भक्तीच्या हायवेवरचं टाईममशीन

विठोबा सावंत

टाईममशीनमध्ये बसलं ती भूतकाळात फेरी मारता येते, असं सिनेमात दाखवतात. हायवेला लागून असलेल्या अरण या गावात पोचलं की तेच होतं. संत सावता माळी यांचा मळा, विहीर, घर, समाधी आजही तिथे आहे. ते सारं आपल्याला साडेसातशे वर्षांपूर्वी घेऊन जातं. सावता@अरण.

पुण्याहून सोलापूरकडं जाताना हायवेला खेटूनच अरण लागतं. सोलापूर जिल्ह्यात शिरलो. टेंभुर्णी सोडलं की वरवडे टोलनाका. तो ओलांडला की पाच किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला अरण गावाची पाटी दिसते. हायवे सोडून खाली सर्विस रोडला आलं की, डाव्या बाजूला सिमेंटचा छोटा रस्ता अरण गावात शिरतो.

सोलापूरकडच्या गावांत असतात तशी रस्त्याच्या दुतर्फा घरं. काही नव्याने बांधलेली. पण बहुतेक जुन्या मजबूत दगडाची. माणसांचा राबता आहे, तितकी शाबूत. बाकीच्यातली काही ढासळलेली. जाडजूड भिंतीचा भूतकाळ सांगणारी. त्यांचे लाकडी मजबूत दरवाजे आणि लोखंडी साखळीच्या इतिहासजमा झालेल्या कड्या गावाच्या जुनेपणाची साक्ष देणा-या. त्यांच्या मधला सिमेंटचा रस्ता अवघ्या दोन मिनिटांत अरण ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर पोचवतो. आणि समोर दिसतं, संत सावता माळी यांचं समाधीमंदिर.

देवळासमोर आमची गाडी पार्क होते. थोडीफार भक्तमंडळी असतात तिथे. त्यातला एक आजोबा आपल्या कुटुंबाला सांगत असतो, हा इथेच सावतोबांचा मळा होता. पायाखाली पेवर ब्लॉकचा निर्जीव स्पर्श लागत असूनही उभ्या शरीरातून वीज वाहिल्यासारखा शहारा उठतो. तेच शहारलेपण घेऊन आम्ही देवळाच्या दिशेनं चालू लागतो. देऊळ जुन्या पद्धतीचं. काळ्या दगडाची उंच तटबंदी. किमान दीडेकशे फूट तरी असेल. डाव्या बाजूला उंच कळस. नक्षीदार. पिवळ्या, हिरव्या, निळ्या, लाल रंगानं रंगवलेला. मुख्य दरवाजातून आत शिरलं की डाव्या बाजूला संत सावता माळी यांचं मुख्य समाधीमंदिर. काही शतकांपूर्वी बांधलेलं. जुन्या काळातल्या मंदिरांना असतात तसे दगडावर नक्षीकाम केलेले दर्शनी खांब. गुलाबी, पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगांनी रंगवलेले. दरवाजा ओलांडून आत गेलं की मंदिराचा छोटासा गाभारा. साधारण १० बाय १० फूट. अंधार गडद करणार्‍या घट्ट काळ्या दगडांचा.

सताड उघड्या जुन्या लाकडी दरवाजावर चांदीचे पत्रे ठोकलेले. त्यातून बाहेर डोकावणारे सावता महाराज. झटकन नजरेत भरते ती त्यांची पीळदार मिशी. शिखर धवनसारखी. आपण जवळ जातो, तसं त्या मिशीतल्या मिशीत ते मंद हसताहेत असं वाटत राहतं. नाकापासून कपाळापर्यंत मोठा करत नेलेला विठ्ठलाला असतो तसा गंधाचा टिळा. त्यात डोक्याला सफेद पागोटं. गळ्यात उपरणं वाटावं असं सफेद धोतर. त्यावर तुळशीचे आणि फुलांचे हार. आमचे सावतोबा फारच देखणे दिसतात. तेजाळ, मधाळ आणि जणू स्वागतासाठी हात पसरून उत्सुक असलेले.

महत्त्वाचं म्हणजे अरणचे सावतोबा अगदी तरुण आहेत. अस्सल कष्टकरी. कातळाला नांगरण्याची जिगर असणारे तरणेताठे. नाहीतर अवघ्या पंचेचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या सावतोबांना सगळया चित्रकारांनी पांढर्‍या मिशा रंगवून म्हातारं करून टाकलंय. त्यांचा हा पितळी मुखवटा कुणी बनवलाय माहीत नाही. पण तो मुळात बनवणार्‍याची सावतोबांशी अंतरंगीची जानपहचान असावी. दर एकादशीला पितळेच्या जागी चांदीचा मुखवटा असतो. पण त्या चेहर्‍यातली नम्र मिजास मात्र तीच राहते. कदाचित त्या मुखवट्याखालच्या समाधीच्या दाट काळ्या दगडाचा तो गुण असावा.

सावतोबा जणू नजरबंदीचा खेळ करतात. एकदा पाहिलं की नजर काही केल्या हटू देत नाहीत. समाधीवर डोकं ठेवल्यानंतरच डोकं ठिकाणावर येतं. मागचा विठोबा दिसू लागतो. हा सावता माळ्यांचा विठोबा. दुसर्‍या कोणत्याही समाधीच्या देवळात तो रुक्मिणीसोबत जोड्यानं असतो. पण इथं मात्र तो एकटाच. कारण सावता माळ्यांच्या या मळ्यात त्यांना भेटण्यासाठी तो पंढरपुराहून एकटाच आला होता. त्यामुळं पिढ्यान्पिढ्या कथा चालत आलीय की ही विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. स्वतः विठ्ठल इथं साकार झालाय. खरंतर तो अरणला आला तेव्हा एकटा नव्हता. सोबत संतश्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली होते. त्यांच्याही छोट्या साजिर्‍या मूर्ती गाभार्‍याच्या दारात आहेत.

हे मुख्य समाधीमंदिर बांधलं तेव्हा त्याला ४,१०० रुपये खर्च आला होता. तशी नोंद मंदिराच्या दर्शनी भागातच आहे. मंदिराच्या गाभार्‍याच्या साधारण १३ फूट भिंतीवरचा घुमटही दगडाचा. इतक्या वर्षांनंतरही मजबूत. तो महाराष्ट्री वास्तुकलेचा सोपा सुबक तरीही सुंदर नमुना आहे. दिवसभर शेतात राबून घामाच्या श्रमानं भक्तीचा मळा फुलवणार्‍या सावतोबांच्या मंदिरात एअर कंडिशनरदेखील आहे. एका भक्तानं काही वर्षांपूर्वी तो दान केलाय. त्याचा गारवा आपल्याला साडेसातशे वर्षांपूर्वीच्या इतिहासातून वर्तमानात घेऊन येतो.

