संवादाचा दुवा

श्रीपाल सबनीस

नामदेवरायांना घडवणार्या् संत विसोबा खेचरांच्या वाट्याला उपेक्षाच आली. या थोर संताचा नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की, त्यांच्या कर्तृत्वात समाज जोडण्याचा धागा आहे. तो धागा शोधण्याचं काम ‘रिंगण’ने केलं आहे.

वारकरी संतांच्या मांदियाळीत अठरापगड जातीचे असंख्य संत असले तरी मराठी विचारवंत आणि समीक्षक यांचा फोकस मोजक्याच संतांच्या कर्तृत्वावर केंद्रित झाल्याचं सत्य लक्षात येतं. ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि रामदास या संतांचा लौकिक पसरला. मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, नरहरी, सावता, गहिनीनाथ इत्यादी संत मंडळी वारकर्‍यांच्या आणि अभ्यासकांच्या चर्चेत राहिली. पण, चोखामेळा, शेख मोहम्मद, रोहिदास, कर्ममेळा, सोयराबाई, बंका, विसोबा खेचर आदी संतांच्या वाट्याला मराठी अभ्यासकांची अक्षम्य उपेक्षाच आल्याचं दिसतं. ही कोंडी जाणीवपूर्वक फोडण्याचं सांस्कृतिक कर्तव्य सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी अत्यंत डोळसपणे ‘रिंगण’च्या विशेषांक मालिकेतून केलं आहे. त्यामुळं संत कर्तृत्वाच्या लौकिकाचा ढळलेला समतोल महाराष्ट्रात आता सर्वदूर रुजतो आहे.

संत नामदेव, जनाबाई, चोखोबा, निवृत्तिनाथ यांच्या संबंधानं ‘रिंगण’नं सत्याच्या नव्या वाटा अधोरेखित केल्या आहेत. आता विसोबा खेचर यांच्या चरित्र आणि कार्याचं आव्हान पेलण्याचा संकल्प ‘रिंगण’ने केलाय, ही बाब सर्वार्थानं अभिनंदनीय म्हणावी लागेल.

खरं तर विसोबा खेचर यांचं चरित्र कुठेही उपलब्ध नाही. भक्ती चरित्रकारांनी वर्णिलेल्या काही नोंदीवरून विसोबांचं संपूर्ण चरित्र मांडणं कठीण आहे. परंतु विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरू असल्याचं सत्य मात्र निर्विवादपणे मान्य करता येतं. संत नामदेवांना बार्शीच्या शिवमंदिरात विसोबांनी उपदेश केला, की औंढा नागनाथाच्या मंदिरात, या प्रश्‍नाचं निर्णायक उत्तर देणं शक्य नसलं तरी दोन्हीपैकी एका ठिकाणी विसोबांनी नामदेवांना गुरुपदेश केलाय हे सत्य आहे.

विसोबा खेचर हे एक नसून अनेक असल्याच्या नोंदीही आढळतात. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या जातीचे विसोबा अधोरेखित झाले आहेत. ब्राह्मण जातीचे आणि पांचाळ जातीचे विसोबा दिसतात.

संत नामदेव त्यांच्या गावाजवळच्या औंढ्याच्या नागनाथ मंदिरातील विसोबांकडे गेले. कारण संतांच्या मेळाव्यात विसोबा खेचर यांचा लौकिक नामदेवांनी अनुभवला होता. शिवाची उपासना करणारे विसोबा मंदिरातील शिवपिंडीवर पाय ठेवून निवांतपणे पहुडल्याचं दृश्य नामदेव पाहून आश्‍चर्यचकित होतात. आणि म्हणतात, ‘उठि उठि प्राण्या, आंधळा तू का…’ तेव्हाचं विसोबांचं उत्तर अर्थपूर्ण आहे.

विसोबा म्हणतात, ‘देवाविण ठाव रिता कोठे…’ आणि विसोबा आज्ञा करतात, ‘जेथे देव नसे, तेथे पाय ठेवी..’

या प्रसंगानं नामदेवांना जन्ममरणाचं कोडं सुटल्याची अनुभूती आली. साक्षात कैवल्याचा अनुभव नामदेवांनी घेतला.

‘श्रवणी सांगीतली मात|
मस्तकी ठेवियला हात॥’

हा अनुभव नामदेवांनी औंढ्यांच्या मंदिरांत घेतला. अर्थात पहिला उपदेश नामदेवांनी त्यांच्या गावाजवळच्या औंढ्याला घेतला असावा आणि नंतर अधिकचा उपदेश बार्शीच्या मंदिरात घेतला असल्याची शक्यता आहे. या उपदेशाचा संस्कार स्वीकारून नामदेवांचं समर्पण गुरू विसोबाप्रति सदैव ऋणी असणं स्वाभाविक आहे.

नामदेवांची कृतज्ञता त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झाली.

सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली|
निजवस्तू दाविली माझी मज॥
माझे सुख मज दावियेले डोळां|
दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा॥

नामदेवांची गुरूभक्ती आणि गुरुवरील श्रद्धा त्यांच्या रचनेतून स्पष्ट झाली आहे. ‘नामयाचा खेचर दाता’ ही जीवन धारणा संत नामदेवांच्या व्यक्तित्वाची अविभाज्य साक्ष म्हणता येईल.

संत नामदेवांचं कर्तृत्व महाराष्ट्राच्या भूगोलातून मुक्त होऊन ते संपूर्ण उत्तर भारताच्या नकाशात ओतप्रोत ओसंडताना दिसतं. त्यांच्या भक्तीपदांचा प्रभाव गुजरातच्या नरसी मेहता आणि राजस्थानच्या संत मीरेच्या काव्यरचनेवर शोधताना शीख संप्रदायही नामदेवांनी व्यापल्याचं सत्य लक्षात येतं.

गुरुग्रंथसाहिबमधील नामदेवांच्या ६१ रचना त्या पवित्र ग्रंथाचा वंदनीय भाग बनल्या. त्यामुळं शीख संप्रदाय हिंदू धर्माच्या जवळ तर आलाच; पण संपूर्ण उत्तर भारत नरसी मेहता, संत मीरा आणि गुरू शिरवांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी कायमचा जोडला गेला.

राष्ट्रीय एकात्मतेची सांस्कृतिक पायाभरणी करणारे एकमेव संत नामदेव महाराष्ट्राचे आणि वारकरी पंथाचे भूषण आहेत.

याच संदर्भात विसोबा खेचर यांच्या गुरुपणाचं मूल्य निर्णायक महत्त्वाचं ठरतं. संत मालिकेतील नामदेवांची जागा ही सर्वार्थानं मध्यवर्ती केंद्रातील आहे. कीर्तन, चरित्र यांचे आद्यत्व नामदेवांच्या नावावर आहेच. पण उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणारा दुवा म्हणूनही नामदेव महत्त्वाचे ठरतात. तसंच उपेक्षित महार जातीच्या चोखोबाला दीक्षा देऊन विठ्ठल भक्तीचे अभंग रचण्याची प्रेरणा होणारे नामदेव आजच्या दलित चळवळीचे कैवारी ठरतात. त्याचप्रमाणं दासी जनाबाईंना भक्तीचा अधिकार देऊन विठ्ठलाच्या सान्निध्यात रमण्याची संधी आणि दीक्षा नामदेवच देतात.

या सर्वच आधुनिक काळातील समता पर्वाच्या नांदीच्या प्रेरणा नामदेवांच्या संतत्वातून जन्म घेतात आणि नामदेवांच्या संतत्वाचा जन्म विसोबा खेचर यांच्या उपदेश बोधातून आकारास येतो. अर्थात नामदेवांच्या संपूर्ण देशभर पसरलेल्या कर्तृत्वाचा थेट अनुबंध विसोबा खेचर यांच्या गुरुपदाशी जुळतो. त्यामुळं नामदेवांच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक औदार्याची, थोरवीची नाळ थेट विसोबांशी जुळते.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची बाधा झालेल्या काही मराठी विद्वानांनी जातीनिहाय वाटणी करून संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारामांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं. काही विद्वानांनी तर ‘ग्यानबा- तुकाराम’चा गजर खंडीत करून मुंज न झालेल्या ज्ञानेश्‍वरांना ‘ब्राह्मण’ ठरवून त्यांना तुकारामांपासून बाजूला केलं आणि त्या जागेवर नामदेवांची स्थापना केली.

जातीचं विष पेरून ज्ञानेश्‍वर आणि तुकारामांची फारकत करणार्‍या विद्वानांना नामदेवांचं प्रेम नव्हतं. एका ज्ञानेश्‍वरांची ब्राह्मण जात त्यांना आडवी येत होती. म्हणून बहुजन जातीयवादाचा बळी म्हणून ‘नामदेव-तुकाराम’ हा नवा गजर त्यांनी सुचवला. परंतु अठरापगड जातीच्या वारकर्‍यांनी मात्र कुटाळ कारस्थानी विद्वानांची विकृती पायदळी तुडवून ७०० वर्षांचा ‘ज्ञानबा-तुकाराम’ गजर अखंडितपणे चालू ठेवला. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर प्रवाहातील बरेच विद्वान जातीय मानसिकतेतून संताची विभागणी, वजाबाकी करीत असले तरी सर्वसामान्य वारकरी मात्र जातीच्या भिंती तोडूनच त्यांना वंदन करतात. वारकर्‍यांनी सर्व संतांचं मोठेपण जात वजा करूनच सदैव प्रमाण मानलं. वारकर्‍यांचं हे शहाणपण विद्वानांनाही प्रेरक ठरावं.

ज्या विसोबांनी नामदेवांना भक्तीचा उपदेश केला ते विसोबा ब्राह्मण जातीचे असल्याची नोंद आढळते. किंवा पांचाळ जरी असले तरी ब्राह्मणत्वाच्या वादामध्ये धर्मगुरूंनी ब्राह्मणांचे संस्कार पाळणार्‍या पांचाळाच्या ब्राह्मणपणाबद्दलचा निकाल त्यांच्या कैवारात दिल्याच्या नोंदी आढळतात. ‘शिल्पशास्त्रा’चा निर्माता विसोबांना ‘शिवब्राह्मण’ संबोधतो. आणि ‘शिवब्राह्मण’ हे ‘पांचाळ’पैकी सोनार असतात. शिवाय पांचाळांनी आपला संबंध वेगवेगळ्या वेदांशी जोडलाय. परंपरेनं चालत आलेल्या चरित्र प्रवाहात विसोबांचा व्यवसाय सराफीचा आणि जात यजुर्वेदी ब्राह्मण असल्याची माहिती मिळते.

विसोबा खेचर यांनी ‘शडुस्थळ’ हा ग्रंथ लिहिल्याची नोंद डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलीय. ‘शडुस्थळ’चा सिद्धांत लिंगायत पंथीय आहे. विसोबा खेचर वारकरी पंथीय नामदेवांचे गुरू आहेत. या भिन्न नोंदी एकत्र केल्यास बसवेश्‍वरप्रणीत लिंगायतपंथाचा प्रभाव वारकरी पंथावर काही प्रमाणात पडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात बसवेश्‍वरांचं कर्तृत्व लिंगायत प्रवाहातच उदयाला आल्याचं आणि या सर्व भिन्न मतप्रवाहांचा संवाद आणि संघर्ष प्रत्येक कालखंडात दिसून येतो.

‘पांचाळ’ समाजात येणार्‍या जाती लिंगायत पंथात समाविष्ट असण्यात आणि त्याच संप्रदायाचा ‘षट्स्थल’ सिद्धांत विसोबांना प्रभावी करणारा ठरला. विसोबांना गोरक्षनाथांचाही वारसा प्राप्त झालाय. म्हणून तर ‘शडुस्थळ’ ग्रंथात त्यांनी गुरुमुख म्हणजे मनाची स्थिरता आणि मनमुख म्हणजे विषय सन्मुखता याविषयी विवेचन करून भक्तीमार्गी साधकानं परमेश्‍वर सन्मुख असावं, असा उपदेश केलाय. त्यांच्या उपदेशाचं सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

हे जाणिले गुरुमुखे| तरीच साक्षात्कारे वाटणे॥
मनमुखे जो देखे| तो पशुसमान॥

संसार सुखाच्या प्रवाहात विषयाचे भोग अटळ असतात. त्यामुळं पारमार्थिक सुख गमावलं जातं. ईश्‍वर साधनेत मनमुखापेक्षा गुरुमुखच महत्त्वाचं! याच सूत्राला सिद्ध आणि नाथ परंपराही आळवताना दिसते.

‘मनमुखाचा’ त्याग आणि ‘गुरुमुखा’चा स्वीकार करण्याचं सूत्र पंजाबच्या गुरू नानक यांच्या अनेक पदरचनांत आढळतं. याचा अर्थ हा आध्यात्मिक विचार विसोबा खेचर यांच्याकडून नामदेवांपर्यंत आणि नंतर गुरू नानकांपर्यंत पोचला असावा.

तेव्हा शुद्ध अध्यात्माचं सूत्र विसोबा मांडतात. त्यांच्या पूर्वज परंपरेत नाथ संप्रदाय आहे. चांगदेव आहेत आणि पुढील वारशात नामदेवांसह नानकही दिसतात. या सूत्राचा अर्क वीरशैवांतून ‘शडुस्थळ’द्वारे उदयास येतो. सारांश शुद्ध अध्यात्माचा अनुबंध नाथ, वीरशैव, वारकरी पंथास शीख पंथापर्यंत एकात्मता साधताना दिसतो.

वर्तमान भारताच्या धार्मिक आणि सांप्रदायिक भेद संकल्पनांचा, संघर्षाचा विलय करण्यासाठी विसोबा खेचर यांच्या ‘शडुस्थळ’ ग्रंथातील अध्यात्म तत्त्वज्ञानाचं सूत्र कसं उपयुक्त ठरतं, याची ही साक्ष विचारप्रवर्तक आहे.

आजचा लिंगायत पंथ बसवेश्‍वरांच्या कर्तृत्वानं प्रभावित आहे. किंबहुना लिंगायत धर्माची नव्यानं स्थापना करून वैदिक धर्माच्या विरोधात बसवेश्‍वर उभे राहताना दिसतात. वर्णव्यवस्थेच्या विरोधात बसवेश्‍वर उपदेश करतात. समता आणि श्रमाला महत्त्व देतात. ब्राह्मण, चांभार जातीचं लग्न लावून क्रांती करतात. आजच्या फुले-आंबेडकरी समतेची नांदी बसवश्‍वेरांच्या कार्यात दिसते.

‘भेदाभेद अमंगळ’ ठरवून समतेचा उद्घोष करणारी ज्ञानेश्‍वर ते तुकाराम ही संत परंपरा बसवेश्‍वरांच्या आंतरजातीय विवाहाच्या वारशात का उभी दिसत नाही? हा प्रश्‍न आज कळीचा बनलाय. संतांची आध्यात्मिक समता फुले-आंबेडकर पर्वाच्या सामाजिक समतेशी जोडता येते. पण तिचा थेट सांधा बसवेश्‍वरांशी जसा जुळतो तसा संतांशी जुळत नाही.

ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संत मानवतावादी आहेत. समतावादीही आहेत; पण सामाजिक समतेचे प्रयोग या संतानी जाणीवपूर्वकच केले नाहीत. कारण पाठीमागे बसवेश्‍वरांनी केलेला आंतरजातीय विवाहाचा प्रयोग आणि समतेचा प्रयत्न समाजाला पचला नसल्याचं सत्य संतानी जाणलं होतं. जे समाजाच्या पचनी पडत नाही त्याचा प्रचार-प्रसार हळूहळू करावा, असं संतांचं धोरण असावं. म्हणून बसवेश्‍वरांचा क्रांतीवादी समताप्रयोग बाजूला ठेवून वारकरी संतांनी अध्यात्म आणि भक्तीचे मानवतावादी प्रयोग रुजवले. त्यात नामदेवांची सर्वस्पर्शी भूमिका केंद्रीय राहिली. आणि नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांची तात्त्विक धारणा नाथ, वीरशैवासह वारकरी पंथाला औदार्याचे संस्कार शिकवण्यात यशस्वी ठरली.

लिंगायत प्रवाहातील बसवेश्‍वरांचं पर्व अनेक सूत्रांवर वैदिकांशी संघर्ष करू पाहातं. वारकरी संप्रदायाचा ‘पाया’ म्हणून गौरवलेल्या संत ज्ञानेश्‍वरांच्या आळंदीतील समाधीजवळच त्याच परिसरात भोजलिंगकाकांची समाधी आहे. याच भोजलिंगकाकांनी आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या दुर्दैवी लेकरांचा सांभाळ केल्याच्या नोंदी आहेत. ज्ञानेश्‍वरांनीच भोजलिंगकाकांना स्वतःच्या हातानं समाधी दिल्याची नोंद १५ जुलै २०१६ च्या ‘प्रभात’ दैनिकातील लेखामध्ये मीलन म्हेत्रे यांनी केलीय. हे भोजलिंगकाका वीरशैव परंपरेतील असल्याची माझी माहिती आहे. अर्थात बसवेश्‍वर लिंगायत आणि वारकरी यांचा सांस्कृतिक अनुबंध संवाही करण्यासाठी भोजलिंगकाकांची ज्ञानेश्‍वरादी भावंडाच्या पालकत्वाची भूमिका महत्त्वाची ठरते.

‘शडूस्थळ’ ग्रंथाचा उपयोग लिंगायत पंथाचे विचार आणि आचार समजून घेण्याकामी निश्‍चितच होणार आहे. तसंच भारतीय सांप्रदायिकतेचे विसंवाद बाद करून शुद्ध अध्यात्माच्या तात्त्विक सूत्रावर संवादाच्या जागाही त्यातून लक्षात येतात. त्यामुळं आधुनिक काळातील सांप्रदायिक कर्मठपणा आणि संकुचित जाणिवांवर मात करण्यासाठी विसोबा खेचर यांनी रचलेला ‘षट्स्थल’ ग्रंथ उपयुक्त ठरतो.

ज्ञानेश्‍वरीचं तत्त्वज्ञान आणि वाड्मयाचं श्रेष्ठत्व कितीही प्रमाण मानलं तरी अवैदिकांना ज्ञानेश्‍वरांचं संतपण भावू शकेल. पण गीतेचं तत्त्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्‍वरी पचण्याची शक्यता नाही. वैदिक आणि अवैदिक प्रवाहामधील हा दार्शनिक आणि व्यावहारिक संघर्ष आज समाज जीवनात धुमाकूळ घालून भारताचं सार्वभौमत्त्व संकटात आणतो आहे.

या दुभंग होत जाणार्‍या समाजाच्या संघर्षाच्या वणव्यात लिंगायतांचा मूळचा ‘षट्स्थल’ सिद्धांत आणि विसोबांची त्यावरील ग्रंथाची रचना सर्व सांस्कृतिक प्रवाहांना जोडण्याचं कार्य करू शकते. विसोबांची शिष्यपरंपरा नामदेवांपासून सुरू होते आणि नामदेव नानक, मीरा, नरसी मेहतांपर्यंत भिडून जातात. हेच नामदेव संत परंपरेचा वारसा विकसित करताना अस्पृश्य जातीच्या चोखोबांसह कर्ममेळा, निर्मळा यांच्या भक्तीरचनांची आध्यात्मिक लोकशाही जन्माला घालतात. संत नामदेव तुकारामांच्या रूपानं पुन्हा जन्म घेऊन अवतरतात, अशी वारकर्‍यांची श्रद्धा आहे.

विसोबा खेचर यांच्या नावावर काही मोजक्या अभंग रचना असल्या तरी त्यानी निर्मिलेल्या ‘शडूस्थळ’ ग्रंथाचं महत्त्व काल, आजच्या सांप्रदायिक संपादकांच्या दृष्टीनं निर्णायक महत्त्वाचं ठरतं. कारण लिंगायत तत्त्वज्ञान हेच मुळी षट्स्थल नावानं ओळखलं जातं. तेव्हा लिंगायत आणि वारकर्‍यांचा सांस्कृतिक पूल होण्याचं कर्तृत्व विसोबा खेचर यांच्या नावावर सन्मानित होताना दिसतं.

स्थल म्हणजे ब्रह्म. लींग स्थल म्हणजे शिव. तसंच अंगस्थल म्हणजे जीव. जीवाचं आणि शीवाचं ध्येय म्हणजे ‘लिंगांग सामरस्य’ होय. बसवेश्‍वरांचा हाच अध्यात्मवादी आणि सामाजिक ध्येयवाद आहे. त्याच्याशी वारकर्‍यांचा थेट संवाद घडू शकतो. भक्त स्थळापासून ऐक्यापर्यंत होणारा साधकाचा प्रवास सहा टप्प्यांत होतो तो ‘षट्स्थल’ होय.

लिंगायत पंथीय विद्वानांची ‘षट्स्थल’ विषयक मांडणी आणि विसोबांची मांडणी सारखीच असण्याचं कारण नाही. कारण विसोबांचे जात संस्कार ‘पांचाळ’ परंपरेतून येतात आणि ‘पांचाळ’ जातीनं ब्राह्मण वर्णावर अधिकार सांगण्याची परंपराही दिसते. सारांश विसोबा खेचर यांच्या संबंधानं जन्म, समाधी, उपदेशाचं स्थान या बाबत अनेक मत मतांतरं असली तरी नामदेवांचे गुरू विसोबाच असल्याचं सत्य सर्वार्थानं महत्त्वाचं ठरतं.

संत चरित्रांचा उपयोग आजच्या समाजाचे प्रश्‍न सोडवण्याकामी व्हायला हवा. भारतीय-मराठी समाज एकात्म करण्यासाठी जोडायचा धागा विसोबांच्या कर्तृत्वातून मिळतो. म्हणूनच या उपेक्षीत पण अत्यंत कर्तृत्ववान संत गुरूची उपेक्षा मोडीत काढण्याचं कार्य ‘रिंगण’ने केलंय. या ऐतिहासिक, सांस्कृतिक राष्ट्रीय कामगिरीबद्दल संपादकांचं विशेष अभिनंदन.

0 Shares
सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज परंपरा बंडखोरीची