एवढ्यात कधी आळंदीला गेलात तर ‘पवित्र अलंकापुरी आता पूर्वीची उरली नाही’, असं म्हणाल. देवाच्या आळंदीत सनातनी विचारांचे चोर घुसलेत. पण एक नक्की, इथं ‘ज्ञानोबा-तुकारामाचा’ गजर जोपर्यंत घुमत राहील, तोपर्यंत माऊलींचं प्रेमसाम्राज्य संजीवन राहील.
आळंदीत जाऊन थेट ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरासमोर उभा राहिलो. क्षणभर डोळे मिटले तर केवढा कल्लोळ मनामध्ये. माऊली मूळचे आळंदीचे नव्हेच. हे त्यांचं आजोळ. मूळ गावापेक्षा आजोळ मायेनं सांभाळतं, हे या भावंडांनी अनुभवलं. आई-वडिलांचं छत्र हरपल्यावर हेच आजोळ या अश्राप लेकरांना खायला उठलं. या संन्याशाच्या मुलांची कुणी अंगावर सावली पाडून घेईना. पैठणच्या धर्मसभेनं त्यांना शुद्ध करून घेतलं नाही, मग सामान्य आळंदीकर त्यांना कसं स्वीकारणार? सगळे छळायला टपलेले. त्यातही एक व्हिलन होता. विसोबा त्याचं नाव. तोही काही मूळचा आळंदीचा नव्हे. कोणी म्हणतं तो औंढ्याचा, कोणी म्हणतं बार्शीचा, तर कोणी सांगतं पैठणजवळच्या मुंगीचा. ते काहीही असो पण त्यांनं आळंदीत चाटी अर्थात कपड्याचा व्यापारी म्हणून चांगलंच बस्तान बसवलं होतं. ज्ञानदेव आणि भावंडं जिथं जात तिथं हा मागोमाग जाई आणि या संन्याशाच्या मुलांना भिक्षा देऊ नका, असं सांगे. वैतागले एकदा ज्ञानदेव. रागावले, रुसले आळंदीकरांवर. झोपडीची ताटी लावून फुगून बसले आतमध्ये. मग लहानगी मुक्ताई सरसावली. अनुभवाच्या चटक्यांनी शहाणपण आलं होतं. असं करू नका ज्ञानदेवा. असे लोक असतातच. कोणत्याही काळात. कोणत्याही गावात. त्यांना माफ करा. आपल्यासारखी किती पोरकी मुलं असतात, गावोगावी. हे लोक कसेही वागले, तरी आपण प्रेमानं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांच्या डोक्यातली द्वेषबुद्धी घालवायला पाहिजे. तरच तुम्ही संत व्हाल. ज्ञानदेवांनी या चिमुकलीचं म्हणणं ऐकलं त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. वाईट माणसातललं वाईटपण जाऊदे, त्यांच्या हातून चांगली कामं होऊदे असं जगाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं. त्यानंतर ते विश्वाची माऊली झाले. माऊलींना हात जोडले आणि बाहेर आलो.
परिसर न्याहाळत असताना मनात आलं, हाच परिसर, हेच गाव, ज्यांनी माऊलींना छळलं असणार. मांडे भाजायला खापरही मिळू न देणारा तो विसोबा खेचर. ज्ञानदेवांनी योगसामर्थ्यानं पाठ तापवली आणि मुक्ताईला मांडं भाजायला सांगितलं. ते चोरून बघणार्या विसोबानं मग या भावंडांपुढं लोळण घेतली. माऊली त्याला म्हणाले, आता दूर हो खेचरा तेव्हापासून त्यांचं आडनाव पडलं खेचर. अशी गोष्ट. खरी की, खोटी माहिती नाही. एक मात्र खरं ज्ञानदेवांनी त्यांचं डोकं बदललं असणार. त्याच्या डोक्यातली द्वेषबुद्धी घालविली असणार. ती खासियतच आहे, या वारकर्यांची. तुमच्या पायाशी वाकतील, अन् हृदयात घुसतील.