मुख्य मंदिरासमोर लांब सभामंडप आहे. पूर्वी तो सागवानी लाकडाचा होता. सावतोबांवरच्या जुन्या पुस्तकांत जुन्या मंडपाचा फोटो आहे. मंदिराच्या चारही बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये मंदिराकडच्या अर्ध्या भागात हा मंडप उभा होता. कालांतरानं त्याची पडझड झाली. त्यामुळं नाशिक जिल्हा भक्त मंडळी म्हणजेच नाशिकमधल्या माळी समाजाच्या लोकांनी पुढाकार घेऊन तो बांधला. १९८९ असं बांधकामाचं वर्ष तिथं नोंदवलंय.

देवळाभोवतीच्या दगडी तटबंदीच्या आतल्या बाजूनं सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना लांबलचक ओवरी आहे. आत खोल्या. वारकर्‍यांना आराम करण्यासाठी निवारा. आम्ही पोचलो तेव्हा निवांत दुपार होती. फुलं विकणार्‍या बायका, कर्मचारी, विणेकरी, काही भाविक आराम करत होते. भर उन्हाळ्यातही आत गारवा होता. सभामंडपात आलेले भाविक गणपती, शंकर, कृष्ण, दत्त यांच्या छोट्या देवळांकडे फिरकत नव्हते. पण गरुडखांबाला मिठी मारत होते. दहा वर्षांपूर्वी दोन माजी सैनिक भक्तांनी हा गरुडखांब बांधलाय. तिथं भाविक सावता महाराजांची गळाभेट घेतात.

लोक सांगत होते, अरणमधे रोज ४५-५० गाड्या तरी येतात. म्हणजे रोज हजार-दोन हजार लोक येऊन जातात. मच्छिंद्र भानवसे त्यांच्या नव्या नवरीसह हे जवळच्या गावातून आले होते. माळी समाजाचे नवरा नवरी दर्शनाला मोठ्या प्रमाणात येतात. हे त्यातलेच एक. दुपारच्या वेळी दर्शनासाठी विशीतली तरुण मुलंही आलेली दिसली. शेजारच्या गावातला अमोल कुंभार आणि त्याचे दोन मित्र होते. ते म्हणाले, ‘दर एकादशीला आम्ही इथं येतो. इथं आल्यावर प्रसन्न वाटतं. सकाळी येऊन प्रसाद घेऊन जातो.’

संत सावता महाराजांच्या मंदिरातून आत जाताना प्रवेशद्वारावर काही बायका फुलं घेऊन बसतात. त्या वसेकर कुटुंबातल्या. पण वंशजांपैकी नाहीत. गावातल्या वसेकरांपैकी ठरावीक कुटुंबांनाच इथं फुलं विकता येतात. याशिवाय मंदिरात दिवसभर विणेकरी पहारा देतात. भाविक त्यांच्या पाया पडतात. थोडे पैसेही देतात. ते सलग दोन तास उभं राहून ते सेवा देतात. दोन तासांनी दुसर्‍याची पाळी. हे लोक स्वेच्छेनं इथं येतात. त्यांना कपडे, दोन वेळचं जेवण आणि महिना ५०० रुपये मानधन दिलं जातं. त्यांचं जेवण बनवण्यासाठी एक महिला नियुक्त केलीय.

आम्हाला भेटलेले विणेकरी रामदास वाघ मुंबईत बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला होते. २०१४मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर ते पंढरपूर, देहू, आळंदी अशा ठिकाणी जाऊन महिना-दोन महिने राहतात. मुंबईचं वातावरण मानवत नाही. त्यापेक्षा विठ्ठलभक्तीत सेवा दिलेली बरी म्हणून ते इथं आलेत. पैशासाठी ते इथं आलेले नाहीत. पण सगळेच असे येत नाहीत. त्यांचा एक सहकारी मुंबईहून आलाय. त्याचा मुलगा दारू पितो. आणखी एक विणेकरी आहेत. साठी पार केलेले. पत्नीचं निधन झालं. मुलं नोकरीला; पण बापाला बघत नाहीत. म्हणून सावता महाराजांच्या मंदिरात विणेकरी म्हणून राहतात. जेवणाची, राहण्याची सोय होते.

मंदिरासमोर दुसर्‍या टोकाला सभामंडपातच तुळशीवृंदावनासारखा दगडी चबुतरा आहे. त्यावर पादुका कोरलेल्या आहेत. सावता माळींच्या कोणत्या तरी वंशजांची ही समाधी. पण कुणाची हे माहीत नाही. समाधीच्या दगडांच्या बाजूलाच एक दोन तीन फुटाचा काहीसा त्रिकोणी दगड आहे. भगवा शेंदरी लेप चढवलेला. हाच तो म्हसोबा. हाच सावतोबांच्या मळ्यात होता. गावकरी त्याची पूजा करायचे. पण हा देव सावतोबांना मळ्याची मशागत करताना अडचण करायचा. म्हणून त्यांनी तो उचलला आणि बांधावर ठेवला. त्यानंतर गावात देवीची साथ आली. गावकर्‍यांना वाटलं, म्हसोबा शेतातून हलवला, त्याचा कोप झाला. त्यांनी सावतोबांना मारहाण केली. मळ्याला आगही लावली. पण सावतोबा दबावात आले नाहीत.

त्यांना माहीत होतं, देव कुठं आहे. ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी’. आपलं काम हीच आपली भक्ती, हे तत्त्वज्ञान त्यांनी ७५० वर्षांपूर्वी सांगितलंय. अंधश्रद्धा नाकारली. मठ्ठ कर्मकांड नाकारलं. त्या संत सावता माळींच्या डोळस श्रद्धेचा साक्षीदार असलेला हा म्हसोबा. आपल्या काळाच्याच नाही तर आजच्याही अनेक योजनं पुढं असणार्‍यांची थोरवी गाणारा हा मैलाचा दगडच. मी त्याला हात लावला. पुन्हा एकदा तेच शहारलेपण अनुभवलं.

