महात्मा बसवेश्वरांनी पायाभरणी केलेली समतेची पायवाट वारकर्यांसनी रुंद केली. या वाटेवर लिंगायतांना लागलेल्या ठेचा पाहून मागचे वारकरी शहाणे झाले. त्यांनी संघर्षाऐवजी समन्वयाचा मार्ग पत्करला. बाराव्या शतकातल्या या बसवपथाची आजच्या ‘गुगल मॅप’च्या आधारानं केलेली ही सफर.
मुंबई ते सोलापूर रेल्वेनं आणि तिथून पुढं गाडीनं बसवकल्याणच्या दिशेनं चाललो होतो. वाटेत ठायीठायी महात्मा बसवेश्वरांच्या नावाचा प्रभाव दिसत होता… अगदी बसवेश्वर चौकातील बसवेश्वरांच्या पुतळ्यापासून ते बसवेश्वर महाविद्यालयापर्यंत आणि बसवेश्वर मेडिकल शॉपपासून बसवेश्वर रसवंतीपर्यंत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या या सीमावर्ती भागात बसवेश्वरांच्या नावाशिवाय राजकारण-समाजकारणाचं पानही हलत नाही. आज तब्बल ९०० वर्ष उलटली तरीही बसवेश्वरांचं आणि त्यांच्या लिंगायत सांप्रदायाचं जनमानसावरचं गारूड कमी झालेलं नाहीये.
आम्ही बसवकल्याणच्या वाटेवर असताना, पावसाच्या काही सरी बरसून गेल्या होत्या. त्यामुळं वातावरणात ओलेतं हिरवेपण आलं होतं. दोन्ही बाजूला पसरलेल्या शेतांमध्ये मशागतीची कामं सुरू होती. जमिनीची चांगली मशागत केली नाही तर, पीक चांगलं येत नाही हे शेतकर्याला माहीत असतं. तशीच विचारांची मशागत द्रष्ट्या सुधारकांनाही करावी लागते. आजच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तशी वैचारिक मशागत बाराव्या शतकात बसवेश्वरांनी केली. त्याचे परिणाम फक्त या भागापुरतेच नाहीत, तर संपूर्ण देशाच्या विचारविश्वावर झाले. म्हणूनच बसवेश्वरांचं जीवन, त्यांचे विचार, त्यांच्या कल्याणक्रांतीचा आवाका, ती संपविण्यासाठी झालेली प्रतिक्रांती, त्याचे झालेले परिणाम आणि या सार्याचे आजचे संदर्भ अभ्यासणं आज एकविसाव्या शतकातही महत्त्वाचं ठरतं.
हैदराबाद रस्त्यावर बसवकल्याणला पोचल्याची सर्वात मोठी खूण दिसते, ती म्हणजे अतिभव्य कमान. बसवेश्वरांच्या पुतळ्यावर सहा-सात मजले उंच एवढी ही कमान तुमचं चालुक्यांच्या राजधानीत आणि बसवेश्वरांच्या कर्मभूमीत स्वागत करते. आम्ही या कमानीपाशी पोहचलो तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. आम्हाला पुढं भालकीलाही जायचं होतं. त्यामुळं थोडं नियोजन बदलून, आम्ही आधी भालकी आणि मग बसवकल्याण करायचं ठरवलं आणि गाडी भालकीच्या दिशेनं हाकली.
‘बेळगाव-कारवार-धारवाड-निपाणी-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेतली भालकी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचं ठाणं असलेल्या भालकीत शिरल्यावर मराठी पाट्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदी मराठमोळ्या खुणा दिसू लागल्या. भालकीत आम्हाला जायचं होतं, हिरेमठ संस्थानात. या संस्थानात ‘महाराष्ट्र बसव परिषद’ काम करते. बसवेश्वरांच्या जीवनाचं आणि जीवनविचारासंदर्भात साहित्यनिर्मिती, व्याख्यानं आदी अनेक उपक्रम ही परिषद गेले कित्येक वर्ष राबवत आहे.
एखाद्या छोट्या गढीप्रमाणं दगडी बांधकाम. प्रवेशद्वारावर बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आणि आसपास शाळेबाहेर लावतात तसे यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो. आत शिरलो तर शाळेचंच वातावरण. मधली सुट्टी झालेली. मुलं शाळेतर्फे मिळणारं मध्यान्ह भोजन घेत होती. त्यातल्या काही मुलांना विचारलं कार्यालय कुठं आहे, तर त्यांनी डावीकडं बोट दाखवलं. तिथं परिषदेचे संचालक राजू झुबरे भेटले. आमचं स्वागत वगैरे झाल्यावर ते म्हणाले, ‘या मठातर्फे शाळा चालवली जाते. इथं गरजू विद्यार्थ्यांची राहायची, शिक्षणाची, जेवणाखाण्याची व्यवस्था पाहिली जाते. इथून शिकलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर आहेत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असं इथल्या महाराजांचं सांगणं आहे. बरं, ते सारं राहू दे, तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुम्ही आधी जेवून घ्या.’
त्यांचं बोलणं झाल्यावर लगेचच एक काका आम्हाला घेऊन दासोहाच्या दिशेनं निघाले.
दासोह ही लिंगायत सांप्रदायातील महत्त्वाची संकल्पना. दासोह म्हणजे दान नव्हे. दानात देणारा दाता मोठा असतो. दासोहामध्ये देणारा आणि घेणारा कोणीही लहान-मोठा नसतो. एवढंच नव्हे तर दासोही कोण हे घेणार्याला ठाऊकही नसतं आणि आपण कोणाला देणार आहोत हे दासोह्यालाही ठाऊक नसतं. ही झाली दासोहाची मूळ संकल्पना. पण, आता दासोहाचीही कल्पना बदलली आहे. अनेक ठिकाणी आजच्या दासोहाचे प्रायोजक आहेत, श्रीयुत अमके तमके अशी घोषणा होते, फलक लावले जातात. हे खरं तर दासोहाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात आहे. पण आज सगळ्यांचंच मार्केटिंग जोरात आहे. त्यामुळं याबद्दल न बोललेलंच बरं. असं समजून घेत घेत आम्ही दासोहापर्यंत पोचलो.
