पायाचा थोर दगड

सचिन परब

संत विसोबा खेचरांच्या इतक्या कहाण्या आहेत की त्यांच्या आयुष्याची एक गोष्ट नाहीच सांगता येत. त्यांचे शिष्य नामदेवरायांच्या आसपासच त्यांची खरी गोष्ट आहे. नामदेवांच्या आयुष्यातले बिंदू जुळवतच विसोबांच्या जीवनाचं चित्र उभं करता येतं. पण असंच घडलं असेल, असा दावा नाही करता येत.

लय इदरकल्याणी कार्ट हाय, कर्नाटक सीमेजवळच्या भागात सर्रास ऐकू येतं हे वाक्य. कार्ट वात्रट, आचरट, आगाऊ, वाया गेलेलं, उचापतखोर असेल तर या शिवीवजा विशेषणानं त्याचा उद्धार होतो. इदरकल्याण म्हणजे बिदर कल्याण. इदरकल्याणी म्हणजे बिदरकडच्या कल्याण गावातला. व्यवस्थेला काय राग आहे या गावाचा की आजही या गावाच्या नावची शिवी हासडली जाते.

साडेआठशे तरी वर्ष झालीत त्याला. महात्मा बसवेश्वरांनी याच कल्याण शहरात सगळ्या शोषणाचं मूळ असणारी व्यवस्थाच मुळापासून गदागदा हलवायला सुरुवात केली होती. जातपात नाकारली होती. ब्राह्मण घरात जन्मलेले बसवण्णा अस्पृश्याच्या घरी जेवत होते. कक्कय्या ढोराला बाप आणि चन्नय्या मांगाला आजोबा म्हणत होते. वेद नाकारत होते. मूर्ती नाकारत होते. देऊळ नाकारत होते. देवाधर्माच्या नावानं ब्राह्मणांकडून होणार्‍या अत्याचारांवर सडकून टीका करत होते. स्त्रियांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवत होते. त्यांच्या पुनर्विवाहाला संमती देत होते. जगातली पहिली संसद ठरावी असा अनुभवमंटप उभारत होते. हे सारं कमी होतं म्हणून की काय, बसवण्णांच्या अनुभवमंटपात अस्पृश्य हरळय्यांच्या मुलीचं लग्न मधुवरस ब्राह्मणाच्या मुलाशी लावण्यात आलं.

मग ‘सैराट झालं जी!’ आर्चीचा प्रिन्सदादा सिनेमात करतो, तेच तेव्हाही झालं. रांगोळी रक्तात भिजली. बसवण्णांच्या अनुयायांची म्हणजेच शरणांची कत्तल सुरू झाली. एका एका शरणाला वेचून वेचून मारण्यात आलं. उरलेसुरले देशोधडीला लागले. त्यांचं साहित्य संपवण्यासाठी सारी ताकद पणाला लावली गेली. बसवण्णांच्या क्रांतीला संपवण्यासठी प्रतिक्रांती झाली. कल्याणीवर वरवंटा फिरला. इदरकल्याणी शिवी झाली.

पण काहीही झालं तरी क्रांतीचा निखारा पूर्णपणे विझत नाही कधीच. आता दहा वर्षांतच जग बदलून जातं. तेव्हा काळाच्या कपाळावरच्या सुरकुत्या वर्षानुवर्ष टिकून राहायच्या. कारण माणसं गाव सोडून जायची नाहीत. पिढ्या बदलल्या तरी गावगाडा तसाच राहायचा. कल्याणीत बसवण्णांनी केलेल्या क्रांतीला शंभर वर्ष उलटून गेली होती. एक मुलगा आई गोणाईबरोबर त्याच्या आजोळी कल्याणीला यायचा. त्याच्यासाठीच जणू कल्याणीतल्या क्रांतीच्या सुरकुत्या टिकून होत्या. नामदेव त्याचं नाव. तो तेव्हा राहत असलेल्या पंढरपूरहून मूळ गावी नरसीला जायचं. जवळच असलेल्या औंढा नागनाथाचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढं कल्याणीला मोठा मुक्काम ठोकायचा, असं वर्षातून एकदा तरी घडायचं. नामदेव आला की त्याच्या प्रश्नांनी शिंपी आळीतलं गोमाशेटी – उमाबाईंचं घर दणाणून जायचं.

नामदेव पंढरपूरच्या पांडुरंगाचा पिसा होता. दुसरं काहीच सुचायचं नाही त्याला. कितीदा तरी लंगोटी लावून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनासाठी उभा ठाकायचा. तेच कल्याणातही करायचा. आवाज गोड होताच. ही गर्दी व्हायची त्याचं मोकळं ढाकळं कीर्तन ऐकायला. कल्याणीला आला की त्याचा पाय परत जायला निघायचा नाही. तिथं देवळांना तोटा नव्हता. राजधानीचं गाव म्हणून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. नामदेव घरात नसायचाच. तो देवाच्या शोधात फिरत राहायचा. कोणी साधू आला की हा लागला त्याच्या मागे. मग तो संप्रदाय बघायचा नाही की धर्म. प्रवचनात तर त्याचे शंभर प्रश्न असायचे. वेदशास्त्र शिकलेले पंडितही त्याला कल्याणीतच भेटायचे. सगळे त्याला हाकलून द्यायचे. पण तो एखाद्याच्या कनपटीला बसला की उत्तरं घेतल्याशिवाय उतरायचाच नाही. त्यातच त्यानं बसवण्णांविषयी ऐकलं होतं. त्याचे डोळे विस्फारले होते.

नामदेव मोठे होत होते, तसा त्यांचा आवाकाही वाढत होता. देव त्यांच्याशी गप्पा मारायचा. त्यांच्या हातून नैवेद्य खायचा. तेच नामदेव कुत्र्याला कोरडी भाकर खावी लागू नये म्हणून तूप घेऊन त्याच्यामागे धावायचे. दगडधोंड्यांना थंडी वाजेल म्हणून त्यांना पांघरूण घालायचे. अगदीच वेगळा विचार करायचे ते. मुळापासूनचा विचार. त्यांना नवं नवं सूचत राहायचं. कीर्तनाच्या रंगी रंगत ज्ञानदीप लावण्यासाठी गावोगावी फिरणंही आता सुरू झालं होतं. नवनवे सोबती भेटत होते. त्यांच्या सोबतचे सगळेच लहानथोर त्याच्या निर्मळ वागण्यानं, अद्भूत काव्यानं आणि गोड गाण्यानं दंगून जायचे.

इंद्रायणीच्या काठी जवळपास त्यांच्याच वयाचे निवृत्तीनाथही नामदेवांसारखेच. फक्त स्वभाव तुलनेनं खूपच शांत. ज्ञानेश्वर, सोपान आणि छोट्या मुक्ताबाई, मात्र खटपटे. चौघांच्याही मनात विश्वाचं आर्त उमटलं होतं. ज्ञानेश्वरांनी तर देवानं सांगितलेली गीताच मायमराठीत सांगितली. संस्कृत फिकी पडेल अशी प्रतिभा त्यात उमटली होती. रंजलेगांजले भावार्थदीपिकेच्या वर्षावानं न्हात होते. नामदेवांपेक्षा दोनचार वर्षांनी मोठे असलेले त्यांचे दोस्त तेरचे गोरा कुंभार नुकतेच आळंदीला जाऊन आले होते. त्यांनी नामदेवांना या भावंडांविषयी सांगितलं.

नामदेव आळंदीला निघालेच. निवृत्ती-ज्ञानदेवांनाही कधी एकदा नामदेवांना भेटतोय असं झालं होतं. दोघांचीही मित्रमंडळीही आली होती. संतांचा मेळाच जमला. सगळ्यांचीच वयं वीसच्या आसपास. दिवसाचं, रात्रीचं कुणालाही भान नव्हतं. जग देवाच्या विचारांचं बनवायचं, तर काय करायला हवं, यावर घनघोर चर्चा झाली. वारकरी क्रांती, परिवर्तनाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार होत होती. आता हे सारं कुणातरी मोठ्याच्या कानावर घालायला हवं होतं. एवढ्या ताकदीचं कोण आहे? कोण नेमकं मार्गदर्शन करू शकेल? पांडुरंगालाच विचारायला हवं. सगळ्यांचा विवेक एकच नाव सांगत होता, विसोबा खेचर.