सावता माळी यांनी आपल्या कृतीतून प्रबोधनाचा वारसा इथल्या मातीला दिला. आजही मंदिरात पूजाअर्चा करणारे सावता महाराजांचे वंशज इथल्या समाधीच्या दगडांवर फुलं वाहतात. पण म्हसोबाच्या दगडावर मात्र फुलं वाहत नाहीत. वंशजांमधलेच एक दामोदर वसेकर सांगतात, ‘काही वर्षांपूर्वी मंडपाखालच्या जमिनीवर फरशी बसवण्याचं काम सुरू होतं. तेव्हा हा दगड हलवायचा होता. गावकर्‍यांच्या मनात भीती होती. कुणी हात लावायला तयार होईना. शेवटी मीच पुढं झालो आणि दगड उचलायला सुरुवात केली. मग बाकीचे पुढं आले.’ हे दामोदर वसेकर काही अंधश्रद्धेच्या विरोधात चर्चा करणारे पोषाखी बंडखोर नाहीत. ते साधे शेतकरी. वडिलोपार्जित थोड्याशा मळ्यात फूलशेती करणारे. साधा पांढरा शर्ट, लेंगा आणि डोक्यावर टोपी. गळ्यात उपरणं आणि अष्टगंधांचा टिळा. सावतोबांच्या या अल्पशिक्षित, सर्वसामान्य आयुष्य जगणार्‍या वंशजांकडे डोळस श्रद्धेचा हा वारसा साडेसातशे वर्ष सलग वाहतो आहे.

साडेसातशे वर्षांपूर्वीचा स्पर्श सांगणारी जुनी विहिरही देवळाच्या मुख्य दरवाजासमोर आहे. ती दहा पुरुष तरी खोल असेल. वर दगडांचं बांधकाम आणि खाली कातळ. सुरुंग लावून विहिरीची खोली वाढवली असावी. विहिरीच्या तळाला थोडंसं पाणी दिसतं. या अवर्षणग्रस्त भागात भर उन्हाळ्यात पाणी असणं म्हणजे कौतुकाचीच गोष्ट. ही विहीर सावतोबा आणि त्यांची पत्नी जनाबाईंनी खोदली. नंतरच्या पिढ्यांनी ती आणखी खोल केली. १९८०च्या दशकापर्यंत या विहिरीला मोट होती, असं गावकरी सांगतात. ‘मोट, नाडा, विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी’, असं सावतोबांचं भावविश्व या विहिरीशी जोडलेलं होतं. ‘आम्हां हाती मोट नाडा, पाणी जाते फुलझाडा’हा अभंग ही मोट चालावतानाच सावतोबांना सुचला असणार.

ही विहीर टाईम मशीन बनून सावतोबांच्या काळात घेऊन जाते. ७०० वर्षांपूर्वी सावता माळी, जनाबाई आणि त्यांची गोड मुलगी नागी अशा त्रिकोणी कुटुंबाचा याच मळ्यात राबता होता. याच विहिरीच्या पाण्यानं सावता माळी आपला मळा फुलवत होते. आता या मळ्याच्या जागी मंदिर, अन्नछत्र, ग्रामपंचायत, घरं, दुकानं उभी आहेत. मधलं मोकळं मैदान पेवर ब्लॉकनं सपाट केलंय. तिथंच सावतोबा राबत होते. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबीर, फुलांचा मळा फुलवत होते. श्रमच त्यांचा देव होता. घामातून पिकवलेल्या कांदा, मुळा, भाजीमध्येच त्यांना विठ्ठल दिसत होता. या जगावेगळ्या भक्ताला भेटायला विठोबाही इथं येत होता.

मळ्यात राबताना सावतोबांना इथंच अनेक अभंग स्फुरलेत. कर्म, धर्म आणि भक्तीचा अनोखा संगम याच मळ्यात घडला. श्रमातून पिकवलेल्या इथल्या शेतात सावतोबांना विठ्ठल दिसला. ‘सावता म्हणे केला मळा, विठ्ठल-पायी गोविला गळा’ किंवा ‘सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा’. सावतोबांची फळाफुलांनी बहरलेली ही अवस्था याच मळ्यात झाली.

सावता महाराजांचा जन्म अरणमध्येच झाला. १२५०मध्ये. त्यांचं घराणं विठ्ठलभक्त, वारकरी. तसं सांगणारा सावता महाराजांचाच एक अभंग आहे. औस्ये हे त्यांचं मूळ गाव. बहुतेक अभ्यासकांचं म्हणणं आहे, की ते औस्ये गाव मिरज संस्थानात होतं. ते उद्ध्वस्त झालं म्हणून त्यांचे पूर्वज अरणला आले. पण सावता महाराजांचं ललित चरित्र लिहिणारे अरणचे प्रा. सावता घाडगे यांनी मात्र हा दावा फेटाळला. ‘ही पुस्तकं माझ्याकडेही आहेत. महाराजांचं चरित्र लिहिण्याच्या निमित्तानं मी अनेकांना भेटलोय. माळगणाकडे वंशावळ असते. त्यांच्याकडून मी महाराजांची वंशांवळ काढून घेतलीय. त्यानुसार लातूरमधलं औसा हेच त्यांचं गाव. तिकडं चौकशीही केली. तिथं यादव आडनावाचे लोक आजही आहेत,’ असं घाडगे सर सांगतात.

सावतोबांचे पूर्वज फूलमाळी. फुलांची शेती करणारे. तेही वारकरी असावेत. पंढरीच्या वारीला नित्यनेमानं येणारे. औसा तसा दुष्काळी भाग. त्यामुळे सावतोबांच्या आजोबांनी पंढरपूरच्या वारीत वाटेतच असलेल्या अरणमध्ये स्थायिक झाले असावेत. अरणमध्ये नावाप्रमाणंच घनदाट जंगल असणार तेव्हा. सावता महाराजांचे आजोबा दैवू सुरुवातीला महादेवाच्या मंदिरात राहिले. हे देऊळ आजही अरणमध्ये आहे. दगडांवर दगड रचून बांधलेलं प्राचीन पद्धतीचं. तिथे दैवू पूजाअर्चा करायचे. मग शेती करू लागले. आधीच वस्तीला असणार्‍या माळ्यांनी आधार दिला असणार. शेतीत राबून, घाम गाळून हे कुटुंब अरणशी एकरूप झालं. असं सांगणार्‍या अनेक गोष्टी आहेत.