जेवणं उरकल्यावर, आम्ही पुस्तकालयात आलो. बसवेश्वरांच्या जीवनावरील, त्यांच्या आयुष्यातील विविध स्थळांची माहिती देणारी, तसंच लिंगायत सांप्रदायाचा तत्त्वविचार सांगणारी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी पुस्तकं तिथं होती. बसवेश्वरादी शरणांचे फोटो, मूर्ती, स्मृतिचिन्हं अशा अनेक गोष्टीही होत्या. तिथं आम्हाला राजूदादा सविस्तर माहिती सांगू लागले. ते म्हणाले, भालकीच्या या मठाला चार-पाचशे वर्षांचा इतिहास आहे. मुळात मठसंस्कृती ही बसवेश्वरांना मान्य नाही. त्यांचा एल्गार या मठसंस्कृतीच्या विरोधात होता. पण कल्याणप्रतिक्रांतीनंतर या अशाच मठांमध्ये बसवेश्वरांचं वचनसाहित्य टिकून राहिलं. त्यामुळं आज काही मठ खरंच चांगलं काम करत आहेत. भालकीचा हा मठ या मोजक्या मठांमध्ये आहे. इथली शाळा खूप चांगलं काम करतं आहे. एकंदरीतच आज बसवेश्वरांचा विचार नव्यानं पुढं येतो आहे. शतकानुशतकं बसवेश्वरांच्या चळवळीचा लावलेला चुकीचा अर्थ पुसणं शक्य नाही. शेवटी ही जळमटं काढणं ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. ती हळूहळू होतेय, हे मात्र निःसंशय.
बसवेश्वरांचं आयुष्य नीट समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांचे विचार कळणार नाहीत, असं सांगत त्यांनी बसवचरित्राचे काही ग्रंथ दाखवले. पूर्ण मठात बसवेश्वरांचं आयुष्य उलगडणारी विविध चित्रं लावली आहेत. ती समजावून सांगत त्यांनी बसवण्णांचं चरित्र थोडक्यात सांगितलं.
ते म्हणाले, की बसवेश्वरांचं सारं आयुष्य आजच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात गेलं. बागेवाडीच्या एका सुसंपन्न ब्राह्मण घरात त्यांचा जन्म झाला. पण स्पृश्यास्पृश्यता, देवळात अस्पृश्यांना असलेली प्रवेशबंदी, धार्मिक अनुष्ठानांचा अतिरेक, वेगवेगळ्या देवतांसाठी वेगवेगळा पूजापाठ या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण होत होती. जेव्हा आई-वडिलांनी त्यांची मुंज करायचं ठरवलं तेव्हा फक्त माझीच मुंज का, बहिणीची का नाही? असा प्रश्न विचारत त्यांनी मुंज करून घेण्यास नकार दिला आणि घर सोडलं. कुडलसंगम इथं ईशान्यगुरूंकडं विविध दर्शनांचा, उपासना पद्धतींचा तौलनिक अभ्यास केला. मंगळवेढ्यातल्या राजाच्या पदरी मामा बलदेव हे मंत्री होते. मामांनी विद्यासाधना केलेला आपला भाचा जावई करून घ्यायचं ठरविलं. त्यांनी गुरूंकडून आज्ञा घेऊन बसवेश्वरांना मंगळवेढ्याला आणलं. तिथं बसवेश्वरांचा विवाह झाला आणि राजदरबारात ते करणिक म्हणून रुजू झाले. आपल्या कामानं राजावर प्रभाव टाकल्यानं आणि राजकीय परिस्थितीची गरज म्हणून तिथून बसवेश्वर कल्याणला महामंत्री म्हणून आले.
ज्ञानसत्ता आणि राजसत्ता यांची सांगड घालत बसवेश्वरांनी कल्याणमध्ये विविध सामाजिक प्रयोग केले. लोकशाहीचा आद्य प्रयोग म्हणवला जाणारा अनुभव मंटप, देव देवळात नाही तर आपल्या गळ्यातील इष्टलिंगात आहे, असं सांगणार्या लिंगायत सांप्रदायाची पायाभरणी, श्रमांना महत्त्व देणारी जीवनपद्धती, समतेची गाथा असलेल्या वचनसाहित्याची निर्मिती, विविध जातीपातीतील शरणांना दिलेलं नेतृत्त्व आणि जातीपातीच्या विरोधात रोटीबेटी व्यवहाराचा आग्रह, अशा अनेक प्रयोगांनी बसवेश्वरांचं कार्य हळूहळू क्रांतीचं स्वरूप घेऊ लागलं. पण हेच कार्य तत्कालिन व्यवस्थेला धक्का देणारं होतं. त्यामुळं या तथाकथित ‘धर्मबुडव्या’ क्रांतीला विरोध करण्यासाठी तिथल्या धर्ममार्तंडांनी राजव्यवस्थेला फूस लावत प्रतिक्रांती घडविली. बसवेश्वरांनी उभी केलेली लिंगायत सांप्रदायाची रचना रक्तरंजित हल्ले करत अक्षरश: उलथवून टाकली. याच दरम्यान बसवेश्वरांचा कुडलसंगम इथं मृत्यू झाला, असं सांगण्यात येतं.
हे बसवचरित्र समजून घेतल्यानंतर एक गोष्ट कळते, की तो एक तत्कालीन रुढीप्रिय, विषमतावादी व्यवस्थेविरुद्धचा एल्गार होता. बसवेश्वरांकडं ज्ञानदृष्टी होती आणि राजसत्ताही. त्यामुळं त्यांनी या व्यवस्थेला थेट आव्हान दिलं, संघर्ष केला. पण स्वतःला धर्माच्या रक्षणकर्त्या म्हणवणार्या तत्कालीन व्यवस्थेनं त्यांचं हे आव्हान यशस्वी होऊ दिलं नाही. तरीही आजसुद्धा बसवविचार संपला नाही. तो पुढील अनेक चळवळींना प्रेरणा देत राहिला. जगाच्या पाठीवर कोणत्याही काळातला धर्मसुधारणाचा आणि समाजसुधारणांचा इतिहास आपल्याला याच मार्गावरून जाताना दिसतो.
दिवस मावळायच्या आत आम्हाला कल्याणनगरीला म्हणजे आजच्या बसवकल्याणला पोचायचं होतं. बाराव्या शतकातली चालुक्यांची ही राजधानी. ती कळचुरी बिज्जलांच्या ताब्यात आल्यानंतर बसवेश्वर तिथं महामंत्री होते. भालकी ते बसवकल्याण हे तास-दीडतासाचं अंतर. आम्ही कल्याणात पोचलो तेच आम्हाला सांगण्यात आलं की, आधी किल्ला पाहून घ्या, नाहीतर तो बंद होईल. किल्ल्यात शिरलो. बाहेरची तटबंदी आणि काही इमारती वगळता पूर्णपणे उध्वस्त झालेला हा किल्ला. एकेकाळी राजधानीचं वैभव मिरवणार्या याच किल्ल्यात बसवेश्वर महामंत्री म्हणून काम पाहत होते. या किल्ल्यात नंतर अनेक राजवटी आल्या. त्याची साक्ष किल्ल्यात इतस्तः विखुरललेल्या मूर्ती, काही शिलालेख आणि सर्वात मुख्य म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तुसंग्रहालयातील वस्तू देत होत्या. वस्तुसंग्रहालय पाहताना एके ठिकाणी पाय थांबले. तिथं चक्क काचेच्या कपाटात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती होती. स्वतःला कानडा म्हणवणारा विठोबा किल्ला परिसरात सापडला होता. बसवेश्वरांच्या लिंगायत आणि ज्ञानोबा-नामदेवांच्या वारकरी सांप्रदायाचे धागे एकमेकांत गुंफलेले आहेत, याचं पहिलं दर्शन घडलं.
