निगुऱ्याचा गुरू

डॉ.श्यामसुंदर मिरजकर

विसोबा आणि नामदेव हे वारकरी संप्रदायाच्या मूळारंभातले गुरुशिष्य वेगवेगळ्या प्रेरणा पचवत स्वतःचा नवा मार्ग शोधतात. या प्रवासात दोघेही एकमेकांवर प्रभाव टाकत असावेत.

वारकरी संप्रदायाचा शिस्तबद्ध प्रारंभ संत नामदेवांपासून होतो. मराठीत या मूळारंभाची नेमकी नोंद अ. ना. देशपांडे, म. वा. धोंड, भालचंद्र नेमाडे अशा मोजक्याच अभ्यासकांनी केली. मा. आ. मुळेंपासून नामदेव चरित्रात चमत्कारांना मोठं महत्त्व दिलं गेल्यामुळे नामदेवांच्या कर्तृत्वाकडे जाणता-अजाणता डोळेझाक झाली. नामदेवांच्या अभंगवाणीत साजीवंत झालेला चालता- बोलता विठ्ठल म्हणजे अद्भूत चमत्कार नसून, लोकमानसामध्ये देवाचं ‘सखा’ आणि ‘भक्तवत्सल’ हे रूप ठसवण्यासाठी नामदेवांनी जाणीवपूर्वक रचलेलं ‘मिथक’ आहे, हे लक्षात घेतलं तर नामदेवांच्या कल्पक दूरदृष्टी असणार्‍या पंथप्रवर्तकाचं वेगळेपण जाणवू शकेल.

नामदेवांची जडणघडण स्वयंप्रज्ञतेनं झाली की दुसर्‍या कुणाच्या कृपाप्रसादानं हा कुतुहलाचा प्रश्‍न आहे. नामदेव हे विठ्ठलक्तीत रंगलेले, दंगलेले ‘भावभोळे भक्त’ होते, हा महाराष्ट्रानं जोपासलेला गोड गैरसमज. नामदेवांची विठ्ठलभक्ती ही शंभर टक्के खरी होती पण ती ‘भावभोळी’ नव्हे तर डोळस होती. तत्कालीन परंपरेप्रमाणं भक्तीचा, पूजा-अर्चा करण्याचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला, पण नित्योपचाराच्या पलीकडे जाऊन परमेश्‍वर आणि त्याची उपासना समजून घ्यावी, असं त्यांना वाटू लागलं. ईश्‍वर, विश्‍वरचना आणि मनुष्य यांचा परस्परसंबंध म्हणजेच ‘तत्त्वज्ञान’ जाणून घेण्यासाठी नामदेव वेदज्ञाजवळ गेले, तर तो विधिनिषेधात अडकून अहंकारी झाला होता. नंतर क्रमानं शास्त्री, पुराणिक, हरिदास यांच्याकडे ते गेले पण ते सर्व भेदाभेद, मतभेद, लौकिक वासना यात गुंतले होते. अनेकांकडून वंचना पदरी आल्यावर, अनेक ठिकाणी हिंडून निराशा वाट्याला आल्यावर नामदेव पांडुरंगाला शरण गेले. त्यांनी शुद्धभावानं नामसंकीर्तन सुरू केलं. नामदेवाच्या भक्तीची सुरुवात अजाणता झाली असली तरी त्यांची वाटचाल डोळसपणे चालू होती, याचा हा पुरावा होय.

मध्ययुगातील रामदेवराव यादवाचा कालखंड हा वैदिक ब्राह्मणांचा प्रभाव असणारा काळ आहे. ज्या काळात रामदेवारावाचा प्रधान हेमाद्रीनं ‘चातुर्वर्णचिंतामणी’ हा व्रतकोश रचला आणि एका वर्षात करायच्या सुमारे २००० व्रतांची माहिती दिली. त्या काळात शास्त्री, पंडित, पुरोहित यांचं महत्त्व मोठं असणं स्वाभाविकच होय. अशा काळात परिसा भागवतासारखा पुराणिक नामदेवांना ‘‘तू शूद्र आहेस, तुझी जागा माझ्या पायाजवळ आहे’’, असं म्हणत असेल तर नवल ते काय!