चालत चालत गोपाळपुर्यात पोचलो. मन कृतज्ञतेनं भरून आलं. गावाबाहेरची हीच वस्ती जिनं ज्ञानदेव आणि भावंडांना राहायला जागा करून दिली. सारी आळंदी या मुलांना अस्पृश्याची वागणूक देत होती, त्यावेळी या वेशीबाहेरच्या लोकांनी या पोरांचा सांभाळ केला. आजही इथं बहुजनांची वस्ती आहे. तेव्हाही तसंच असणार. म्हटलं बहुजनांचे ज्ञानदेव या गोपाळपुर्यानंच आपल्याला दिलेत. थँक यू गोपाळपुर्या! तुस्सी ग्रेट हो!!
फिरून सगळा परिसर बघत होतो. इथंच कुठंतरी ज्ञानदेव भावंडांची झोपडी असेल. मधल्या काळात ज्ञानदेवांच्या समाधीलाच उपेक्षा सहन करावी लागली होती. तिथं त्या बहिष्कृतांच्या झोपडीची जागा कोण लक्षात ठेवणार? आळंदीचे अभ्यासक, इतिहासाचे विद्यार्थी संदीप तापकीर यांच्याकडून आळंदी समजून घेत होतो. ज्ञानदेवांचा काळ (१२७५-१२९६) तेराव्या शतकातला. तेव्हाची आळंदी कशी असेल? आज २०१७ सालात आळंदीत फिरताना तेव्हाच्या आळंदीतल्या गावगाड्याची फक्त कल्पनाच करता येईल. कारण स्मार्ट सिटीकडं वेगानं निघालेल्या पुणे आणि पिंपरीतील सिमेंटच्या जंगलानं आळंदीला जवळपास गिळंकृत केलंय. आळंदीतील गोपाळपुर्यात ज्ञानदेवांना जातवास्तव उमगलं. अज्ञानाच्या खाईत पिढ्यानपिढ्या राबणारी माणसं त्यांनी बघितली. त्यामुळंच तर त्यांनी जाणीवपूर्वक संस्कृत या उच्चवर्णीयांच्या भाषेकडं पाठ फिरवून लोकभाषा, बहुजनभाषा असलेल्या प्राकृतात ज्ञानेश्वरी लिहिली. मराठी मुलुखातलं ते पहिलं सांस्कृतिक बंड म्हणायला पाहिजे. त्या काळातल्या व्यवस्थेविरुद्धचा तो मोठाच विद्रोह होता!
ज्ञानदेवांची थोरवी मनात घोळवता घोळवता किसन महाराज साखरेमहाराजांचा मठ समोर आला. साखरेमहाराज आणि जोगमहाराज ही आळंदीतली प्रतिष्ठीत नावं. त्यांच्या हातात वारकरी सांप्रदायाचा कारभार. ज्ञानाच्या चाव्याच म्हणा ना! जोगमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१७मध्ये आळंदीत वारकरी शिक्षणसंस्था सुरू केली. या संस्थेतून आजपर्यंत हजारो कीर्तनकार, प्रवचनकार महाराष्ट्राला मिळाले. नुकताच राज्य सरकारचा ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार मिळालेले मारुतीमहाराज कुर्लेकर हे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांना संस्थेतले शिक्षक, विद्यार्थी ‘मोठेबाबा’ म्हणून हाक मारतात. यापूर्वी विठ्ठलबुवा चौधरी मोठेबाबा होते. अर्थात या संस्थांमधल्या अभ्यासक्रमामध्ये संत तुकोबांरायांची गाथा वगैरे शिकविली जात नाही. इथून वेदांती प्रभाव घेऊन बाहेर पडणारे कीर्तनकार कीर्तन, भजनात महिलांना टाळ घेऊन उभं राहू देत नाहीत. भजन करू देत नाहीत, असं प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराजांनी सांगितलं. आळंदीतल्या मंडळींना मी विचारलं, मग ज्ञानदेवांनी मुक्ताईला, नामदेवांनी जनाबाईला, चोखामेळ्यानं सोयराबाईला का म्हणून सोबत घेतलं असेल, मानाचं स्थान दिलं असेल? त्याचं उत्तर कोणाकडं नव्हतं. संतांच्या शिकवणुकीलाच हरताळ फासण्याचा हा प्रकार. असो. पण असं असलं तरी आजही अनेक महिला कीर्तनकार महिला संतांचा वारसा पुढे चालवत आहेत.