या किल्ल्यापासून थोड्या अंतरावर बसवेश्वरांचं मंदिर आहे. या मंदिरात बसवेश्वरांची मूर्ती असून, त्याची विधीवत पूजा वगैरे होते. पुजार्यांतर्फे तीर्थही दिलं जातं. या मंदिराच्या प्रवेश्वद्वारावर गणपतीसह शिवकुटुंब विराजमान झालेलं आहे. आम्ही पोचलो तेव्हा मंदिराच्या एका बाजूला एक महिला कन्नड भाषेत ग्रंथवाचन करत होती. मंदिरात फार गर्दी नव्हती. एक नवविवाहित दांपत्य बसवेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलं होतं. खरं तर बसवेश्वरांचं मंदिर हाच त्यांच्या विचारांचा विरोधाभास आहे. ज्या बसवेश्वरांनी आयुष्यभर दगडातील देव नाकारला, देव, देवपूजा, पुरोहितशाही यांचा विरोध केला, त्या बसवेश्वरांनाच देवत्व देऊन आज त्यांचं मंदिर उभं राहिलं आहे. त्यांचे चरणतीर्थ वाटणं म्हणजे त्यांच्याच विचारांवर ओतलेलं पाणी आहे.
एका वचनात बसवेश्वर म्हणतात, दगडापासून बनवलेल्या नागाला दूध पाजता. पण हा साप जिवंत दिसला तर त्याला मारण्यासाठी धावता. एखादा जंगम भुकेला-तहानलेला असेल, तर त्याला हाकलून देता. पण कधीही काहीही न खाणार्या निर्जीव दगडी मूर्तीपुढं पंचपंक्वान्न वाढता. ही कोणती सामाजिक प्रथा आहे, कुंडलसंगमदेवा!
दुर्दैव असं की, बसवेश्वरांच्या याच मंदिरात बसवेश्वरांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला एक दगडी सर्पमूर्ती पूजली जात होती. महापुरुषांची पूजा बांधून त्यांच्या विचारांचा पराभव कसा होतो, त्याचं मूर्तीमंत उदाहरण समोर दिसत होतं. तिथल्या पुजार्यांना मंदिराच्या इतिहासाबद्दल विचारलं तर ते म्हणाले, हे मंदिर ७०० वर्षांपूर्वीचं आहे. बाकी फार काही ते सांगू शकले नाहीत. मंदिराच्या बांधकामावरून आणि तिथल्या रचनेवरून तरी हे मंदिर फार जुनं असल्याचं वाटलं नाही. बसवकल्याण डेव्हलपमेंट बोर्डानं बसवेश्वरांसंदर्भातील अनेक वास्तूंचा जो जीर्णोद्धार केला, त्यात या स्मृतीमंदिराचा विकास झाल्याचं दिसत होतं.
संपूर्ण बसवकल्याण शहरात बसवेश्वरांच्या खाणाखुणा सांगणार्या अनेक वास्तू दाखविल्या जातात. यात ‘अरिविना मने’ म्हणजे खुद्द बसवेश्वरांनी ध्यानासाठी वापरलेली गुहा, वेगवेगळ्या शरणांनी तपस्येसाठी वापरलेल्या गुहा, वेगवेगळे विचार मांडण्यासाठी खुली मुभा असणारा अनुभव मंटप आणि नव्यानं बांधण्यात आलेला १०८ फूट उंच बसवेश्वरांचा पुतळा अशा अनेक गोष्टी आहेत. या सार्या स्थळांमुळं बसवकल्याण हे आज उत्तर कर्नाटकातलं महत्त्वाचं पर्यटनस्थळ बनलं आहे.
बसवेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरचा थोडा परिसर सोडला तर बाकी वातावरण एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शहराप्रमाणंच होतं. रस्त्याच्या एका बाजूला उघडा नाला वाहत होता. त्याच्या बाजूनं डुकरांचा अस्वच्छ कळप फिरत होता. त्या सार्यातून वाट काढत आम्ही अनुभव मंटपचा रस्ता विचारू लागलो. १०८ फूट बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोरच्या रस्त्यानं गेलात की अनुभव मंटप, असा पत्ता समजल्यानं आम्ही गाडी १०८ फुटी पुतळ्याकडं वळवली. मुख्य रस्त्याला लागलो की १०८ फुटी पुतळा कुठूनही दिसेल असा. त्या पुतळ्यासमोर अनुभव मंटपाची मोठी कमान. त्या रस्त्यानं आत जाऊ लागलो, तर कानडीमध्ये दुतर्फा लिहिलेल्या बसवेश्वर वचनांच्या पाट्या.
अनुभव मंटपापाशी पोचलो. एखाद्या शिवलिंगासारख्या आकाराची ही इमारत म्हणजे अनुभव मंटप. बसव कल्याणच्या माहितीपत्रकात या अनुभव मंटपाच्या इथं ‘न्यू’ असं लिहिलं आहे. याचाच अर्थ बसवेश्वरांच्या अनुभव मंटपाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा नवा अनुभव मंटप उभारण्यात आला आहे. बसवेश्वरांनी आपल्या सार्या वचनांमध्ये सांगितलं की, जग ज्या स्थावर शिवलिंगाची पूजा करतं त्याची पूजा करू नका. या स्थावरतेनं देवालयं माजतात. तिथं शोषण सुरू होतं. म्हणूनच बसवेश्वरांनी प्रत्येक लिंगायताला आपल्या गळ्यात घालण्यासाठी इष्टलिंग दिलं.
बसवेश्वर म्हणतात…
भव्य शिवालय बांधती सधन|
बांधू कैसे जाण, पामर मी||
पाय माझे खांब, देह देवालय|
सुवर्णकळस होय, मस्तक ते||
कुडलसंगमदेवा! नाशेल स्थावर्|
अविनाशी थोर, जंगम ते||
बसवेश्वरांच्या या विचारांचा प्रसार करणार्या अनुभव मंटपाचं बांधकामच स्थावर शिवलिंगाच्या आकारात करण्यासारखं दुसरं विडंबन तरी काय असावं?