अरण पंढरीपासून जवळ. अवघं ३५ किलोमीटर. गावात शेतीसाठी पाणी भरपूर. त्यामुळं या वारकरी फूलमाळी कुटुंबानं अरण निवडलं असावं. आजोबा दैवू यांची बायको गीताई. त्यांना दोन मुलं. परसोबा आणि डोंगरोबा. त्यातले डोंगरोबा दिंडीत गेले. ते पुन्हा परतलेच नाहीत. परसोबांचं लग्न अरणमधल्याच सदू राऊत यांच्या नांगिता हिच्याशी झालं. त्यांच्याच पोटी संत सावता माळी यांचा जन्म झाला. सावता हे नाव का ठेवलं असेल?

घाडगे सर याचं विस्तारानं उत्तर देतात, ‘सावतोबांचे वडीलही वारकरी. आपला मुलगा सत्यानं, प्रामाणिकपणे, निष्ठेनं वागणारा असावा असं त्यांना वाटणारच. त्या भावनेतून सावता हे नाव आलं असावं. साव म्हणजे सज्जन, सत्य बोलणारा. त्याला ता हा प्रत्यय जोडला की त्याचा अर्थ होतो, खरेपणा, प्रामाणिकपणा. सावता हे अलौकिक, अर्थपूर्ण नाव आहे.’ घाडगे सरांचं नावही सावता. ‘आमच्या परिसरात आजही हे नाव मुलांना ठेवतात. आजूबाजूच्या गावांत हजारो सावता आपल्याला भेटतील,’ घाडगेसर सांगतात. हे नाव स्वतः विठ्ठलानं बारशाला हजर राहून ठेवलंय, अशा कथा कीर्तनकार मंडळी सांगतात.

देवळासमोर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्‍या मोठ्या रस्त्याला छेदून एक छोटा रस्ता गावच्या वस्तीत शिरतो. दोन्ही बाजूला नव्या जुन्या पद्धतीची घरं. याच रस्त्यानं उजवीकडं थोडंसं आत गेल्यावर मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर संत सावता माळी यांचं घर आहे. दुमजली. सावतोबांचं घर म्हटल्यावर आपल्याला वाटतं जुन्या पद्धतीचा वाडा किंवा घर असेल. पण हे आरसीसी ठोकळ्याचं बांधकाम आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून २००७ला बांधलेलं. याच जागेवर सावतोबांचं घर होतं. त्यांच्यानंतर त्यांची मुलीच्या संसारही याच घरात होता. कालांतरानं ते घर पडलं. तिथं हे घर बांधलंय. आणि त्यात छान चित्रांमधून सावतोबांचा जीवनपट चित्ररूपानं मांडलाय.

या सगळ्या गोष्टींमधली विठोबाच्या अरणभेटीची कहाणी सर्वात महत्त्वाची. संत नामदेवांना म्हणे भक्तीचा गर्व झाला होता. म्हणून विठ्ठल ज्ञानदेव आणि नामदेवांना घेऊन लऊळच्या दिशेनं चालले. तिथं संत कूर्मदास पांडुरंगाची वाट बघत होते. वाटेत अरण गाव लागलं. पांडुरंग त्या दोघांना मागं ठेवून काम करतानाच कर्मभक्तीत रममाण असलेल्या सावतोबांकडे गेले. ‘आपल्या मागे दोन चोर लागलेत. मला अशा ठिकाणी लपवून ठेव, जिथं मला कुणी शोधू शकणार नाही.’

तेव्हा सावतोबांनी हातातल्या विळीनं स्वतःचं पोट फाडलं आणि देवाला आपल्या हृदयात लपवलं. नामदेव आणि ज्ञानेश्वर देवांना शोधत सावतोबांकडे आले. संतांनी ओळखलं की देव सावतोबांच्या हृदयात आहेत. गावात भेटणारा प्रत्येकजण ही कथा रंगवून सांगतोच. अरणचं महात्म्य याच कथेत आहे. पण प्रत्येकाचं वर्जन थोडं थोडं वेगळं असतं. विठ्ठलानं नामदेव आणि ज्ञानेश्वरांना जिथं थांबवलं होतं, ती जागा आता ‘पाऊक्ताचा मळा’ म्हणून ओळखली जाते.

देवळाकडून हायवेकडे बाहेर आलं की, हायवेखालच्या छोट्या बोगद्यातून पलीकडे जायचं. डावीकडे वळून पलीकडच्या थोडं पुढं गेलं की उजव्या हाताला असलेल्या मळ्यात ही जागा आहे. ट्रस्टनं तीर्थक्षेत्र विकास निधीतून तिथं २००३-०४ साली छोटंसं मंदिरही बांधलंय. मंदिरात विठ्ठलाबरोबर संत नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिराच्या जवळ ३०-४० फूट दूरवर रस्त्याच्या पलीकडे काही शिळा, दगड पडलेले आहेत. ही खरी पाऊक्ताची जागा. तिथं संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींची पावलं उमटलेली आहेत. म्हणून तो पाऊक्ताचा मळा बनलाय. महाराष्ट्राचाच नाही तर देशाचाही इतिहास बदलवणारे हे दोन महामानव दस्तुरखुद्द पांडुरंगाची वाट बघत इथं उभे होते. साडेसातशे वर्षांपूर्वी इथे खरंच तसं घडलं होतं की नाही, हे शोधणं शक्य नाहीच. पण आस्था अनेकदा वास्तवाच्या पलीकडचा आनंद देते. समाधान देते. ते समाधान इथं मिळतं.

आता हा मळा जयसिंग धोडिंबा शिंदे यांच्या मालकीची आहे. आम्ही तिथं पोचलो तेव्हा मोटरसायकलवरून ते तिथं आले. शर्ट, पँट असा पेहराव. बोलणं कार्यकर्त्यासारखं. ‘ही जागा ट्रस्टच्या नावावर करायला मी नकार दिला. कारण सरकारला ही जागा दिली, तर ती सरकारच्या नावावर करावी लागेल. या जागेवर कट्टा बांधा, असं मी म्हटलं. पण ते नाही म्हणाले. आता मीच या जागेची डागडुजी करणार. मीच दगडांनी इथं बांधकाम करणार. याच्या आठवणी जपणार.’ शिंदे सांगत होते. तिथं एका शिळेवर पावलांच्या खुणा आहेत. तो दगड मधेच तुटलाय. शिंदे कुटुंबीय इथे रोज दिवाबत्ती करतात.

