संत सावता माळी यांचा मृत्यू नवज्वर या तापामुळे झाला असा उल्लेख एका अभंगात आहे. हा नवज्वर नेमका आहे तरी काय? आयुर्वेदाची माहिती धुंडाळून केलेला हा लेख.
उठोनी प्रातःकाळी करोनिया स्नान ।
घालुनी आसन यशाविधी ॥
नवज्वरे देह झालासे संतप्त ।
परि मनी आर्त विठोबाचें ॥
प्राणायाम करुनि कुंभक साधिला ।
वायु निरोधिला मूळतत्त्वी ॥
बारा शतें, सतरा, शालिवाहन शक ।
मन्मथ नामक संवत्सर ऋतू ग्रीष्म ॥
कृष्ण आषाढ चतुर्दशी ।
आला उदयासी सहस्त्रकर ॥
सांवता पांडुरंग – स्वरुपीं मीनला ।
देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥
संत सावता महाराजांवर त्यांच्या समकालीनांनी लिहिलेले फारसे अभंग सापडत नाहीत. त्यामुळं हा अभंग महत्त्वाचा ठरतो. हा अभंग कुणी लिहिलाय, याची नाममुद्रा यात नाही. काही अभ्यासक हा अभंग संत निवृत्तीनाथांचा मानतात. तसं असेल तर याचं महत्त्व अधिकच वाढतं.
यात सर्वात वेगळी माहिती आहे, ती नवज्वराची. संत सावता यांना नवज्वर झाला होता. आजा-यांना झाडपाल्याचं औषध देणा-या सावतोबांना त्याचं गांभीर्य कळलं असेल. त्यानंतर त्यांनी त्या काळातल्या उपलब्ध उपचारांची मर्यादा लक्षात घेऊन स्वतःला शांतपणे मृत्यूच्या हवाली केलं. पांडुरंगाला समर्पित केलं.
यातला नवज्वर म्हणजे नेमकं काय, हे शोधून काढायचं होतं. नवज्वर म्हणजे ‘नवीन ताप’ असा शब्दशः अर्थ आहे. असा ताप जो अजून शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेला नाही किंवा त्याला नाव दिलेलं नाही. तो तेव्हा नवीन असलेला मलेरिया, टायफॉईड किंवा प्लेग वगैरे काहीही असू शकेल, असं वाटतं खरं. पण ते खरं नसतं. मुंबईच्या पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजातले वैद्य सुहास कोळेकर यांनी सांगितलं की, नवज्वराचा उल्लेख आयुर्वेदात आहे. प्रसिद्ध चरकसंहितेतही नवज्वराचा उल्लेख आहे. चरकसंहितेच्या ‘ज्वरचिकित्सितम’ या तापावरच्या उपचारांची माहिती देणार्या अध्याय तीनच्या १३८व्या श्लोकात नवज्वराचा उल्लेख आहे.
दोषप्रवृत्तिरष्टाहो निरामज्वर लक्षणम् ।
नवज्वरे दिवास्वप्न स्नानाभ्यड्गान्न मैथुनम् ॥
आयुर्वेदाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नवज्वराचा समावेश आहे. बीएएमएसच्या दुस-या किंवा तिस-या वर्षात विद्यार्थ्यांना नवज्वराची माहिती दिली जाते. वैद्य कोळेकर यांनी दिलेल्या संदर्भानुसार आयुर्वेदाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना रेफरन्स म्हणून देण्यात येणा-या ‘कायचिकित्सा’ या वैद्य य. गो. जोशी यांच्या पुस्तकात ज्वरचितित्साध्याय तीनमधे नवज्वराचा उल्लेख आहे. या पुस्तकातल्या माहितीनुसार नवज्वरामधे दिवसा झोपणं, स्नान अभ्यंग, अन्न, मैथुन, क्रोध, वा-यात हिंडणं, व्यायाम, आणि काषाय रस वर्ज्य आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर्स असोसिएशनचे सल्लागार डॉ. अमृत गोरुले यांनी नवज्वर ही संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नवज्वर म्हणजे नवीन ताप. तो नुसता ताप असू शकतो किंवा एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. नव्यानं ताप आला असेल आणि तो नेमका कोणत्या प्रकारचा ताप आहे, हे लक्षात येत नाही, तोवर त्याला नवज्वर असं म्हणतात. हा नवज्वर शरीराच्या मांसल भागातून हाडात, कण्यात, मणक्यातल्या स्त्रावात किंवा मेंदूत गेला तर रोगी कोमात जातो. तापाच्या सुरुवातीला त्याला नवज्वर म्हणतात. दोन-तीन दिवसांनंतरही ताप बरा झाला नाही, तर त्याला जीर्ण ज्वर असं म्हणतात. आजच्या भाषेत बोलायचं तर नवज्वर हा वायरल तापाच्या जवळ जाणारा असू शकतो.
नाशिकच्या औदुंबर आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचे प्रमुख डॉ. राहुल चौधरी यांनीही सांगितलं, नवज्वर हा ताप मूळ आजार किंवा एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतो. याचं उदाहरण देताना ते म्हणाले, काविळीचं निदान होण्यापूर्वी आलेला ताप हा नवज्वर असू शकतो. त्या तापाच्या उपचारादरम्यान आलेला ताप फक्त नसून कावीळ या आजाराचं लक्षण म्हणून येतो. त्याला नवज्वर असं म्हणतात.
आरोग्याची नीट माहिती असलेल्या सावतोबांना या नवज्वराची तीव्रता कळली असावी. त्यामुळे त्यांनी शांतपणे आपले प्राण सोडले असावेत, असं वाटतं. नंतर त्याचं वर्णन करण्यासाठी त्याला प्राणायमातल्या परिभाषेची जोड दिली असावी. त्यातून हा अभंग तयार झाला होता. पण या अभंगाने आपल्याला सावतोबांच्या मृत्यूची नेमकी तारीख दिलीय, हे काही कमी नाही.
सावता तो धन्य! सावतोबांच्या अभंगात मिरची कुठून आली?