या नव्या अनुभव मंटपाच्या दाराशीच भगव्या कपड्यातील एक महाराज मंत्रजप करत होते. समोर परिसरातील पोरसवदा मुलं कपाळाला आडवी विभूती लावून मांडी घालून त्या मंत्रांचा पुनरुच्चार करत होती. एखाद्या पाठशाळेत आल्यासारखं वाटावं असं दृश्य. त्याच्या शेजारी पर्यटकांना माहिती देणार्या पुस्तकांचं, वस्तूंचं दुकान. तिथं या जागेबद्दल विचारलं तर तो माणूस माझ्याकडं पाहतच बसला. भाषा ही इथली मोठी अडचण. मराठी, हिंदी, इंग्रजी इथं अनेकांना कळत नाही. बोलायचं फक्त कन्नडमधूनच. मला कन्नड येत नाही, म्हणून त्यानं काही हिंदी आणि मराठी पुस्तकं दाखवली. मी नको म्हणून आत जाऊ लागलो, तर तोडक्या मोडक्या हिंदीत तो म्हणाला, ‘ये नऊसो साल पुरानी भारतकी सबसे पहली संसद है…’
आतमध्ये एका मोठ्या वेदीवर बसवेश्वरांचा अर्धपुतळा ठेवला होता. सभोवती या अनुभव मंटपाचे पहिले अध्यक्ष असणार्या अल्लमप्रभूसह अनेक शरणांचे फोटो भिंतीवर लावले होते. बसवेश्वरांनी या अनुभव मंटपात किती जातीच्या आणि किती पंथांच्या लोकांना एकत्र आणले होते, त्याची साक्ष हे फोटो देत होते. त्यामध्ये हडपद अप्पण्णासारखा नाभिक होता, मेडर केंतय्यासारखा बुरुड होता, मादर चन्नय्यासारखा चर्मकार होता, मडिवाळ वाचय्यासारखा परीट होता, मोलिगे मारय्यासारखा लाकूडविक्या होता, किन्नरी बोमय्यासारखा सुवर्णकार होता, डस्क्क्या बोमय्यासारखा डोंब होता. असे नानाविध कामं करणारे लोक बसवेश्वराच्या अनुभव मंडपात शिवशरण होते. शिवाय अक्कमहादेवी, रायम्मा, आयदक्की लक्कम्मा, मुक्तायक्का, रेमव्वे, हिंगम्मा, सोमम्मा अशा अनेक शिवशरणीही होत्या. स्रीपुरुष समानतेची भाषा या अनुभव मंटपात बसवण्णांनी प्रत्यक्षात आणली होती.
एका वचनात बसवेश्वर म्हणतात…
शिवालय आणि महारवाड्याची|
भूमी ती एकचि दोहीसाठी||
आचमन शौच, दोन्हिशी ते जळ्|
एकचि निर्मळ दुजे नाही||
आपण आपण जाणिवेचि रीत|
षडदर्शन मुक्त समानाचि||
कूडलसंगमदेवा! जाणती जे तुज्|
सम ती सहज, भूमंडळी||
नऊ शतकांपूर्वीच्या त्या लोकशाहीच्या प्रयोगाला अभिवादन करून आम्ही सोलापूरकडं पुन्हा येऊ लागलो, तोपर्यंत सूर्य मावळतीला गेला होता. परतताना मघाशी कानडीत दिसणारे ते वचनसाहित्याचे फलक उलट्या बाजूनं हिंदीमध्ये लिहिले होते. त्यातील एका फलकावर बसवेश्वरांचं श्रमसंस्कृतीचा गौरव करणारं महावाक्य दिसलं… ‘कायकवे कैलास, दासोहवे देवधाम’. म्हणजेच आपलं काम हाच कैलास आणि दासोह हेच देवाचं निवासस्थान.
सोलापुरातून दुसर्या दिवशी बागेवाडी, मंगळवेढा आणि कुडलसंगम असा प्रवास करायचा होता. सुरुवात सोलापूरला सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन झाली. सिद्धेश्वर ही सोलापूरची ओळख. तळ्यातला महादेव म्हणून सिद्धेश्वराची ख्याती. पण हे शिवस्थान म्हणजे बसवेश्वरांच्या लिंगायत चळवळीतील अध्वर्यू आणि अनुभव मंटपचे तिसरे अध्यक्ष सिद्धरामेश्वरांचं समाधीस्थान आहे, या बद्दल फारशी जागरुकता नाही. सिद्धेश्वराचं देऊळ हे आज सोलापूरच्या अस्मितेचा भाग बनलंय. पण एकंदरीतच बसवेश्वरांच्या चळवळीविषयी या मंदिर परिसरात फारसं काही जाणवत नाही.
सिद्धरामेश्वरांनी ६८ हजार वचनं रचल्याचा उल्लेख त्यांच्याच एका वचनात आहे. पण आजघडीला त्यांची केवळ दोन हजार वचनं उपलब्ध आहेत. मल्लिकार्जुन हे त्यांचं आराध्यदैवत, तर कपिलसिध्द मल्लिकार्जुन हे त्यांचं अंकित नाम. सिध्देश्वरांच्या आज उपलब्ध असलेल्या चरित्रापैकी कन्नड महाकवी राघवांक यांनी लिहिलेलं ‘सिध्दरामचरित्र’ हा चरित्रग्रंथ आद्य मानला जातो. सिध्देश्वरांवर बसवादी शिवशरणांचा प्रभाव राहिला आहे. आपल्या वचनांतून सिध्देश्वरांनी महात्मा बसवेश्वरांचा अतिशय आदर आणि गौरवानं उल्लेख केल्याचं आढळून येतं. तसंच बसवादी शरणांची महती ऐकून ते कल्याणमंटपाला गेल्याचा उल्लेख अनेक वचनांत मिळतो.
सिद्धेश्वराची सुप्रसिद्ध यात्रा हा तर आता फक्त धार्मिक सोहळा राहिला नसून, ते सामाजिक ऐक्याचं प्रतीक बनलं आहे. या यात्रेत विविध जातीचे सात नंदीध्वज सहभागी होतात. यात्रेत बारा बलुतेदार, अठरापगड समाजघटकांना मान असतो. हलगी, संबळ, वाजंत्रीवाले यांच्यासह प्रत्येक समाजघटकाला यात्रेत मानाचा विडा आहे. त्यामुळं सिद्धेश्वराची यात्रा ही एका समाजापुरती न उरता सर्व सोलापूरची, किंबहुना महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकची यात्रा झाली आहे.