बाकीचे संत विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातात. विठ्ठल मात्र संत सावता माळींना भेटायला अरणला यायचा. हे सावतोबा आणि अरण यांच्या मोठेपणाची जणू सिग्नेचर ट्यून आहे. अरणमध्ये प्रत्येकजण हे सांगतंच. पण ते सांगताना त्यात संत सावता कधी पंढरपूरला गेले नाहीत, असं बिटविन द लाईन्स सांगणं असतंच. मात्र अरणचे शिवदास वसेकर गुरुजी हे मान्य करत नाहीत. ते आजरेकर फडाचे चौथे प्रमुख नामदेव अण्णा माळी आजरेकर यांचे नातू आणि ज्येष्ठ कीर्तनकार. आजरेकर फड हा अभंगांचा नव्यानं अर्थ लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या पूर्वकार कुळात पंढरीला जाण्याचा नियम आहेच. तो आपण सुरूच ठेवला, असं सावतोबांनीच एका अभंगात सांगितलंय. या दाव्याच्या समर्थनात ते सावतोबांचा तो अभंग सांगतात,

पूर्वपार कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठ्ठलाचे ॥
तारी अथवा मारी देवा तूचि एक । न घ्यावी भाक पांडुरंगा ॥
वडिलांचा सेवा धर्म अनुजी चालवी । व्यर्थ न भुलवी मायापाश ॥
सावता म्हणे देवा अखंड घ्यावी सेवा । आठव असू द्यावा माझा बाप ॥

सावता महाराजांच्या पत्नी जनाबाई अरण शेजारच्याच भेंड गावातल्या भानवसे रूपमाळी घराण्यातली. सावता महाराजांना एक मुलगा होता. त्याचं नाव विठ्ठल. तो लहानपणीच वारला. त्यामुळं मुलगी नागी हीच सावता महाराजांची वारस ठरली. तिचा उल्लेख नांगिता, नागाताई, नागुबाई असा करतात. तीदेखील सावतोबांसारखीच विठ्ठलभक्त. तिच्या विठ्ठलभक्तीचीही गोड गोष्ट आहे. सावतोबा तिला सांगत की या मळ्याचा मालक पांडुरंगच आहे. लहानपणी तिनं मालकाला भेटण्याचा हट्ट केला. त्यामुळं तिच्यासाठी विठ्ठल स्वतः मळ्यात आला. पुढं नागीचं लग्न गावातल्याच गोविंद वसेकर यांच्याशी झालं. वसेकर कुटुंबही वारकरी. विठ्ठलभक्तीचा हा वारसा वसेकर कुटुंबांने आजही जपलाय.

वसेकर आडनावाची अरणमध्ये३०-४० घरं असतील. यातली वंशजांची चार प्रमुख घरं आहेत. वंशजांच्या घरात बाळ जन्मलं की पाचव्या दिवशी तुळशीमाळ घालतात. सावतोबांचे वंशज शाकाहारी. त्यांची सोयरिकही शाकाहारी घरातच होते. दरवर्षी आलटून पालटून हे चार वंशज मंदिरात सेवा करतात. सगळ्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच. वाटण्या होत होत शेती कमी होत गेली. आता त्यांच्याकडे १८ गुंठ्यांपासून पाच एकरांपर्यंत शेती आहे. सावता महाराजांची खूप जमीन होती. नंतर वंशजांनी काही विकली, असं वंशज रविकांत वसेकर सांगतात. आता असलेल्या जमिनीत वंशज शेती करतात. डाळिंब, बोरीच्या बागा आहेत. मंदिरातील दान मिळतं, ते सेवेकरी वंशजांना मिळतं. दरवर्षी एक घराणं सेवा करतं. एका घराण्यातही आता तीनचार वाटेकरी आहेत. सगळे मिळून सेवा करतात आणि उत्पन्न वाटून घेतात.

‘सेवेची संधी असते ते वसेकर कुटुंब पहाटे ४ वाजता उठून आंघोळ करून मंदिरात येतात. सावता महाराजांना स्नान घालतात. मंदिर आणि परिसराची साफसफाई करून पूजाअर्चा करतात. सहा वाजता काकड आरती. त्यावेळी ५०-६० भक्त असतात. एकादशी असेल तर जास्त गर्दी. दिवसभर मंदिर उघडं असतं. रात्री ८ ते ९ हरिपाठ, ९ वाजता आरती आणि १० वाजेपर्यंत भजन. रात्री १० वाजता शेजारती. मग देव झोपतात. दरवाजा बंद केला जातो,’ सेवेकरी रविकांत महाराज मंदिरातली दिनचर्या सांगतात.

दिवाळीच्या पाडव्यापासून सेवेचं वर्ष सुरू होतं. तिथून दुसर्‍या कुटुंबाला मान मिळतो. मंदिराबाहेरच्या दानपेट्या ट्रस्टच्या. ट्रस्टच्या वतीनं देवळात एक पावतीपुस्तकही असतं. दर्शनाला येणारे भाविक तिथं पावती फाडतात. तो पैसा ट्रस्टला जातो. ‘झाडलोट करण्यासाठी लागणारं साहित्यापासून छोटा मोठा खर्च आम्हीच करतो,’ रविकांत महाराज सांगतात. ट्रस्टमध्ये किंवा अन्नछत्र मंडळात सावतोबांच्या वंशजांपैकी कुणीच नाही. स्वतःची शेती आणि मंदिरातली सेवा यापलीकडे वंशजांचा फारसा संबंध नसतो. नाही म्हणायला नारायण वसेकर नावाचे एक वंशज अरणचे सरपंच होते. नव्या पिढीतले दोन-तीन तरुण मात्र कीर्तन आणि समाजसेवेच्या क्षेत्रात धडपडताना दिसतायत. त्यापैकीच एक रविकांत वसेकर.

रविकांत महाराज वसेकर. सावतोबांच्या १८व्या पिढीतले २८ वर्षांचे तरुण कीर्तनकार. सावळा वर्ण, नेहरू शर्ट, शास्त्री धोतर. कपाळावर अबीर गंध आणि डोक्यावर टोपी. ते तीन भाऊ. एक शेती आणि देवळात पूजाअर्चा करतो. तिसरा शिक्षक आहे. वडलांनी दोन वर्षांपूर्वी घर बांधलंय. विटांचं साधं घर. सामान्य कुटुंब. तसं सावता महाराजांच्या वंशजांमध्ये कीर्तन प्रवचनकारांची परंपरा नव्हती. त्यामुळं घरच्यांची इच्छा होती. त्यामुळं रविकांत महाराज कीर्तनाकडे वळले. सोळाव्या वर्षी पैठणला गेले. तिथं एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेत पाच वर्ष शिकले. नंतर एकविसाव्या वर्षी आळंदीला जाऊन दोन वर्ष उजळणी केली. मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली, पाठ ऐकले आणि अनुभव घेऊन कीर्तन सुरू केलं.

आता महाराज गावोगावी कीर्तन करतात. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश आणि पंजाबमधल्या घुमानमध्येही त्यांनी कीर्तन केलंय. तिथले अनुभव ते सांगतात, ‘माळी समाज आहे तिथं सावता महाराजांची देवळं आहेतच. माझ्या हस्तेच ५०० तरी मूर्ती स्थापन झाल्या असतील. पुणे जिल्ह्यात जास्त. मध्य प्रदेशात कीर्तनासाठी गेलो. तिथंही मंदिर होतं. राजस्थानात मंदिरं असावीत. त्याची उभारणी करणारे प्रामुख्याने माळी समाजाचे लोक असतात. संत सावता हे माळी होते. त्यांना भेटायला परमेश्वर येई, असं दूरदूरच्या माळी समाजाच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळं लोक दूरवरून येतात. गेल्या पुण्यतिथीला राजस्थानमधील माळी समाजाचे एक मंत्री आले होते. त्याआधी बिहारमधील एक नेताही येऊन गेला.’ ७०० वर्षांपूर्वी आपल्या समाजातील एक थोर संत पुरोगामी विचार देऊन गेला, याचा अभिमान समाजातल्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे.

रविकांत यांच्या घराला लागूनच रमेश महाराज वसेकर यांचं घर आहे. नीटनेटकं बांधलेलं. रमेश बोलायला चटपटीत. डोळ्यात डोळे घालून संवाद साधतात. वय ४५च्या पुढे मागे. शिक्षण आठवीपर्यंत. मध्यम उंचीचे, गोरा रंग, शर्ट, लेंगा. कपाळावर टिळा आणि डोक्यावर टोपी. गळ्यात उपरणं. त्यांना दोन मुली, एक मुलगा. मोठी मुलगी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतेय. रमेश महाराज मोठ्या अदबीनं स्वागत करतात. त्यांच्या संवाद साधण्याच्या कलेमुळं लोकांशी संपर्कात असतात. त्यामुळं महाराजांचे वंशज म्हणून समाजात उठबस.

जवळच ठेवलेला फोटोंचा अल्बम काढून ते नेत्यांबरोबरचे त्यांचे फोटो दाखवतात. पंकजा मुंडेशी संवाद साधताना. छगन भुजबळ, अतुल सावे अशा एक ना अनेक नेत्यांबरोबरचे फोटो. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर, स्वागत करताना, सत्कार स्वीकारताना, चर्चा करताना अशा वेगवेगळ्या पोजमधले. प्रत्येक फोटो दाखवून कुठं भेट झाली, याची माहिती रमेश महाराज देतात.

जवळच लग्नपत्रिकांचा गठ्ठा पडलेला असतो. राज्यभरातून आलेल्या. त्यावर ‘शुभाशीर्वाद : रमेश महाराज वसेकर, श्री संत सावता माळी यांचे वंशज, तीर्थक्षेत्र अरण’ असा ठळकपणे उल्लेख. त्यानंतर आमदार, खासदार, महापौरांची नावं. सावता माळी यांचे वंशज म्हणून रमेश महाराजांचं नाव आधी. माळी समाजातल्या लग्नांमध्ये नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सन्मानानं बोलावतात. त्यातून आमदार, खासदार, नेतेमंडळींशीही त्यांचा संबंध येत असावा. अल्बममधील बरेचसे फोटो अशा ठिकाणचे असावेत.

‘दोन महिने आधी बूक करतात. सावता माळींचे वंशज म्हणून मान देतात.’, रमेश महाराज कौतुकानं माहिती देतात. प्रत्येक वाक्यानंतर छोटासा पॉज. मग पुढचं वाक्य. ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माळी समाज आहे. गावागावात फिरतो. सावता माळींचे वंशज म्हणून भेटण्यासाठी गर्दी होते. ही सावता महाराजांची कृपा. त्यांचंच सगळं आहे. आपलं काय आहे?’, रमेश महाराज सांगतात. ‘संपर्क मोठा असल्यानं आता लग्नही जमवतो. गावागावात सावता महाराजांचं मंदिर आहे. तिथं लोक बोलावतात. पंकजाताई भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगावला बोलावतात.’ पंकजा मुंडे यांच्याबरोबरचा व्यासपीठावरील फोटो दाखवून रमेश महाराज त्यांची नेत्यांबरोबर असलेली उठबस दाखवतात.

२०१५पासून पंकजाताई अरणला मेळाव्यासाठी येतात. मेळाव्याला ५०-६० हजार लोक असतात, अशी माहितीही ते आवर्जुन देतात. लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आपण मानधन मागत नाही, लोक स्वखुशीनं देतात, असं रमेश महाराज सांगतात. घरी आलेला पाहुणा परत निघाला की शाल, श्रीफळ देऊन सत्कार करतात. फोटो काढून घेतात. सभा, समारंभात उठबस असल्यानं पाहुण्यांचं आदरातिथ्यही उत्साहानं करतात. त्यांच्या स्वभावामुळं सावतोबांचे वंशज म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलीय. नव्या पिढीतले आणखी एक तरुण सावता अंकुश वसेकर पखवाज वादक आहेत. बाकी सावता महाराजांची वंशज असलेली मंडळी साधी, सामान्य. गावातल्या इतर लोकांसारखीच शेती, नोकरी करून पोट भरणारी.

सावतोबांच्या देवळात वर्षातून दोन मोठे उत्सव होतात. त्यातला एक म्हणजे चंदनउटी सोहळा. आणि दुसरा श्रीफळ हंडीचा. चैत्र वद्य द्वादशीला होणार्‍या चंदनउटी  सोहळ्याच्या दिवशी सावता महाराजांच्या समाधीला चंदनाचा लेप लावला जातो. उन्हाळ्यात महाराजांना थंडावा मिळावा म्हणून चंदनउटी केली जाते. पंढरपुरातच्या विठ्ठलमंदिरातली ही प्रथा आता सगळ्याच संतांच्या समाधीमंदिरांमध्ये रूढ झालीय. दुसरा श्रीफळ हंडीचा सोहळा मोठा असतो. सावतोबा पुण्यतिथी निमित्तानं होणार्‍या या उत्सवाला ‘कालायात्रा’ असंही म्हणतात. चार दिवसांचा हा सोहळा असतो. आषाढी एकादशीसाठी सगळ्या वार्‍या पंढरपुरात जातात; पण संत सावता महाराजांसाठी पंढरपूरहून वारी अरणला येते. त्याला राज्यभरातून हजारो लोक असतात.

सावतोबांच्या काळातलं अरण साडेसातशे वर्षांत पूर्ण बदललंय. पूर्वीचं घनदाट जंगल कधीचंच संपलंय. गावाशेजारी थोडं जंगल आहे अजून. त्यात हरणं, काळवीट, तरस, ससे असे प्राणी आजही आहेत. गावामधून एक ओढा जातो. पावसाळ्यात त्याला पाणी असतं. पूर्वी वारीबरोबर अण्णा हजारे गावात येत. अण्णा एकदा मुक्कामाला होते. तेव्हा त्यांनी गावची पाहाणी केली. अरण पाणलोट क्षेत्राखालचं आहे, असं सांगितलं. त्यानंतर गावात १७ बंधारे बांधण्यात आले. गावातून कालवाही पूर्ण झालाय. पण उजनीचं पाणी अजून आलेलं नाही. गावातल्या विहिरींना आणि बोअरवेलना थोडंसं पाणी आहे. गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्यानं दुष्काळी स्थिती आहे. असं असलं तरी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर शेतकरी शेतीसाठी करतो.

इथला शेतकरी कष्टाळू. सावतोबांच्या शिकवणीप्रमाणं कष्टाला देव मानणारा. दुष्काळ असला तरी मेहनतीनं शेती करणारा. ‘आधी बाग सांभाळू आणि मग पांडुरंगाला जाऊ’ हा त्यांचा शिरस्ता. शेतकरी सकाळी दूध डेअरीवर घालून मग सावता महाराजांच्या दर्शनाला येतील. आधी गावात ज्वारी, बाजरी, कांदा, मिरचीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं. गावात मिरचीचा बाजारही भरायचा. पण आता तो चार किलोमीटरवर असलेल्या मोडनिंबला भरतो. कारण मोडनिंबला रेल्वे स्टेशन आहे. बाजारपेठ आहे.

नव्वदच्या दशकात अरणमधले शेतकरी पारंपरिक शेतीकडून फळबागांकडे वळले. बोर आणि डाळिंबाच्या बागा केल्या. अगदी दुष्काळ असतानाही पाउक्ताच्या मळ्याजवळ एक द्राक्षांची बागही दिसली. बागांना ठिबक सिंचनानंच पाणी दिलं जातं.  इथली फळं पुणे आणि नाशिक मार्केटमध्ये जातात. अगदी पंजाब, हरयाणापर्यंत इथली फळं जातात. शेतीबरोबर गावात दुधाचा जोडधंदा. प्रत्येक शेतकर्‍याच्या दारात एक-दोन जर्सी गाई दिसतातच. गावात दोन चिलिंग सेंटर्स आहेत.

गाव तसं पुढारलेलं. गावात नर्सरीपासून शिक्षणाची सुविधा आहे. संत सावता माळी यांच्या नावानं १९७२ साली गावात शाळा सुरू झाली. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणार्‍या या शाळेत सध्या ८३३ विद्यार्थी आहेत. त्यामुळे गावातली मुलं बारावीपर्यंत शिकतातच. बारावीनंतर कॉलेज जवळच मोडनिंबला. ‘अरणचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं क्रीडा प्रशिक्षण. धनुर्विद्या, कराटे, रग्बी, सायकलिंग, बुद्धिबळ, भालाफेक अशा ११ प्रकारच्या खेळांचं प्रशिक्षण इथं दिलं जातं. राज्यस्तरावर ३०० आणि राष्ट्रीय पातळीवर ५० पेक्षा जास्त मुलं पोचलीत. काही मुलांना क्रीडा कोट्यातून नोकरीही मिळाली.’ अरणमध्येच शिकून संत सावता माळी विद्यालयात शिक्षक असलेले सतीश घाडगे गावातील क्रीडा संस्कृतीची माहिती देतात.

अरणमध्ये संत सावता महाराजांच्या नावानं गावात आयुर्वेद सेंटर आणि आयुर्वेद महाविद्यालय सुरू करावं, अशी गावकर्‍यांची मागणी आहे. ‘सावता महाराजांना आयुर्वेदाचं ज्ञान होतं. झाडपाल्याच्या औषधांची त्यांना माहिती होती. तशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अविनाश ठाकरे यांच्याकडे केलीय’,अशी माहिती सतीश घाडगे यांनी दिली. अरण तीर्थक्षेत्र विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्‍यातील नायगाव इथं केलीय. त्यामुळं मुख्यमंत्री हा प्रकल्प मार्गी लावतील, अशी आशा अरणवासीयांना वाटतेय.

मंदिरातील पूजेचा मान सावता महाराजांच्या वंशजांना असला तरी मंदिराचा कारभार श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टकडे आहे. १९५३ साली हा ट्रस्ट स्थापन झालाय. दर पाच वर्षांनी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांची निवड होते. सध्या या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत विठ्ठल गजरे आणि सचिव आहेत विजय शिंदे. दोघंही मराठा समाजाचे. ट्रस्टवर ११ सदस्य असतात. वेगवेगळ्या समाजाचे. त्यात सध्या तिघे माळी आहेत. साधारण सगळे राजकीय पुढारी असतात. आता असलेले ट्रस्टी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित.

‘मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिराची देखभाल, दिवा-बत्तीची सोय करणं, यात्रेचं नियोजन करणं, महाराजांचे चरित्र, अभंग असं साहित्य छापणं, त्याची विक्री करणं अशी कामं ट्रस्टमार्फत होतात. श्री क्षेत्र अरणला देहू, आळंदी, शिर्डी किंवा अक्कलकोट देवस्थानांप्रमाणं मोठी प्रसिद्धी नाही. त्यामुळं फारसं उत्पन्नही नाही. खास अरणला येणार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळं फार काही करता येत नाही’, ट्रस्टचे सचिव विजय शिंदे सांगतात.