अशा प्रतिकूल काळात नामदेव नामसंकीर्तनाची, उत्कट भक्तीची नवी पायवाट चोखाळतात. ‘हाती विणा मुखी हरी| गाये राऊळा भितरी॥’, असा त्यांचा पहिला आविष्कार आहे. ‘आमुचा विठ्ठल प्रचंड | इतरां देवांचे न पाहूं तोंड ॥ एका विठ्ठलावाचून | न करु आणिक भजन॥’, असा एकविध भाव त्यांनी मनी जपला. पंढरपुरी प्रथम भजन मग कीर्तन सुरू झालं. लोकांचा मेळा जमू लागला. जसजसा नामदेवांचा प्रभाव वाढू लागला तसा ब्रह्मवृंदाचा विरोध सुरू झाला. श्रुतिस्मृतिंचा हवाला देऊन परमेश्‍वर हा विठ्ठलापेक्षा वेगळा आहे, असं म्हटलं जाऊ लागलं. विठ्ठलभक्तीला पाखंड म्हटलं जाऊ लागलं. तरीही नामदेवांनी निर्धारपूर्वक सांगितलं की,

मान तोडावया कर शस्त्रांचे | कठिण बहुतांचे उभारिले ॥
तरी न वदे न वदे आन | आन कांही या विठोबावाचून ॥

‘मज विठ्ठल सापडला’ म्हणता म्हणता नामदेव म्हणू लागले, की ‘आम्हा सापडले वर्म | करु भागवत धर्म ॥’ हळूहळू चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा मेळा जमू लागला, वाढू लागला. नामदेवांचा नावलौकिकही सर्वत्र पसरू लागला. याची पहिली स्पष्ट नोंद निवृत्तीनाथांनी ‘पंढरीचा प्रेमा’ या शब्दांत घेतली आहे.

संन्याशाची पोरं म्हणून ब्रह्मवृंदानं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना जातबहिष्कृत केलं. त्यांना चांडाळ ठरवलं. मौजीबंधन नाकारलं. सगळ्या समाजानं त्यांच्याशी संबंध तोडावेत असा दबाव आणला. परंतु ही भावंडं सामान्य नाहीत. ती प्रज्ञावंत आहेत. नाथपंथी आहेत. नामदेव स्वतःहून या भावंडांना भेटण्यासाठी आळंदीस येतात, तेव्हा सोपानदेव सांगतात,

रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार |
संता माया थोर अनाथांची॥
आमुचे मायबाप भेटलेति आज |
समाधान सहज आलंगिता॥

मुक्ताबाई नामदेवांविषयी म्हणतात, ‘हा टाळ, दिंडी घेऊन हरिकथा करतो. स्वतःला हरिभक्त, हरिदास म्हणवितो. यानं खूप बोलून स्वतःचं मोठेपण वाढवलं आहे.’ इथं हे स्पष्ट होतं की नामदेवांची या भावंडांशी भेट होण्यापूर्वीच नामदेवांचं भजन, कीर्तन सुरू झालं होतं. नामदेवांचा सर्वत्र बोलबाला झाला होता. त्यांच्या भोवती लोक जमत होते. अशा नामदेवांनी या बहिष्कृत भावंडांना पाठबळ दिलं. सन्मानपूर्वक वारकरी संप्रदायात घेतलं आणि संत हे सर्वोच्च स्थान दिलं. कारण मूळात नाथपंथी असणार्‍या या भावंडांचा अधिकार मोठा आहे, हे नामदेव जाणत होते.

या वाटचालीत कधी चुकत, कधी नवं शिकत नामदेव स्वतःला सिद्ध करत होते. जिज्ञासा, ज्ञानलालसा हा नामदेवांचा स्थायिभाव होता. परिसा भागवत मंदिरात रामायण-महाभारतादी ग्रंथवाचन करत असताना, त्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडणारे नामदेव आहेत. यावर ‘करिता अपमान नामा माझा’, अशी परसोबांची तक्रार आहे. नामदेव तर विद्वान ब्राह्मणांना भेटतात आणि शंका विचारतात. हा त्यांच्या जडणघडणीचाच एक भाग आहे. पुराणिक, हरिदास, शास्त्री यांच्याकडून मिळेल ते ज्ञान ऐकावं याची धडपड होती, परंतु त्यातून समाधान होईना. तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळली.