हे सारं खरं असलं, तरी सिद्धेश्वर ज्या बसव सांप्रदायाचे विचार सांगतात ते आणि आज मंदिरातील व्यवस्था पाहिली की त्यातील विरोधाभास जाणवल्याशिवाय राहत नाही. बसवेश्वरांनी ज्या पुरोहितशाहीचा आणि पूजापाठाचा विरोध केला त्याच व्यवस्थेकडून आज सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक, रुद्राभिषेक, अक्कीपूजा, महापूजा वगैरे करण्याचे दरपत्रक लावण्यात आली आहेत. दासोहाच्या हॉलबाहेर दासोह्यांची यादी लावली जाते. एवढंच नव्हे तर दासोहासाठी देणगी देणार्यांना आयकरात सूट मिळेल, असं सांगून आकर्षितही केलं जातं. एकंदरीत काय बसवेश्वरांच्या अनुभव मंटपाचे तिसरे अध्यक्ष असलेले सिद्धरामेश्वर विस्मरणात जाऊन, सोलापूरचं ग्रामदैवत असेलेलं शिवमंदिर अधिक लोकप्रिय ठरू लागलंय.
सिद्धरामेश्वरांचा निरोप घेऊन आम्ही मंगळवेढ्याच्या दिशेनं निघालो. मंगळवेढा हे बादशहाचं कोठार दुष्काळग्रस्त जनतेला खुलं करणार्या संत दामाजीपंताचं शहर. एवढंच नव्हे तर चोखामेळा, कान्होपात्रा आदींपासून स्वामी समर्थांपर्यंत अनेक संतांच्या वास्तव्यामुळं हे शहर संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. पण हेच मंगळवेढा बाराव्या शतकात चालुक्यांचे मांडलिक असणार्या कळचुरी बिज्जलांची राजधानी होती. याच राजधानीत बसवेश्वरांचे मामा त्यांना कूडलसंगम इथून घेऊन आले. इथंच बसवेश्वरांचा विवाह झाला. याच मंगळवेढ्यात करणिक या पदावर काम करताना बसवेश्वरांनी आपल्या सामाजिक प्रयोगांची सुरुवात केली. इथंच अनुभव मंटपाचा पहिला प्रयोग झाला होता, असंही काहींचं म्हणणं आहे.
या सार्याची साक्ष देणारा एक पडका किल्ला फक्त सध्या मंगळवेढ्यात आहे. त्याला चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्यात सध्या उपविभागीय दंडाधिकार्यांचं कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. अवशेषांवरून किल्ला पूर्वी मोठा असावा असं वाटलं. किल्ल्यात इतस्ततः विखुरलेल्या मूर्ती, काही शिलालेख आढळले आहेत. ती सर्व संपदा पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून, गावात अनेक ठिकाणी तत्कालीन वैभवाची साक्ष देणारे काही खांब आहेत. या असंबद्ध अशा भग्न अवशेषांखेरीज सध्या गावात बसवेश्वरांची स्मृती जागवणारं काहीही नाही, अशी माहिती स्थानिक अभ्यासक इंद्रजित घुले यांनी दिली.
बसवेश्वरांचं यथायोग्य स्मारक मंगळवेढ्यात असावं, अशी मागणी लिंगायत समाजातर्फे कित्येक वर्ष करण्यात येत आहे. पण अद्यापही आश्वासनं, निधीची घोषणा या पलिकडं काही झालेलं नाही. लातूर विमानतळाला बसवेश्वरांचं नाव द्यावं, श्री क्षेत्र कपिलधार इथं श्री मन्मथ स्वामींच्या स्मारकासाठी निधी मंजूर करावा, याही मागण्या लिंगायत समाजातर्फे करण्यात येत आहेत. एवढंच नव्हे तर, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आणि आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. कर्नाटकात झालेल्या आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या बसवेश्वरांच्या स्मारकांची भव्यदिव्यता पाहता लिंगायत समाजाचं राजकीय वजन कोणालाही दुर्लक्षिता येणार नाही.
ज्या गाडीनं हा सारा परिसर फिरत होतो, त्या गाडीचा चालक सोलापुरातील एक छोटा राजकीय कार्यकर्ता होता. शिवजंयती, नवरात्रोत्सव अशा अनेक मंडळांचा पदाधिकारी आणि मराठा मोर्चातील मोर्चेकरीही होता. शिवाजी महाराजांचा पोवाडा हा त्याच्या फोनचा रिंगटोन होता. तो सांगत होता, ‘दादा, मी मराठा आहे. गेले काही वर्ष बरंच राजकारण पाहिलंय. भाजपचा पदाधिकारीही होतो. तुम्हाला सांगतो बघा, सोलापुरात लिंगायत आणि मराठा यांच्यात फारसं जमत नाही. आता हेच पाहा ना, सोलापुरातील दोन आमदार भाजपचे आहेत. दोघेही देशमुख. पण एक मराठा आणि एक लिंगायत. प्रत्येकाचं गणित वेगळं.’
सोलापूर शहरातला लिंगायतांचा आकडा मोठा आहे. साधारणतः दीडेक लाखाच्या आसपास. त्यामुळं शहरात या वीरशैव लिंगायत समाजाचं वजन मोठं आहे. सिद्धेश्वर मंदिराचं विश्वस्त मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, महापालिका, जिल्हा परिषद अशा अनेक महत्त्वाच्या सत्तास्थानांमधील समीकरणं या समाजाभोवती फिरतात. ही झाली फक्त सोलापुरातली परिस्थिती. आज हा वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश-तेलंगण या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या सार्या पट्ट्याची राजकीय गणितं वीरशैव-लिंगायत, बसवेश्वरांची अस्मिता यांच्याशी जोडलेली दिसतात.
आता वीरशैव आणि लिंगायत यांच्यातही तात्त्विक मतभेद आहेत. स्वतःला लिंगायत म्हणवणारे बसवेश्वर विचारांचे अभ्यासक वीरशैव चळवळीला आपलं मानत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःला वीरशैव म्हणवणारे पूजापाठ, कर्मकांड, स्थावर लिंगाची पूजा, अनेक देवांची पूजा, मंदिर उभारणी अशा गोष्टींमध्ये अडकलेत. हे सारं बसवेश्वरांना अपेक्षित असलेल्या लिंगायत विचारांपासून दूर जाणारं आहे. दुसरं म्हणजे जंगमव्यवस्था. आज वीरशैवांमधील जंगम हा जन्मानं जंगम असतो. पण बसवेश्वरांच्या कल्पनेतलं जंगम हे जन्मजात नव्हे तर ज्ञानसंपादनानं मिळालेलं स्थान आहे. आज जातीनं जंगम होता येतं. ही तर वीरशैवांमधली पुरोहितशाहीच असल्याचं या लिंगायत अभ्यासकांचं म्हणणं आहे.