कर्मचारी नाहीत म्हणून ट्रस्टचं अन्नछत्र बंद आहे. पण मंदिराच्या मागच्या बाजूला २०१६पासून सुरू केलेलं अन्नछत्र मात्र एकही दिवस खंड न पडता सुरू आहे, अशी माहिती या अन्नछत्राचं व्यवस्थापन संभाळणारे पदाधिकारी देतात. अन्नछत्राचा रोजचा खर्च साधारण ५ हजार रुपये आहे. गावातल्या काही धडपड्या मंडळींनी पुढाकार घेऊन ‘संत सावता माळी सेवाभावी न्यास’ स्थापन केला. त्यातील १५ जणांनी प्रत्येकी ५० हजार रुपये सभासद वर्गणी भरून निधी गोळा केला आणि अन्नछत्र सुरू केलं. दानशूर व्यक्ती अन्नधान्य दान करतात. एकाच वेळी ६० जण बसतील, अशी व्यवस्था करण्यात आलीय. रोज अडीच-तीनशे भाविक इथं जेवतात. एकादशी दिवशी ७०० ते ८०० भाविक जेवतात. लोकांच्या मदतीमुळं आजवर काही कमी पडलेलं नाही, या ट्रस्टचे अध्यक्ष सावता घाडगे सांगतात.

सावता भानुदास घाडगे सर. अरणच्या संत सावता विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य. कडक इस्त्रीचा सफारी, कपाळाच्या मधोमध भांग पाडून नीट विंचरलेले केस. पेशानं शिक्षक असल्यानं बोलण्याची वेगळी ढब. ते स्वतः माळी समाजातले. अन्नछत्र चालवणार्‍या ट्रस्टचे तेच अध्यक्ष. घाडगेसरांनी सावतोबांचं ललित चरित्र लिहिलंय. ‘मी सर्व संतांची चरित्र वाचायचो. तेव्हापासून मला संत सावता महाराजांचं चरित्र असावं असं वाटत होतं. सावता महाराज म्हणजे काम हाच देव, मानणारा एकमेव संत. बहुजन समाजाचा पहिला कीर्तनकार. पंधराव्या वर्षांपासून ते कीर्तन करत’, सावता सर सावतोबांबद्दल सांगताना थकत नाहीत.

आषाढी वारीसाठी अनेक पालख्या अरणमधून जातात. पैठणच्या एकनाथ महाराजांची पालखी इथं मुक्कामाला असते. याशिवाय निळोबारायांची, भगवानगडाची, ओतूरच्या चैतन्य महाराजांची, सिद्धटेकच्या गोविंद महाराजांची, एदलाबादहून येणारी मुक्ताबाईंची पालखी, संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आपेगावातून निघणारी पालखी अशा अनेक पालख्या इथं येतात. मुक्काम करतात. शेगावच्या गजानन महाराजांची पालखी परतीला जाताना येते. या पालख्यांबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी असतात. काहीजण मंदिरात थांबतात. काहींची व्यवस्था भक्त निवास, शाळा, हायस्कूलमध्ये केली जाते.

गेल्या दोन दशकांत अरणच्या विकासाला चालना मिळालीय. बीडचे कल्याण आखाडे हे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते दरवर्षी चंदनउटीला मेळावा भरवतात. त्यासाठी ते भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना घेऊन येत. मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मेळाव्यात अरणला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. आधी तो ‘क वर्ग’ होता. विजयसिंह मोहिते-पाटील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीही अरणच्या विकासाला गती दिली, असं गावकरी सांगतात. विजयदादांच्या काळात मंदिराजवळ भक्त निवासही बांधण्यात आलंय. गावातले रस्ते, मंदिराची डागडुजी, मूळ घराच्या ठिकाणी दुमजली घर अशी बरंच कामं करण्यात आली. मुंडेंनंतर आता पंकजा मुंडे दरवर्षी मेळावा घेतात.

गावकर्‍यांकडून हे ऐकून गावच्या राजकारणाविषयी उत्सुकता वाटते. अरण बारा बलुतेदार असलेलं गाव. ५० टक्के मराठा समाज. त्यानंतर ३० टक्के माळी. बाकी रामोशी, धनगर, कोळी, परीट, कुंभार अशी सगळी. ‘लोकवस्ती सुमारे साडेआठ हजार. ४,७२६ मतदान.’ नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन गेल्यानं एका गावकर्‍यानं अगदी अचूक आकडेवारी दिली. यावरून गावातील राजकीय सजगता लक्षात यावी. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात अशी राजकीय संवेदनशीलता असतेच.

‘मुंडे मेळावा घेत असले, तरी गावात राष्ट्रवादीचं वर्चस्व. आधी काँग्रेसचं. गावात शिवसेनेची ठरलेली मतं आहेत. आता विजयदादा भाजपमध्ये गेले. त्यामुळं गणित बदललं. यावेळी राष्ट्रवादीऐवजी भाजपला चांगलं मतदान झालं.’ गावकर्‍यांशी बोलताना इथलं राजकारण उलगडत जातं. पण अमूक जातीचे लोक अमूक पक्षाचे मतदार असं काही गणित नाही. सर्वच समाजात प्रत्येक पक्षाचे समर्थक आहेत. सावता महाराज ट्रस्टवर असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक पुढारी गावातली राजकीय समीकरणं स्पष्ट करतात.

महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचं संघटन करणार्‍या छगन भुजबळांनी मात्र अरणकडे तेवढं लक्ष दिलं नाही. मुंबईचे महापौर असताना ते एकदा आले होते आणि नंतर मंत्री असताना. गावात कदाचित विजयदादांना मानणारे कार्यकर्ते असल्यानं भुजबळांनी अरणकडं दुर्लक्ष केलं असावं. किंवा सगळ्या ओबीसींचं नेतृत्व करताना त्यांना माळी म्हणून स्टॅम्प नको असावा.

भुजबळ असोत की मुंडे, ओबीसींचं नेतृत्व राज्यात उदयाला आलं ते मंडल आयोगानंतरच. त्यानंतर माळी समाजाचं संघटन वाढलं. नवनव्या संघटना उभ्या राहिल्या. त्यातून अरणला लोकांचा राबता वाढला. त्यामुळे एक तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित झालं. आता तर ते माळी समाजाच्या प्रेरणेचं केंद्र बनलंय. पण ते संत सावता माळी यांच्या काळाच्या कितीतरी पुढे विचाराचं केंद्र बनायला हवं. ते विचार खरी टाईममशीन आहे. जुन्या नाही, तर नव्या काळात हात पकडून घेऊन जाणारी.

0 Shares
सावता सागर प्रेमाचा आगर आजही भेटते माहेरवशीण जनाई