एकमेव कादंबरी ‘सावताई’

डॉ. रणधीर शिंदे

सावता महाराजांवर आजवर कुणी कादंबरी लिहिली नव्हती. ती कमतरता सुरेश शिंदे यांच्या ‘सावताई’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या कादंबरीनं पूर्ण केलीय. अभंगवाटेवरचे सावतोबा कादंबरी रूपानं भेटायला उत्सुक आहेत.

‘सर्ज्या’, ‘मेंढका’ आणि ‘मुडा’ या लक्षणीय कादंबर्‍या लिहिणार्‍या सुरेश शिंदे यांची ‘सावताई’ ही संत सावता माळी यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी २०१८मध्ये प्रकाशित झाली. ग्रामीण जीवन तसंच माणूस आणि पाळीव पशू-प्राण्यांच्या जगाचं एक अनोखं जग रेखाटणारे सुरेश शिंदे हे संतपरंपरेकडे वळले आहेत.

‘सावता महाराजांचं जीवनच मुळी त्या काळ्या आईशी निगडित होतं. त्यांच्या कामकांतीचा हा दरवळ त्या विठाईपर्यंत पोहचलेला दिसतो,’ या धारणेतून ही कादंबरी लिहिली गेलीय. सुरेश शिंदे यांनी ही कांदबरी एका उत्स्फूर्त भावावस्थेत केवळ बारा दिवसांत लिहिलीय. त्यांनी ही कादंबरी श्रद्धाशील मनानं लिहिलीय. सावता माळींच्या आजोबांपासून ते औसा गाव भयापोटी सोडण्यापासून अरणला आपलेसं करण्याच्या प्रसंगापासून कादंबरीचा प्रारंभ झालाय. सावताचे आई-वडील, सावताचा जन्म, बालपण, घडवणूक, लग्न, गावकर्‍यांचा विरोध, सावताचा मळालळा, भक्ती, पांडुरंगभेट आणि समाधी अशा चरित्रपटाचं निवेदन या कादंबरीत आहे.

लोकगंगेनं संतचरित्रांची घडवणूक केलेली असते. त्यांच्या भावनाशील आणि श्रद्धाशील अंतःकरणांनी तसंच सर्जनशील कल्पितांनी संतचरित्रं सजलेली असतात. मात्र त्यामध्ये समाज-संस्कृतीच्या जीवनशैलीचे रंग मिसळलेले असतात. या कल्पितांच्या आत दडलेली अनेक संस्कृतिनिष्ठ तत्त्वं ही शोधभूमी ठरू शकते. सुरेश शिंदे यांनी या कादंबरीत मराठी लोक आणि संतपरंपरेनं निर्मिलेल्या सावता माळी यांचं चरित्र कादंबरीरूपानं मांडलं आहे. संवादकथनाचा रूपबंध वापरून ही कांदबरी आकाराला आलीय.

सावता माळींचे वडील, आई, पत्नी, मुलगी आणि शिष्य काशिबा आणि स्वतः यांच्या संवादानं कांदबरीला आकार आलाय. ही सावतोबांच्या कुटुंबाची कहाणी आहे, तशीच ती अरणगावाची आणि सावतोबांच्या मळ्याची देखील कहाणी आहे. मुख्यत्त्वे सावतोबांना केंद्रवर्ती ठेवून त्याच्या अवतीभवतीच्या पसार्‍याला कादंबरीत सजीव केलंय. एका अर्थानं अरणभूमीलाच सजवण्याचा हा प्रयत्न आहे.

कादंबरीची भाषा फार प्रवाही निरुपणाची आहे. ‘माझं मन मळ्यातून, पिकातून फिरत असे. अभंगाचे शब्दसुद्धा त्या हिरव्यागार पानांतून जन्माला येत असत. प्रत्येक अभंग माझ्या कामाचाच भाग असे. माझ्या जगलेल्या जीवनाची ती भक्तिशीला असे. या संसारातच खराखुरा देव आहे. इथंच भक्तिभाव आहे, आणि मन रिझवणारं शेती हे साधन आहे’, या जाणिवेनं ही कांदबरी लिहिली आहे.

ही कादंबरी महाराष्ट्र संस्कृतीतल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणार्‍या शेतीसंस्कृतीच्या निष्ठेचं वर्णन करते. तसंच भक्तीची एकमेळी परंपरा उलगडून दाखवत या परंपरेला प्रकाशमानही करते. मात्र प्रत्यक्ष सावतोबांच्या अभंगवाटेवरून सावतोबांचा चरित्रपट आणि त्याच्या आत्मसंघर्षाची रूपं शोधता येऊ शकतात.

0 Shares
सावतोबांची पोथी लिहिणाऱ्यांची गोष्ट माळी गुरुजींचा सावताचा मळा