शरणांचे खून पाडल्यानंतर झालेल्या भीतीदायक वातावरणानंतर लिंगायत झालेले काही जण परत फिरले. ते पुन्हा शैव प्रथा पाळायला लागले. आज वीरशैव म्हणणार्या गुरू, शिवाचार्य, जगद्गगुरू आदी लोकांमुळं समाजाची गोची झालीय. या बाबा-बुवांच्या नादी लागून लोक बसवेश्वरांचा मूळ विचार विसरले आहेत. भागवतकथांप्रमाणे बसवकथा वाचून लाखो रुपयांची सुपारी घेतली जात आहे. एकीकडं हे बाबा-बुवा तर दुसरीकडं बसवेश्वरांच्या नावानं ब्रिगेड वगैरे स्थापून आपला राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर या अशा चळवळींचं पीक आलंय. बसवेश्वरांच्या घोड्यावर सगळ्यांनाच बसायचंय, पण त्यांचे विचार समजून घ्यायचे नाहीत, अशी परिस्थिती आहे. या सार्या विचारकलहात लिंगायत समाज पूर्णपणे गोंधळलाय, असं हे अभ्यासक वारंवार सांगतात.
हे सारं खरं असलं, तरी आज वीरशैव आणि लिंगायत हे शब्द समानार्थीच वापरले जातात. त्यातील बसवेश्वरांचा शुद्ध लिंगायत विचार हा वेगळा काढून दाखवता येत असला, तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र या दोन्ही विचारांची सरमिसळच झालेली दिसते. अनेक ग्रंथांमध्ये, परदेशी होणार्या अभ्यासांमध्ये हे दोन्ही शब्द एकत्रच वापरलेले आढळतात. शेवटी शुद्धतेचा आग्रह कितीही ठेवला, तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र विविध प्रकारच्या सरमिसळीलाच सामोरं जावे लागते, हे वास्तव इथंही स्पष्टपणं दिसतं. अर्थात याचबरोबर गेल्या नऊ शतकांमध्ये, इतर कोणत्याही विचारसमूहाप्रमाणंच, ही लिंगायत विचारधाराही मूळ स्वरूपापासून प्रचंड भरकटली, हेही तेवढंच स्पष्टपणानं दाखवता येतं.
आमचा पुढचा मुक्काम होता, तो कर्नाटकातील विजापूर तालुक्यातल्या बागेवाडीला. बागेवाडी हे बसवेश्वरांचं जन्मस्थान. १९६८मध्ये या बागेवाडीचा नामविस्तार बसवन बागेवाडी असा झाला. बागेवाडीतलं नंदीकेश्वरचे मंदिर हे या शहरातलं महत्त्वाचं स्थान. बसवेश्वरांच्या आईनं केलेल्या येथील नंदीच्या उपसानेमुळंच बसवेश्वरांचा जन्म झाला, अशी कहाणी सांगितली जाते. बसव म्हणजे कन्नडमध्ये बैल. शंकराचं वाहन असलेल्या या नंदीच्या नावावरूनच बसवेश्वरांचं नाव ठेवण्यात आलं. चालुक्यकालीन अप्रतिम कोरीव काम असलेल्या मंदिराचा आणि मंदिर परिसराचा आज पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आला आहे.
या मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावर बसवेश्वरांचं जन्मघर होतं, असं सांगतात. या घराच्या जागी आज बसवेश्वरांचं भव्य स्मारक बांधण्यात आलंय. अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या घुमटाची आठवण व्हावी अशी या बसवेश्वर स्मारकाची रचना आहे. स्मारकाच्या काही पायर्या वर चढून गेल्यावर मुख्य सभागृहात मध्यवर्ती ठिकाणी माता मादलंबिका, बाल बसवेश्वरांचं शिल्प आहे. सभोवती बसवेश्वरांच्या आयुष्यातील विविध घटना उठावशिल्पांच्या स्वरूपात मांडल्या आहेत. सभोवती प्रदक्षिणापथ आहे.
या दिमाखदार स्मारकाच्या आसपासचा परिसर मात्र एखाद्या जेमतेम ‘ब’ दर्जाच्या शहरासारखा आहे. काही बैठी घरं, किरकोळ दुकानं, रस्त्यावर लागलेले राजकीय बॅनर आणि नाक्यानाक्यावर उभी असलेली माणसं असं नेहमीचं दृश्य दिसत होतं. या सार्या वस्तीत बसवेश्वरांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एक विठ्ठल मंदिर दिसलं. वरून मार्बल लावलेल्या मंदिरात मुद्दामून डोकावून पाहिलं तेव्हा कळलं की, हे मंदिर दगडी बांधकाम असेलेलं जुनं मंदिर आहे. आतल्या दगडावर वरून फक्त दर्शनी भागातच मार्बल लावलेला आहे. मंदिराला प्रदक्षिणा घातल्यावर कळतं, की मागची बाजू अद्याप तशीच जुनी आहे. विठोबा-रखुमाईची मूर्तीही जुन्या पद्धतीची वाटली. सगळ्यात वेगळेपण म्हणजे, मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर शिवलिंग कोरलेलं होतं. हरिहर ऐक्याची गोष्ट सांगणार्या या मंदिराबद्दल कुतुहल चाळवलं आणि या मंदिराची माहिती काढण्यासाठी आजूबाजूला चौकशी करण्यास सुरुवात केली.
मंदिरासमोर असलेल्या एका झाडाच्या पारावर दोन आजोबा गप्पा मारत होते. डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात तुळशीमाळ घातलेल्या आजोबांना विचारले की, काका, मराठी येतं का? ते म्हणाले, कळतं की! लगेच पुढचा प्रश्न, आबा, हे मंदिर किती जुनं आहे? ते म्हणाले, फार जुनं आहे. लहानपणापासून पाहतोय. हे बसवेश्वरांचं स्मारक गेल्या काही वर्षात बांधलं. पण हा विठोबा फार जुना आहे. यासंदर्भांत अजून माहिती हवी असेल तर श्याम पवारांना भेटा.
