मितीचा प्रारंभ दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून मानला जातो. राजा हरिश्चंद्र १७ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणजे १८ मे १९१२ रोजी ‘पुंडलिक’ हा मूकपट प्रदर्शित झाला. त्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या २५ मे १९१२च्या अंकात परीक्षण प्रसिद्ध झालेलं आहे. हे सारं सांगण्याचा हेतू हा की संतपटांची परंपरा किती जुनी आहे, हे लक्षात यावं. ‘प्रभात’ ही चित्रपट निर्मितीसाठीची कंपनी हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर सुप्रसिद्ध होती. त्यातही या कंपनीनं निर्माण केलेले संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर हे संतपट तर आजपर्यंत रसिकांच्या आठवणीतून गेलेले नाहीत. प्रभातचे एक महत्त्वाचे भागीदार व्ही. शांताराम यांनी प्रभात सोडून १९४३मध्ये ‘राजकमल’ ही स्वतःची कंपनी स्थापन केली. त्याच्या पुढच्याच वर्षी १९४४मध्ये ‘संत सावता माळी’ यांच्यावर आधारित ‘भक्तीचा मळा’ चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला.(‘भक्तीचा मळा’ या मराठी चित्रपटाबरोबर त्याची हिंदी आवृत्ती ‘माली’ या नावानं तयार करण्यात येऊन तीही प्रदर्शित करण्यात आली होती.)
‘भक्तीचा मळा’ चित्रपटाचा नायक सावता माळी यांची भूमिका मास्टर कृष्णराव यांनी केली होती. मास्टर कृष्णराव हे खरे तर संगीतकार. त्यांची प्रभातच्या धर्मात्मा, अमर ज्योती, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी इत्यादी मराठी-हिंदी चित्रपटांना संगीत दिलं होतं. ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाची कथा, संवाद आणि गाणी स. अ. शुक्ल यांनी लिहिली होती. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटात सावता माळी यांची भूमिका मा. कृष्णराव यांनीच केली होती. ‘राजकमल’च्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते असलेले केशवराव दाते यांनी केलं होतं. त्यांनी प्रभातच्या आणि नंतर राजकमलच्या अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ते स्वतः अभिनेते असूनही त्यांनी ‘भक्तीचा मळा’ चित्रपटात अभिनय केला नाही.
‘भक्तीचा मळा’ चित्रपटाची कथा अगदी साधी, सरळ अशी रचली आहे. चित्रपटाचे नायक सावता माळी हे सरळ स्वभावाचे, सज्जन शेतकरी आहेत. आपलं रोजचं काम निष्ठेनं करत आहेत. ते मुखानं नेहमी श्री विठ्ठलाचा जप करत असतात. गरजूंच्या मदतीला धावून जाणं, हा त्यांचा स्वभाव. त्यांच्या घरी मेहनती, सालस पत्नी, निरागस पण चुणचुणीत मुलगी आहे. सावता माळी यांच्या कथानकाशी समांतर गावातील टोळभैरवांचीही कथा सुरू असते. ही मंडळी सावता माळींविरोधात काही ना काही उचापती करत असतात. या टोळभैरवात गावचा पाटील, पंच तसंच इतर रिकामटेकडी मंडळी आहेत. ही मंडळी सावतोबांचं आपल्या मनासारखं काहीच नुकसान करू शकत नाही. तेव्हा ती मंडळी सावतोबांच्या मळ्यातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त करतात. त्याचं घर आगीत जळून भस्मसात करतात. सावता माळींना हा जबर धक्का असतो. यातून ते सावरतात. पुन्हा विहीर खणायला घेतात. श्री विठ्ठलाच्या कृपेनं विहिरीला उदंड पाणी लागतं. श्री विठ्ठल हाच या मळ्याचा धनी, अशी सावता माळी यांच्या निरागस मुलीची श्रद्धा असते. हा धनी इथं येईपर्यंत मी अन्न, पाणी घेणार नाही, असा हट्ट ही चिमुरडी धरते. सावता माळी आणि त्यांची पत्नी दोघंही हवालदिल होतात. ते मुलीची समजून काढण्याचा प्रयत्न करतात. पण ती बधत नाही. अखेरीला सावता माळी आपलं हृदय कोयत्यानं फाडतात. त्यातून श्री विठ्ठल प्रकट होतो. तो त्यांच्या हृदयात कायमचा वास करून असतो. पण यामुळं सावता माळी जमिनीवर कोसळतात. मुलीला श्री विठ्ठलाचं दर्शन घडतं. श्री विठ्ठल कृपेनं सावता माळी डोळे उघडतात. शिवाय ‘तुझ्या मळ्यात माझा कायम वास राहील’, असं वचन देव सावतोबा यांना देतात. सर्व दुष्ट मंडळी सावता माळी यांना शरण येतात.
संतपटात चमत्कार नसणं, हे जवळजवळ अशक्यच. इथंही चमत्काराचा वापर आहे. शेवटचा मोठा चमत्कार चित्रपटात क्लायमॅक्स म्हणून आहे. चित्रपटात सर्वांनीच अभिनय उत्कृष्ट असा केला आहे. सावतोबांच्या भूमिकेत मास्टर कृष्णराव अगदी फिट बसतात. त्यांच्या चेह-यावरील भोळा, सात्विक भाव त्यांना संत म्हणून प्रस्थापित करतो, तर त्यांची शरीरयष्टी मेहनती शेतक-याला शोभेशी आहे.
‘भक्तीचा मळा’ चित्रपट मुंबईच्या नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित करावा लागला. हा चित्रपट स्वस्तिक थिएटरात प्रदर्शित करावयाचा विचार व्ही. शांताराम यांचा होता. परंतु तिथं त्यांचाच ‘शकुंतला’ चित्रपट तुफान गर्दी खेचत होता. म्हणून नाईलाजानं ‘भक्तीचा मळा’ नॉव्हेल्टीमधे प्रदर्शित करावा लागला.
याबाबत आणखी एक गंमत अशी : भक्तीचा मळा नॉव्हेल्टीत प्रदर्शित करू नये, असा सल्ला अनेकांनी शांताराम बापूंना दिला होता. आतापर्यंत नॉव्हेल्टीत जे जे चित्रपट प्रदर्शित झाले ते सगळे फ्लॉप झाले होते. परंतु ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटानं सिल्व्हर ज्युबिली साजरी केली. म्हणजे हा चित्रपट तिथं पंचवीस आठवडे चालला.