सोन्नर महाराज वारकर्यांच्या विश्वव्यापी धर्माबद्दल बोलत होते तेव्हा संत सोयराबाईंचा ‘अवघा रंग एक जाला’ हा किशोरीताई आमोणकरांच्या आवाजातला अभंग कानात घुमत होता. अवघा रंग एक व्हावा, अवघी मानवजात एक व्हावी, हाच तर ज्ञानदेवांचा ध्यास. तोच ज्ञानेश्वरीचा अट्टाहास. पण त्या ध्यासाला सुरूंग लावणारे हात फक्त तेव्हाच होते, असं नव्हे. आजही ते हात एकात्मतेला नख लावण्यासाठी शिवशिवताहेतच. ज्ञानदेवांनी संस्कृत भाषा नाकारली पण वारकरी शिक्षण देणार्या संस्थांमध्ये संस्कृतचा भडिमार आजही थांबत नाही. कीर्तनकार व्हायला आलेली मुलं बहुजनांची. पण, त्यांना शिकवण मात्र संस्कृतची. व्वा! काय डोकं आहे ना! कटू वाटेल पण, आळंदीत हे सुरू आहे. शिक्षण संस्था, धर्मशाळा, मठ, पुजारी, विश्वस्त मंडळ अशा सगळीकडं तो झगडा जिवंत आहे. आजही. आळंदीकरांनी संत एकनाथांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. हा महात्मा पैठणहून आळंदीत आला. माऊलींची अडगळीत, झाडझाडोर्यात गडप झालेली समाधी त्यांनी शोधली. ज्ञानेश्वरीचं शुद्ध रूप जगापुढं आणलं. पुढं शिवकाळात आळंदीचं महत्त्व वाढलं. एकनाथांसारखंच संत तुकाराम महाराजांनी माऊलीचं महत्त्व ओळखलं. त्यांनी समाधी मंदिराची डागडुजी केली. त्यांच्या मुलानं तुकाराममहाराजांसोबतच ज्ञानोबामाऊलींचीही पालखी सुरू केली. एकनाथ, तुकाराम हे दोघेही बामणी, वेदांती विचारांचे विरोधक. काशीचं पाणी गाढवाला पाजून महत्त्व कशाला द्यायला हवं, हे सांगणारे नाथबाबा आणि वेद नाकारणारे तुकोबाराय थोरच. सनातन्यांनी विझवत आणलेल्या माऊलींच्या विद्रोही विचारांच्या ठिणगीला पुन्हा फुंकर घालून, तिच्यावरची राख झटकून एकनाथमहाराज, तुकोबारायांनी केवढे उपकार केलेत आपल्यावर! पण विद्रोहाचे मारेकरी किती चलाख बघा. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात ते आत्ता आत्तापर्यंत संत तुकोबांची आरती म्हणू देत नसत. ज्ञानोबा-तुकोबांचं नातं तोडून टाकण्याचा केवढा हा क्रूर डाव!
