इथं भाडं आकारलं जात नाही

राहुल बोरसे

आळंदीत मठ खूप आणि लग्नही. त्यामुळे अनेक मठ लग्नाचे हॉल बनलेत. पण संत सावता माळी मठ त्याला अपवाद आहे. इथे विद्यार्थी आणि वारकरी एकही पैसा न देता राहतात. सावता@आळंदी.

आळंदीच्या चावडी चौकातून आतल्या रस्त्यानं माऊलींच्या मंदिराकडे जाताना लोखंडी गेट लागतं. त्याच्या डाव्या बाजूच्या गल्लीत आत गेलं की संत सावता माळी मठ आहे. बाहेरून पाहिलं, तर तिथं मठाच्या काहीही खाणाखुणा दिसत नाहीत. आळंदीत असणार्‍या इतर मठांच्या तुलनेत सावता माळी मठ खूपच साधा आहे. मातीच्या भिंतीवर मठाचं नावही खूपच पुसट अक्षरात दिसतं.

गेट उघडून आत गेल्यावर डाव्या बाजूला थोडी मोकळी जागा आणि त्याला लागूनच काही खोल्या आहेत. उजव्या बाजूनं मंदिरात जायला दरवाजा दिसतो. वारकरी कीर्तन शिकण्यासाठी आळंदीत आलेली मुलं या मठात राहतात. संध्याकाळी निवांत वेळ असल्यानं मुलं गप्पा मारत बसलेली होती. मठाची व्यवस्था कोण पाहतं, असं विचारल्यावर त्यांनी संतोष महाराजांचं नाव सांगितलं.

संतोष महाराजांना फोन केला. ते जवळच होते. लगेचच भेटायला आले. चाळीशीच्या आसपास वय असणारे संतोष महाराज गेल्या चौदा वर्षांपासून आळंदीत राहतात. शिक्षणाच्या निमित्तानं आळंदीत आले. मठात राहिले आणि इथलेच झाले. गेल्या काही वर्षांपासून ते मंदिराची आणि मठाची देखभाल करतात.

संत सावता माळी मठाची स्थापना १९५६मध्ये झाली. खेड परिसरात राहणारे नारायण घुमटकर, महादेव आल्हाट, भिकोबा नरके, गंगारामबुवा कुदळे, गंगाराम कांडपिळे आणि त्यांचे सहकारी महिना वारीसाठी आळंदीत येत. त्यावेळी त्यांनी वर्गणी काढून या भागात असलेली पडीक जागा विकत घेतली. संतोष महाराज सांगतात, ‘दशमी, एकादशी आणि द्वादशीला ते आळंदीत येत. त्यावेळी याच जागेत ते मुक्काम करत. त्यावेळी कापडी मांडव टाकला जाई आणि सगळे वारकरी तिथं निवार्‍यासाठी राहत. पुढं १९५७-५८मध्ये या जागेत मंदिर बांधण्यात आलं. त्यासाठी पुन्हा वर्गणी काढली गेली. या सदस्यांमध्ये माळी समाजाबरोबरच मराठा आणि इतर समाजाचेही भाविक होते.’

वारकरी शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची विनामूल्य राहण्याची सोय व्हावी, असाही उद्देश मठाच्या उभारणीमागे होता. मठाच्या जागेत व्यापार किंवा व्यावसायिक गोष्टी करायच्या नाहीत, हेही ठरलं होतं. आजही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मठाचं कामकाज चालवलं जातंय. इथं राहणार्‍या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. आळंदीत लग्न खूप होतात. त्यामुळे अनेक मठांचा वापर लग्नाचा हॉल म्हणून होतो. मात्र सावता माळी मठ लग्नकार्यासाठी दिला जात नाही. मठात मुक्कामी येणार्‍या वारकर्‍यांसाठी राहण्याची व्यवस्थाही मोफत केली जाते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं भाडं घेतलं जात नाही. आश्रमाचे सभासद आश्रमाचा खर्च स्वतःच्या खिशातून वर्गणी काढून भागवतात.

मठात लग्नं लागत नसली, तरी धार्मिक कार्यक्रम मात्र होतात. रोज सकाळ-संध्याकाळ पूजापाठ होतो. नित्य हरिपाठ म्हटला जातो. माऊलींच्या पालखी सोहळ्यात मठाची दिंडी असते. ही ८० नंबरची दिंडी माऊलींच्या पालखीसोबत जाणार्‍या जुन्या दिंड्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेले ४०० ते ५०० वारकरी दिंडीत सहभागी होतात. पालखी माघारी आल्यावर आषाढ वद्य सप्तमी ते अमावास्येपर्यंत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यावेळी सकाळी काकड आरती, गाथा भजन, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन तर रात्री जागर असे कार्यक्रम केले जातात.

संत सावता माळी मठ अडीच गुंठ्याच्या परिसरात आहे. त्यात संत सावता माळी यांचं मंदिर आणि आजूबाजूला मठाच्या खोल्या आहेत. मंदिराच्या आत जुन्या सभासदांचे फोटो टांगलेले आहेत. मंदिराच्या पुढच्या मोकळ्या जागेत गरुडाची मूर्ती आहे. तिथं बाजूलाच एका कोपर्‍यात विद्यार्थ्यांच्या पेट्या, मृदुंग आणि वीणा ठेवलेल्या दिसतात. देवळाचं दगडी बांधकाम मजबूत आहे. मंदिराच्या आत सावता माळी यांची फेटा घातलेली रेखीव दगडी मूर्ती आहे. मूर्तीच्या हृदयात विठ्ठल आहे आणि पाठीमागंही विठ्ठलाची मूर्ती आहे. संतोष महाराज सांगतात, संत सावता माळी यांचं हे मंदिर अरण इथं असलेल्या मंदिराची प्रतिकृती आहे.

पूर्वी आळंदीत आलेले विद्यार्थी माधुकरी मागून शिक्षण घेत असत. मात्र एकादशीला उपवास असल्यानं विद्यार्थ्यांना उपवास व्हायचा. त्यावेळी आश्रमाचे सरचिटणीस भानुदास महाराज चव्हाण यांनी आळंदीतील विद्यार्थ्यांना दर एकादशीला पंगत देण्याचा कार्यक्रम सुरू केला. अजूनही ३०० ते ३५० विद्यार्थ्यांना दर एकादशीला फराळाची पंगत दिली जाते. गेली अनेक वर्ष कुठलाही खंड न पडता ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.

आळंदीत येणारे विद्यार्थी आणि वारकर्‍यांसाठी आजही हा मठ एक हक्काचं ठिकाण आहे. त्यामुळंच मराठवाडा, खान्देश, नाशिक, कोल्हापूरसह वेगवेगळ्या भागातून वारकरी आणि विद्यार्थी या मठात मुक्कामाला येत असतात. सावता माळी मठ त्यांना आपलाच वाटतो. हेच सावतोबांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचं व्रत वर्षानुवर्ष आचरल्याचं फळ आहे.

0 Shares
लऊळमधलं देऊळ भक्तीमधल्या एकतेचं मुंबईनंही जपलीय सावतोबांची प्रेरणा