माझिया मने मज उपदेश केला|
तो मज बिंबला हृदयकमळी॥
निर्वाणीची एक सांगितली खूण|
कैवल्य चरण केशवाचे॥

अशी स्वानुभावाची वाटचाल सुरू झाली. इथं नामदेवांनी अत्यंत स्पष्ट शब्दात गुरू उपदेश नव्हे तर ‘माझ्या मनानं केलेला उपदेश’ असं म्हटलं आहे. ‘आपुले आपणासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता॥’ या तुकारामांच्या भक्तीची पूर्वपिठिका सांगणारा हा अभंग आहे.

या टप्प्यावर ज्ञानदेवादी भावंडांची भेट ही महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. गुंफेमध्ये बसून समाधी लावणारी ही नाथमंडळी आहेत. ‘ऐस गुंफेमध्ये नाही नामदेव| म्हणूनी माझा जीव थोडा होतो॥ असे निवृत्तीनाथांचे बोल आहेत. त्यामुळं गोरा कुंभार आणि विसोबा खेचरांसह सार्‍यांचा प्रयत्न नामदेवाला सगुण साकाराची भक्ती सोडायला लावायची आणि निर्गुणोपासनेत योगमार्गात घ्यायचं असा आहे. यासाठी जाणीवपूर्वक तीन प्रयत्न करण्यात आले. एक, गोरोबा काकांकडून मडकं कच्चं की पक्कं हे तपासणं. दोन, विसोबा खेचरांचं पिंडीवर पाय ठेवून झोपणं. तीन, ज्ञानदेवांनी भूतळीची तीर्थ पाहण्याच्या निमित्तानं आणि एकांकात चर्चा करण्यासाठी नामदेवांना तीर्थयात्रेस घेऊन जाणं. या तीन प्रसंगांतून नामदेवांच्या चित्तवृत्तीत थोडा बदल होतो, थोडी भूमिका बदलते. परंतु ते विठ्ठलोपासना सोडत नाहीत. अनेक परीनं ज्ञानदेव नामदेवांच्या विचारपरिवर्तनासाठी झटतात. शेवटी ते म्हणातात, ‘पंढरीरायाचा प्रेमभांडारी असणार्‍या नामदेवा, तू जे भक्तीसुख घेतोस त्याचा अनुवाद कर.’ मग नामदेव आपला भक्तीमार्ग सविस्तर कथन करतात. नामदेवांच्या भूमिकेनं भारावलेले ज्ञानदेव उस्फूर्तपणे म्हणतात,

भक्त भागवत बहुसाल ऐकिले|
बहु होऊनि गेले होती पुढें॥
परि नामतयाचे बोलणें नव्हे हें कवित्व|
हा रस अद्भूत निरुपमू॥

आणि या भावंडांचा, गोरोबा, विसोबांचा वारकरी संप्रदायात प्रवेश होतो.

नामदेव स्वयंप्रकाशी आहेत हे खरं, पण दुसर्‍यांकडून मिळालेलं ज्ञान, सहकार्य याबद्दल ते कमालीचे कृतज्ञ आहेत. सगुण साकारात अडकलेल्या नामदेवांना त्यातून बाहेर काढून निर्गुण निराकाराची जाणीव करून देण्याचं फार मोठं कार्य विसोबांनी केलं. परमेश्‍वर हा जळ-स्थळ-काष्ठ, पाषाण, पिंड, ब्रह्मांड, अणुरेणू व्यापून सर्वत्र साक्षभूत होऊन राहिलला आहे, याची स्पष्ट जाणीव विसोबांनी करून दिली. ‘देवाविण ठाव हे बोलणेंची वाव॥’ हे नामदेवांना जाणवलं. विसोबांनी अनेक गोष्टी सांगितल्या, नामदेवांना पदपिंडविवर्जित केलं आणि ‘ज्ञान हेच गुरू’ असंही सांगितलं. सर्वाभूती विठ्ठल पाहायला सांगितलं. या प्रसंगाचं वर्णन नामदेवांनी ‘डोळियाचे डोळे उघडिले जेणें| आनंदाचे लेणें लेवविलें॥’ असं केलं आहे. परमेश्‍वर स्वहृदयी आणि सर्वाभूती असल्याची जाणीव विसोबांनी करून दिली. त्याची कृतज्ञता व्यक्त करताना नामदेव म्हणतात, ‘नामा म्हणे स्वामी खेचर माऊली| कृपेची साऊली केली मज|’

