गुरुकृपांकित तत्त्वज्ञ

ओमश्रीश दत्तोपासक

संत नामदेवांच्या साहित्याचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की, नामदेवराय जे जे तत्त्वज्ञान सांगतायत, ते त्यांच्या गुरूंचं विसोबा खेचरांचं आहे. अर्थात ते साहजिकही आहे. त्याच समतेच्या तत्त्वज्ञानानं पंजाबातील शीख धर्माचाही पाया घातला आहे.

मुमुक्षु अवस्थेतून साधकावस्थेत प्रवेश करणा-या प्रत्येक भक्ताला गुरुच्या अनुग्रहाची अत्यंत आवश्यकता असते. नामदेव चरित्रातील एक कथा आहे, एकत्र बसलेल्या संत मंडळींनी ठरवलं की, देवाचा लाडका असलेल्या नामदेवाचं मडकं कच्चं आहे.

मग नामदेवांना प्रत्यक्ष विठ्ठलानंच विसोबांची भेट घेण्यास सुचवलं. औंढ्याला विसोबांशी झालेल्या पहिल्या भेटीतच केवळ पंढरपुरातच नाही तर,

‘नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव|’

असा साक्षात्कार नामदेवांना झाला. त्या आत्मानंदाचं वर्णन नामदेव पुढीलप्रमाणे करतात –

सद्गुरुनायके कृपा मज केली|
निजवस्तु दविली माझी मज॥
माझे सुख मज दावि येले डोळा|
दिधली प्रेमकळा नाममुद्रा॥

नामदेवांच्या पारमार्थिक वाटचालीतील भावनात्मक अनुभव, प्रत्यक्ष ईश्‍वराचा साक्षात्कार आणि साक्षात्कारानंतरच्या सुजाण अवस्थेतून जगाकडे डोळसपणे पाहताना येणारे अनुभव असं त्यांच्या अभंगाचं स्थूल मानानं वर्गीकरण करता येईल. नामदेवांच्या गाथेतील तात्त्विक अभंग एकत्र करून त्यातील विचार संकलित केल्यास नामदेवांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आणि गुरुपदेशानंतर त्यांची वैचारिक परंपरा यासंबंधी काही निष्कर्ष काढता येतात.

या विशाल विश्वात आत्म्याहून भिन्न अशी एकही वस्तू नाही. या जगात एकच अखंड सत्ता विद्यमान आहे आणि ती म्हणजे आत्मसत्ता होय. तिला जो जाणतो तोच खरा तत्त्वज्ञानी. नामदेव गाथेत अशा आशयाची अनेक वचनं आलेली आहेत.

आत्मत्त्वाच्या योगे पाहू जाता|
नाही निरंतर भिन्न देवता॥
हेचि सार ब्रह्ममय खरे|
आणिक दुसरे न दिसे आम्हां॥
नारायण पूर्ण सर्वभूतां ठायी|
अभाग्यासी नाही तिही लोकी॥
विश्‍वी विश्‍वंभर कोंदलासे एक|
भेदाचे कौतुक कैसे सांगा॥
ब्रह्मी नाही भाव एकपणाचाही|
तेथे दुजे काही सामावते॥
सभरभरित विठ्ठल मागे पुढे|
जिकडे जाती तिकडे विठ्ठलचि॥

नामदेवांचा पिंड हा भक्ताचा होता. पांडुरंगाच्या प्रेमाची ओढ हृदयात घेऊनच ते जन्माला आले होते. तत्त्वज्ञान मांडताना त्यांनी नुसतं ब्रह्म म्हणावयाच्या ऐवजी आपल्या पांडुरंगालाच ब्रह्म ही संज्ञा बहाल करून टाकली. म्हणूनच कधी कधी हरी पांडुरंग, विठ्ठल असे शब्द ‘ब्रह्म’ या संकल्पनेला पर्यायी म्हणून योजले आहेत. आपण जसं आपल्या वडिलांना नुसतं वडील न म्हणता दादा, बाबा वगैरे म्हणतो अगदी तोच भाव यात आहे. यातच भक्तीची गोडी सामावलेली आहे. सर्व भूतांत विठ्ठलच भरून राहिला आहे, अशी आपली दृष्टी झाली पाहिजे. आपल्या भक्तीला तत्त्वज्ञानाची ‘बैसका’ मिळायला हवी. या भावनेतूनच नामदेव विठ्ठलाजवळ मागणं मागतात –

माझे व्रत एक चालवी विठ्ठला|
सकळा घटी तुला देखे॥

एरवी विठ्ठलावाचून क्षणभरही बाजूला न होणार्‍या नामदेवांची ही अवस्था त्यांना विसोबांनी गुरुपदेश केल्यानंतरची आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. मुळात विठ्ठलाचे पाय न सोडणार्‍या आणि पंढरपुरातच रमलेल्या समतेच्या या प्रभावी प्रचारकाला देशाटनाला पाठवलं पाहिजे असं सर्व संतांच्या मनात जेव्हा आलं असेल तेव्हा त्यांनी नामदेवाचं डोकं बदलण्यासाठी विसोबा खेचरांची गुरू म्हणून निवड केली असावी. ही निवड किती सार्थ ठरली हे काळानं अनुभवलंच आहे.