आळंदीचा नाथ संप्रदायाशी जवळचा संबंध. मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ-ज्ञानदेव अशी नाथसंप्रदायाची थेट परंपरा खुद्द माऊलींनीच सांगितलीय. गोरक्षनाथांचा विचार करताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आठवले. विश्वबंधुतेचा संदेश देणारे नाथपंथाचे पाईक ज्ञानोबामाऊली कुठं आणि डोकी भडकाऊ विखारी भाषणं करत गोरक्षनाथांचा वारसा सांगणारे योगी आदित्यनाथ कुठं? विचारधारांना मोडून कसं खावं, हे या मंडळींकडून शिकावं. आदित्यनाथांनीही एकदा आळंदीत येऊन माऊलींचं दर्शन घ्यायला हवं. वारकर्यांची समतेची, सहिष्णू परंपरा समजून घ्यायला हवी, असा भाबडा विचार मनात आला. बोलता-चालता पुन्हा माऊलींच्या मंदिरात आलो. तर समोर भोजलिंगकाकांची समाधी. अख्ख्या आळंदीनं ज्ञानदेवादी लेकरांना वाळीत टाकलं होतं, तेव्हा भोजलिंग काकांनी त्यांना सांभाळलं. हे भोजलिंगकाका लिंगायत परंपरेतले. होय, म्हणजे आपल्या विसोबा खेचरांचे जातभाई. आळंदी परिसरात महानुभवांचेही खूप मठ आहेत म्हणे. म्हणजे अजबच आहे ही आळंदी. महासमन्वयी गाव म्हणायचं. हे गाव पंढरपुरापेक्षाही जुनं असावं, असं संत नामदेव म्हणतात. इथं फक्त विविध विचार-मतांचांच समन्वय आहे, असं नव्हे. तर जात समन्वयही घडलाय. त्यात संत गाडगेबाबांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रात जेवढ्या जाती असतील त्या सर्वांच्या धर्मशाळा आळंदीत आहेत.
संदीप तापकीर सांगत होते की, जातनिहाय धर्मशाळांचा आळंदीतला आकडा आहे सुमारे ८००. इथं डॉ. आंबेडकर धर्मशाळा आहे. या धर्मशाळांच्या माध्यमातून गाडगेबाबांना जातीभेदाची घाण साफ करायची होती. विविध जातीजमातींना त्यांचा सन्मान मिळवून द्यायचा होता. महात्मा जोतिराव फुले यांनाही सत्यशोधक समजाच्या विस्तारात या धर्मशाळांवाल्या मंडळींनी साहाय्य केलं होतं म्हणे. सध्याच्या काळात आषाढी-कार्तिकीच्या व्यतिरिक्त या धर्मशाळांमध्ये लग्नं लावली जातात. फार कमी खर्चात. लग्नाचं रितसर नोंदणी प्रमाणपत्र मिळतं. त्यामुळं घरातून पळून आलेल्या जोडप्यांना या धर्मशाळांचा मोठाच आधार असतो.
आळंदीत हिंडताना वेदांती, बामणी परंपरेच्या खुणा जागोजागी दिसतात. अलीकडच्या काळात पुण्यात एमआयटी ही संस्था चालवणार्या विश्वनाथ कराड यांनी ‘देहू-आळंदी परिसर विकासा’चा मोठा गाजावाजा केला. घाटाच्या कामासोबतच इंद्रायणीच्या पात्रात ७० फूट उंचीचा ध्वज उभारला. हा ध्वज म्हणजे वेदांती परंपरा ठळक करण्याचा प्रकार. अशा ध्वजाची परंपरा कुंभमेळ्यात असते. वारकरी परंपरेत नाही. यासाठी कराडांना साखरे महाराजांचं मार्गदर्शन होतं म्हणे. आळंदीतल्या काही सुजान माऊलीप्रेमींनी या प्रकाराला विरोधही केला होता. पण स्तंभ उभा राहिलाच. पेशवे काळात आळंदीत बामणी मताचा बडेजाव खूप झाला. इथल्या मंदिरांचे जिर्णोद्धार झाले. वेदांती मतांव्यतिरिक्त इतर मतांना डावलण्याचा खेळ झाला. पण इंद्रायणीच्या पाण्यातून जणू बंडच वाहतं. १३व्या शतकात माऊलींनी आणि सोळाव्या शतकात तुकोबारायांनी इंद्रायणी काठी आळंदी-देहूत बंडाचे झेंडे उभारले. त्याच इंद्रायणीचं पाणी वारकर्यांच्या पोटात आहे आणि धमन्यांमधून माऊली-तुकोबारायांच्या विचारांचं रक्त वाहतंय. त्याची चुणूक यंदा वारीच्या वाटेवर दिसली. ती चुणूक माऊलींच्या पालखीचे चोपदार राजाभाऊ चोपदारांनी दाखविली. सांगलीच्या मनोहर भिडे ग्रुपनं दिंडीत तलवारी घेऊन पोरं घुसवली. आम्ही धारकरी आहोत म्हणाले. राजाभाऊंनी त्यांना रोखलं. त्यांचं वारकर्यांमध्ये हिंसक विचार पसरवण्याचं कपट उघडं पाडलं. राजाभाऊ म्हणतात, ‘दिंडी हा संतविचारांचा उत्सव. संवाद, समन्वय, सहिष्णुता, मानवता यांचा संगम. त्याला गालबोट लावणं म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांना बट्टा लावणं. शस्त्राची जागा दिंडीत नाही. दिंडीला भूषण विचारांचं. तिथं शस्त्राचं काम नव्हे. भिडे कंपनी म्हणते की, दिंडीचं राखण छत्रपती संभाजी महाराज करायचे तसे आम्ही करू. मी म्हणतो, आज दिंडीची राखण करण्याची जबाबदारी पोलिसांची, सरकारची. तथाकथित धारकर्याचं ते काम नव्हे. ज्याचं काम त्याला करू दे. त्यांचा छुपा अजेंडा आम्ही चालवू देणार नाही. हिंसावादी विचारांना संतविचारात जागा नाही.’ वारीत तलवारी नकोत.
मनात आलं या सगळ्या भोंदूगिरीविरोधात बंड करायला माऊली, नाथबाबांनी पुन्हा जन्म घ्यायला हवा. नंतर वाटलं कशाला, राजाभाऊंसारखे माऊलींचे सेवक आहेत. सर्व संतांचे विचार रोज जगणारे वारकरी आहेत. ते असल्या-तसल्या काव्यांना फसणारे नव्हेत. दरवर्षी आषाढीला माऊलींचा प्रेमाचा संदेश ते पेरत राहतील. त्यातून सर्वत्र बंधुभावाचं पीक फोफावतच जाईल.
विसोबांची समाधी आळंदीत?
आळंदीत विसोबा खेचर भेटतात ते केवळ कथांमधून. त्यांच्या प्रत्यक्ष पाऊलखुणा दिसत नाहीत. त्यांचं औंढ्याला मंदिर तर, बार्शीला समाधी आहे. तथापि विसोबांनी आळंदीत समाधी घेतली, असा तपशील नोंदवणारा एक अभंग ज. र. आजगावकर यांनी महाराष्ट्र कवी चरित्रमालेच्या आठव्या खंडात उधृत केलाय.
विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव|
अप्सरा गंधर्व नाचताती॥
अलंकापुर क्षेत्र इंद्रायणीती|
मनी ज्ञानेश्वर आठविला॥
सौम्य संवत्सर बाराशे एकतीस|
शुद्ध श्रावणमास एकादशी॥
निर्गुण निराकार स्वरुपीं मिळाला|
खेचर बैसला समाधिसी॥
विसोबा खेचरांनी शके १२३१ या वर्षी श्रावण शुध्द एकादशीच्या दिवशी इंद्रायणी काठी समाधी घेतली, असं या अभंगात म्हटलं आहे. असं असेल तर संशोधकांनी या समाधीचाही शोध घ्यायला हवा.
एक बाकी खरं, तर विसोबा खलपुरुष असतील तर ज्ञानदेवांनी नक्की त्यांचं मनपरिवर्तन केलं असणार. कारण असं दुष्कृत्य करणार्या माणसाचं मनपरिवर्तन केल्याच्या अनेक गोष्टी महापुरुषांच्या चरित्रात आहेत. वाल्या कोळी, गौतम बुद्धांपासून ते अगदी महात्मा जोतिबा फुलेंपर्यंत. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर एकशेआठ वेळा थुंकणार्या माणसाची समाधी एकनाथांनी त्यांच्या घराशेजारीच बांधली. त्याच न्यायानं विसोबांचीही समाधी माऊलींच्या समाधीमंदिराच्या आसपास असावी, असाही एक तर्क आहे.
पुरोगामी प्रतिमा महायोगिनी