गावात श्याम पवार यांचं घर शोधलं. लुंगी-बनियन घातलेल्या, तोंडात पान आणि गळ्यात तुळशीमाळ असलेल्या श्यामकाकांना ओळख करून दिली. ते या मंदिराचे प्रमुख होते. मंदिराचं दैनंदिन कामकाज ते पाहतात. कानडी ढंगाच्या मराठीत ते म्हणाले, मी दोन-तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालो. पण हे मंदिर माझ्या आजोबांच्या काळापासून आहे. त्याच्या आधीचं काही ठाऊक नाही. मंदिरासंदर्भात कोणतंही कागदपत्र आमच्याकडं नाही. आम्हीच थोडे पैसे जमवून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात मराठी-कानडी दोन्ही भाषिक लोक आहेत. पण मराठी शाळा नाही. त्यामुळं आम्ही सगळे कानडी माध्यमातच शिकलो. गावात शिवजयंतीही होते आणि बसवजयंतीही.
बसवेश्वरांच्या घराजवळ असलेलं हे मंदिर खूप काही सांगत होतं. ते बसव काळातलं असेल का? याबद्दल काहीच सांगता येणार नाही. पण या सार्या परिसरावर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव ठळकपणे दिसत होता. गावात अनेक जण माळकरी होते. गावातून पंढरपूरला नियमित जाणारी मंडळी आहेत. या सार्यावरून एवढं मात्र नक्की स्पष्ट होत होतं की, बसवेश्वरांच्या या जन्मगावात, नंदिकेश्वराची शिवपूजा आणि पंढरपूरच्या विठोबाची पूजा एकत्र नांदत होती. त्यातून या दोन्ही सांप्रदायांचा एकमेकांवर किती प्रभाव असेल याची कल्पना करता येते.
तेराव्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटात ज्ञानोबा-तुकोबांनी केलेल्या समतेच्या एल्गाराआधी शंभरेक वर्ष बसवेश्वरांची कल्याणक्रांती गाजली होती. आज महाराष्ट्र, कर्नाटक ही दोन स्वतंत्र राज्यं असली तरी बाराव्या किंवा तेराव्या शतकात हा सारा भूभाग एकाच राजवटीखाली होता. त्यामुळं परस्परांमध्ये रोटी-बेटीसह व्यापारही होत होता. बसवेश्वरांची क्रांती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून झालेली प्रतिक्रांती जिथं घडली ते कल्याण म्हणजे संत नामदेवांचं आजोळ. एवढंच नव्हे तर नामदेवांची एक सून या कल्याण नगरीमधली. त्यामुळं नामदेवांचं कल्याणात येणं-जाणं असणारच. नामदेवांचा काळ १२७० ते १३५०पर्यंतचा. तर बसवेश्वरांचा काळ हा ११०५ ते ११६७ मधला. त्यामुळं बसवेश्वरांच्या क्रांतीचं नक्की काय झालं याची कल्पना नक्कीच नामदेवांना असणार असं म्हणता येतं.
ज्ञानेश्वरांबद्दलही अशीच थोडी वेगळी मांडणी करता येते. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांच्या माध्यमातून जी आदिनाथ-मत्सेंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ अशी परंपरा सांगतात, ती थेट शैव असलेल्या नाथ परंपरेशी जुळते. ज्ञानोबांची आळंदी हे शिवपीठ असल्याचं आपल्याला आजही पाहता येतं. आळंदीच्या समाधी परिसरातच ज्ञानेश्वरपूर्वकालीन सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आई-वडिलांच्या अकाली वियोगानंतर ज्या भोजलिंगकाकांनी ज्ञानेश्वरादी चार भावंडांचा सांभाळ केला, ते लिंगायत होते. त्यामुळं ज्ञानेश्वरांवरांनाही बसवक्रांतीबद्दल चांगलीच माहिती असणार.
बसवेश्वरांनी समतेसाठी केलेलं बंड का फसलं, याचाही अभ्यास वारकरी सांप्रदायाच्या या धुरिणांनी निश्चितच केला असणार. तसंच बसवेश्वरांच्या क्रांतीचा निःपात करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेनं केलेल्या या रक्तरंजित प्रतिक्रांतींची भिती जनमानसातून संपण्याआधीच पंढरीच्या वाळवंटात पुन्हा एकदा वारकर्यांचे मृदंग वाजू लागले हे समजून घ्यायला हवं. पण पंढरपुरात भीमेकाठी जे घडलं त्याचा मार्ग वेगळा होता. हा मार्ग होता समन्वयाचा. विरोधाला विरोध न करता आपली रेषा मोठी करण्याचा त्यांचा हा मार्ग समतेचा होता. हा मार्ग स्वीकारताना संत ज्ञानेश्वर-नामदेव आदींनी बसवेश्वरांच्या क्रांतीनंतर सांडलेल्या रक्तपातातून धडा घेतला असं म्हणायला जागा उरते.
लिंगायत आणि वारकरी हे दोन वेगळे मार्ग असल्याचं वरकरणी दिसत असलं तरी त्यात अनेक साम्यस्थळं दाखवता येतात. एकीकडं बसवादी शरण नाना जातीच्या आणि नाना पंथांच्या मंडळींना घेऊन अनुभव मंटपाचा प्रयोग करतात, तर दुसरीकडं वारकरी संत चंद्रभागेच्या वाळवंटात विविध जाती-वर्णाच्या संतांचा खेळ मांडतात. बसवेश्वरांची क्रांती वेद, शास्त्र, आगम, पुराणावर प्रहार करत नवी उपासनापद्धत रुजवतात, तर ‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण| वेदांचे वचन नकळे आम्हा॥’, असं सांगत वारकरी संतही वेदांच्या पलिकडं जाण्याचा प्रयत्न करतात. एकीकडं बसवेश्वरांच्या या चळवळीत अक्क महादेवी, अक्कनागाईपासून संकव्वेसारखी गणिकाही आहे. त्याचप्रमाणं वारकरी चळवळीत मुक्ताबाई, जनाबाईंपासून कान्होपात्रांपर्यंतच्या महिलांचा हिरिरीनं सहभाग दिसतो. एकीकडं वचन साहित्य तर दुसरीकडं अभंग साहित्याद्वारे सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोचविण्याची तळमळ दिसते.