इथं नामदेवांनी विसोबांना साक्षात गुरुस्थान दिलेलं दिसतं. परंतु बारकाईनं विचार केला तर आपणास असं दिसेल की ही नामदेवांची फार मोठी कृतज्ञता आहे. विसोबा हे मूळात शैवमार्गी आहेत, परंतु नामदेव तिकडे वळल्याचं दिसत नाही. उलट हे विसोबाच वारकरी पंथाकडे वळले आहेत. ‘विठ्ठल नामे भरी तिन्ही लोक’ असा उपदेश त्यांनी केला आहे.

विसोबांच्या ‘शडूस्थळ’मधील अंतर्गत प्रमाणांच्या आधारे नरहर कुरुंदकरांनी व्यक्त केलेलं मत आपल्या विवेचनासंदर्भात महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, ‘षट्स्थळ’ हा ग्रंथ विसोबांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केल्यानंतर लिहिलेला आहे. शिव आणि विष्णू यात अभेद मानणार्‍या एका वारकर्‍यानं शैवागम सांगितला आहे, असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. वारकरी संप्रदायाच्या भूमिकेनं प्रभावित झालेल्या एका वीरशैवाचं हे लिखाण आहे, असंही म्हणता येईल. विसोबा खेचर हा शैव तत्त्वज्ञान सांगणारा वारकरी आहे, की काही प्रमाणात वारकरी प्रभाव असलेला वीरशैव आहे, या प्रश्‍नाचं उत्तर सोपं नाही. विसोबांवरील वारकरी संप्रदायाचा प्रभाव इथं स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.

नामदेव गाथेत विसोबांचे दोन अभंग उपलब्ध आहेत. पहिल्या अभंगात, ‘प्रारब्धी असेल ते चुकणार नाही. तरी धैर्यबळाने अखंड हरिस्मरण, कीर्तन करुन सुख विश्रांती पाठवावी,’ असे म्हटले आहे. तर दुसर्‍या अभंगात तीर्थयात्रा, योगसाधना यांना नकार असून, देहातील शून्य भुवन अनुभवण्यास सांगितले आहे. परंतु या दुसर्‍या अभंगाची समाप्ती ‘खेचर विसा करी विनवणी, कोप न धरी दे नामया’ अशी आहे. विसोबा नामदेवांचे आध्यात्मिक गुरू होते, असं मानलं जातं. त्या मान्यतेला छेद देणारा प्रस्तुत अभंग आहे. कारण इथं तर विसोबा नामदेवांना विनवणी करून राग धरू नकोस, असं म्हणत आहेत. गुरू-शिष्य परंपरेला न साजेसा असाच हा प्रकार आहे.

तात्पर्य इतकंच की, नामदेवांच्या जडणघडणीत विसोबांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण त्यांनी नामदेवांना ईश्‍वराच्या निर्गुण निराकार रूपाचं ज्ञान करून दिलं आहे. असं असलं तरी विसोबांच्या दोन्ही अभंगांवर आणि ‘शडूस्थळ’ या ग्रंथावर वारकरी संप्रदायाचा पर्यायानं नामदेवांचा प्रभाव आहे. ज्यांना गुरुस्थानी मानलं त्या विसोबांना शैवमताकडून वारकरी संप्रदायाकडे घेऊन येण्याचं ऐतिहासिक कार्य नामदेवांनी केलं आहे. शिष्याच्या विचारप्रभावात येणारा गुरू, अशी ही दुर्मीळ घटना आहे.

0 Shares
जोडण्याचा वारसा कच्च्या मडक्याची कच्ची कहाणी