निर्विकल्प, निरुपाधिक आणि निर्विकार अशा आत्मसत्तेचं नाव ब्रह्म असं आहे. ब्रह्म हेच परमार्थत: सत्य आहे. तसंच ते ज्ञानस्वरूप असून अनंतही आहे.

नामदेव म्हणतात-

सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण
नाही रूप गुण गुणातीत॥
नाद ना भेद ना छंदे निरंतर|
दोहीच्या विचारे ब्रह्म नांदे॥
नामा म्हणे केले चैतन्य जवळ|
मांडियेला खेळ संती येथे॥

उपनिषदांनी सगुण-निर्गुण अशा दोन्ही घटकांचं प्रतिपादन केलं आहे.

कार्य हे उत्पन्न होण्यापूर्वी कारणात विद्यमान असतं. कार्य ही कारणाहून भिन्न अशी वस्तू नाही. मातीची बनविलेली गाडगी, मडकी इत्यादी पदार्थ हे सगळे मातीच आहेत. सोन्याची बनवलेली अंगठी, कंकण इत्यादी अलंकार वस्तुत: सोनंच आहेत. याचा अर्थ असा की कारणामध्ये कार्य हे अव्यक्त रूपानं पहिल्यापासूनच विद्यमान असतं. कुंभार, सोनार या निमित्त कारणांच्या द्वारे तेच अव्यक्त रूप व्यक्त केलं जातं. एखादा आकार किंवा गुण याला मूलद्रव्याहून पृथक मानणं हे व्युक्तिसंगत नाही. आकाराला किंवा गुणाला द्रवोहून भिन्न अशी सत्ता नाही. कुंभारानं आपल्या कल्पनेनं घडे, गाडगं बनवलं. त्यांना भिन्न भिन्न नावं दिली, तरी त्यांची नामरूपं मिथ्या आहेत. त्यातील वास्तवद्रव्य माती हेच एकमेव खरं आहे.

हाच आशय नामदेव सुवर्ण-अलंकार, जळजळगार, बीज-वृक्ष या दृष्टांतांनी आपल्यापुढं मांडतात.

नग जे ते सोने लेण्याजोगे होते|
मुदी कंकण ते नामे त्यांची|
मुशीमाजी जेव्हां गेले ते मुरोन|
जालासे सुवर्ण अभिन्न ते॥
निर्गुण सगुण नाही ज्या आकार्|
होऊनि साकार तोचि ठेला||
पांडुरंगी अंगे सर्व जालें जग|
बीजाचिया पोटी वटाचा विस्तारू|
सर्व तो आकारू तुझा चि असे ॥

नामदेवांचा ईश्‍वर हा पंढरपूरचा सावळा पांडुरंग श्री विठ्ठल आहे. हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तप्रेमाला लाचावून वाळवंटात पुंडलिकापुढं विटेवर उभा राहिला. अशा अर्थाची कित्येक वचने नामदेव गाथेत सापडतील.

नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ|
ब्रह्म हे केवळ विटेवरी॥

नामदेवांच्या लेखी

निर्गुणीचे वैभव आले भक्तिमिषे|
ते हे विठ्ठलवेषे ठसविले॥

ही ईश्‍वर संकल्पना आहे. नामदेव गाथेत एक हृद्य प्रसंग आहे. नामदेवांची दृष्टी व्यापक करण्यासाठी स्वत: पांडुरंग नामदेवाला समजावून सांगतात की, नामदेवा तू माझ्यासाठी व्याकुळ होऊ नकोस. मी तर विश्वव्यापक आहेच पण तुझं स्वरूपसुद्धा माझ्यापेक्षा निराळं नाही. नामदेवाला ‘स्वरूपाची ओळख’ करून देताना पांडुरंग म्हणतात,

मज घेऊनिया बैसलासि किती|
पाहे सहज स्थिती आपुले सुख॥
काही तू नव्हेसी विचारी मानसी|
चैतन्य आहेसि शुद्धबुद्ध॥

साक्षात ईश्‍वरच जीवाला त्याच्या स्वरूपाची ओळख करून देतो आहे. असं अन्य उदाहरण कोठे सापडेल?

अर्थात अशा पद्धतीनं नामदेवांचे डोळे उघडण्याचे काम त्यांचे गुरू म्हणून संत विसोबा खेचर यांनी केलेलं आहे, हे नक्की. विसोबा खेचर यांच्या गुरुकृपेमुळं नामदेवांचा आध्यात्मिक विकास याच दिशेने होत गेला. म्हणूनच आर्त भक्तीपासून प्रारंभ करून नामदेव शेवटच्या टप्प्याला तत्त्वज्ञानी भक्ताच्या भूमिकेवर आरूढ झालेले दिसतात.

0 Shares
सकळाशी येथे आहे अधिकार सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज