मुंगीची गुंगी

शर्मिष्ठा भोसले

पैठणच्या जवळचं मुंगी नावाचं गाव ‘संतविजय’ या ग्रंथातील उल्लेखामुळे विसोबांशी जोडलं गेलंय. पण त्या गावात विसोबांचं काहीच सापडत नाही

विसोबा खेचर यांच्याविषयी जे काही थोडंफार लिखाण झालंय, त्या प्रत्येक ठिकाणी ते पैठणजवळच्या मुंगी गावचे असल्याचा उल्लेख येतो. मुळात तो संदर्भ आहे दासो दिगंबरांच्या ‘संतविजय’ ग्रंथातला. दासो दिगंबर नावाचे एक मोठे कवी दत्त संप्रदायात होऊन गेले. ते संत एकनाथांचे समकालीन होते. आंबेजोगाईचे राहणारे हे दासोपंत त्यांच्या पासोडीसाठी प्रसिद्ध आहेत. या दासो दिगंबरांचे अनेक ग्रंथ आहेत. पण त्यात ‘संतविजय’ नाही. हा ‘संतविजय’ लिहिणारे दासो दिगंबर वेगळेच आहेत. ते जुन्नरचे राहणारे आहेत आणि आंबेजोगाईच्या दासो दिगंबराच्या खूप नंतर झालेत.

अद्यापही अप्रकाशित आणि अर्धवट सापडलेल्या या संतविजयात विसोबांची गोष्ट आहे. त्यांच्या गावाविषयी त्यात म्हटलंय,

‘विसोबा खेचर जाण्| राहे मुंगीमाजी आपण्||
खिस्तीचा उदीम करून| काळक्रमण करीतसे||’

या एका कडव्याला आधार मानून विसोबांचं नाव, गाव, जात सगळंच शोधायचा प्रयत्न मोठमोठ्या अभ्यासकांनी केलाय. त्यामुळं विसोबांचा शोध घेताना या गावी जाणं क्रमप्राप्त होतं. नगर जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यात हे मुंगी येतं. दहा हजार लोकवस्तीच्या या गावाची अर्थव्यवस्था मुख्यत: बागायती शेती आणि अवैध वाळूविक्रीच्या धंद्यावर उभी आहे. विसोबा मुंगी गावात खिस्ती म्हणजे सावकार असल्याचं ‘संतविजया’त म्हटलंय. पण गावात त्याविषयी कुणालाच काहीच माहीत नाही.

गावचे रहिवासी शेखर राजेभोसले यांच्या सोबतीनं मी मुंगीतल्या वारकरी मंडळींशी बोलले. अगदी जुन्या पिढीतल्या लोकांनाही याविषयी काहीच माहिती नव्हती. गावात गोदावरी नदीच्या काठावर मुंगादेवीचं पन्नासेक वर्ष जुनं मंदिर आहे. निम्बार्काचार्य परंपरेतल्या एका अमराठी बुवांचं आलिशान मंदिर गावात आहे. राजस्थानातल्या लोकांनी येऊन हे मंदिर उभारलंय. शिवाय सध्या उदय नाईक यांच्या देखरेखीत असलेला विठ्ठल-रखुमाईचा मठही गावात आहे. मात्र विसोबा मुंगीचे असल्याची एकही खूण गावात नाही. गावच्या माणसांनीही त्यांच्या बापजाद्यांकडून तसं काही ऐकलेलं नाही.

दासो दिगंबरानं लिहिलेली विसोबांची ‘संतविजयात’ली नोंद त्यामुळंच बिनकामाची ठरते. एकतर ती अर्धवट माहितीवर आधारलेली असेल. कदाचित नामदेव, ज्ञानेश्वरांचे समकालीन नसणार्‍या दुसर्‍याच कोणत्या तरी विसोबांविषयी ते लिहिलेलं असेल किंवा बंडखोर लिंगायतांची परंपरा सांगणार्‍या विसोबांविषयी गोंधळ निर्माण व्हावा, यासाठीही खोडसाळपणे ते नोंदवून ठेवलं असेल.

काहीही असो, पण नामदेवांचे गुरू विसोबांचं मुंगीशी काही घेणंदेणं नाही, हे आता स्पष्ट व्हायला हरकत नाही.

0 Shares
काय माहीत नाय जोडण्याचा वारसा