खेचर म्हणजे आकाशात उडणारा. जगातली कोणतीच गोष्ट विसोबांना बांधू शकत नव्हती. ते खर्‍या अर्थानं मोकळे होते, स्वतंत्र होते. आपलं, परकं असा भेद नसणारं त्यांचं आकाश निरभ्र होतं. म्हणूनच खर्‍या विवेकाचा सल्ला फक्त त्यांच्याकडूनच मिळणार होता. त्यासाठी नामदेव त्यांना भेटण्यासाठी औढा नागनाथाला आले. परिवर्तनाच्या वाटेवर चालायचं तर देवाधर्माचं काय करायचं, हा सनातन प्रश्न त्यांच्यासमोर होता. बसवण्णांच्या क्रांतीचं काय झालं, ते विसोबांच्या डोळ्यासमोर होतं. चक्रधरांच्या बंडखोरीचं काय झालं, ते त्यांनी अनुभवलं होतं. विसोबांनी आपला अनुभव नामदेवांच्या ओंजळीत ओतला. बंडखोरी तर करायचीच पण ती नम्रपणे हवी. जे काही करायचं ते आस्ते कदम. आक्रमक पवित्रा न घेताही व्यवस्थेला आव्हान देता येतं. देवाच्या नावानं थोतांड करून द्वेष आणि भेदभाव रुजवले जातात. मग त्याच देवाच्या नावानं चांगलं घडवलं तर काय बिघडलं? पण काही झालं तरी बसवण्णांच्या विचारांशी गद्दारी नको, विसोबा सांगत होते. नामदेवांना लहानपणी ऐकलेल्या बसवण्णांच्या कहाण्यांचा अर्थ उमगू लागला. त्यांच्या डोळ्यासमोर कल्याणीच्या अनुभवमंटपात विराजमान झालेले बसवण्णा दिसू लागले होते.

नामदेवांचा रात्रीचा मुक्काम विसोबांकडेच होता. म्हणून विसोबांनी सांगितलं, आज नागनाथासमोर कीर्तन होऊ दे. नामदेवांचं कीर्तन आणि विसोबांचं आवाहन यामुळं गावागावांतून माणसं आली. महाशिवरात्रीलाही कधी आली नाहीत, इतकी माणसं आली. देव आपल्या सोबतच आहे. मूर्ती आणि मंदिरापुरतं त्याला अडकवून ठेवता येणार नाही. तो भावाचा भुकेला आहे. तो आपला सखा आहे. तो कोपत नाही. त्याला घाबरायची गरज नाही. नामदेवांचं कीर्तन रंगू लागलं होतं. देवळातल्या पुजार्‍यांना आपली दुकानं बंद होताना दिसू लागली. त्यांनी कीर्तन बंद पाडलं. नामदेवांची जात काढली. शूद्र म्हणून अपमान केला. नामदेव शांत राहिले. ना ब्राह्मणांच्या नावानं शिव्या दिल्या ना देवाच्या. त्यांनी देवळाच्या मागं जाऊन कीर्तन सुरू केलं. सगळी गर्दी तिथे जमा झाली. औढा नागनाथाचं जणू देऊळच फिरलं. विसोबा निर्धास्त झाले.

विसोबा छोटी आसामी नव्हते. हजारो मुलांना शिल्पशास्त्र शिकवणार्‍या विद्यापीठाचं आचार्यपद त्यांनी वर्षानुवर्ष भूषवलं होतं. त्यांचा शडुस्थळ हा तत्त्वज्ञानावरचा ग्रंथ मान्यता पावला होता. नाथ आणि लिंगायत दोन्ही परंपरांमध्ये त्यांना मोठा मान होता. लिंगायत तर त्यांना विश्वनाथ जंगमच मानत. तो सारा मानमराताब विसरून ते नामदेव-ज्ञानेश्वरांच्या नेतृत्वाखाली संतमेळ्यात सहभागी झाले. एकटेच आले नाहीत, तर आपले गुरू योगी चांगदेवांनाही सोबत घेऊन आले. बार्शीच्या जोगा परमानंदांनाही हात पकडून घेऊन आले. सारे ज्येष्ठ-श्रेष्ठ विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले. या सार्‍या ज्येष्ठांनी आपली पुण्याई या पोराटोरांच्या पाठीशी उभी केली. आपण त्यांचे शिष्य आहोत, असं जगाला सांगितलं.

कुणी शिष्य म्हणो की गुरू म्हणो, विसोबांना त्याचं काहीच देणंघेणं नव्हतं. कारण बसवण्णांची क्रांती चंद्रभागेच्या वाळवंटात साकार होताना ते पाहात होते. ते भरून पावले होते. त्यांचं काम पायाच्या दगडाचं होतं. त्याची दखल कुणी कधी घेणार नव्हतंच. त्याची त्यांना अपेक्षाही नव्हती.

0 Shares
थँक्यू राजाभाऊ! पुरोगामी प्रतिमा