हे आणि असे आणखी अनेक अनुबंध या दोन्ही चळवळींमध्ये दाखवता येतात. गुरुपरंपरेपासून स्थानमहात्म्यापर्यंत आणि साहित्याच्या तौलनिक अभ्यासापासून परंपरेच्या आधुनिक प्रवाहापर्यंत अनेक पातळीवर लिंगायत आणि वारकरी चळवळीतील नातं दाखवता येतं. हे सारं आपोआप घडलेलं नाही. या संदर्भात कानडी-मराठी अनुबंधाचा अभ्यास करणारे ज्येष्ठ लेखक डॉ. अ. रा. तोरो यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. ते म्हणतात, ‘बसवेश्वरांची क्रांती असफल झाली असेल. पण त्यातल्या धगीनं पुढीलांना अधिक स्वच्छ दिशा दाखविल्या. बसवेश्वरांनी घडविलेल्या क्रांतीची ही धग पंढरपुरापर्यंत येऊन पोचली. म्हणूनच वारकर्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. बसवेश्वरांच्या शरण चळवळीच्या अपयशातूनच वारकरी चळवळ उगम पावली, असं म्हटलं तरी वावगं वाटू नये असं या दोन्ही विचारधारांमध्ये साम्य आहे. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बसवेश्वरांच्या खांद्यावर बसले असल्यानं त्यांना अधिक दूरचं दिसलं. त्यामुळं लिंगायत-वारकरी विचारांची दिंडी समतेच्या पंढरीला शतकानुशतके जातच राहिली.’
बसवेश्वरांच्या चळवळीशी वारकर्यांचं नातं जोडणारा आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे विसोबा खेचर. वारकरी विचारांचा देशभर प्रसार करणार्या संत नामदेवांना दिशा दाखविली ती लिंगायत संत विसोबा खेचरांनी.
दुर्दैवानं लिंगायत चळवळीतील अभ्यासक आज विसोबांना ‘आपलं’ म्हणताना दिसत नाहीत. कारण विसोबांनी त्यांच्या ‘शडूस्थळ’ ग्रंथात सांगितलेला ‘शिव’ त्यांना पसंत नाही. कदाचित विसोबांनी स्वीकारलेली वारकर्यांची समन्वयाची भूमिका त्यांच्या पचनी पडली नसावी.
उत्तराच्या दिशेनं नेणार्या अशा अनेक प्रश्नांचा विचार करत आमचा प्रवास बागेवाडीतून कुडलसंगमच्या दिशेनं होऊ लागला होता.
कुडलसंगम… महात्मा बसवेश्वरांनी जिथं विविध दर्शनांचा आणि सांप्रदायांचा अभ्यास केला ते स्थान म्हणजे कुडलसंगम. बागेवाडीतून परंपरागत विषमतावादी विचारधारेला पाठ दाखवून लिंगायत विचाराचा नवा मार्ग शोधणार्या बसवाचा महात्मा बसवेश्वर जिथं झाला ते स्थान म्हणजे कुडलसंगम. बसवेश्वरांनी आपल्या वचनांमध्ये सातत्यानं ज्या कुडलसंगम देवाचा उल्लेख केला आहे, त्या संगमेश्वर महादेवाचं स्थान म्हणजे कुडलसंगम. सर्वात शेवटी कल्याणात झालेल्या प्रतिक्रांतीनंतर परांगदा झालेल्या बसवेश्वरांनी जिथं अखेरचा श्वास घेतला ते स्थान म्हणजे कुडलसंगम.
कुडलसंगम हे आज फार मोठं पर्यटनस्थळ झालं आहे. भव्यदिव्य महाद्वारं, माहिती केंद्र, सभाभवन, दासोह भवन, वचनसाहित्य संशोधन केंद्र, शरण दर्शन संग्रहालय, आंतरराष्ट्रीय बसव सेंटर अश्या बसवेश्वरांना वाहिलेल्या अनेक भव्यदिव्य इमारती या परिसरात विकसित करण्यात आल्या आहेत. देशविदेशातील प्रवाशांना राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी यात्री निवास, उपहारगृह अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. हे सारं पाहून बसवेश्वरांचं कर्नाटकातील स्थान किती महत्त्वाचं आहे, याची खात्री पटते.
अत्यंत भव्यदिव्य आणि नितांतसुंदर कोरीव काम असलेल्या संगमेश्वर मंदिराचा हा परिसर कोणालाही आवडावा असा आहे. याच मंदिरासमोर दोन नद्यांच्या संगमावर बसवेश्वरांची समाधी बांधलेली आहे. इथंच बसवेश्वर आणि त्यांच्या उपास्य शिवाचं ऐक्य झालं म्हणून त्याला ‘ऐक्य मंटप’ असं म्हणतात. १९८२ला नारायणपूर धरण झाल्यानं बॅकवॉटरमुळे बसवेश्वरांची समाधी पाण्याखाली जाऊ लागली. त्यामुळं समाधी भोवती सुरक्षित भिंत उभारून समाधीस्थान जपण्यात आलं. त्यामुळं आज चक्राकार पायर्यांनी ३० फूट खोल उतरून बसवेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेता येता येतं. ज्या स्थावर लिंगपूजेला बसवेश्वरांनी विरोध केला, आज त्यांच्याच समाधीवर स्थावर शिवलिंगाची स्थापना केली आहे. हे सारं पाहून शेवटी ‘कालाय तत्स्मै नमः’ म्हणून तशाच चक्राकार पायर्यांनी पुन्हा वर आलो.
बसवेश्वर, लिंगायत चळवळ आणि वारकरी सांप्रदायाशी त्यांचं असलेलं नातं शोधण्यासाठी सुरू केलेला प्रवास आता आटपत आला होता…परतीच्या प्रवासाला निघायचं होतं… बसवण्णांनी आपल्या वचनावचनांमध्ये अजरामर केलेल्या कुडलसंगमदेवाचं आणि बसवण्णांच्या समाधीचं दर्शन घेऊन घाटावर बसलो होतो. घाटावर आडोशाला ठेवलेल्या, भग्न झालेल्या, विसर्जित केलेल्या अनेक मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यात दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला विठोबाही होता. शतकानुशतकांचा हा सारा खेळ पाहत. समोर समुद्राची आठवण यावी असा अथांग जलाशय. एकीकडं वारकरी चळवळीची साक्ष देत, मराठी मुलुखातून धावत येणारी भीमा-कृष्णा, तर दुसरीकडं बसवक्रांतीची कथा सांगणारी कानडी मलप्रभा… या दोघांचा संगम तो कुडलसंगम. या संगमावर या दोन्ही चळवळींचे प्रेरणास्रोत असलेले बसवेश्वर चिरनिद्रा घेत आहेत. त्यांचा पदस्पर्श करत भक्तीचा हा जलप्रवाह पुढंपुढं चालला होता… शतकानुशतकं तो तसाच वाहत राहणार आहे.
या प्रवाहातला पालापाचोळा जमेल तेवढा दूर करत राहायचा.., असा संकल्प केला आणि परतीच्या प्रवासासाठी ‘गुगल मॅप’ उघडला…
विसोबा टोपणनावातलेही विसोबांचा वारसा कलबुर्गी